Friday, December 16, 2011

जगबुडीचा जाहिरातपट (आर्मागेडन)


अख्ख्या जगाला संकटात लोटण्याचा हॉलिवुडकरांना नवा छंद लागला आहे.
  जगाच्या विनाशाचं कल्पनाचित्र रंगवणारा `डीप इम्पॅक्ट' नुकताच येऊन गेला. आता भारतात कोलंबिया- ट्रायस्टारचा `आर्मागेडन' दाखल झालाय.
  अवकाशातून एखादा धूमकेतू वा लघुग्रह पृथ्वीवर आदळून पृथ्वीवरल्या जीवसृष्टीचा संपूर्ण विनाश होण्याची भीती हे दोन्ही सिनेमांच्या कथा- कल्पनेमधलं साम्य. फक्त `डीप-इम्पॅक्ट'मध्ये काही भाग्यवान मानवी जीव वाचण्याची शक्यता ठेवण्यात आली होती. `आर्मागेडन'मध्ये तीही नाही.
 दोन्ही सिनेमांच्या `ऍप्रोच'मध्येही बराच फरक आहे. `डीप इम्पॅक्ट'मध्ये विनाशाच्या चाहुलीनं माणसांच्या मनोव्यापारात होणारी उलथापालथ केंद्रस्थानी होती. `आर्मागेडन'मध्ये लघुग्रहाच्या ठिकऱया उडवून देणाऱया (अर्थातच) अमेरिकी साहसवीरांच्या पराक्रमावर `फोकस' आहे.
  पृथ्वीशी धडक घेऊन पृथ्वीवरची संपूर्ण जीवसृष्टी नष्ट करायला निघालेल्या एका लघुग्रहावर हॅरी स्टॅम्पर (ब्रूस विलिस) या तेलविहिरी खणण्यातल्या तज्ञाच्या नेतृत्वाखाली `नासा'चे शास्त्रज्ञ अंतराळवीरांचं पथक पाठवतात. आपल्या रासवट, दांडगट सहकाऱयांच्या साह्यानं हॅरी त्या लघुग्रहाच्या पृष्ठभागावर एक मोठं छिद्र खणून त्यात अणुबॉम्ब पेरतो. पृथ्वीला धोका पोहोचवण्याच्या कक्षेत येण्याआधीच अणुबॉम्बच्या स्फोटानं लघुग्रहाचे दोन तुकडे होतात आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेबाहेरून निघून जातात; जीवसृष्टीचा विनाश टळतो, हे `आर्मागेडन'चं कथानक.
 आता खरंतर अंतराळातल्या अशा संकटाचा वेध पृथ्वीवरच्या अत्याधुनिक यंत्रणांना सुमारे पाच वर्षे आधी लागतो. वास्तवात असा लघुग्रह पृथ्वीशी धडक घ्यायला निघाला, तर पृथ्वी सुरक्षित ठेवण्याकरता त्याचा निकाल लावायला पाच-सहा महिनेप्रवास करून त्या लघुग्रहावर पोहोचायला लागेल. पण, अशा `रटाळ' वास्तवावर `डॉक्युमेंटरी'वजा सिनेमा कोण काढणार? (आणि काढला तर `डिस्कव्हरी'च्या प्रेक्षकांशिवाय तो कोण पाहणार?)
  त्यामुळं, कथाकार रॉबर्ट रॉय पूल- जोनाथन हेनस्ली, रुपांतरकार टॉम गिलरॉय- शेन सॅलर्नो आणि पटकथाकार जोनाथन हेनस्ली- जे.जे. अब्रॅम्स यांनी भरपूर स्वातंत्र्य घेऊन ही घटना चित्तथरारक बनवली आहे.
 `आर्मागेडन'मध्ये लघुग्रह पृथ्वीच्या परिसरात आल्याची खबर मिळते अंतराळातलं एक `शटल' उल्कांच्या माऱयानं उद्ध्वस्त झाल्यावर. आता सिनेमात हे फक्त अमेरिकेच्याच शास्त्रज्ञांना समजतं (कारण जगात तेच सगळ्यात शहाणे.) तेही पृथ्वीचा विनाश करणारी धडक फक्त काही दिवसांवर आलेली असताना. याच वेळी काही उल्कांचा अमेरिकेत काही ठिकाणी वर्षाव होतो. मोठमोठय़ा इमारती जमीनदोस्त होतात, तप्त अग्नी गोलकांचा मारा गोथॅम, ग्रँड सेंट्रल स्टेशन, क्रायस्लर बिल्डिंग उद्ध्वस्त करून टाकतो. तरीही म्हणे अमेरिकेतसुद्धा कुणालाही या संकटाची चाहूल लागत नाही. बाकीचं जग तर बेअकलीच. `टेक्सास'च्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीकडे झपाटय़ानं निघालेला असताना अमेरिकेचे अध्यक्ष म्हणे हे गुपित राखतात... `टॉपमोस्ट सिक्रेट.'
