Friday, January 13, 2012

चक्रम आणि चटकदार भेळपुरी (बॉम्बे बॉईज)


वाहवा! ब्राव्हो! भले शाबास!
अखेर एक सिनेमा असा पाहायला मिळाला ज्याची कथा नेहमीच्या भाषेत सांगता येत नाही आणि वाचणाऱयाला ती वाचून `कळला सिनेमा, आता पाहायची गरज काय' अशी सुटका करून घेता येत नाही. ज्या सिनेमातला अभिनय, छायालेखन, संगीत, दिग्दर्शन वगैरे अंगांची अनुक्रमे `प्रत्ययकारी', `नेत्रसुखद', `श्रवणीय', `सफाईदार' अशा टिपिकल विशेषणांनी बोळवण करताय येत नाही.
 सिनेमाचा विचार न करण्याची हिंदी सिनेमांनी लावलेली अंगवळणी पडलेली सवय मोडून काढणारा हा येडचाप सिनेमा आहे कैझाद गुस्ताद दिग्दर्शित `बॉम्बे बॉईज'
 हा पडद्यावर दिसतो, थिएटरात जाऊन पाहावा लागतो म्हणून सिनेमा म्हणायचा. प्रत्यक्षात ही भेळ आहे भेळ. खुद्द कैझादनीच एका मुलाखतीत सांगितलंय की, त्याला `बॉम्बे बॉईज'च्या रुपानं भेळपुरीच बनवायची होती. त्याची मनीषा पूर्ण झाली आहे. `बॉम्बे बॉईज' ही विलक्षण टेसदार, चटपटीत भेळ झाली आहे.
  म्हणजे काय ते समजण्यासाठी आधी भेळेची कल्पना समजून घ्यायला हवी. भेळेत काय काय असतं? शेव, चुरमुरे, दाणे, फुटाणे, चिंचेचं पाणी, सीझन असेल तर कैरी, स्वस्त असेल तेव्हा भरपूर कांदा वगैरे वगैरे. आता यातला प्रत्येक पदार्थ आपण स्वतंत्रपणे खाऊ शकतो, त्याला स्वतंत्र चव आहे. पण, भेळेत काय होतं? भेळेत हे सर्व पदार्थ एकजीव मिश्रित झाले, की तशी प्रत्येक पदार्थाची वेगळी चव कळते; पण तिला इतर पदार्थांचा `वास' लागलेला असतो. भेळेतली शेव एरवीच्या शेवेसारखी लागत नाही, भेळेतला कांदा, मिरची, कैरी कुठलाच पदार्थ त्याच्या स्वंतंत्र' चवीनं जाणवत नाही. आपल्याला चटकदार चव कळते ती भेळेची.
  अकारण तोंडाला पाणी आणणारी ही रसचर्चा एवढय़ासाठी की `बॉम्बे बॉईज'मध्ये कथा-पटकथा- संवाद-अभिनेते- अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत एवढे सारे `पदार्थ' आहेत, त्यांची एरवी `स्वतंत्र'पणे चव घेण्याची आपल्याला सवय आहे. इथे हे सगळे घटक एकमेकांच्या चवींवर अतिक्रमण करून एकमेकांची चव बिघडवतात आणि एक वेगळीच चव घडवतात.
  सांगायचंच ठरलं तर `बॉम्बे बॉईज'ची कता सांगता येते थोडीफार. कृष्णा साहनी (नवीन अँड्रय़ूज), रिकार्डे फर्नांडिस (राहूल बोस) आणि झर्क्सेस मिस्त्राe (अलेक्झांडर गिफोर्ड) हे तीन अनिवासी भारतीय तरुण एकाच वेळी भारतात येतात. योगायोगानं तिघेही मुंबईत एकाच खोलीत पेइभग गेस्ट म्हणून वसतात.
 कृष्णा आलाय न्यूयॉर्कहून अभिनयाच्या डिगऱया घेऊन हिंदी सिनेमात अभिनेता बनण्यासाठी, रिकार्डे आलाय ऑस्ट्रेलियाहून आपल्या भावाचा शोध घेण्यासाठी. झर्क्सेस आलाय लंडनहून `बॉम्बे बॉईज' नावाच्या एका पॉप वाद्यवृंदात वादक बनण्यासाठी.
