Tuesday, January 24, 2012

अनर्थाचा अन्वयार्थ (1947- अर्थ)


 लाहोरच्या क्वीन्स पार्कमध्ये आज काय घडत असेल?
    लाहोरातच उमर बितवलेले पन्नाशीच्या पुढचे कुणी बूढे, आजही तिथल्या एखाद्या बाकावर बसून त्या ऐसपैस बगिच्याची स्वातंत्र्यपूर्व शान याद करून हळहळत असतील. `पाकिस्ताना'त जन्मलेल्या सभोवारच्या नौजवान गर्दीकडे पाहून मनातल्या मनात म्हणत असतील, ``खरी रौनक यांनी पाहिलीच नाही.''
   काय होती ती रौनक?
  या भूमीची शकले पडून हिंदुस्थान-पाकिस्तानचे टिळे लागले नव्हते; म्हणूनच रगेल-रंगेल लाहोरात हिंदू, शीख, मुस्लिम, पारशी हँसीखुशी एकत्र नांदत होते. धर्मनिरपेक्षतेचे नारे नव्हते, कौमी एकतेच्याही घोषणा नव्हत्या; होता तो आपापलं स्वतंत्र अस्तित्व जपूनही राखलेला भाईचारा.
  एक साल आलं... 1947... आणि सगळं उधळून गेलं. तेव्हा जिवंत असलेल्या आणि पुढे जन्माला येणाऱया प्रत्येकाची `ओळख' ठरवणारी एक अदृश्य रेषा आखली गेली... सरहद. स्वतंत्र देश मिळाला प्रत्येकाला... आणि मग लाहोर-कराचीतल्या हिंदू-शिखाला, अमृतसर-गुरुदासपूरच्या मुस्लिमाला त्याची मायभू परकी झाली, ती सोडून `आपल्या' देशाची वाट धरावी लागली.
  हे सारं पहावं, भोगावं लागलेली संपूर्ण पिढीच काही काळानं संपून जाईल दोन्ही देशांतून. क्वीन्स पार्कची ती एके-काळची रौनक कायमची `इतिहास'जमा होईल. इतिहास... ज्यापासून काहीच न शिकता माणसं ज्याची फक्त पुनरावृत्ती करत राहतात, असा दुखरा इतिहास...
  दीपा मेहताचा मन डहुळवून- गढुळून टाकणारा `1947- अर्थ (EARTH)' त्या इतिहासावरची खपली काढतो. फाळणीचा दाहक अनुभव कधीच न भोगलेल्यालाही तो चटका अगदी आतपर्यंत पोहोचवतो आणि विचारात पाडतो...
  बॅप्सी सिध्वा या पारशी लेखिकेच्या `क्रॅकिंग इंडिया' या (भारतीय उपखंडात `आईस कँडी मॅन' या नावानं सुपरिचित) कादंबरीवर `1947' आधारलेला आहे. ही कादंबरी आणि सिनेमा साकारतात आठ वर्षांच्या एका पारशी मुलीच्या नजरेतून. लाहोरच्या सधन सेठना कुटुंबातली ही लेनी (मैया सेठना) एका पायानं अधू, शांता (नंदिता दास) या आयाबरोबर तो राज क्वीन्स पार्कचा सैरसपाटा करते. शांता काळीसावळी पण नाकेली, तरतरीत. जवान असूनही (त्या काळात) अविवाहित. शिवाय बोलकी, मनमोकळी काहीशी आवाहक आणि सैल वृत्तीची. साहजिकच सभोवती तिचे उघड- छुपे चाहनेवाले भरपूर.
  हातावरचं पोट असणाऱया माणसांचा हा अड्डा. यात अठरापगड जाती-धर्माचे लोक. ज्योतीभोवती पतंग जमावेत, तसे शांताच्या आकर्षणातून भवती जमा होणारे दीवाने. ही त्यांची `पणती'. ती त्यातल्या त्यात बधते दोघांना. एक आहे दिल-नवाझ (आमिर खान) हा दिलफेक आशिकचं मिजाज घेऊनच जन्माला आलेला आईस कँडीवाला. खोडय़ाळ, आक्रमक स्वभावाचा, सतत शायरी झाडणारा हरफनमौला. दुसरा आहे हसन (राहुल खन्ना) हा दिलनवाजच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा तेलमालिशवाला. अगदी मुलीसारखा लाजाळू, अबोल, संकोची पण नेकदिल.
