एक भिकारी एका देवळासमोर कायम भीक मागत असे.
एकदा एका धनिकाला त्याची दया आली आणि त्यानं भिकाऱयाला भरपूर पैसाअडका,
अलिशान बंगला आणि नवीकोरी चकचकीत मोटार भीक म्हणून दिली.
दुसऱया दिवशी धनिक मंदिराच्या दाराशी उभा असताना ही करकरीत मोटार समोर येऊन
उभी राहिली. सुटाबुटातला भिकारी ऐटीत गाडीतून उतरला आणि `नेहमीच्या' जागी बसून त्यानं पुन्हा कटोरा पसरला...
*********
इंद्रकुमार नावाचा एक सुदैवी दिग्दर्शक आहे. पिटातल्या
पब्लिकला(च) भावेल असा लाऊड भावभावनांचा
मसाला, अभिजनांना आवडणारे कलावंत आणि सर्व स्तरांवर पसंतीला उतरणारं
कर्णमधुर संगीत यांच्या मिश्रणातून त्यानं लागोपाठ चार सुपरहिट सिनेमे दिले.
आता त्याच्या हातात एक कथानक पडलं, अर्थातच एका गाजलेल्या
इंग्रजी सिनेमाचं. ही होती एक साधी सरळ प्रेमाची परीकथा.
कदाचित या कथेनं इंद्रकुमारचं कल्पना `दारिद्रय़'
दूर केलं असतं... त्याला यशस्वी `दिग्दर्शक' बनवलं असतं.
पण, इंद्रकुमारनं त्या भिकाऱयाचाच आदर्श ठेवला आणि `मन' काढला.
***********
`मन'ची कथा कॅरी ग्रांट आणि डेबोरो केर यांच्या `ऍन अफेअर टू रिमेंबर' या जुन्या संस्मरणीय सिनेमावरून
उचलेली आहे. दिवंगत राजेंद्रकुमार यांच्या `आरजू'लाही याच कथानकाचा आधार होता म्हणे.
इथं प्रेम फुलतं एका आलिशान बोटीवर- लक्झरी क्रुझरवर.
देवकरण सिंह (आमिर खान) हा
एक देखणा `धंदेवाईक' आशिक... प्लेबॉय. सुंदर आणि श्रीमंत पोरींना गटवणं, मौजमजा करणं आणि मध संपला की एका फुलावरून दुसऱया फुलाकडे झेपावणं,
हा या भ्रमराचा धंदा.
एखाद्या अब्जाधिशाची एकुलती एक पोरगी कायमची गटवून, तिच्याशी
लग्न करून ऐषआरामात लोळायची त्याची इच्छा जवळपास फलद्रूप झाली आहे. उद्योगपती सिंघानियाच्या (दलिप ताहिल) मुलीशी (दीप्ती भटनागर) त्याचं
लग्न ठरलंय.
सिंगापूरहून भारताचा प्रवास तो एका लक्झरी क्रुझरमधून करतो आहे.
प्रिया (मनीषा कोईराला) ही अनाथ
पण गुणवान रुपसुंदरी. एका सहृदय धनिकाच्या, राजच्या (अनिल कपूर) सहकार्यानं
तिनं मुंबईत स्वत:ची संगीत-नृत्यशाळा चालवली
आहे. राजच्या उपकारांखाली दबलेल्या प्रियानं त्याचा लग्नाचा प्रस्तावही
मंजूर केला आहे.
तीही एका स्पर्धेत बक्षीस मिळालेल्या तिकिटावर याच क्रुझरवर आहे.
क्रुझरवर देव प्रियाला पाहताक्षणी तिला पटवण्याचे प्रयत्न सुरू करतो.
पण, हे पाणी वेगळं आहे, हे
त्याला कळायला वेळ लागत नाही. या मनस्वी पोरीबद्दल त्याच्या मनात
आदर निर्माण होतो.
देवच्या `इमेज'मुळे त्याच्यापासून
दूर पळणाऱया प्रियाला जेव्हा त्याच्यातल्या वेगळ्या आणि चांगल्या माणसाचं दर्शन घडतं,
तेव्हा दोघांमध्ये दोस्ती घडून येते. देव क्रुझरवरच्या
एका छबिलीला (शमा गेसावत) पटवण्यासाठी प्रियाची
`मदत' घेतो, तेव्हा
प्रियाला आपल्या मनात त्याच्याविषयी मनात उमलू लागलेल्या प्रेमाची चाहूल लागते.
