सिनेमाचं नावच किती वेगळं... `प्यार तो होनाही था' `प्यार किया
तो डरना क्या', `प्यार ही प्यार', `जब प्यार
किसीसे होता है', `प्यार झुकता नहीं'... सगळीकडे `प्यार' होऊन गेलंय,
सिनेमांचा भर नंतरच्या घडामोडींवर.
`प्यार तो होनाही था' या नावातूनच सिनेमा प्रेमात पडण्याबद्दलचा,
प्रेम फुलण्याविषयीचा आहे, हे स्पष्ट होतं.
सिनेमाचं कथानकही नावाला साजेसं. इथे नायक-नायिका जवळपास सिनेमाभर एकत्र आहेत, पण प्रेमाचा `इकरार' होतो शेवटच्या रिळात, शेवटच्या
मिनिटाला. असं होणार हे आपल्याला सिनेमाच्या नावामुळे आणि हिंदी
सिनेमे पाहण्याच्या तगडय़ा अनुभवामुळे आधीच ठाऊक असतं. अशाच कथानकावरचे
`रोमन हॉलिडे', `चोरी, चोरी', `दिल है के मानता नहीं' आपण पाहिलेले असतात. तरीही `प्यार
तो...' आपण शेवटपर्यंत पाहतो आणि जगात अजूनही काही बऱया गोष्टी
आहेत, अशा भावनेसह बाहेर पडतो. अशा प्रकारच्या
`फील गुड' सिनेमांचं उद्दिष्टच मुळी प्रेक्षकाला
ही भावना देण्याचं असतं. ते `प्यार तो...'
चोख पूर्ण करतो.
सिनेमात शेवटी एक मुख्य पात्र असलेला पोलिस इन्स्पेक्टर (ओम पुरी) म्हणतो, `प्रत्येक माणसानं
आयुष्यात एकदा तरी प्रेम करावंच. प्रेम माणसाला खूप चांगलं बनवतं.'
हे या सिनेमाचं सूत्र आहे, हीच त्याची शिकवण आहे.
सिनेमा सुरू होतो तेव्हा नायिका संजना (काजोल)
आधीच प्रेमात पडलेली आहे. नायकाच्या नव्हे तर राहुल
(बिजय आनंद) या भलत्याच माणसाच्या.
फ्रान्समध्ये नोकरी करणाऱया, तिथलीच नागरिक असणाऱया
संजनाचा राहुलशी वाङनिश्चयही झालाय. अनाथ संजनानं पैसे साठवून
एक टुमदार घरही भावी संसारासाठी खरेदी करायचं ठरवलंय.
पण, तिच्या नशिबात नियतीनं काही वेगळंच वाढून ठेवलंय,
याची जाणीव होते राहुल कामानिमित्त भारतात आल्यावर. इथे तो भलत्याच मुलीच्या (कश्मिरा शाह) प्रेमात पडतो, तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतो आणि
तो संजनाला फोनवरून कळवतोही.
राहुल आणि त्याच्याशी करायचा संसार यांनी भावविश्व व्यापलेल्या संजनाला हा
धक्का सहन होत नाही. ती राहुलला कसंही करून परत मिळवण्याच्या
उद्देशानं भारताकडे येणाऱया विमानात बसते. या विमानातच तिची गाठ
पडते शेखर (अजय देवगण) या अट्टल चोराशी.
तो एका राजकुमारीचा हिऱयांचा हार चोरून भारताकडे निघालाय. विमानात त्यांची ओळख होते आणि फुटकळ भांडणंही. विमानतळावर
पोलिसांकडून पकडले जाण्याच्या भीतीनं शेखर तो हार संजनाच्या सामानात दडवतो आणि एका
गंमतीशीर प्रवासाची सुरुवात होते.
संजनाला राहुल परत मिळवायचाय म्हणून ती त्याच्यामागे आणि शेखरला हार परत मिळवायचाय
म्हणून तो तिच्यामागे, अशी यात्रा सुरू होते. या यात्रेत (योगायोगानं) दोघे शेखरच्या
गावी जातात. तिथे `सरसों'च्या शेतात वसलेल्या शेखरच्या एकत्र कुटुंबाकडून संजनावरही प्रेमाचा,
वात्सल्याचा वर्षाव होतो. आपल्या हृद्रोगग्रस्त
पुतण्याच्या उपचारासाठी, कर्जामुळे गहाण पडलेली शेतीवाडी सोडविण्यासाठी
शेखरनं चोरीचा मार्ग पत्करलाय, हे संजनाला समजतं. ती शेखरची मैत्रीण बनते.