  हट्टानं लेनीला सायकलवर बसवून शांताची सोबत करणारा, तिला छळून घरी येण्याचं वचन वसूल करणारा, पतंग उडवायला शिकवण्याच्या मिशानं तिच्याशी बेधडक शारीरिक लगड करू पाहणारा, पायानं तिची साडी वर सरकवण्याची डांबरट `मस्करी' करणारा दिलनवाझ हा शांतासाठी स्वत:च्या आकर्षणशक्तीचा परिणाम दर्शवणारा एक मापक आहे. तिच्या स्त्राeत्वाचा स्वेच्छेनं गुलाम बनून खेचला जाणारा एक पुरुष... पण, `पर'पुरुष. कारण आपला जोडीदार ती शोधते मवाळ हसनमध्ये. जी जवळिक दिलनवाझ तिच्याकडून जबरदस्तीनं वसूल करू पाहतो, तीच ती हसनशी स्वेच्छेनं करते, प्रसंगी पुढाकार घेऊन.
  प्रेमाचा हा तिढा गुंफत जातो तोही अगदी तेढय़ा काळात. ब्रिटिश ही भूमी सोडून जाताना विभाजनाची रेघ ओढून जाणार आहेत, याची चाहूल लागल्यावर लाहोरही आतल्या आत खदखदू लागलेलं असतं. आपली माती सोडून जाण्याच्या कल्पनेनं अस्वस्थ झालेला सिंग (गुलशन ग्रोव्हर) लेनीच्या घरातल्या डिनर पार्टीत लाहोरच्या गोऱया इन्स्पेक्टर जनरलवर हात उगारतो, तेव्हाच लहानग्या लेनीलाही भविष्यातल्या उलथापालथींचा अस्फुट अदमास येतो. पार्कातल्या गप्पा-गोष्टींचा सूर बदलू लागतो. आजवर एकमेकांशी मजाकमस्करी करत गरमा-गरम नाश्त्याचा आस्वाद घेणारे सुख-दु:खांचे भागीदार यार-दोस्त आता एकमेकांकडे संशयानं, भयानं पाहू लागतात. भारतीय स्वातंत्र्याच्या मुहूर्तावर हळूहळू  धुमसू लागलेल्या लाहोरमध्ये गुरुदासपूरहून एक ट्रेन येते. मुडद्यांनी भरलेली. सर्व मुस्लिम स्त्राe-पुरुष-मुलांची निर्घुण कत्तल झालेली... चार गोण्या बायकांच्या छात्यांनी भरलेल्या... या गाडीतून दिलनवाझच्या बहिणी येणार असतात...
 दिलनवाझचं सांत्वन करायला गेलेल्या शांता आणि लेनीला त्याच्या छज्ज्यातून होरपळणारं लाहोर दिसतं. मुस्लिमांकडून हिंदू-शिखांचं, हिंदू-शिखांकडून मुस्लिमांचं होणारं शिरकाण पाहून लेनी थिजून जाते. शांताही गोठते ती दिलनवाझच्या बदललेल्या सुरानं. एकेकाळी धर्मावरून झगडणाऱया मित्रांना `दुख का मजहब कौनसा, आँसू की कैसी जात। सारे तारे दूर के, सबके छोटे हाथ।' असं सुनावणारा दिलनवाझ आता आपल्या शेजारच्या हिंदूंची घरं पेटलेली पाहून आतून सुखावू लागतो. त्याला स्वत:लाही हा फरक समजतो, डाचतो...  