वाटेत एका बेटावर देवच्या एकाकी आजीच्या (शर्मिला टागोर)
घरी देवच्या संगतीत एक दिवस घालवल्यावर तर तिला देवची नव्यानं ओळख पटू
लागते. इतके दिवस उथळपणा उधळत फिरलेल्या देवलाही प्रियामध्ये
`खऱया' प्रेमाचा साक्षात्कार होतो.
आपले सगळे गैरधंदे बंद करून, स्वत:च्या कष्टाच्या बळावर प्रियासाठी खऱया प्रेमाची दुनिया उभारण्याचा निर्णय देव
घेतो. मुंबईत उतरताना सहा महिन्यांनी- व्हॅलेंटाईन्स
डेला एकमेकांना गेटवेवर भेटायचं, मधल्या काळात एकमेकांना पाहायचंही
नाही, अशी प्रेमाची सत्त्वपरीक्षा पाहणारा संकेत ते ठरवतात.
सिंघानियाच्या मुलीशी ठरलेलं लग्न मोडून, त्यापायी आलेला
कफल्लकपणा देव स्वीकारतो. चित्रकलेच्या बळावर सहा महिन्यांमध्ये
घरदार उभं करतो. प्रियाचं राजशी लग्न होण्याच्या बेतात असताना
राजला देव-प्रियाच्या नात्याविषयी समजतं. तो मोठय़ा मनानं प्रियाच्या वाटेतून दूर होतो. दोघेही
प्रेमिक `व्हॅलेंटाईन्स डे'ला असोशीनं गेटवेकडे
निघतात...
....
पण तिथे एकमेकांना भेटू मात्र शकत नाहीत. त्यांची
भेट न व्हावी असं काय घडतं? ते पुन्हा भेटतात का? त्यांचं मीलन होतं का?
ही `मन'ची कथा. `ऍन अफेअर टू रिमेंबर'शी प्रामाणिक राहून इंद्रकुमारनं
हीच कथा सरळ-साध्या पद्धतीनं फुलवली असती तर कदाचित एक सुसह्य
प्रेमपट तयार झाला असता. पण, इंद्रकुमारनं
स्वत:चा कोणत्याही पातळीवर विकासच होऊ द्यायचा नाही. असा पणच केला असेल, तर कोण काय करणार?
`मन' प्रदर्शित होण्यापूर्वीच्या मुलाखतीत इंद्रकुमारनं
आपल्या प्रकृतिधर्मापेक्षा सर्वस्वी निराळा सिनेमा काढत असल्यानं हा `दिग्दर्शक' म्हणून आपला `पहिला'च सिनेमा असल्याचा दावा केला होता. पण सिनेमा फक्त कथेवर
वेगळा ठरतो का? वेगळी कथा घेतली तर तिच्यानुसार दिग्दर्शनशैली
बदलण्याची लवचिकता हवी किंवा कोणत्याही प्रकृतीची कथा वळवून मांडण्याएवढी दिग्दर्शनशैली
समर्थ हवी. पैकी दुसरी गोष्ट इंद्रकुमारच्या बाबतीत संभवतच नाही
आणि पहिली गोष्ट त्यानं केलेली नाही. साहजिकच `मन' हा बऱयापैकी कथा-बीजाची वाट
लाव-णारा सिनेमा झाला आहे.
या कामी इंद्र-कुमारला पटकथाकार आतिश कपाडिया यांनी फारच
`मोलाचं साह्य' केलंय. एकतर त्यांनी मूळ प्रेमकथेला पूर्वार्धात थिल्लर विनोदाची आणि उत्तरार्धात
अतिरंजित, अतिसुलभीकृत नाटय़ाची ठिगळं जोडून घरंदाज जरतारी शालूची
कम्प्लीट गोधडी करून टाकली आहे. क्रुझरवर तंग कपडे घालून ज्याला-
त्याला धडका मारत फिरणारी एक बुलडोझर बया, राजेंद्रनाथची
तिय्यम दर्जाची (आधी राजेंद्रनाथची, तिही
तिय्यम दर्जाची) नक्कल करणारा कुणी एक पोपट नामक इसम आणि एक पिसं
उचकटलेल्या कोंबडय़ासारखा `पक् पक् पक् पक्' हसणारा फोटोग्राफर वगैरे मंडळी मिळून जो काही विनोद घडवतात तो निव्वळ किळसवाणा
आहे.
