Monday, January 2, 2012

कातळमाया (टेररिस्ट)


फक्त थरकाप उडविण्यापुरते डोळे, श्वास घेण्यापुरते नाक आणि धमक्या उच्चारण्यापुरतं तोंड उघडं ठेवणाऱया दहश्तवाद्यांच्या बुरख्यावरचा छाप कोणताही असो आत चेहरा एकच असतो, दहशतवाद्याचा, `टेररिस्ट'चा.
  मानवी जीवनातील सर्व भावभावना, आशाआकांक्षा पद्धतशीरपणे खुडून काढून मेंदूत एकाच (सोयिस्करपणे `उदात्त') ध्येयाच्या पूर्ततेचं कलम केलेल्या या चेहऱयाच्या आत कुठे माणूसपणाचा अंश शिल्लक असतो का?
 दोन राष्ट्रीय आणि चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकाविलेला संतोष सिवन लिखित-दिग्दर्शित आणि छायांकित `टेररिस्ट' या प्रश्नाचा शोध घेतो.
  एलटीटीईने श्रीपेरुम्बूदूर येथे घडवून आणलेल्या राजीव गांधी यांच्या हत्येचा स्पष्ट संदर्भ या सिनेमाला आहे. सिनेमात दहशतवादी संघटनेचा, तिच्या नेत्याचा वा मारल्या जाणाऱया `व्हीआयपी'चा कुठेही नामोल्लेख नाही. पण, हत्येची पूर्वतयारी, हत्येसाठी वापरलेलं मानवी बॉम्बचं तंत्र आणि सिनेमाची पार्श्वभूमी हा संदर्भ लख्खपणे स्पष्ट करते.
  मग तसा स्पष्ट उल्लेख सिनेमात का नसावा? राजीव गांधी हत्येवर बेतलेले `कुत्रीपत्रिकाई' (चार्जशीट) आणि `भारतरत्न' हे सिनेमे सर्वेच्च न्यायालयात रखडले आहेत. त्यामुळे कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी संतोष सिवननं ही चतुराई केली असेल का?
 तसं वाटत नाही. कारण `टेररिस्ट' हा काही सत्यघटनेवर आधारीत थ्रिलर नाही. हत्येशी संबंधित कोणताही पैलू प्रेक्षकानं थरारक `मनोरंजना'च्या पातळीवर ग्रहण करावा, अशी संतोष सिवनची अपेक्षा दिसत नाही. एका बडय़ा नेत्याच्या हत्येसाठी मानवी बॉम्ब बनण्याचं, जाणीवपूर्वक शहीद होण्याचं धाडस दाखवणाऱया तरुण मुलीच्या भावविश्वातल्या घडामोडी, उलथापालथी, सूक्ष्म बदल तरलपणे चित्रित करण्याचा हा प्रयत्न आहे.
  ही कथा आहे मल्लीची (आयेशा धारकर). आपल्या `देशा'साठी तरुणपणात प्राणार्पण केलेल्या बंडखोराची (म्हणजेच दहशतवाद्याची) ही बहीण, तीही आपल्या आपल्या राष्ट्राच्या निर्मितीला सर्वस्वानं वाहून घेतलेली एक `टेररिस्ट' आहे. तिच्या व्यक्तिगत आकांक्षा, भावभावना, नैसर्गिक प्रेरणांचं दहशतवादाच्या धगधगत्या होमकुंडात हवन झालं आहे. तिच्या मनात फक्त एकच विचार- मी माझ्या देशासाठी सर्वेच्च आहुती देईन. हा देश म्हणजे काय, त्यासाठीची आहुती म्हणजे काय, या देशाच्या उद्धारासाठी हेच मार्ग योग्य कसे, असे प्रश्न तिला पडत नाहीत. कारण, ती एकचालकानुवर्ती संघटनेची यंत्रमानववजा पाईक आहे. शत्रूचा किंवा स्वत:चा मृत्यू, यापलीकडे तिच्या विश्वात `घटना'च नाही.
  तिच्या `गुणां'मुळे तिची एका खास कामासाठी निवड होते. संघटनेच्या ध्येयात अडसर बनलेल्या एका `व्हीआयपी'च्या हत्येसाठी तिला मानवी बॉम्ब बनायचं आहे.