तो शांताला तिथेच लग्नाची मागणी घालतो, सांगतो, ``हे हिंदू-मुस्लिम- सिक्ख वगैरेंच काही नाहीये. हे आपल्या सगळ्यांमध्येच आहे दडलेलं... एक जानवर... पार्कातल्या पिंजऱयात डांबलेल्या सिंहासारखं. दबा धरून वाट पाहणारं... कब पिंजरा खुलेगा...'' शांताची साथ मिळाली, तर आपल्यातंलं जनावर काबूत राहील, याची खात्री आहे त्याला. मात्र असहाय-विकल दिलनवाझला शांता नकार देते. त्याच्यातल्या जनावरला बांधून ठेवणारा एकमेव प्रेमपाश नकळतच तोडून टाकते...
   एके रात्री भयाकुल शांताला धीर देताना हसन तिच्या इतका जवळ येतो, की दोघांमधलं सगळंच अंतर गळून पडतं. त्यांचा शरीरसंग चोरून पाहणाऱया लेनीची नजर अवचित समोरच्या खिडकीवर जाते, तिथे तिला दिसतो दिलनवाझचा चेहरा... क्रुद्ध, विद्ध, विखारी.
  1947 ची ती काळरात्र पुढे जे उत्पात घडवते, त्यात लेनीचं बाल्य, निरागसता आणि आयुष्याचा एक सुरम्य हिस्सा कायमचा जळून खाक होतो...
  `1947' या सिनेमाच्या केंद्रस्थानी लहानगी लेनी असण्याइतकंच महत्त्वाचं आहे तिचं पारशी असणं. या भूमीवर परक्या असलेल्या पारश्यांचं उपरेपण संख्याबळाअभावी अगतिक आहे. लाहोरचा भडका उडू लागल्यावर लेनीचे आईवडील (किटू गिडवानी- आरिफ झकेरिया) या उपरेपणातून आलेली वांझोटी तटस्थता सांभाळतात. आसपासचा हलकल्लोळ आपण थांबवू शकत नाही, याबद्दलची खंत त्यांनाही टोचणी लावतेच. पण, वावटळीत उडणाऱया पाचोळ्याइतकीच हैसियत असणाऱया या समाजाला दोष तरी कोण देणार?
  दोष तसा एकमेकांचे गळे घोटणाऱयांचा तरी कुठे असतो. आपले जातभाई `तिकडे' कापले जाताहेत, या भावनेतून आणि `मारलं नाही तर आपण मरू,' या भयगंडातून उद्भवलेली भ्याड, दिशाहीन हिंसा असते ही. आपली भूमी सोडवत नाही, तिचा परकेपणा सोसतही नाही, मित्रांच्या गोतावळ्याचं रक्तपिपासू कळपात झालेलं रुपांतर दिसतंय पण आकळत नाही, अशी भयाण उलघालींची ही अवस्था.
  सिनेमात ती टिपली जाते लेनीच्या अबोध पण संस्कारक्षम नजरेतून. लेनीचं बालपण रुढ अर्थानं अगदी निरागस नाही. लेनीसमोर क्वीन्स पार्कच्या हऱयाभऱया काळातही बऱयाच `प्रौढ' गप्पागोष्टी आणि घटना घडत असतात. दिसनवाझ शांताशी चावटपणा करतो तो तिच्या समोरच. तिच्या भावजीवनाचा तो `हिरो' आहे. शांतानं दिलनवाझला नाकारल्यावर `मै करूँगी तुमसे शादी', असं लेनी त्याला बिनदिक्कत सांगते. हसन आणि शांताची चुंबाचुंबीही ती पाहते. त्यानंतर वाढदिवसाला `किस' करणाऱया छोटय़ा चुलतभावाला `तुझ्यापेक्षा तो मालिशवाला शांताचं किती सुरेख चुंबन घेतो,' असं फटकारते. धडाधडा पेटलेलं लाहोर ती दिनवाझच्या गच्चीवरून पाहते, दोन गाडय़ांना हातपाय बांधून चिरफाळला जाणारा माणूस पाहते, जिवंत जाळली जाणारी माणसं पाहते आणि शांता-हसन यांचा शरीरसंगही.
