राज कपूरनी `श्री 420' आत्ताच्या युगात, 1998 साली काढला असता तर कसा काढला असता?
आता या प्रश्नाच्या उत्तरासाठी डोकं खाजवण्याची गरज उरलेली नाही. राज कपूरच्या मुलानं, ऋषी कपूरनं `आ अब लौट चले' काढून या प्रश्नाचं उत्तर रुपेरी पडद्यावरच
देऊन टाकलं आहे. अर्थात, थेट तुलना टाळण्यासाठी
(की काय?) त्यानं `420' नसलेला नायक निर्माण करण्याची चलाखी केली आहे. पण,
बाह्यरुप कितीही वेगळं भासलं तरी `आ अब...'चा आत्मा `श्री 420'चाच आहे.
`श्री 420'नं `आवारा' पाठोपाठ सामाजिक समस्यांकडे पाहण्याचा राज कपूरचा खास दृष्टीकोन गडद केला होता.
त्याचा नायक गरीब पण `दिल का सच्चा' होता. त्याला भेटणारी सगळी गरीब माणसं तरतऱहेच्या स्वभावांची
पण माणुसकीनं ओतप्रोत भरलेली होती. ती वाईट धंदे करायची ती पोट
जाळण्यासाठी. तशीच `श्री 420'मधली सगळी श्रीमंत माणसं एकजात धूर्त, कावेबाज,
लबाड, स्वार्थी आणि बेरड होती. त्याच्या भोळ्याभाबडय़ा नायकाला पैसा कमावण्यासाठी `श्री
420' बनून गैरमार्ग अवलंबण्याखेरीज प्रत्यवाय नव्हता.
त्यासाठी तो नायिकेचं विशुद्ध, लोभस प्रेमही ठोकरून
निघून जायचा.
अर्थात, योग्य वेळी पैशांपेक्षा प्रेम, माणुसकी किती मोठी आहे, याची जाणीव होऊन तो `आपल्या' माणसांमध्ये परतून चुकीची दुरुस्ती करायचाच.
जीवनाचं अतिसुलभीकृत तत्त्वज्ञान आणि ठोकळेबाज (स्टीरियोटाईप) व्यक्तिरेखाटन असूनही राज कपूरच्या परिस्पर्शामुळं
`श्री 420' हा विलक्षण परिणामकारक आणि आल्हाददायक
सिनेमा झाला होता. त्याचा परिणाम `नुक्कड'सारख्या मालिका आणि `राजू बन गया जंटलमन'सारख्या आधुनिक सिनेमांमध्येही प्रकर्षानं दिसला होता.
माणुसकी आणि श्रीमंती यांच्यातलं प्रमाण व्यक्तच असतं, असं हट्टाग्रही प्रतिपादन करून श्रीमंत होण्याची- पैसा
कमावण्याची इच्छा बाळगणं म्हणजे महापातक करण्यासारखं अपवित्र आहे, असा उटपटांग संदेश देणारं हे कथाबीज ऋषी कपूरनं `अत्याधुनिक'
स्वरुपात मांडलं आहे.
राज कपूरचा राजू नशीब काढायला, पैसा कमावायला अलाहाबादहून
मुंबईत आला होता. ऋषी कपूरचा रोहन (अक्षय
खन्ना) याच कारणासाठी अमेरिकेत जातो. तो
कंप्युटरचा पदवीधर आहे, पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालेला.
पण, भारतात त्याला नोकरी मिळत नाही. वडिलांच्या पश्चात अनेक खस्ता खाऊन त्याला शिक्षण देणाऱया आई (मौसमी चटर्जी) आणि आजोबांचे (अलोकनाथ)
पांग फेडण्यासाठी त्याला अमेरिकेत जाण्यावाचून गत्यंतरच नसतं.
