Thursday, December 15, 2011

देशभक्तीची विटंबना (जयहिंद)


`टॅक्स फ्री' सिनेमाचा एक मोठा फायदा असतो. तिकिटाचे पैसे पूर्णपणे वाया गेले तरी मुळात तिकिटाची किंमतच कमी असल्यानं फार पैसे वाया जात नाहीत.
 `जयहिंद' नावाचा भयाण चित्रपट पाहण्याचं दुर्भाग्य नशिबी आलेल्या प्रेक्षकाला तुम्ही जेमतेम एवढाच दिलासा देऊ शकता. हिंदी चित्रपटसृष्टीतील देशभक्तीचे घाऊक कंत्राटदार मनोजकुमार ऊर्फ भारतकुमार यांचा हा नवा सिनेमा. या सद्गृहस्थांनी आपल्या `क्रांती'मध्ये ब्रिटिशांना चणेफुटाणे (चना जोर गरम) खायला घालून भारतातून हुसकावून लावलं होतं. आता त्यांनी काश्मीर समस्येला तेवढय़ाच थिल्लरपणे हात घातलाय.
 `जयहिंद' ही काश्मीरमध्ये दहशतवादाशी सामना करणाऱया एका दिलेर, बहादूर वगैरे वगैरे जवानाची विजयची (कुणाल गोस्वामी) कहाणी आहे. काश्मीरमध्ये भारतीय सैनिक असलेल्या विजयची गुलरोश (ऋषी कपूर) या स्थानिकजाँबाज तरुणाशी दोस्ती होते. गुलरोश मुस्लिम असूनही मातृभूमीशी- भारताशी एकनिष्ठ असतो. वलीशाह (शाहबाज खान) हा स्थानिक दहशतवादी भारतीय सैनिकांच्या वेषात गुलरोशच्या बहिणीसह काही लहान मुलांना ठार मारून गुलरोशच्या मनात विजयबद्दल विष पेरतो.
 विजयचं शीतल (मनीषा कोईराला) या मुलीवर प्रेम आहे. त्यांचा साखरपुडा होत असताना शीतलचे आजोबा निवृत्त कर्नल ग्यानचंद (प्राण) त्यात मोडता घालतात. कारण विजयचे आजोबा निवृत्त कर्नल मोहनदास (अमरिश पुरी) यांनी 1971 च्या भारत- पाक युद्धात त्यांच्या डोळ्यांसमोरच देशद्रोह केलेला असतो. असल्या गद्दाराच्या घरात नात द्यायला त्यांचा सक्त विरोध असतो. या धक्क्य़ाने विजयचे वडील आत्महत्या करतात.
 प्रेमिकेला बायको बनविण्यासाठी विजयला आजोबांवरचा, स्वत:वरचा आणि घराण्यावरचा कलंक धुवून काढणं भाग असतं. तो वलीशाहला नेस्तनाबूत करून हा डाग कसा धुऊन काढतो, याची `जयहिंद'ही कहाणी.
 या कहाणीला उपकथानकांचे फाटेही बरेच आहेत. विजयला `बाबू' (शहरी बाबू हो!) म्हणणारी, एकतर्फी प्रेम करणारी `गाँवकी छोरी' रोशनी (शिल्पा शिरोडकर) आहे, तिचा काश्मिरी पंडित पिता (प्रेम चोप्रा) आहे, गुलरोशची प्रेयसी गुलनार (रवीना टंडन) आहे. शिवाय रोशनीवर (बिंदू) आणि मिस्टर सिंदिया या (सदाशिव अमरापूरकर) या  प्रोफेसर युगुलाची हिणकस विनोदगाथा आहे.
 या सगळ्यांतून काश्मीर प्रश्न वेळात वेळ काढून अधूनमधून डोकावतो. तोही भारतबाबूंनी एकदम सोप्पा करून टाकलाय. ज्याचा हुद्दा काय, ज्याला नेमकं काम काय, हे सिनेमाभर कळत नाही, असा गॉगल आणि तरतऱहेच्या टोप्या घालून, छाकटे कपडे पेहरून, कॅमेऱयापुढं अकारण तिरकं उभं राहून भाषणबाजी आणि बंदूकबाजी करणारा नायक काश्मिरात सोडला की तो एकटा दहशतवाद्यांचा अख्खा अड्डा उद्ध्वस्त करून टाकतो. असे पंधरावीस सांड काश्मिरात सोडले की झालं? भारत सरकारला न सुचलेला हा सोप्पा उपाय भारतकुमारांनी सुचवलाय.