  आता शास्त्राeयदृष्टय़ा मूर्खपणामध्ये गणलं जाईल असं आणि अमेरिकेबाहेरच्या जगाला थेट अवमानकारकच असं लेखक दिग्दर्शकांचं कल्पनास्वातंत्र्य मान्य केलं तरच `आर्मागेडन'चा आनंद घेता येतो. अंतराळप्रवासाचा अनुभव, शिक्षण आणि अत्याधुनिक उपकरणं वापरण्याचं यत्किंचितही ज्ञान नसलेले हॅरी आणि सहकारी खूप कमी मुदतीत सर्व प्रशिक्षण घेतात आणि त्यानुसार अंतराळात कार्यवाही करू शकतात, हेही प्रेक्षकानं पचवून घ्यायचं. (आपल्याला ते जड नाही म्हणा. आपले `गरीब' नायक महागडय़ा मोटारी चालवतात, अत्याधुनिक गन्स वापरतात, तेव्हा आपण कुठे शंका घेतो?)
  हिंदी सिनेमाचा `डोकं गहाण ठेवण्याचा' सराव कमी आणायचं ठरवलं तर `आर्मागेडन' एक जबरदस्त अनुभव देतो. दिग्दर्शक मायकेल बे (आधीचे सिनेमे `बॅड बॉईज' आणि `द रॉक') हा जाहिरातपट आणि म्युझिक व्हिडिओज्च्या क्षेत्रातला दादा मानला जातो. `आर्मागेडन'मध्ये त्याच्या या कसबाची साक्ष पटते. अंतराळवीर लघुग्रहावर पोहोचेपर्यंतचा सुमारे 60 टक्के सिनेमा तर तास-सव्वातासाचा जाहिरातपट वाटतो. त्याचा कोणताही शॉट काही सेकंदाच्यावर टिकत नाही आणि एकेक प्रसंगही जेमतेम एक-दोन मिनिटांचा. त्यात मागे सतत साऊंडट्रकवर दणदणीत गाणी किंवा पार्श्वसंगीत सुरू असल्यानं `एम टीव्ही' पाहात असल्याचाही भास होतो. हा सिनेमा आहे की सिनेमाचा ट्रेलर, असा प्रश्न तो पाहताना मनात निर्माण होतो.
 गंमत म्हणजे एवढय़ा प्रचंड वेगानं नजरेसमोरून झरझर सरकणाऱया दृश्यांमधूनही प्रेक्षकाला कथाभाग सहजगत्या समजतो. इंग्रजी संवाद आणि त्यातले पंचेस् न कळणाऱया प्रेक्षकालाही ढोबळ कथानक कळू शकतं. कारण मूळच्या गुंतागुंतीच्या शास्त्राeय आधारांचं लेखक दिग्दर्शकांनी अतिसुलभीकरण केलंय.
 मुख्य कथानकाबरोबरच `आर्मागेडन'मध्ये टिपिकल अमेरिकन मनोवृत्ती आणि समाजस्थिती दाखवणारी उपकथानकं आहेत. घटस्फोटित हॅरी स्टॉम्परची तेलविहिरींच्या परिसरातच वाढलेली मुलगी ग्रेस (लिव्ह टायलर), हॅरीचा कनिष्ठ सहकारी ए.जे.फ्रॉस्ट (बेन ऍफ्लेक) याच्याशी तिचं प्रेमप्रकरण, त्याचा हॅरीलला असलेला राग हे तपशीलही मुख्य कथानकाबरोबर त्याच वेगानं उलगडत जातात. हॅरीच्या सहकाऱयांची निवड, त्यांची व्यक्तित्वं, त्यांचं प्रशिक्षण, त्यांच्याबद्दल `नासा'च्या शास्त्रज्ञांना असलेली घृणा आणि शंका यातून संघर्ष घडतात आणि विनोदही.