कमी शिक्षण असूनही अमेरिकेत जाऊन करोडपती बनलेल्या मित्राच्या उदाहरणावरून
प्रेरणा घेऊन रोहन अमेरिकेत जाऊन थडकतो. (या `सुशिक्षित बेकारा'ला अमेरिकेचा व्हिसा कसा मिळतो,
असा प्रश्न विचारायचा नाही.) तिथे मोटेलच्या नावाखाली
वेश्याव्यवसाय चालवणारा त्याचा मित्र त्याला थारा देत नाही. तेव्हा
त्याच्या मदतीला धावून येतो सरदार खान (कादर खान) हा पाकिस्तानी पठाण टॅक्सीवाला. तो अमेरिकेतल्या `गरिबांच्या बस्ती'त रोहनला आश्रय देतो. इक्बाल सिंग (जसपाल भट्टी), चौरसिया
पानवाला (सतीश कौशिक), त्याची बायको (हिमानी शिवपुरी), वासवानी (विवेक
वासवानी) हे गरीब पण `दर्यादिल'
मित्र त्याला लाभतात. त्याला खोटय़ा लायसन्सवर टॅक्सी
चालवण्याची नोकरी मिळवून देतात.
टॅक्सी चालवता- चालवता रोहनची भेट होते पूजाशी (ऐश्वर्या राय). ती आपल्या भावाला भेटण्यासाठी अमेरिकेत-
न्यूर्यार्कमध्ये आलेली असते. या भावानं स्वत:च्या आर्थिक उत्कर्षासाठी तिचं लग्न परस्पर आपल्या फॅक्टरीच्या वयस्क मालकाशी
ठरवलेलं असतं. ते सहन न होऊन पूजा घराबाहेर पडते खरी,
पण तिच्याकडे ना परतीचं तिकीट असतं, ना पैसे,
ना अमेरिकेत कुणी ओळखीचं.
इथे रोहन तिच्या मदतीला धावतो. आपल्या गरीबांच्या बस्तीमध्ये
तिला आसरा मिळवून देतो. व्हिसाच्या सहा महिन्यांच्या मुदतीत परतीच्या
प्रवासाला पुरतील एवढे पैसे कमावण्यासाठी फुटकळ नोकऱया मिळवून देतो. तिची पदोपदी काळजी घेतो, प्रसंगी संरक्षण करतो.
पूजाच्या मनात रोहनच्या नकळतच त्याच्याबद्दल प्रेमाचा अंकुर फुलतो.
रोहनला मात्र `बडा आदमी' बनण्याचा
ध्यास लागलेला असतो. त्यासाठी अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व
देणारं ग्रीन कार्ड मिळवायचं असतं. याचा एक सोपा मार्ग अमेरिकन
नागरिक असलेल्या मुलीशी लग्न करण्याचा. तशी अनिवासी भारतीय मुलगी
त्याला भेटते लव्हलीनच्या (सुमन रंगनाथन) रुपात. आधुनिक मुलीचे सर्व `फिल्मी'
दोष असलेल्या लव्हलीनचा तो पिच्छा पुरवू लागतो. पूजा आणि रोहनची अन्य दोस्त मंडळी त्यात बिब्बा घालू पाहतात. त्यामुळे भडकलेला रोहन पूजाचं प्रेम आणि गरीब मित्रांची माणुसकी ठोकरून लव्हलीनच्या-श्रीमंतांच्या जगात निघून जातो.
यथावकाश रोहनला लव्हलीनचं खरं स्वरुप उमगतं आणि
आपल्या मनात पूजाबद्दलच प्रेम आहे, याचा
साक्षात्कार होऊन तो परततो. दरम्यानच्या काळात पूजानं देखभाल
करून आपलासा बनवलेला धनाढय़ पण एकाकी बलराज खन्ना (राजेश खन्ना)
हा रोहनचा परागंदा झालेला बापच निघतो. नाटय़मय प्रसंग
आणि हृदयपरिवर्तनांच्या मालिकेनंतर बाप-लेक-भावी सून `आ अब लौट चले' म्हणून
माणुसकीशून्य अमेरिकेतून गरीब पण संस्कृतीसंपन्न भारताचा रस्ता धरतात.
`श्री 420'चा संदर्भ बाजूला ठेवून आणि ती जादू न अपेक्षिता
पाहिला तर `आ अब...' समाधानकारक कौटुंबिक
मनोरंजन पुरवतो. कथा-संवादलेखक रुमी जाफरी,
पटकथाकार सचिन भौमिक आणि दिग्दर्शक ऋषी कपूर यांनी ही जुनीच दारू नव्या
आकर्षक बाटलीत भरली आहे. पटकथाकार सचिन भौमिक यांनी मूळ सांगाडय़ात
वेगवान प्रसंग भरले आहेत, नव्या काळाचे संदर्भ पेरले आहेत,
`स्टीरियोटाईण्ड'पण (त्यामुळेच)
सहजगत्या स्पष्ट होतील अशी विविध स्वभावांची पात्रं निर्माण केली आहेत.
