Monday, December 19, 2011

मराठी माणसाची धाव (जिगर- मराठी)


`जिगर'चा अर्थ समाजासमाजानुसार बदलतो.
  सामान्य गुजराती माणसाची जिगर त्याला देशा-परदेशात मोठा व्यापारी बनवते. सामान्य मारवाडी माणसाची जिगर त्याला उद्योगपती बनवते. सामान्य दाक्षिणात्य माणूस जिगरीच्या बळावर हॉटेलसम्राट बनतो आणि सामान्य मराठी माणसाची जिगर त्याला खेडय़ातून मोठय़ा शहराच्या चाळीत एका खोलीची जागा मिळवून देण्यातच संपते.
 सगळ्या गुजराती/ मारवाडी/ दक्षिणी/ मराठी जिगरबाज माणसांचं हेच होतं, असं नाही. अपवाद सगळ्यांमध्येच असतात. पण, त्या- त्या समाजांची प्रातिनिधीक `इमेज' तरी वर उल्लेखल्यासारखी आहे.
 डॉ. संजय पाटोळेनिर्मित आणि कुमार सोहोनीदिग्दर्शित `जिगर'च्या नावावरून सिनेमाच्या आशयाबद्दल काही गैरवाजवी अपेक्षा निर्माण होऊ नये, म्हणून हा ऊहापोह. कारण ही कहाणी आहे कोकणात जन्मून मुंबईत पळून येणाऱया आणि स्वहिमतीवर घरसंसार उभा करणाऱया एका जिगरबाज मराठी तरुणाची.
  कोकणातल्या एका खेडय़ातला छोटा मुलगी विठोबा स्मार्ट आणि चुणचुणीत. पण हेडमास्तरांनी खेकडे पकडून आणण्याचीच हजेरी त्याच्यामागे लावल्यानं त्याचं अभ्यासात दुर्लक्ष होतं आणि सातवीत तो तिसऱयांदा नापास होतो. त्याच्या या अपयशानं संतापलेले वडील श्रीपतनाना (रवींद्र बेर्डे) त्याला जेवत्या ताटावरून हाकलून देतात, `स्वत:च्या पायावर उभा राहशील तेव्हा तोंड दाखव' असं बजावतात.
 मुंबईत स्थायिक झालेले श्रीपतनानांचे मित्र अण्णा (सखाराम भावे) त्याला भेटतात. तो त्यांच्या हातापाया पडून त्यांच्यासोबत मुंबईला येतो. अण्णांच्या खाष्ट निपुत्रिक पत्नीला (नयनतारा) विठोबाच्या रुपानं मुलाबरोबर घरगडीच लाभतो आणि संपूर्ण चाळीला एक हरकाम्या मिळतो. दिवसभर सर्व चाळीच्या आणि काकूच्या हमाल्या करण्याच्या चक्रातही पिचून न जाता विठोबा मेहनतीनं अभ्यास करत मोठा होत जातो. मोठय़ा झालेल्या विठोबाच्या (लक्ष्मीकांत बेर्डे) रखरखीत आयुष्यातला ओलावा आहे, ल्युसी (कविता लाड) ही त्याची ख्रिश्चन बालमैत्रीण... अण्णांच्या मित्राची (लिलाधर कांबळी) पुतणी.
  बीए झाल्यावर नोकरीसाठी वणवण आणि ल्युसीबरोबर प्रेमप्रकरण सुरू असताना विठोबा एकदा छोटुभाई (इर्शाद हाशमी) या सिनेमा-नाटकांना कपडे पुरवणाऱया सधन गृहस्थाला गुंडापासून वाचवतो. या उपकारांची परतफेड म्हणून छोटूभाई त्याला आपल्याकडे मॅनेजरची नोकरी देतो.