तोवर शेखरला संजनाबद्दल `वेगळं काही' वाटू लागलेलं असतं; पण ती इथे राहुलला परत मिळवण्यासाठी
आलीये, याचं भान ठेवून तो मानतलं प्रेम उघडपणे व्यक्त करत नाही.
उलट, तिला तिचं प्रेम मिळवून देण्याचं वचन देतो
आणि त्यासाठी प्रयत्न सुरू करतो.
शेखरच्या योजनेनुसार संजना राहुलला जळवण्याचा प्रयत्न करते. आपण शेखरच्या प्रेमात पडलो आहोत, असं राहुलला भासवते.
पण, राहुल तिच्याकडे परतेपर्यंत तिला राहुलचा स्वार्थीपणा
उमगलेला असतो. तिचं त्याच्यावरचं प्रेम उद्ध्वस्त झालेलं असतं
आणि नि:स्वार्थीपणे मदत करणाऱया, तिला जिवापाड
जपणाऱया शेखरवर तिचा जीव जडलेला असतो.
तीही शेखरपाशी प्रेम व्यक्त करू धजत नाही. फ्रान्समध्ये
परतण्याची वेळ आल्यावर शेखरला न कळू देता ती आपल्या घरासाठी जमा केलेली रक्कम त्याला
मिळेल, अशी व्यवस्था करते. स्वप्न पाहण्याचा,
ते उद्ध्वस्त होण्याचं दु:ख भोगल्याचा अनुभव तिला
शहाणी करून गेलेला असतो. निदान शेखरचं स्वप्न तरी पूर्ण व्हावं,
म्हणून तिनं हा त्याग केलेला असतो.
शेखरच्या हितचिंतक इन्स्पेक्टरमुळं ऐनवेळी शेखरला संजनाचं प्रेम समजतं आणि
विमानतळावर विमान रोखून तो तिला योग्य वेळी अडवतोच, हे काही सांगायला
नको.
मेग रायन आणि केव्हिन क्लाईनच्या `फ्रेंच किस'
या हॉलिवूडपटावर लेखक-दिग्दर्शक अनीस बाज्मी यांनी
`प्यार तो...' बेतला आहे. त्याचं भारतीयीकरण करण्याच्या नादात (विशेषत:
पूर्वार्धात) त्यांनी सिनेमात काही फुटकळ उपकथानकं
आणि असंबद्ध प्रसंगही घुसवलेले आहेत. पिटातला प्रेक्षक गृहीत
धरून काही बाष्कळ विनोदही केले आहेत.
फ्रान्सकडून भारताकडे निघालेल्या विमानात अचानक बिघाड झाल्यावर सहप्रवाशांची
भीती घालवण्यासाठी नायकानं गायलेलं समूहगीत हा तर आचरटपणाचा कळसच. (ते सिनेमातून कापून टाकलं तरी काही बिघडणार नाही.) अगदी
पुस्तकातल्यासारखं (किंवा `दिलवाले दुल्हनिया
ले जायेंगे' मधल्यासारखं) शेखरचं घर आणि
अगदी साच्यातनं काढलेले आई, वडील, भाऊ,
वहिनी, बहीण हे कुटुंबीयही सिनेमात उपरे वाटतात,
त्यात शेखरनं आपल्या कुटुंबियांच्या सुखासाठी चोरीचा मार्ग पत्करणं हाही
अगदी साचेबंद घटक. शेखर आणि संजना मिळून राहुलला जळवतात,
हा भाग तर (त्यातल्या गाण्यासह) अत्यंत बालिश. राहुलला परत मिळवण्यासाठी संजना श्रीमंताची
मुलगी असल्याचा बनाव रचते, हेही खूप परंपरागत झालं. शिवाय सिनेमाचा जो भाग भारतात घडतो, असं सिनेमात सांगितलं
जात; तो सरळसरळ सेशल्स आणि स्वित्झर्लंडला चित्रीत केलाय...
सिनेमा `नेत्रसुखद' करण्यासाठी.