रुमी जाफरी यांनी फाफटपसारा टाळून नेमके चुरचुरीत संवाद लिहून सिनेमा
खुसखुशीत केला आहे.
हिंदी सिनेमा हा दुर्मिळ शक्यतांचा समन्वय असतो. रोहनला
अमेरिकेचा व्हिसा कसा मिळतो, त्याला नेमका पाकिस्तानी टॅक्सीवाला
कसा भेटतो, मदतीला सज्ज असे गरीब मित्र कसे भेटतात, एनआरआय मुलीचा विचार मनात आल्याबरोबर लव्हलीन कशी भेटते, अमेरिकेच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवता येण्याइतपत ड्रायव्हिंग, वाहतूक नियमांचं ज्ञान आणि शहराचा भूगोल त्याला कुठून अवगत होतो, वगैरे अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात. पण, या सर्व घटना घडण्याची वास्तवातही एक टक्का का होईना, शक्यता असतेच. आणि हिंदी सिनेमाचा नायक अशा एक टक्के
शक्यतांचा लाभ मिळण्याचं भाग्य घेऊनच जन्माला येतो, हे ज्ञान
गाठीशी बांधलं तर `आ अब...'च्या योगायोगांबद्दल
आश्चर्य वाटत नाही.
त्यात भारत-पाकिस्तान संबंधांचं आदर्शवादी प्रतिकात्मक
चित्रण करणारी सरदार-इक्बाल यांची दोस्ती, मुस्लिम `सरदार' आणि शीख `इक्बाल' यांच्या नावांची मार्मिक गंमत, शनिवार-रविवार मंदिरात पूजापाठ करणारा आणि इतर दिवस अमेरिकी
पोलिस दलाची निष्ठेनं सेवा बजावणारा जॅक पटेल (परेश रावळ),
त्याचा वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये सूत्र गुंफण्यासाठी केलेला वापर,
या कल्पक क्लृप्त्यांमधून `आ अब...'ला मिळणारा वेग प्रेक्षकाला व्यावहारिक प्रश्नांमध्ये फारसं गुंतू देत नाही.
अमेरिकेच्या या मसालेदार `इंडियन सफारी'त प्रेक्षक आपसूक रमून जातो.
पटकथाकाराची आणि दिग्दर्शकाची गोची होते रोहनमधला बदल दाखवताना. आई-आजोबांच्या सुखासाठी अमेरिकेत कष्ट उपसणारा रोहन हा
नम्र, लाघवी, सुसंस्कृत आणि समजूतदार मुलगा.
पूजाची काळजी वाहताना त्याचंही तिच्याच नकळत गुंतणं दिग्दर्शक दाखवतो.
पण, `बडा आदमी' बनण्याच्या
स्वप्नाची अचानक आठवण झाल्यावर मात्र तो एकदम एनआरआय मुलगी `पटविण्या'चा उथळ मार्ग सहजगत्या मान्य करतो, हे अनाकलनीय आहे.
एकवेळ हे घडणं शक्य मानलं तरी ज्या भाषेत बोलून तो मित्रांशी-
पूजाशी संबंध तोडतो ती भाषा त्याच्या तोंडी शोभत नाही.
लेखक-दिग्दर्शक आणि त्यांची तथाकथित भारतीय संस्कृती
पूर्णपणे उघडी पडते ती रोहनला लव्हलीनच्या `खऱया रुपा'चा साक्षात्कार होतो तेव्हा. अंगावरचे कपडे बदलल्यासारखे
`मित्र' बदलणारी, दारू पिणारी, सिगरेट ओढणारी, उत्तान
वेशभूषा करणारी लव्हलीन पहिल्यापासून तशीच असते, दिसते.