देवचं चरित्ररेखाटन करताना लेखक दिग्दर्शकांनी `प्लेबॉय'च्या संकल्पनेचं भारतातलं स्थानच लक्षात घेतलेलं
नाही. अनेक पोरी फिरवण्यात एक्स्पर्ट असलेल्या गुलछबू माणसाचा
पत्रकार,टीव्ही चॅनल्सवाले यांच्याकडून पुरवला जाणारा पिच्छा
इथे केवळ असंभाव्यच आहे. मूळ परदेशी कथानक या मातीत आणताना आवश्यक
छाटणी करून त्या जागी काही कलमं करायची दक्षता न घेतल्याचा हा परिणाम.
प्रिया आणि देव यांच्यातल्या सुरुवातीच्या झटापटी, विशेषत:
लिफ्टमधला ग्राम्यतेकडे झुकणारा प्रसंग, केवळ पिटातल्या
प्रेक्षकाचा विचार करून रचल्याचा वास येतो. या भानगडीत आपण (पुढे आदर्श प्रेमिका ठरण्याचं बंधन असलेल्या) नायिकेची
व्यक्तिरेखा उथळ करतो आहोत, याचंही भान लेखक-दिग्दर्शकांनी ठेवलेलं नाही. देव-प्रिया यांच्यातले मैत्रीचं नातं गहिरं करीत त्यातून प्रेम उमलवण्याची तसदीही
त्यांची घेतलेली नाही. (मग, पाचकळ विनोद
कोण करील?) देवला प्रियाबद्दल काही वाटायला अनेक कारणं आहेत.
पण, प्रिया देवसारख्या माणसाकडे (तेही अन्यत्र `कमिटेड' भारतीय नारी
असताना) का आकर्षित होते, याला प्रबळ कारण
नाही.
देवच्या व्यक्तिमत्त्वाची चांगली बाजू दर्शविण्यासाठी रचलेली आजीच्या घराची
लांबण तर वीट आणते. इथे सगळी माणसं इतकी हळहळी हुळहुळी का होतात,
हे प्रेक्षकाला कळतच नाही. जो-तो आपला `किती शांत-किती छान वाटतंय'
वगैरे सेमी-आध्यात्मिक छापाची भावुक वटवट करत राहतो.
अरे बाबांनो, जे काही तुम्हाला वाटतंय ते आम्हालाही
`फर्स्ट हँड' वाटू द्याना! तुम्हीच कशाला वर्णन करून सांगताय? हा सिनेमा आहे का
श्रुतिका? पण, आतिश-इंद्रकुमार जोडगोळी प्रेक्षकांना कुक्कुली बाळंच समजते आणि बोळ्यानं भावना
भरवण्याचा प्रयत्न करते. देव-प्रिया पुनभेंटीच्या
शपथा घेऊन तात्पुरते दुरावतात, त्यानंतर तर लेखक-दिग्दर्शक प्रेक्षकांचा बुद्यांक `उणे काहीतरी'
असावा, असंच गृहीत धरतात.
एक अलिशान बंगला, गाडी वगैरेचा मालक असणारा देव सिंघानियाच्या
मुलीशी लग्न तुटल्यावर डायरेक्ट कफल्लकच होतो, थेट रस्त्यावर
बरं तो काय करतो, तर दिवसा रस्त्यावरचे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे
रंगवतो, होर्डिंग्ज रंगवतो आणि रात्री चित्रं काढतो. (या इंद्रकुमार-महोदयांनी `दिल'मध्ये माधुरी दीक्षित एका चौकात भीक मागताना दाखवली होती. तेव्हा मुंबईबतले `हे' चौक ठाऊक
नसल्याबद्दल झालेली दुखरी हळहळ आता पुन्हा उफाळली.) त्याच्या
त्या बाळबोध चित्रांना एकदम इतकी मागणी येते की, सहाव्या महिन्यात
पट्टा एका गगनचुंबी इमारतीत अलिशान फ्लॅटच घेतो. क्या यार,
हम लोग क्या कलईच अलिबागसे आयेले है क्या?