 पण तरीही तिचं न कळतं वय आहे. ती घटना फक्त `पाहू' शकते, त्यांचे अर्थ लावू शकत नाही मोठय़ा माणसांसारखे. ती घटनांचं विश्लेषण करते पण तिच्या वयाच्या पातळीवरचं, अर्थ लावायचा प्रयत्न करते ती आपल्या नजरेतून. `1947' च्या दुफळीनं तोवरचा स्नेहभाव हा `बालिश भाबडे'पणा ठरवला, हे लक्षात घेतलं, तर लेनीची कहाणी हे धर्मद्वेषाच्या आगलोळात तत्कालीन समाजजीवनातली निरागसताच कशी कोळपून गेली, याचं रुपक वाटू लागते. दीपा मेहतानं हे लेनीचं लहानपण चित्रभाषेतही जपलं आहे. त्यासाठी लेनीची ती नजर आत्मसात केली आहे. त्यामुळंच `1947'मध्ये कसला न्यायनिवाडा नाही, बाजू घेणं नाही; त्याचबरोबर जनावर जागलेल्या माणसांचे भेसूर चेहरे दाखवतानाही लपवाछपवी नाही, त्यांच्या मूर्खपणाचं समर्थन नाही.
 इथे हिंदू- शिखांबद्दल मुसलमान अद्वातद्वा बोलतात, मुसलमानांचीही उणीदुणी काढली जातात. पण, ती माणसं त्यांचा काळ आणि मर्यादा ओलांडून प्रेक्षकाला भलतीसलती `आवाहने' करत नाहीत. मुळात ती प्रेक्षकाला `अड्रेस' करून बोलतवागतच नाहीत. अस्सल अनुभवातून आलेली सहजस्फूर्तता जपण्याचं मोठं आव्हान दीपानं समर्थपणे पेललं आहे.
  तिचा कॅमेरा समोरच्या सगळ्या माणसांच्या त्या-त्या वेळच्या पातळीवरच राहतो. लेनीच्या घरातला आरसा बनतो, पार्कातल्या मैफलीत यारदोस्त बनून शरीक होतो, लाहोर सोडून निघालेल्यांचे तांडे दाखवताना, ते पाहून हेलावलेल्या हसनची नजर आत्मसात करतो, गुरुदासपूरच्या ट्रेनमधले विटंबित निष्प्राण कलेवरांचे ढीग पाहताना दिलनवाझच्या नजरेसारखाच गोठतो... गोठवन टाकतो. दीपा कादंबरीच्या आशयात पदरचे रंग भरत नाही, तिचा पोत बिघडवत नाही. हा दुर्मिळ संयम चित्रपटमाध्यमावरची तिची प्रगल्भ हुकुमत दाखवतो.ती माणसांचे `नायक', `नायिका', `खलनायक', `विनोदी पात्रं' असे गणपती घडवत नाही. मूळच्या शाडूमातीचा ओलावा, लवचिकता कायम ठेवते. ती माती पुढे आपसूक आकार धारण करते, तेव्हाही तिच्या मातीपणाचा विसर पडत नाही प्रेक्षकाला. सगळ्याच पात्रांमध्ये थोडेथोडे आपण आहोत आणि ती सगळी आपल्यातही थोडीथोडी आहेत, ही सहोदरभावना प्रेक्षकाचं सिनेमाशी घट्ट नातं तयार करते. त्याला आतून हलवते.
  भारतीय सिनेमात `टाबू' असलेला हसन-शांताचा प्रणयप्रसंगच घ्या. इथे हसन शांताचं शरीर कुरवाळतो, ब्लाऊझची बटणं काढतो, परकराची नाडी सोडतो; साधारपणे `बोल्ड, प्रक्षोभक' भासेल, असं सगळं काही करतो. पण त्यातून जाणता प्रेक्षक `चाळवला' जात नाही. त्या कृत्यातली अवघडलेली `भूक'च फक्त पोहोचते प्रेक्षकांपर्यंत. (आपल्याकडील सदाबुभुक्षित प्रेक्षक-वर्गातील काहींना हाही प्रसंग `गरम' वगैरे वाटण्याचा धोका आहे खरा. पण तो दोष सिनेमाचा नाही.)