  हे तिघेही वंशानं भारतीय आहेत पणं जन्म आणि कर्मानं परदेशी आहेत. तिघांची भारतात येण्याची कारणं वेगवेगळी असली तरी आतलं कारण एकच आहे. त्यांच्या अस्तित्वातलं काहीतरी कुठेतरी हरवलंय आणि ते भारतातच सापडेल, अशी त्यांची खात्री आहे, या `मायभूमी'ला कधीही भेट न देता.
  इथे त्यांना भेटलेला पेसी श्रॉफ (रोशन सेठ) हा घरमालक `गे' आहे, संमलिंगी संबंध ठेवणारा. त्यानं खास चेहऱयामोहऱयात पारशी वेगळेपणा असलेल्या झर्क्सेसवर डोळा ठेवून त्यांना जागा दिलीये. कृष्णा ज्या चित्रपट निर्मात्याला काम मिळवण्यासाठी भेटतो तो मस्ताना (नसीरुद्दीन शहा) हा एक बी ग्रेड निर्माता आणि ए-ग्रेड `भाई' माफिया डॉन आहे. त्याला पैसे गमावण्यासाठी एक फ्लॉप सिनेमा काढायचाय. या कामी कृष्णाचं `अभिनयकौशल्य' उपयोगी पडेल, अशा हिशोबाने तो कृष्णाची इच्छा नसताना त्याला हीरो बनवून टाकतो. डॉली (तारा देशपांडे) ही चंड आणि टंच पोरगी त्याची रखेल आहे. कधीतरी मस्ताना आपल्याला हिरोईन बनवेल, या आशेवर ती त्याच्याशी संबंध ठेवून आहे.
 रिकार्डेची डॉलीशी भेट होते. त्याला तिच्याबद्दल आकर्षण, सहानभुती, कुतुहल असं काहीतरी चमत्कारिक वाटू लागतं. तिला आधी हा `डॉलर्स'मध्ये पेमेंट करणारं `गिऱहाईक' वाटतो. पण, तीही त्याच्या नितळ भावनेकडे आकर्षिली जाते. इकडे झर्क्सेसला `बॉम्बे बॉईज' या `बांगलादेशात लोकप्रिय' असलेल्या वाद्यवृंदाचा पत्ता लागतो. तसेच आपणही `गे'च आहोत याचाही शोध लागतो.
  कृष्णाच्या उटपटांग सिनेमाचं शूटिंग, रिकार्डेचं डॉलीप्रकरण, त्याचा मस्तानाला आलेला राग, `बॉम्बे बॉईज'ची तथाकथित सुपरहिट कंपोझिशन्स बनवण्याची धडपड, रिकार्डेच्या भावाचा शोध आणि या चौघांभोवती धडधडणारं मुंबई हे अफलातून जिवंत शहर असलेल्या सगळ्या कथासूत्राच्या गुंतागुंतीतून `बॉम्बे बॉईज' एका करुण पण हास्यकारक शेवटाकडे जातो. सुरुवात ते शेवट यातला प्रवास खुसखुशीत, कुरकुरीत प्रसंगांमधून स्मितहास्यापासून सातमजली गडगडाटापर्यंत तरतऱहेचे हशे वसूल करत जातो. हसता हसता प्रेक्षक अधेमधे अंतर्मुखही होतो.
  आता हे कथानक वाचल्यावर अशी समजूत होऊ शकते, की (शेवट वगळून) सर्व सिनेमा समजला. ही गैरसमजूत आहे, कारण शब्दांच्या भाषेत व्यक्त होऊ शकणारा हा एक बारीकसा धागा आहे. भेळीतला चुरमुऱयाचा `बेस' म्हणूयात हवं तर! पण, दृश्यांच्या भाषेत पडद्यावर जे काही घडतं त्यात चित्रपट बनविण्याच्या सर्व शैलींची सरमिसळ एक अद्भुत रसायन तयार करते.
  उदाहरणार्थ, `बॉम्बे बॉईज'चे कफल्लक फटिचर वादक-गायक एका कंठाळी चालीचा नमुना झर्क्सेसपुढे पेश करताहेत, त्याला इम्प्रेस करण्यासाठी. `हे।़हे।़।़ हे।़।़।़हे।़।़।़' असा निव्वळ आरडाओरडा ऐकून झाल्यावर झर्क्सेस त्यांना शांतपणे सांगतो, ``चाल उत्तमच आहे; पण अठराव्या ओळीतला सातवा `हे' थोडा `फ्लॅट' गेला.
