Thursday, December 29, 2011

नाव ज्ञानूबाई... (अशी ज्ञानेश्वरी)


सिनेमातली लहान मुलं नेहमी अशीच का असतात?
 अशीच म्हणजे आगाऊ... आपल्या वयानुरूप न वागता मोठय़ा माणसांसारखं वागणारी, बोलणारी.
  कदाचित मुलांच्या चुणचुणीतपणाबद्दलची आपली (गैर) समजूत याला कारणीभूत असेल. कारण अशी `घडवलेली' ओव्हरस्मार्ट मुलं सिनेबाहेरच्या जगातही भेटतात. अर्थही न कळलेल्या जड शब्दांची पढीक पोपटपंची करून वात आणतात, मोठय़ा माणसांच्या छोटय़ा आकारातलय प्रतिकृती वाटतात... तकलादू आणि खोटय़ाखोटय़ा.
  त्यात `अशी ज्ञानेश्वरी असेल तर विचारायलाच नको. पटकथा-संवाद लेखक प्रताप गंगावणे तिला `ज्ञानियांची राणी'च बनवून टाकतात. दिग्दर्शक एस.एम.रंजन तिच्याकडून बाळबोध अभिनय करवून घेतात आणि या ज्ञानेश्वरीची बेगडी गाथा तयार होते.
  `अशी ज्ञानेश्वरी' हा `नन्हा फरिश्ता'या एकेकाळी खूप गाजलेल्या हिंदी सिनेमाचा मराठी अवतार. त्या सिनेमाशी प्रामाणिक राहून जरी हा सिनेमा बनवला असता, तरी बऱयापैकी सुसह्य ठरू शकला असता. पण मूळ कथाबीजावर उपकथानकांची उतरंड रचून पटकथाकार- दिग्दर्शक यांनी बिचाऱया लहानग्या ज्ञानेश्वरीच्या जीव घुसमटवला आहे.
  ज्ञानेश्वरी (अक्षता नाईक) हिचे वडील अविनाश कुलकर्णी (रमेश भाटकर) हे निवृत्त लष्करी अधिकारी. गावातल्या बबनराव घुगरे पाटील (कुलदीप पवार) या बडय़ा राजकारणी नेत्याचा पर्दाफाश करून त्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे न्यायालयात सादर करण्याचा निर्धार अविनाशने केला आहे. संभाव्य संकटातून वाचवण्यासाठी बबनराव तीन गुंडांना पॅरोलवर सोडवून त्यांच्यामार्फत ज्ञानेश्वरीचं अपहरण घडवून आणतो.
  अजय (सुहास पळशीकर), सावळ्या (सयाजी शिंदे) आणि हिंदुराव (नंतू माधव) हे तीन गुंड ज्ञानेश्वरीला एका ओसाड बंगल्यात डांबून ठेवतात. तिचा सुरुवातीला छळ करतात. पण चुणचुणीत ज्ञानेश्वरी या तिघांची मनं जिंकते. त्यांच्यातली माणुसकी जागी करते आणि तिच्या जिवावर उठलेले हे तीन नराधम नंतर जिवावर उदार होऊन तिचे रक्षण करू लागतात.
  सिनेमाच्या नावावरून ही ज्ञानेश्वरीच्या शौर्याची- धैर्याची गाथा आहे, असा भास होतो. पण निम्म्याहून अधिक सिनेमा तिच्या अपहणाव्यतिरिक्तच्या घटनांनी व्यापला आहे. अत्यंत पुस्तकी भाषेतली अविनाशची भ्रष्टाचारविरोधी भाषणबाजी, त्याचे सतत देवघरातच मुक्कामाला असलेले आईवडील, बाहेरून मवाळ, बावळट दिसणारा पण आतून पक्का कावेबाज बबनराव, त्याच्या भानगडी या फाफटपसाऱयाला सिनेमात अवास्तव महत्त्व मिळालं आहे. त्यामुळे सिनेमांचा तोल ढळला आहे.