  आराधना सेठ यांची निर्मिती संकल्पना आणि रचना, गाइल्स नटजेन्स यांचं छायालेखन, वेश- रंगभूषा यातून दीपा मेहतानं दिल्लीच्या लोकेशन्समधून लाहोर उभं केलंय. लेनीच्या घरातलं `फॉर्मल' वातावरण, पार्कातला मोकळेपणा, ब्रिटिश आणि मुघल वास्तुकलेच्या मिश्रणातून घडलेला परिसर, दाटीवाटीनं वसलेल्या गल्ल्यामुहल्ल्यांची वाटावळणं... हे सगळं `1947'मध्ये जिवंत होतं. गाइल्सच्या छायालेखनाची खुबी अशी, की तो फक्त रुप पोहोचवत नाही; त्या त्या स्थळाचा स्पर्श- गंधही दरवळवतो, `इंद्रियाकरवी अतिंद्रिय' भोगवतो. माणसांमधल्या स्नेहबंधांची ऊब `1947' पाहताना सुखावते आणि त्याच उबेची धग झाल्याचा प्रत्ययही देते; यात गाइल्सच्या छायालेखनाचा मोठा वाटा आहे. स्वच्छ- मोकळ्या- निरभ्र- स्नेहशील दिवसांचा पूर्वार्ध आणि मिट्ट अंधारानंच भरल्या-भारलेल्या, भडक्यांचाच भीषण लाल-पिवळा सर्वभक्षी प्रकाश घेऊन आलेल्या रात्रींनी व्यापलेला उत्तरार्ध, ही पटकथेतली नैसर्गिक रचना त्यानं कौशल्यानं वापरली आहे.
   `1947' ची इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजरातीच्या मिश्रणातून बहुपोती पण एकजिनसी भाषा समर्थ चित्रभाषेला पूरक कामगिरी बजावते. अकृत्रिम संवाद `त्या' लाहोरच्या रसरशीत ताजगी आणि खुमारीचा अहसास करून देतात. आमिर खान, नंदिता दास, राहुल खन्ना, मैया सेठना, किटू गिडवानी, कुलभूषण खरबंदा, आरिफ झकेरिया, गुलशन ग्रोव्हर, पवन मल्होत्रा, रघुवीर यादव आदी सर्व प्रमुख कलावंतापासून सेकंदभर दिसणाऱया ज्युनियर आर्टिस्टांपर्यंत सर्वांच्या अभिनयाचा लसावि एकच आहे; कुणी `अभिनय' करतच नाही, सगळे पडद्यावर `जगतात', किमान तसा प्रामाणिक प्रयत्न करतात. मैयाचं आंग्लप्रभावित हिंदी लेनीला साजून दिसतं, तसंच राहुल खन्नाचंही मूळ इंग्रजी वळणामुळं अडखळतं हिंदी उच्चारण हसनच्या व्यक्तिरेखेतला अबोलपणाच अधोरेखित करतं. नंदिताच्या व्यक्तिमत्त्वातलं चैतन्य इथे शांतापासून वेगळं काढता येत नाही आणि आपल्या अतिपरिचयाचा आमिरसुद्धा दिलनाझमध्ये केव्हा विरघळून जातो ते कळत नाही.
पात्रनियोजनात दीपानं सर्वात मोठा धोका पत्करला आमिरची निवड करून. प्रश्न त्याच्या अभिनयक्षमतेचा नाही, त्याच्या व्यावसायिक `नायका'च्या प्रतिमेचा आहे. दिलनवाझची सुरुवातीची हिरोगिरी हा रुढ नायकाच्या प्रतिमेशी सुसंवादी स्वभावगणु आहे. हे लक्षात घेऊन दीपानं हा `हीरो' निवडला असावा, अशी शंका आपल्याला येते आणि पुढे दीपा-आमिर मिळून आपला `कात्रज' करतात. पण, हा अनुभव सुखाचा. बहिणी गमावल्यानंतर दिलनवाझमधलं जनावर नखं काढू लागतं, तिथून आमिर दिलनवाझच्या अंतरंगातली जळमंट आणि अंधार उपसू लागतो. त्याची बदललेली नजरच `अभिनेत्या'ची लख्ख लकाकी प्रतिबिंबित करते.