  डॉली टबबाथ घेते आहे. दारात मस्तानाचे दोन सांड पहारेकरी. तिला भेटायला आलेला रिकार्डे त्यांना विचारतो, `डॉली आहे का?' ते संतापून त्याला मारहाण करतात. तो उठून पुन्हा येतो, तोच प्रश्न विचारतो. पुन्हा बेदम मार. तो पुन्हा येतो, तोच प्रश्न, तसाच मार; पुन्हा पुन्हा पुन्हा तेच. शेवटी हे सांडच विरघळतात. त्याला रडवेल्या सुरात सांगतात, `डॉली घरात नाही. ती बाहेर गेलीये.' तो या अमूल्य माहितीबद्दल थँक यू' म्हणून जिना उतरू लागतो.
  मस्तानाच्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. एका सडियल सीनमध्ये मस्तानाला अभिनयाचा आविष्कार दिसतो. तो भडकतो. त्याला फ्लॉप सिनेमा बनवायचाय ना! अरे बरे सीन वठले तर सिनेमा चालेल की काय, अशी भीती त्याला वाटते. तो चिडून डायरेक्टरच्या डोक्यावर त्याचाच कर्णा (मेगाफोन) मारून त्याला जायबंदी करतो आणि चहावाल्या पोऱयाला `डायरेक्टर' बनवून मोकळा होतो.
  मस्तानानं `बॉम्बे बॉईज'चा वाद्यवृंद आणि तिन्ही नायकांना एका क्लबात इंट्रोडज्यूस केलंय. `तिथे सगळ्या लठ्ठ, मध्यमवयीन, अतिमेकपवान, ओघळलेल्या, थुलथुलीत बायका नायकांचा कॅब्रे पाहतात. जसे हपापलेले अधाशी पुरुष कॅब्रेनर्तकाची नग्नता वखवखून टिपतात, तशीच या बायकाही नायकांशी झोंबाझोंबी करतात. आणि या सगळ्याचा `आनंद लुटतोय' असा केविलवाणा भाव नायकांच्या चेहऱयावर.
  मस्तानाच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये कृष्णाच्या प्रेमदृश्याचे `क्लोजअप' घेण्याचं काम चाललंय. फ्रेममध्ये फक्त कृष्णाच दिसणार असल्यानं नायिकेच्या जागी एक जाडा, काळा, टकलू, दाढीधारी दांडगट मठ्ठोबा बसवला जातो. आपल्या `दिव्य' हिंदीत कृष्णा ते अतिरोमँटिक शब्दांचे फुसकट बुडबुडे मेहनतीनं सोडू पाहतो; पण त्याला त्या राकट चेहऱयाशी रोमान्स काही केल्या करता येत नाही. त्याचा संवाद पूर्ण म्हणण्याचा प्रयत्न पाच-सहा वेळा फसल्यावर तो दांडगोबा नम्रपणे विचारतो, मी दाढी काढून टाकली तर काही मदत होईल का?
 `बॉम्बे बॉईज'ची अशी कितीतरी दृश्यं स्वतंत्रपणे सांगता येतील. पण ती भेळीतले दाणे निवडून खाल्ल्यासारखी किस्सेबाजीच्या पातळीवर राहतील. सिनेमाचा एकंदर पोत कळावा, म्हणून ही उदाहरणं सांगितली.
 पण असली फर्मास हास्यस्फोटक दृश्यं फक्त हास्यस्फोटक आहेत का? रिकार्डे डॉलीला भेटण्यासाठी मार खात असतो, तेव्हा आत डॉली मनगटाची शीर कापून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असते. मस्ताना डायरेक्टरच्या डोक्यात कर्णा हाणत राहतो, तेव्हा चिळकांडय़ा उडतात त्या खऱया रक्ताच्या. झर्क्सेस `बॉम्बे बॉईज'ची टेर खेचतो, तेव्हाही त्यांचं (त्यांना समजणाऱया) संगीतानं झपाटलं जाणं अस्वस्थच करतं आपल्याला. आणि नायकांच्या कॅब्रेवर हसताना असाच प्रकार पुरुष-बाईची अदलाबदल झाली की, किती चवीनं `एंजॉय' केला जातो, ही जाणीवही पराणीच लावते आतल्या मनाला.