 काश्मीर समस्या आणि देशभक्तीचा असा किरकोळीत निकाल लावून झाला की, उरलेला वेळ दिग्दर्शक गाण्याबजावण्यावर खर्च करायला मोकळा? आणि गाणी म्हणजे काय तर तंग, रुंद गळ्याचे कपडे घातलेल्या नायिका आणि सहनर्तिकांचं विविध कोनांमधून सुभग दर्शन पिटातल्या पब्लिकचे डोळे निवलेच पाहिजेत! बाकी मित्रांमधले समज गैरसमज, दोन धर्मांमधल्या `मुंहबोल्या' भावाबहिणींचं उदात्त प्रेम, उपनायिकेचा त्याग हा मसाला खास मनोजकुमार स्टायलीत आहेच.
  ही `मनोजकुमार स्टाईल' काय, असा प्रश्न पडणाऱयांसाठी एक अफलातून प्रसंग सांगायचा मोह आवरत नाही. प्रसंग असा आहे की, नायक गोळ्या लागून जखमी झालाय. सगळं शहर पुरानं वेढल्यामुळं त्याला हॉस्पिटलमध्ये नेणं शक्य नाही. डॉक्टर नायिका शीतल त्याच्यावर एका तंबूतच ऑपरेशन करते. तंबूत उजेडासाठी असलेले कंदील सोसाटय़ाच्या वाऱयामुळे खांबांवर आपटून फुटतात. ऑपरेशनसाठी `उजेड पाडण्या'ची जबाबदारी रोशनी या उपनायिकेवर येते. (रोशनीकडूनच रोशनी, आहे या डायरेक्टरचा टच?) ती आपल्या लाडक्या बाबूचा जीव वाचवण्यासाठी आधी ओढणी पेटवते. ती पुरी पडत नाही तर ब्लाऊज काढून पेटवते. शेवटी घागराही काढून पेटवते. उत्कंठित प्रेक्षकांच्या दुर्दैवानं नेमकं तेवढय़ात ऑपरेशन पार पडतं. पुढे `गरज पडली असती तर मी स्वत:लाही पेटवून घेतलं असतं' असं रोशनी सांगते. केवढं हे उदात्त प्रेम?
अनेक वर्षे चित्रण रखडल्याच्या खुणा दाखविणाऱया या सिनेमात ऋषी कपूर, प्राण, अमरिश पुरी आणि (चक्क) शिल्पा शिरोडकर यांचा चोख अभिनय हीच जमेची बाजू. कुणाल गोस्वामी `सिन्सियरली' आपलं काम करण्याचा प्रयत्न करतो खरा! पण, त्यानं अभिनयासाठी आणि विशेषकरून संवादफेकीसाठी आपल्या वडिलांचा आदर्श ठेवलेला दिसतो. म्हणजे त्याचं काय झालं असेल तर वेगळं सांगायला नको. मनीषा कोईरालाच्या भूमिकेला काही आकारऊकारच नाही आणि अशा भूमिका कमालीच्या निर्जीवपणे करण्यात ती एक्सपर्ट आहे. तिच्या तुलनेत कमी लांबीच्या भूमिकेत रवीना टंडनसुद्धा छाप टाकते. मास्टर कृष्णा या चुणचुणीत पोरानं त्याच्या भूमिकेला आवश्यक भावमारू आगाऊपणा झोकात केला आहे.
  लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांच्या संगीतात त्यांच्या जुन्या संगीताची चमक नसली तरी `सखी री तेरे नैना', आणि `पडोसन पकडी गयी' ही गाणी बऱयाच काळानं शुद्ध भारतीय ठेक्यामुळं श्रवणीय झाली आहेत. तांत्रिक बाजू अगदीच सुमार आहेत.
 सरकारनं `देशभक्ती'च्या लेबलामुळं अकारण `टॅक्स फ्री' केलेला हा `टॅक्सिंग' सिनेमा काश्मीरमध्ये, विशेषत: दहशतवाद्यांना `विनोदपट' म्हणून दाखवायला हरकत नाही. ते अगदी पोट धरधरून हसतील. उर्वरित भागात हा सिनेमा खरंतर फुकटच दाखवायला हवा किंवा तो पाहण्याबद्दल प्रेक्षकालाच काही `भरपाई' मिळायला हवी.

No comments:

Post a Comment