  भारतीय चित्रपटशैलीचं व्यवच्छेदक लक्षण असणारी गाणीही `1947'मध्ये बिनधास्त वापरून दीपानं कथित कलापटांच्या चौकटींना धक्का दिला आहे. `बन्नोरानी' हे लग्नगीत सोडून बाकीची गाणी `पार्श्वगीत' आहेत. कविता आणि गीतरचना यांचा सुवर्णमध्ये साधणारी जावेदची शब्दकळा आणि कालसुसुंगत सुरावटींना कालनिरपेक्ष फ्यूजनचा `टच' देणारं ए. आर. रहमानचं संगीत यांनी ही गाणी सिनेमात मुरवून टाकली आहेत.
  पतंगांच्या सणाला आसमंतातलं उत्सवी चैतन्य `रुत आ गयी रे' मधून उत्फुल्लपणे ओसंडतं. `धीमी धीमी भिनी भिनी खुशबू है तेरा बदन। सुलगे महके, पिघले- दहके, क्यूं ना बहके, मेरा मन।' या गाण्याचा मुखडा आणि त्यातल्या `तू जो पास है, मुझे प्यास है। तेरे जिस्म का अहसास है।' या ओळीमधून, प्रेयसीच्या शरीरगंधाच्या धुंदीनं नादावलेल्या चालीतून हसन आणि शांता याच्यांतल्या जवळिकीचा नेमका पोत पकडला गेलाय. `बन्नोरानी'मध्ये थिरकत्या लग्नगीताचा गोडवा आहे. फाळणीच्या अक्राळविक्राळ तांडवाच्या पार्श्वभूमीवर कानांत तेजाबासारखी ओतली जाणारी `रात की दलदल है गाढी रे। धडकन की चले कैसे गाडी रे'ची आर्त, मृत्युगंधित पुकार थेट काळजात घुसते. सिनेमाच्या शेवटी `ईश्वर अल्ला तेरे जहाँमें, नफरत क्यूं है, जंग है क्यों' ही `अल्ला तेरो नाम'च्या शब्दसुरांची आठवण करून देणारी प्रार्थना मात्र काहीशी भाबडी आणि `पोझी' वाटते. रहमानला `टेक्नोविझार्ड' म्हणून हेटाळणाऱयांची `कानउघाडणी' करणारी ही अव्वल दर्जाची कामगिरी आहे.  
गाण्यांमधल्या, थीम म्युझिकलमधल्या सुरावटी कमीअधिक गतीत, वैविध्यपूर्ण वाद्यमेळात घोळवून आणि स्वतंत्र सुरावटींमधून रचलेल्या पार्श्वसंगीतातून त्यानं संपूर्ण सिनेमा एकसंघ बांधला आहे. एखाद्या कादंबरीवर प्रभावी सिनेमा काढण्याचा परिपाठ घालून देणारा `1947' हा आपलाच इतिहास मांडतो आपल्यासमोर. त्यातून काही शिकायचं की, त्याची पुनरावृत्ती करायची, याचं भंपक `मार्गदर्शन' करायच्या फंदात तो पडत नाही, ही या सिनेमाच्या श्रेष्ठत्वाची खूण आहे. प्रेक्षकाला मात्र हा अनाग्रही सिनेमा संपल्यावरही `मोकळं' होता येत नाही. आपलं वर्तमान हा उद्याचा इतिहास आहे, या जबाबदारीतून त्याची सुटका नाही.
  क्वीन्स पार्कमध्ये येऊन उसासणारे आजचे सगळे म्हातारे जीव अनंतात विलीन झाल्यानंतरही ही जबाबदारी संपणार नाही.

2 comments:

  1. निव्वळ भन्नाट रिव्हु !
    चित्रपटाएवढाच किंबहुना कंकणभर सरस !

    ReplyDelete