 सिनेमाचा खरा पोत असा व्यामिश्र स्वरुपाचा आहे. तो हसता हसता गंभीर करतो, गंभीर भासणाऱया प्रसंगांत हसवतो, कधी कशाची करुणा येते, कधी कशाचा रागही. या सगळ्या भावनांचे रंग कैझाद एकावर एक, त्यावर तिसरा, चौथा, असे फटकारे मारून एकमेकांत गुंतवतो, सुटे करतो, वळवतो, फिरवतो आणि त्यातून एक ऍबस्ट्रक्ट चित्र साकारतं. परिचित दृश्यांच्या भाषेत अर्थहीन पण तरीही समोर बांधून ठेवणारं.
  बेशिस्त हा या सिनेमाचा प्राण आहे. पण ही भाववृत्तीतून आलेली बेशिस्त आहे. तमाम लेबलधारी रचना, भावना, शैलींची दुनिया हा गालिबच्या भाषेतला `बाजीचा--अतफाल' असल्याच्या कलंदंरी जाणीवेतून आलेली बेशिस्त आहे. कुठेतरी `जिप्सीं'च्या बंडखोरीशी साधर्म्य सांगणारी...साठोत्तरी मराठी साहित्यातील लिटल् मॅगझिनशी नातं सांगणारी. सर्व संकेत झुगारणारी बेदरकार बेशिस्त.
  म्हणूनच एरवी चित्रचौकटींचे रूढ नियम न पाळणारा कैझादचा कॅमेरा रिकार्डेला भावाची कबर सापडते, तेव्हा कुठल्याही साचेबंद सिनेमातल्यासारखा क्रेनवरून हळूहळू उंचावर जाऊन स्मशानातल्या गर्दीतलं जिवंत माणसाचं एकटेपण अधोरेखित करतोच. `बॉम्बे बॉईज'चे नामकरण सरकारी अधिनियमानुसार `मुंबई बॉईज' करावे, अशी नोटीस बजावायला आलेला मराठी अधिकारी दाखवताना तो उच्चभ्रू `बॉम्बेवासियां'ची प्रातिनिधिक तिखट, जळजळीत कॉमेंटही थेटपणे करतो. डॉलीबरोबर स्लायलिश फोटो काढायला गेलेला मस्ताना फोटोग्राफरसमोर रखेलरुपी `मालकीच्या वस्तू'चं `हक्कानं' चुंबन घेतो आणि अवहेलनेच्या पराकोटीला पोहोचलेली डॉली जेव्हा `इधरीच करने का है तेरेकू?' म्हणून त्याचे कपडे फाडू लागते, तेव्हा स्तिमित करणाऱया भावनोद्रेकाचं दर्शन घडतं.
 इथे पेसी झर्क्सेसला ऐकवतोसुद्धा की, भारत हे तुम्हा अनिवासी मंडळींचं `इमोशनल डंपिंग ग्राऊंड' आहे. सगळ्या भावनांचा निचरा करायची कचरापेटी. भलतीकडे रूजून वाढल्यावरही तुम्हाला काही कमतरता भासतात स्वत:मध्ये. मग स्वत:चा शोध घ्यावासा वाटला, काहीही शोधावंसं वाटलं की निघालात भारताकडे.
 इथला झर्क्सेस रेल्वेतल्या एका एकतारी वाजविणाऱया भिकारी पोराचा शोध घेऊन त्याला कोरं करकरीत व्हायोलिन देण्याचा स्वप्नाळूपणाही करतो.
  आता सांगा, लागते या सिनेमाची काही टोटल?
 तो पाह्यल्यावरही ही टोटल लागत नाहीच. कारण भेळपुरीमध्ये सकस आहाराची पौष्टिक मूल्यं शोधायची नसतात. तिची तिखट- गोड-आंबट- खारट तुरट भेळचव डोळ्याच्या कडांना पाणी, नाकावर तांबूसपणा आणि टाळूवर धर्मबिंदू जमेपर्यंत जिभेवर चरचरू द्यायची असते.
  असल्या कोलाज कल्पना मनात सुचणं एकवेळ सोपं असतं, पण त्या लेखक-दिग्दर्शक म्हणून पडद्यावर उतरवायला प्रतिभेचं काही देणं असावं लागतं आणि (`प्र' किंवा `स्वयं) शिक्षणाची काही जोड असावी लागते. कैझाद हा सिनेमाचं विधिवत प्रशिक्षण घेतलेला न्यूयॉर्क विद्यापीठाच्या फिल्म स्कूलचा विद्यार्थी आहे. झुल्यावरून वेडंवाकडं हा सर्वात निष्णात झुलापटू असावा लागतो. तसाच कैझादही `फिल्ममेकिंग'च्या विविध शैलींचा अभ्यासक असल्यानंच त्यांची `भेळ' बनवू शकला आहे.