ती तशी आहे हे माहीत असतानाही आर्थिक स्वार्थासाठी रोहन तिच्याशी प्रेमाचं
नाटक करतो, तिच्याशी लग्न करण्याची स्वप्ने पाहतो. तिच्याशी लग्न होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर मात्र त्याला तिचं `बेबंद' वर्तन खटकू लागतं, तो तिला
शालीनतेचे धडे देऊ पाहतो. तिची आणि पूजाची वावदूक तुलना करून
तिचा `त्याग' करतो, तेव्हा तो हास्यास्पदच वाटतो.
म्हणजे, `शिवाजी जन्मावा पण शेजाऱयाच्या घरात' या चालीवर मजा मारण्यासाठी
लव्हलीनसारखी कडक, मादक, बिंधास्त फटाकडी
भेटावीच पण लग्न करण्यासाठी मात्र (दुसरी) सोज्वळ-सालस मुलगी हवी, असला हा
खास भारतीय दुटप्पीपणा आहे. राज कपूरनं सदा बुभुक्षित भारतीय
पुरुष प्रेक्षकांनी मानसिकता लक्षात घेऊन एकीकडे स्त्राeदेहांचं
सांगोपांग दर्शन घडवतानाच भारतीय संस्कृतीचं पावित्र्य पठण करण्याचा `यशस्वी' फॉर्म्युला निर्माण केला होता. तो ऋषी कपूरनं पहिल्यांच सिनेमात आत्मसात केलेला दिसतो.
एरव्हीही `आ अब...'मध्ये ऋषी कपूरच्या
`पहिलेपणा'च्या खुणा कुठे दिसत नाहीत.
प्रत्येक प्रसंगाची दृश्यविभागणी, भावभावनांचं
प्रमाण, अपेक्षित रसपरिपोष, त्या प्रसंगाची
मागील-पुढील प्रसंगाशी जोडणी आणि एकूण सिनेमातलं नेमकं स्थान
याबद्दल त्याच्यातील दिग्दर्शकाचे विचार अतिशय स्पष्ट असल्याचं जाणवतं. कॅमेऱयाचे कोन, हालचाली, पात्ररचना
वगैरे तांत्रिक बाबींवरही ऋषीची उत्तम हुकूमत दिसते. खास दिग्दर्शकाचा
म्हणून सांगावा किंवा `ऋषी टच' शोधावा,
असा एकही प्रसंग `आ अब...'मध्ये नसला तरी पात्र-प्रसंगांच्या उभ्या-आडव्या-तिरक्या धाग्यांच्या विणीतून प्रेक्षकाला तीन
तास खुर्चीत खिळवून ठेवील, असा चित्र`पट'
निर्मिण्याची हातोटी त्याला साधली आहे हे निश्चित.
असंच दिग्दर्शकीय चातुर्य त्यानं अभिनेत्यांच्या निवडीत दाखवलं आहे.
कादर खान, सतीश कौशिक, जसपाल
भट्टी, हिमानी शिवपुरी आणि परेश रावळ या अभिनेत्यांची प्रेक्षकांना
सुपरिचित अशी काही वैशिष्टय़ं आहेत. ती कायम ठेवून त्यांच्या भूमिका
रचल्यानं व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्टय़ं प्रेक्षक `ओळखी'तूनच सहज समजून जातात. त्यावर फुटेज खर्च होत नाही.
हे अभिनेते केवळ सराईतपणेच काम न करता आपापल्या भूमिकेत रंगून काम करतात,
तेव्हा काय धमाल उडते, हे `आ अब...' पाहताना जाणवतं. हेही
श्रेय दिग्दर्शकाचंच. मौसमी चटर्जी आणि आलोकनाथ यांच्या वाटय़ाला
लांबीनं कमी भूमिका आल्या असल्या तरी उत्तम व्यक्तिरेखाटन आणि भावदर्शनामुळे त्या प्रभावी
होतात.