 ही मंडळी लघुग्रहावर पोहोचल्यावर खरं नाटय़ सुरू होतं. लघुग्रहाच्या वातावरणातल्या झंझावती पाषाणांच्या माऱयात सापडून दोन यानांपैकी एक कोसळतं. दुसरं भूपृष्ठावर उतरतं पण नियोजित ठिकाणापासून 25 मैल दूर... कठीण भूपृष्ठावर. त्यामुळं, `ड्रिलिंग'चं वेळापत्रक कोलमडतं. अणुबॉम्बसाठी खड्डा खणला जाणं अशक्य आहे, हे पृथ्वीवर लक्षात आल्यावर अमेरिकन लष्कर `नासा'चा ताबा घेऊन लघुग्रहावरच्या अणुबॉम्बचा स्फोट घडवण्याची तयारी करतं. जिवावर उदार होऊन जगाला वाचवण्यासाठी अवकाशात गेलेल्या शूरवीरांच्या जिवावर उठणं `नासा'च्या प्रमुखाला डॅन ट्रूमनला (बिली बॉब थॉर्न्टन) मान्य नसतं. तो हा स्फोट चलाखीनं काही काळ रोखतो.
  तिकडे लघुग्रहावर अणुबॉम्बची टिकटिक सुरू झाल्यावर हॅरी त्याच्या पथकातल्या `नासा'च्या शास्त्रज्ञांबरोबर बॉम्ब निकामी करतो. शेवटच्या क्षणाला स्फोट घडवण्यासाठी कुणातरी एकाला मागे राहावं लागेल, अशी स्थिती निर्माण होते. हौतात्म्यासाठी सगळेजण पुढाकार घेत असताना बॉम्बबरोबर `संपण्या'साठी ए.जे.ची निवड होते. त्याला तळात पोहोचवायला गेलेला हॅरी ऐनवेळी त्याला लिफ्टमध्ये ढकलून स्वत: त्याची जागा घेतो. `माझ्या मुलीला सांभाळ' असं सांगून जग वाचवण्यासाठी स्वत: मरायला तयार होतो आणि मरतोसुद्धा.
 क्षणाक्षणाला... फुटाफुटाला थरार, रोमांच, उत्कंठा, नाटय़, भावनांचा स्फोट पेरण्याचा मायकेल बेचा प्रयत्न `आर्मागेडन'मध्ये कमालीचा यशस्वी झालाय. आधी उल्लेखल्याप्रमाणे प्रचंड दृश्यात्मक वेगातून आणि समोर घडतंय ते सगळं `अस्सल' भासवणाऱया अफलातून दृक्चमत्कृतींच्या गारुडातून तो प्रेक्षकाला खुर्चीला असं खिळवून ठेवतो, की खुर्चीतून उठणं सोडा; या कोपरावरून त्या कोपरावर होण्याचंही भान प्रेक्षकाला राहात नाही. सिनेमाला जाण्याआधीच सिनेमातलं जग विनाशापासून वाचरणार आहे, हे ठाऊक असलेल्या प्रेक्षकावर ही पकड ठेवणं सोपं नाही.
  ब्रूस विलिस, लिव्ह टायलर, बेन ऍफ्लेक, बिली बॉब थॉर्न्टन, विल पॅटन आदी कलावंतांनी आपापल्या अत्यंत अचूक आखलेल्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला आहे. रशियाचा अंतराळ स्थानकावरचा भ्रमिष्ट शास्त्रज्ञ रंगवणारा पीटर स्टॉर्मेअर आणि प्रकांड बुद्धिमान पण सटकू `रॉकहाऊंड' साकारणारा स्टीव्ह बुस्केमी इतर भाऊगर्दीत लक्षात राहतात.
  शंभर टक्के आणि चोख `एज ऑफ द सीट' मनोरंजन करणाऱया `आर्मागेडन'मध्ये दिसणारा आपला भारत देश फारच वेगळ्या प्रतीचं मनोरंजन आणि उद्बोधन करतो. भारताचं पहिलं दर्शन घडतं अमेरिकेचे अध्यक्ष संपूर्ण जगाला उद्देशून येऊ घातलेल्या संकटाची पहिली वाच्यता करतात तेव्हा. त्यावेळी भारताची जनता पगडय़ा वगैरे पारंपरिक पोशाखात ताजमहालसमोर बसून हात जोडून देवाची करुणा भाकताना दिसते. भारताचं दुसरं आणि शेवटचं दर्शन घडतं ते सिनेमाच्या शेवटी... संकट टळल्यावर. यावेळी पुन्हा ताजमहालासमोरचा तोच जमाव हर्षेत्फुल्ल झालेला दिसतो. संपलं भारत दर्शन.
  वास्तवातल्या `नासा'मध्ये आज अनेक बुद्धिमान भारतीय शास्त्रज्ञ अभिमानास्पद कामगिरी बजावताहेत, याची दखलही `आर्मागेडन'कारांना घ्यावीशी वाटत नाही, यातून सिनेमाच्या हॉलिवुडी नकाशातलं भारताचं स्थान लक्षात येतं.

No comments:

Post a Comment