 हौतात्म्याच्या प्रबळ भावनेतून निडरपणे ती ही जबाबदारी स्वीकारते. शत्रूसैनिकांनी बुजबुजलेल्या प्रदेशातून मार्ग काढून हत्येच्या नियोजित प्रदेशातून मार्गा काढून हत्येच्या नियोजित स्थळाजवळच्या गावात पोहोचते. तिथं एका बडबडय़ा वृद्धाच्या घरात खोटय़ा निमित्तानं आसरा घेते.
   परमोच्च त्यागाच्या ध्येयानं पछाडलेल्या तिच्या `प्रोग्रॅम्ड' मेंदूत मानवी स्पर्श लाभलेली एकच आठवण शिल्लक आहे. `युद्धा'त जायबंदी होऊन पडलेल्या एका तरुण पुरुष साथीदाराबरोबर नैसर्गिक ओढीनं घडून आलेल्या शरीरसंबंधाची. तिच्या निबीड एकांतात हीच आठवण मध्येमध्ये लकाकून जाते. हा मानव्याचा स्पर्श सुफळ-संपूर्ण रुप धारण करतो गरोदर असल्याची जाणीव तिला झाल्यावर. तिच्या उदरात एक जीव आकार घेतोय आणि ती स्वत:बरोबर आणखी एकजीव संपविण्याच्या तयारीत आहे...
 व्हीआयपीच्या स्वागताला हार घेऊन उभ्या असलेल्या स्त्रियांच्या घोळक्यातली मल्ली त्या व्हीआयपीच्या गळ्यात हार घालते. नमस्कारासाठी खाली वाकून पोटाला बांधलेल्या स्फोटक-पट्टय़ाच्या कळीवर हात नेते आणि...
  इथे सिनेमा संपतो, तिची एक निश्चित कृती घडवून. ही कृती काय असते, हे इथे जाणून घेण्यात हशील नाही. महत्त्वाचा आहे तो प्रवास.
  हा प्रवास संतोष सिवन ताकदीनं घडवतो खरो, पण तुकडय़ा-तुकडय़ांच्या जोडणीतून. प्रत्येक तुकडय़ाचं स्वतंत्र अस्तित्व दिसतं, जाणवतं पण एकसंध परिणाम...? तो मात्र घडत नाही.
  `टेररिस्ट'सारख्या सिनेमाकडून व्यावसायिक सिनेमासारखा ढोबळ, बटबटीत परिणाम अपेक्षित नाहीच. पण, सिनेमाच्या रचनेतून दिग्दर्शकाला प्रेक्षकाची संपूर्ण तटस्थताही अपेक्षित नसावी. प्रेक्षकाच्या मनाचा तळ डहुळवण्याचं सामर्थ्य त्यात असायला हवं होतं, `टेररिस्ट' तुकडय़ा-तुकडय़ांत काही तरंग निर्माण करतो, पण अंतिमत: प्रेक्षक बाहेर पडतो तो कोरडाठाक, काहीसा अस्वस्थ झालेला, पण दिग्दर्शकाला अभिप्रेत अर्थानं नव्हे.
 सिनेमातल्या घटनांचा बेतलेपणा समजत राहतो, हे याचं एक कारण आहे. पटकथेच्या रचनेमुळे या सिनेमाची उभारणी `आधी कळस मग पाया' पद्धतीनं झाली असावी, असं वाटत राहतं. ते मत बटबटीत शेवटामुळं जवळपास पक्कं होऊन जातं. राजीव गांधीच्या हत्येच्या घटनेनंतर मानवी बॉम्ब धनूच्या मनात त्या वेळी नेमकं काय सुरू असेल, अशा कल्पनेतून या सिनेमाची सुरुवात झाली आहे हे नक्की. एका दहशतवादी स्त्राeच्या अस्तित्वाभोवती काही काल्पनिकप्रसंग रचून तिच्या मनोव्यापारांचा शोध घेण्याचा प्रयत्नही प्रामाणिक. या प्रवासात तिचं मातृत्व आपसूक उमलून आलं असतं, तर कदाचित `टेररिस्ट' वेगळा झाला असता पण हा सिनेमा आणि त्याचा शेवट पाहिल्यानंतर `ज्या पोटावर तिनं स्फोटकांचा पट्टा बांधला, त्याच पोटात मूल असतं तर' अशा चमकदार भासणाऱया पण अतिनाटय़पूर्ण `लाऊड' कल्पनेपासून सिनेमाची सुरुवात झाली असावी, अशी शंका येते.