   त्यानं कलावंतही फारच चोख निवडले आहेत. नवीन, राहुल आणि अलेक्झांडर यांचं दिसणंच मुळी त्या त्या भूमिकेचं दिसणं आहे. जे जिथून आले आहेत त्या प्रत्येक देशाची इंग्रजी उच्चरणाची शैली (ऍक्सेंट) प्रत्येकानं अचूक उचललीये. नवीनच्या चेहऱयावरचा मिष्किलपणा, राहुलची भाबडी सिन्सियर मुद्रा आणि अलेक्झांडरचा गोंधळलेला `पारशी' चेहरा यांचा त्या त्या भूमिकेच्या मांडणीत जसा उपयोग होतो तसाच एकमेकांना छेद देऊनही एका पातळीवर एकात्म होणारे स्वभाव दर्शवायलाही. रोशन सेठचा पारसी बीभत्स न होताही चवचालपणा दाखवतो.
  तारा देशपांडेची डॉली आणि नसीरचा मस्ताना हे अविस्मरणीय. गेली काही वर्षे व्यावसायिक पटांच्या वर्तुळाबाहेरच्या सिनेमांमध्ये वावरूनही `अभिनेत्री' पण न गवसलेल्या ताराला `बॉम्बे बॉईज'च्या डॉलीमध्ये ते अलगद मिळून गेलंय. स्वच्छंद जगण्याच्या आभासी स्वातंत्र्याच्या हव्यासायी मस्तानाच्या रखेलीपदाची कैद भोगावी लागणारी `डॉली' तिनं यथार्थ साकारली आहे. ती एकाच वेळी निरागस- मादक-साधी- चालू आणि बरंच काही वाटत राहते.
  मस्ताना ही भूमिका केवळ नसीरच करू शकला असता. त्याची ती अर्धशिक्षिताची इंग्रजी भाषा, गुर्मी, डॉलीवरची सत्ता आणि तिचीच भावनिक गुलामी, सत्तेच्या मदातून आलेली हेकट वेडसरपणाची झाक, क्वचित दिसणारा निर्बुद्धपणा, या सगळ्या शेडस् साकारणारा नसीर अंगावर काटा आणतो. एखादा प्रयोगशील, अभ्यासू अभिनेता बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर कसा रसाळ पिकत जातो आणि केचकडय़ाच्या पट्टीवर किती अद्भुत अवर्णनयी असा आनंद देऊन जातो, याचा प्रत्यय नसीरच्या अभिनयातून मिळतो. एकेकाळच्या आशयघन सिनेमाच्या चळवळीच्या प्रमुख आधारस्तंभ असलेला नसीर नव्या युगात कालबाह्य झालेला नाही, उलट, नव्या पिढीच्या प्रयोगशील दिग्दर्शकांनाही त्याचाच आधार घ्यावंसं वाटतं, यातच त्याचं मोठेपण स्पष्ट होतं.
  राम येडेकर यांचं कलादिग्दर्शन, बर्जेर दस्तूर यांची चित्रणस्थळांची निवड, छायालेखन या तांत्रिक बाजूंनी `बॉम्बे बॉईज'च्या तिरपागडय़ा रचनेचा तोल सांभळला आहे. आशुतोष फाटक आणि ध्रुव घाणेकर या तरुण संगीतकारांनी सिनेमाच्या प्रकृतीला साजेसं, अनेक संगीतशैलींचा प्रभाव एकवटणारं संगीत- पार्श्वसंगीत दिलं आहे.
  सिनेमाचे साचे बघण्याच्या सरावानं नजर आणि मन मेलं नसेल तर त्याला काहीशी तरतरी आणण्यासाठी `बॉम्बे बॉईज' पाहावा. त्या साच्यांनाच `सिनेमा' मानण्याइतपत निढावले असाल तर हा सिनेमा आवर्जूनच पाहा. तोच कॅमेरा, तेच नट, तेच तंत्र, तीच दृश्यभाषा वापरून आजची तरुणाई केवढा विलक्षण वेगळा संवाद साधूं शकते, हा अनुभव किमान थक्क तरी करेल.

No comments:

Post a Comment