 आर्थिक स्थैर्य लाभल्यावर विठोबा ल्युसीशी लग्न करायचा निर्णय घेतो. ख्रिश्चन मुलगी घरात आणलेली चालणार नाही, म्हणून अण्णांची बायको जेव्हा विठोबाला घरातून हुसकावून लावते तेव्हा छोटूभाई त्याची राहण्याची व्यवस्थाही करतात. अण्णांच्या पत्नीच्या आजारपणात विठोबा आणि लग्नानंतर लता झालेली ल्युसी तिची मनापासून सेवा करतात. त्यामुळे अण्णांच्या पत्नीचे डोळे उघडतात आणि ती लताला सून म्हणून स्वीकारते.
 दोघांना सोमूच्या रुपानं पुत्रप्राप्ती झाल्यावर दोघेही हरखून जातात. सोमू शाळेतही जाऊ लागतो. चाळीच्या जागी इमारत बांधू पाहणाऱया एका मवाली बिल्डरला विठोबानं जोरदार विरोध केलेला असतो. त्याला तुरुंगवासही घडवलेला असतो. तुरुंगातून परतल्यावर तो सोमूचं अपहरण करतो. जिगरबाज विठोबा त्या गुंडाच्या अड्डय़ावर धडक देऊन मुलाची सुटका करतो.
  चाळीतल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात सोमू वरून कोसळून मृत्युमुखी पडतो. मनानं खचलेले विठोबा-लता कोकणात परतात. सोमूच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या लता आणि विठोबाच्या समुद्रकिनाऱयावर शाळेच्या वेशात खेकडे पकडणारा मुलगा दिसतो. लताला त्याच्यात सोमू दिसतो, तर विठोबाला स्वत:चंच बालरूप. त्याच्याकडे बोट दाखवून लताला सावरतो. `पावलापावलावर होणाऱया भासांमध्ये अडकलीस, तर चालशील कशी', असा उपदेश करून स्वत:बरोबरच तिचीही जिगर जागवतो.
  `जिगर'ची ही कथा-पटकथा निर्माते डॉ. संजय पाटोळे यांची आहे. संवाद गंगाराम गवाणकरांचे. मुळात मराठी तरुणाच्या जिगरबाजपणाचा परीघ त्यांनी मर्यादित गृहीत धरलाय. पण तो प्रातिनिधिक म्हणून मान्य केला, तर सामान्य माणसाच्या, मुंबईतल्या चाळकऱयांच्या जगण्याशी सांगड घालणारे खुसखुशीत आणि हृदय प्रसंग पेरून त्यांनी पटकथा जिवंत केलीय, हेही मानावं लागेल. विशेषत: विठोबाच्या मुंबईत आगमनापासून ल्युसीबरोबरच्या प्रणयाराधनापर्यंतचा काळ उत्तम जमलाय. पहाटे पाच वाजता `येणारा' नळ, पुकट पेपर वाचायला आणि चहा प्यायला येणारे शेजारी, दुधाच्या रांगेत ल्युसीची वाट पाहात `नंबर' सोडणारा विठोबा, दोघे बागेत जातात तेव्हा `बुक' झालेल्या सर्व जागा आणि बुकिंगचे पैसे घेऊन एखादं झाड देणारा दरवान, अशा काही वास्तव काही कल्पनारंजक प्रसंगांच्या मिश्रणातून पटकथा-संवादकार' मुंबईतल्या मराठी माणसाचं आयुष्य यथातथ्य उभं करतात.
 `जिगर'या शीर्षकानुरूप सुरू केलेली पटकथेची वाटचाल पुढे उत्कर्षबिंदूवर नेताना मात्र पटकथाकारांची पंचाईत झालेली दिसते. एकतर घरातून पळून आलेल्या विठोबाचं आईवडिलांशी काही भावनिक नातं उरलेलं दिसत नाही. तसं असतं तर तो स्वत:च्या पायावर उभा राहिल्यावर घरी जायला हवा होता. तसा तो जात नाही. लग्न केल्यावरही जात नाही आणि मुगला झाल्यावरही जात नाही. मग, आईवडिलांचं पत्र आल्यावर त्याचं भावनावेगानं अश्रुकंपित होणं परिणामकारक वाटण्याऐवजी नाटकी वाटून जातं.