  इथे संतोष सिवनच्या प्रामाणिकपणाविषयी शंका घेण्याचं कारण नाही. त्यानं मल्लीचं भावविश्व प्रतिमांमधून ज्या सामर्थ्यानं आणि सहानुभावानं पडद्यावर उतरवलं आहे तो नेणिवेच्या पातळीवरचा अनुभव आहे, जाणिवेच्या माध्यमातून दिलेला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा फोकस (सर्वार्थानं) फक्त मल्लीवरच आहे.
  सगळ्या घटना तिच्या संदर्भातच घडतात. त्यासाठी तो एकाच दृश्यचौकटीतल्या दुय्यम महत्त्वाच्या घटना सरळसरळ `डिफोकस' (धूसर) करून फक्त मल्लीला शार्प फोकसमध्ये ठेवण्याचं धारिष्टय़ दाखवतो. संघटनेचा नेता आणि व्हीआयपी यांचा चेहरासुद्धा दाखवत नाही. नेत्याच्या आशीर्वादपर भेटीत त्याचं अस्तित्व फक्त प्रेरणादायी संभाषणातून आणि पोशाख पेहेरलेल्या देहाच्या माध्यमातून घडतं. तिथंही महत्त्वाचा असतो मल्लीवरला परिणाम.  
त्याचा कॅमेरा मल्लीवरून हटतो तो फक्त तिच्या भावविश्वाशी कळत-नकळत सांधल्या गेलेल्या घटना आणि निसर्गप्रतिमा चित्रित करताना. सुरुवातीच्या गद्दाराच्या हत्येनंतर स्वच्छ-नितळ पाण्यात हेलकावत प्रवाहात वाहत जाणारा रक्ताचे डाग पडलेला बुरखा, हिरव्याकंच पसरट पानात साठत हिंदकळणारे पावसाच्या पाण्याचे थेंब, एकमेकांचा हात धरून खिदळत शाळेकडे निघालेले मुलगा आणि मुलगी, मल्लीच्या केसांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब आणि कुंद घुसमटीचा प्रत्यय देणारा पाऊस, अशा प्रतिमांच्या वापरातून संतोष मल्लीच्या विविध भावावस्था समर्पकपणे साकारतो.
  शब्दांत पकडता न येणारा, सिनेमाकलेची दृश्यात्मक ताकद सार्थकी लावणारा एक जबरदस्त क्षण या सिनेमात आहे. बडबडय़ा म्हाताऱयाच्या घरात आल्यावर मल्लीला खोली मिळते, ती त्याच्या दिवंगत मुलाची. अव्वल दर्जाचा छायाचित्रकार असलेल्या या मुलाच्या खोलीमध्ये सर्व भिंतीवर त्यानं काढलेली छायाचित्रं आहेत, ती सगळी आहेत पोट्रेट्स, विविध जाती-धर्म वयाच्या माणसांचे क्लोजअप्स. मल्ली या खोलीत येते आणि आसपास नजर टाकते, तेव्हा त्या विलक्षण जिवंत चेहऱयांमुळे तिच्या एकांताला एकदम गर्दीत हरवल्याचं परिमाण मिळतं. हा शांत कल्लोळाचा क्षण लाजबाब आहे.
 अबोल, अंतर्मुख मल्लीचं बडबडय़ा म्हाताऱयाशी जुळत जाणारं नातंही अकृत्रिम स्नेहभावानं ओथंबलेलं आहे. त्यात काहीसा `बेतलेपणा' येतो तो म्हाताऱयाच्या पत्नीच्या रुपानं. मुलाच्या मृत्यूनंतर मल्लीच्या पलीकडच्याच खोलीत एका कुशीवर डोळे उघडे ठेवून पण निष्प्राण गोळा होऊन पडलेली ती म्हातारी त्या पोर्ट्रेट्सच्या गर्दीत बराच काळ पोर्ट्रेटच वाटत असते. तिच्या अस्तित्वाची चाहूल मल्लीला लागल्यानंतर आधी ती सावध होते. पण म्हातारीच्या `निरुपद्रवी'पणाबद्दल खात्री पटल्यावर तिच्याशी मल्लीचं एक मूक नातं तयार होतं.