 त्यातही, एका लहान मुलीची शीर्षक भूमिका असलेला सिनेमा प्रेक्षक सहकुटुंब (विशेषत: लहान मुलांना घेऊन) पाहायला येतो, याचं भान पटकथाकार-दिग्दर्शक यांनी सोडलेलं दिसतं. अन्यथा, बबनरावांची आपल्या सेक्रेटरीच्या बायकोबरोबरची (स्मिता ओक) शारीरिक लगट आणि लैंगिक संबंधसूचक हावभाव त्यांनी इतक्या तपशीलवार दाखवले नसते. सिनेमात ऐन कळसाध्यायाला घुसवलेली लावणीही अशीच वाह्यात. या लावणीच्या शब्द-संगीतापेक्षा नर्तिकेचे अवयव चवीनं टिपत केलेलं चित्रण अधिक आक्षेपार्ह आहे. बालप्रेक्षकांच्या मनावर ते कोणते संस्कार करणार आहे? (सिनेमा या माध्यमानं काही संस्कार करण्याचा मक्ता घेतलेला नाही. हे इथं स्पष्ट करायला हवं. पण, या सिनेमात चिमुकल्या ज्ञानूसकट सगळेजण सतत `संस्कार, संस्कार' अशी बाष्कळ भाषणबाजी करत फिरतात, म्हणून हा विशेष उल्लेख.)
  हे प्रसंग लहान मुलांनी पाहण्यासारखे नाहीत आणि प्रौढ प्रेक्षक (आपल्या वा इतरांच्या) लहान मुलांबरोबर ते धड `एंजॉय' ही करू शकणार नाहीत.
  बरं, या ज्ञानेश्वरीवर तथाकथित सुसंस्कारांचा जो काही मारा सुरू असतो, तो पाहून प्रेक्षक हतबुद्धच होतो. तिचे आई, वडील, आजी, आजोबा, नाच शिकवणारे गुरू ही सगळी मोठी माणसं `जीवन, आयुष्य, धैर्य, शौर्य, त्याग, प्रेरणा' असल्या जडजंबाल शब्दांचा माराच करत असतात. तिचे गुरुजी नृत्य म्हणजे काय, हे अशा भाषेत समजावतात की, आपण करतो तो साधा नाच इतका भयंकर काही तरी आहे, अशा विचारानं एखाद्या मुलीला भोवळच यावी. शाळेत सर्वांसमोर गाणं म्हणायला घाबरणाऱया ज्ञानेश्वरीची भीती घालवण्यासाठी तिचे आजी-आजोबा एकदम पुराणं-इतिहासातल्या शूरवीरांचेच दाखले देतात. आजी तर `तो नंदुरबारचा शिरीषकुमार, त्याचे (`त्यांचं' नाही हां, `त्याचे') हौतात्म्य' अशी आठवण करून देते. पुस्तकी भाषेचा कळस म्हणजे पोलिस आयुक्त एका वाक्यात `अमुक होईल `' आम्ही त्यांना पकडू,' म्हणतात.
  सगळ्यात गंमत म्हणजे एरवी जी भाषा प्रौढांना उमगणं कठीण, ती छोटी ज्ञानू मात्र सहज समजून घेते, तसंच पोक्तासारखं बोलतेही. आई-वडील, आजी-आजोबांनी घेतलेली समाजसुधारणेची जबाबदारी आपल्याही खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरते.