अक्षय खन्नामधील स्वाभाविक गोडव्यानं रोहनबरोबरच लेखक-दिग्दर्शकांनाही सावरून घेतलं आहे. रोहनच्या स्वभावातले
अनैसर्गिक बदल अक्षयच्या अभिनयामुळेच क्षम्य ठरतात. या मुलाची
मोठी गंमत आहे. तो व्यक्तिरेखेशी विसंगत `फ्लॅशी' कपडे घालत नाही, स्टायली
मारत नाही, अकाली रुंदावलेला भालप्रदेश झाकत नाही, कोणत्याही प्रसंगात अवास्तव `चमकेश'गिरी करत नाही, फुटेज खात नाही आणि वयानं, अनुभवानं ज्येष्ठ अभिनेत्यांसमोर दबतही नाही. त्याचा
अत्यंत समतोल परफॉर्मन्स हे `आ अब...'चं
बलस्थान आहे.
ऐश्वर्या रायनं त्याला उत्स्फूर्त साथ केली आहे. `ग्लॅमरस'
रूप लाभलेली ऐश्वर्या सुमन रंगनाथसमोर सोज्वळ आणि सात्विक दिसते.
तिच्या भूमिकेसाठी आवश्यक भावदर्शन सहजगत्या घडवते. सुमन रंगनाथवर देहप्रदर्शन + भावदर्शन अशी दुहेरी जबाबदारी
आहे. ती तिनं उत्तम पार पाडली आहे. मात्र,
तिची भूमिका तुटकपणे संपत असल्यानं तिचा प्रभाव उणावतो. राजेश खन्नानं प्रदीर्घ काळानंतर रुपेरी पुनरागमन केलंय खरं, पण अभिनेता म्हणून तो जुन्या यत्तेतून वर आलेला दिसत नाही. तो काही प्रसंगांमध्ये अतिशय बोजड चेहऱयानं वावरतो आणि काही प्रसंगांमध्ये
खास राजेश खन्ना स्टाईबल हातवारे आणि अविर्भावयुक्त `लाऊड'
अभिनयाचं दर्शन घडवतो. `क्लायमॅक्स'च्या प्रसंगात त्याच्यापेक्षा अक्षयचं संयत भावदर्शन बाजी मारून जातं.
तांत्रिक बाजूंमध्ये समीर आर्यचं छायालेखन उल्लेखनीय आहे. एकीकडे अमेरिकेचं भव्य आणि ग्लॅमरस दर्शन घडवताना त्यानं रोहनच्या घराचा-जुन्या दिल्लीचा परिसरही प्रभावीपणे टिपला आहे. राजीव
कपूरच्या कुशल संकलनानं `आ अब...'ला वेग
देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.
निराशा करतं ते `आ अब...'चं संगीत.
शीर्षकगीत, `ओ ताशी अनाका' हे उच्छंखल गाणं, `ओ यारो माफ करना' ही `मेरा जूता है जपानी'ची फिकट
आवृत्ती आणि `तेरे बिना इक पल' हे विरहगीत
`यही है प्यार' हे `मुडमुडके ना देख'च्या सिच्युएशनवरचं गरबागीत,
आणि `मेरा दिल तेरा दीवाना' ही गाणी माफक श्रवणीय आणि समाधानकारक असली तरी `आर.के. फिल्म्स'च्या सोनेरी गीतसंगीताच्या
तुलनेत हे तांबा-पितळच आहे. गाण्यांमध्ये
आणि नरेश शर्माच्या पार्श्वसंगीतात खळाळणाऱया ऍकॉर्डियनच्या सुरावटी शंकर-जयकिशनची आठवण करून देतात पण ती जादू जागवू शकत नाहीत. गाण्यांचं. `टेकिंग' ही ठीक-ठाक असलं तरी गाण्यांना प्रसंगांच्या पातळीवर घेऊन जाणाऱया राज कपूरच्या `टेकिंग'ची मजा सोडा, झलकही त्यांत
नाही.
अर्थात, राज
कपूरनं `आ अब...' काढला असता तर...
असा विचारच ऋषी कपूरवर अन्यायकारक आहे. एक चतुरस्र
दिग्दर्शकाचा वारसा त्याच्या बॅनच्या सुवर्णमोहत्सवी वर्षात त्याचा मुलगा समर्थपणे
चालवतो आहे, हे महत्त्वाचं. हिंदी सिनेमाच्या
क्षितिजावर कथा `सांगण्या'ची कला अवगत असलेल्या
आणखी एका दिग्दर्शकाचं आगमन ऋषी कपूरच्या रुपानं झालं आहे. त्याचं
स्वागत करायला हवं.
No comments:
Post a Comment