या बाळबोधपणाचा कळस होतो प्रियाच्या साखरपुडय़ाच्या समारंभात. देववरचं प्रेम राजपुढे व्यक्त करायची संधी प्रियाला न मिळाल्यानं हा साखरपुडा
घडतो आहे. तिनं जर राजला या टप्प्यावर नाकारलं तर त्याच्या मनावर
केवढा परिणाम होईल, ही जाणीव तिला तोंड उघडू देत नाही,
असं लेखक-दिग्दर्शकांना दाखवायचंय. ते काय करतात, तर प्रियाच्या अनाथाश्रमातली, अशा प्रसंगामधून गेल्यानं मानसिकदृष्टय़ा विकलांग झालेली एक मैत्रीणच ताबडतोब
आणून उभी करतात तिच्यासमोर.
`हिंदी `भासे'ची नक्कल करणारा एक
चॅनेलनिवेदक आणि राजचा भयावह आक्रस्ताळा सेक्रेटरी-कम-मित्र ही मंडळी उत्तरार्धातल्या `इनोदा'चा डोस पुरवतात. प्रियाच्या संगीतशाळेतल्या प्रसंगांवर
`कुछ कुछ होता है'ची जबरदस्त छाप आहे,
पण तो बेतीव गोडवा नाही. सगळी पोरं आपापले हातवारेयुक्त
डायलॉग फेकून निर्विकार चेहऱयानं `परेड।़।़।़ विश्राम'
करून मोकळी होतात.
या सगळ्या भोंगळपणात त्यातल्या त्यात उत्कट आणि संयमित प्रसंग क्लायमॅक्सलाच
घडतो.
रहस्योद्घाटन टाळण्यासाठी त्याची फारशी चर्चा इथे करता येणार नाही.
काही अर्थानं `धाडसी' शेवट
हीच एक बरी बाजू या सिनेमाच्या कथा-पटकथेत सापडते.
एकूण सिनेमासंदर्भात बऱया बाजू चार. एक म्हणजे संजीव-दर्शन यांचं टवटवीत, सुश्राव्य, सुघड संगीत आणि आमिर खान-मनीषा कोईराला- अनिल कपूर या त्रयीचा समाधानकारक अभिनय. आमिर-मनीषा आणि अनिल कपूर हे आता `मंझे हुए' कलाकार झाले आहेत. मनीषा वाईट भूमिका-चित्रपटांमध्ये डोळे झाकून पाटय़ा टाकण्यात सराईत आहे; पण, आमिर-अनिल मात्र वाईटात वाईट
सिनेमांमध्येही किमान दर्जाची कामगिरी करून जातात. मनीषानं प्रियाच्या
सर्व उलघाली सराईतपणे दर्शविल्या आहेत, क्लायमॅक्सला ती उत्कट
अभिनयही करते. बहुतांशवेळा मेकपविनाची मनीषा दिसतेही साधी आणि
छान.
आमिरनं देवचं पहिलं रुप साकारताना (`जो जीता वही सिंकदर'मधल्या संजय लालची आठवण करून देणारं)
मिश्किल, लोचट, आढय़ताखोर
हसू आणि छद्मीपणा वापरला आहे. निष्ठावान प्रेमिकात होणारं रुपांतरही
तो सहजगत्या साकारतो. अनिल कपूर वाव नसलेल्या भूमिकेत इमानदारीनं
रंग भरतो. बाकी मंडळींमध्ये (भयानक विग
वगळता) शर्मिला टागोर, दलिप ताहिल,
शमा गेसावत ही मंडळी ठीकठाक.
बाकी नीरज व्होरासह सर्व विनोदवीरांवर हद्दपारीचा हुकूम बजावावा.
एखाद्या सिनेमातली सर्वच्या सर्व गाणी किमान श्रवणीयतेच्या निकषावर उत्तीर्ण
होण्याचा योग्य दुर्मिळ तो (संगीतकार श्रवण याचे पुत्र)
संजीव- दर्शन यांनी त्यांचा पहिलाच सिनेमा असलेल्या
`मन'मध्ये जुळवून आणलाय. `नशा ये प्यार का नशा है', `तिनक तिन ताना', ही गाणी आणि `ललला लई लई लला' या
`डान्स म्युझिक'वर गणेश आचार्य यांनी केलेली
`कोरियोग्राफी' ही झकास आहे. बाशा लाल यांचे छायालेखन (त्यांचाही हा पदार्पणाचा सिनेमा),
शर्मिष्ठा रॉय यांचं कलादिग्दर्शन आदी तांत्रिक बाजू पासापुरते गुण मिळविणाऱया.
No comments:
Post a Comment