  असं पात्र सिनेमात रेखाटणं हा काही गुन्हा नाही. पण, गुंडांना जिंकून घेण्याचा जो कथाभाग या सिनेमाचा गाभा आहे, तो या `सखाराम गटणे' स्टाईल नायिकेमुळं निष्प्रभ होतो. मुळात रंगपंचमीच्या पिचकाऱया धरल्यासारखे बंदुका धरणारे अज्या आणि कंपनी हे खरतनाक गुंड वाटतच नाहीत. त्यांच्याकडून ज्ञानूचा काही छळ होण्याच्या आतच हिंदुराव तिच्या कथित लाघवीपणामुळे पाघळू लागतो. मग, शाळेतून पळवलेली ज्ञानू (दप्तरातून की काय, देव जाणे) वेगवेगळे मॅचिंग ड्रेस घालून शंकराच्या पिंडीपुढे पूजा करते. तिला आई-वडिलांची आठवण सतावत नाही. हिंदूला डसायच्या तयारीत आलेल्या नागाला ती नमस्कार करते की तो आपोआप जातो. कुणालाही सहजी सापडू नये, अशा ठिकाणी या मुलीला लपवलेलं असावं, अशी आपली समजूत. पण, ज्ञानू गणेशचतुर्थीला थेट गणेशमूर्तीच घेऊन येते. हे लोक घरात मखर मांडतात. दिवाळीत आरास करतात. मिष्टान्न भोजनही करतात. `हे सर्व कोठून येते,' असा प्रश्न आपल्याला पडतो.
  अनेकदा संधी मिळूनही ज्ञानेश्वरी पळून जात नाही. तिचे अपहरणकर्ते तिचे रक्षक बनल्यानंतर तिला तिच्या घरी पोहोचवावं, असं त्यांना वाटत नाही. तिला त्यांच्या ताब्यातून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्यावरही ते तिला आई-वडिलांकडे नेऊन सोपवत नाही. तिला कधी घरची फार आठवणही येताना दिसत नाही.
  ज्ञानेश्वरीनंच आपल्याला पकडून दिलंय, असं नाटक करून तिला 50 लाख रुपयांचं बक्षीस हे गुंड मिळवून देतात. ते तिला घरी पोहोचवून जमलं असतंच की ज्ञानू आणि तिचे `काका' यांच्या एकत्र असण्यालाच काही सयुक्तिक कारण नाही आणि त्यांच्या सहवासाचं कथानकही फुलत नाही. सिनेमा काढायचा म्हणजे तर्कबुद्धी बासनात गुंडाळून ठेवायची, अशा समजुतीतून हा सिनेमा तयार झालाय. अतर्क्य सिनेमाही उत्तम मनोरंजन करू शकतो, पण त्यासाठी त्या धाटणीची हाताळणी हवी.
  रमेश भाटकर, सुहास पळशीकर, सयाजी शिंदे, नंदू माधव हे मराठीतले गुणवान कलाकार आपल्या परीनं भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. पण या भूमिकाचं पसरट, त्यात कुणी किती जीव ओतावा? निशिगंधा वाड, स्मिता ओक आणि उषा नाईक सराईत अभिनय करतात. कुलदीप पवारांचा बेरकी खलनायक आणि त्याच्या किडक्या सेक्रेटरी त्यातल्या त्यात लक्ष वेधून घेतात.
  ज्ञानेश्वरीची शीर्षकभूमिका करणारी अक्षता नाईक चुणचुणीत आहे. ती कॅमेऱयासमोर न बुजता वावरते. स्पष्ट उच्चारात संवाद बोलते. पण सभाधीटपणा, पाठांतरकौशल्य आणि स्पष्ट वक्तृत्व म्हणजे अभिनय नाही. हे समजण्याचं तिचं वय नाही आणि तिला कुणी समजावून सांगितलेलं दिसत नाही. ती ठरल्या ठिकाणी उभी राहून वा ठरलेल्या हालचाली करून एका उच्चारशैलीत आपले संवाद म्हणून मोकळी होते आणि पुढचा संवाद जो बोलेल त्याच्याकडे `ब्लॅक' चेहऱयानं पाहात राहते. अभिनयासाठीचा कच्चा माल असलेले तिचे गुण दिग्दर्शकानं पैलू न पाडल्यानं वाया गेले आहेत.
  सुरेश वाडकर यांनी मराठीत प्रथमच दिलेलं सुरेल संगीत हीच या सिनेमाची एकमेव जमेची बाजू आहे. `मी, संसाराचा वारकरी' हे भजन, `हे देशसेवा तुझी प्रार्थना' आणि `गजानना तुझी कृपा' ही गाणी मनात रेंगाळत राहतात.

No comments:

Post a Comment