  गरोदरपणाची चाहूल लागल्यानंतर मल्ली अंतर्यामी मृदू होऊ लागते. हा केवळ शरीरातला बदल नाही, मातृत्व ही जीवनदायित्वाची जाणीव आहे, याचा साक्षात्कार तिला सैरभैर करतो. ती `मोहिमे'च्या दिवशी म्हातारीचा निरोप घ्यायला जाते, तेव्हा तोवर, गेल्या आठ वर्षांत स्वेच्छेनं पापणीही न फडकावलेली म्हातारी तिच्या हातावर काही क्षणच पकड घट्ट करते.
  आपणही माणूस आहोत, आपल्यालाही भावना आहेत, याचा मल्लीला एकोणीस वर्षांत प्रथमच शोध लागण्याची प्रक्रिया संतोषनं अतिशय हळूवारपणे चित्रित केली आहे. म्हणूनच त्याचा सिनेमाचा शेवट निराशा करतो. ही निराशा कोणत्याही कृतींतून घडत नाही, तर एका पार्श्वध्वनीमधून घडते. त्या निकराच्या क्षणाला पोटावरच्या स्फोटक पट्टय़ावर मल्लीचा हात असताना, बाळाच्या रडण्याचा टय़ाँहा ऐकू येतो. हा ढोबळपणा मन विरजून जातो.
 असल्या प्रतिकात्मकतेच्या आहारी गेलेल्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा बिल्कुलच नाही. जो या सिनेमाचा प्रेक्षक आहे, त्यानं शब्दांविना केवळ प्रतिमांमधून एका कोवळ्या मुलीचा मनोव्यापार जाणून घ्यावा, अशा अपेक्षेनं संतोषनं हा सिनेमा बनवला आहे. मग शेवटी हे करण्याची गरज काय होती?
  मल्लीच्या भूमिकेत आयेशा धारकरला पाहणं हा अविस्मरणीय अनुभव आहे. तिचा आडवागोल चेहरा, मोठ्ठे डोळे, रुक्ष ओठ, सावळट रंगरुप या शारीरवैशिष्टय़ांमधूनच मल्ली निम्मीअधिक साकार होते. गद्दाराच्या हत्येच्या वेळी उदात्त प्रेरणांमधून उद्भवणारं क्रौर्य, नेत्याचं भाषणवजा संभाषण ऐकतानाची भक्तिभावी एकतानता, लहानग्या `लोटस'च्या मदतीनं सुरुंगांनी बुजबुजलेलं रान दक्षतेनं पार करताना नकळत येणारा हळुवारपणा, लोटसनं (अत्यंत फिल्मी पोझमध्ये बसून) सांगितलेली स्वत:ची कर्मकहाणी ऐकतानाची उद्विग्नता, म्हाताऱयाच्या घरातला सावध वावर, मनात उमटणाऱया `त्या' आठवणींमुळे येणारी मुग्धता, त्या निपटून काढण्याची धडपड, मातृत्त्वाच्या चाहुलीनं झालेली असोशी, या सगळ्या अवस्था तिनं अत्यंत परिणामकारकपणे रंगवल्या आहेत.  
यापैकी अनेक भावच्छटा एकमेकींत गुंतून येतानाही स्वतंत्रपणे दाखवतो तिचा चेहरा. `पाहा मी कसा अभिनय करतेय', अशी दाखवेगिरी करण्याची यत्किंचितही संधी नसलेली ही भूमिका आयेशानं ताकदीनं पेलली आहे.  बहुश: प्रतिमांमधून व्यक्त होणारा सिनेमा पचविण्याची ताकद असणाऱया प्रेक्षकाला हा सिनेमा दुर्मिळ आनंदाचा (अपुरां का होईना) अनुभव देईल आणि `निव्वळ प्रतिमांचा सिनेमा ही काय भानगड असेल बुवा', अशी उत्सुकता जागृत झालेल्या प्रेक्षकाला त्याच्या `सहनशीलते'च्या समप्रमाणात `वेगळं काहीतरी' पाहिल्याची अनुभूती मिळेल.

No comments:

Post a Comment