 शिवाय नायकाच्या जिगरीचा प्रवास त्याच्या कुटुंबवस्तल होण्याबरोबर संपतो. त्यापुढे त्याचा आर्थिक सामाजिक उत्कर्ष होताना दिसत नाही. गुंड बिल्डरबरोबरची त्याची झुंज तर हास्यास्पद होते; कारण मुळात हा बिल्डरच अतिशय फुसका आहे. ज्याला चाळकऱयांनी केलेल्या किरकोळ मारामारीच्या तक्रारीवरून बारा वर्षं तुरुंगवास भोगावा लागतो तो माणूस खरतनाक गुंडही वाटत नाही आणि पैसेवाला बिल्डरही.
  विठोबाची जिगर जागी करणारा शेवटचा प्रसंग हा सिनेमाचा `हायलाईट', पण तिथे विठोबा बायकोची जिगर फक्त उक्तीतून जागवतो, योग्य कृती करून दाखवत नाही. आपल्यासारखाच एक मुलगा शाळेच्या वेळात खेकडे पकडतोय म्हटल्यावर त्याचं पुढे काय होईल, आपल्यासारखंच तर होणार नाही ना, या विचारानं तो हादरलेला दिसत नाही. त्या मुलाचं आयुष्य बिघडू देणार नाही, असंही म्हणत नाही. दुसरा विठोबा तयार होऊ न देण्याची संधी तो गमावतो आणि फक्त शब्दांचे बुडबुडे काढतो. विठोबासारख्या कृतीशील माणसाकडून प्रेक्षकाला असली `जिगर' अपेक्षित नसते.
 दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी कोकणाचं चित्रण आणि चाळीतल्या जीवनाचं दर्शन जाणकारीनं घडवलेलं आहे. छोटय़ाछोटय़ा प्रसंगांमधून खुसखुशीत विनोदाची निर्मिती केली आहे. लक्ष्मीकांत बेर्डेकडून गंभीर स्वरुपाची भूमिकाही त्यांनी उत्तम साकारून घेतली आहे. लक्ष्मीकांतनी नेहमीच्या `लौकिका'पेक्षा वेगळा विठोबा समरसून उभा केला आहे. कविता लाडची ल्युसी गोड दिसते- वागते. फक्त या दोघांना `नयनात सांग तू' आणि `झोका झुले हृदयातला' या गाण्यांमध्ये खास मराठी छापाचं नाचवणं केविलवाणं वाटतं. लक्ष्मीकांत या कवायतीला सरावलाय, पण कविताचं अवघडलेपण स्पष्टपणे जाणवतं. शिवाय प्रवीण दवणेंच्या गाण्यांमध्ये नायक- नायिकेच्या एकूण सामाजिक-शैक्षणिक स्तराशी विसंगत अलगुज, लोचनी, कलिका असे शब्द आणि भावगीत छाप रचना जाणवते. त्यांच्या `गोविंदा गीता'`फोडाया मटकी' असा मडक्याला `मटकी' हा हिंदी शब्द वापरलाय. तोही खटकतो. सुशील गंगावणे यांचं संगीत बऱयापैकी श्रवणीय आहे.
  लक्ष्मीकांत-कविता यांना रवींद्र बेर्डे, विजय चव्हाण, सखाराम भावे, नयनतारा, इर्शाद हाश्मी आणि अमेय साळवी, रोहन मसूरकर, रणजित हर्चेकर या बालकलाकारांनी सुरेख साथ दिली आहे. ल्युसीचा अविवाहित काका झालेल्या लिलाधर कांबळींचा खास उल्लेख करावा, असा बहारीचा गोयंकार ख्रिश्चन त्यांनी साकारला आहे.

No comments:

Post a Comment