काढायचे झाले तर या सिनेमात आणखी ढीगभर दोष निघतील. तरीही
तो अगदीच टुकार वाटत नाही; कारण या सिनेमात काही गुणही आहेत.
आणि गुणदोषांचा मेळ घातला तर तो पाहण्याचा अनुभव जमेच्या बाजूकडे झुकणारा
आहे.
एकतर उपरोल्लेखित प्रसंग बाज्मींनी एखा लयीत हाताळल्यामुळे सराईत प्रेक्षकांच्या
ते अगदी अंगावर येत नाहीत. सिनेमाच्या गाभ्याशी प्रामाणिक राहून
चित्रित केलेले नायक- नायिकेच्या प्रेमात पडण्याशी संबंधित प्रसंग
अतिशय संयत आणि तरल मांडणीमुळे आकर्षक झालेले आहेत. प्रेमात पडल्यावर
माणसात जसा चांगुलपणा येतो, तसा प्रेमात पडण्याचं चित्रण करताना
बाज्मींमधला उत्तम लेखक-दिग्दर्शक जागा झालाय बहुतेक.
विशेषत: आपल्या मनातली राहुलची जागा नकळत शेखरनं
घेतलीये, हे संजनाला उमगणं; ते उमगल्यावर
होणारी तगमग आणि उलघाल तर बाज्मींनी अप्रतिमच चित्रित केलीये. नायक- नायिकेतल्या हळुवार प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर
`थीम म्युझिक'सारखं वाजणारा गिटारचा तुकडाही
बाज्मींनी सुरेख वापरून घेतलाय.
शेखरचं `ऐसाही हूँ मै' हे पालुपद
आणि काजोलचा निरागसपणा अधोरेखित करण्यासाठी तिला दिलेली वेंधळेपणाची लकबही लक्षणीय.
मात्र, या सिनेमाचा हुकुमाचा एक्का आहे. काजोल. सिनेमा शेवटपर्यंत पाहायला भाग पाडते ही बाई!
काय जबरदस्त अभिनेत्री आहे ही; आणि किती सहजपणे
इतक्या विविधरंगी भावछटांचा कल्लोळ उमटतो तिच्या चेहऱयावर. संपूर्ण
सिनेमा केवळ आपल्या लोभस अभिनयाच्या बळावर खेचून नेण्याची किमया काजोलनं पुन्हा एकदा
करून दाखवली आहे. इतरांना एखादी भूमिका `जगण्या'साठी जे कष्ट घ्यावे लागतात ते पाहून आपली दमछाक
होते.
ही मुलगी त्या भूमिकेचं व्यक्तिमत्त्व एखाद्या कपडा चढवावा
इतक्या सहजतेनं स्वत:मध्ये भिनवून घेते. तिच्यासारखी ए-वन अभिनेत्री बरोबर असल्यानंतर अजय देवगण
काहीसा झाकोळून जातो खरा! पण, शेखरच्या
भूमिकेत तोही फिट बसतो.
काजोलबरोबरच्या (विशेषत: हळुवार)
प्रसंगांमध्ये तो कुठेही कमी पडत नाही.
अजय देवगणला `हीन' लेखण्याची हल्ली
एक फॅशन आहे. (त्यात अनेक पुरुषप्रेक्षकांना काजोलचा `मित्र' म्हणून त्याच्याबद्दल वाटणारा दुस्वासही अनेकदा
मिसळतो.) `काय कळकट्ट दिसतो तो', असं म्हणून
`शी।़।़' किंवा `ई।़।़'
म्हणणारे हे विसरतात की सिनेमा ही तथाकथित `मदनाच्या
पुतळ्यां'ची मक्तेदारी नाही. त्यांच्यासाठी
`मॉडेलिंग'ची सिनेमापेक्षाही तकलादू दुनिया
आहे. अजय दिसतो कसा यापेक्षा तो अभिनय कसा करतो, हे जास्त महत्त्वाचं असायला हवं. `प्यार तो...'मध्ये तो निगरगट्ट चोर ते हळवा प्रेमिक हा प्रवास व्यवस्थित दाखवतो.
बिजय आनंद आणि कश्मिरा शाह यांची पात्रंच लेखकानं दुय्यम करून टाकली
आहेत. कश्मिराला शरीरसौष्ठव दाखवण्याचं नेहमीचं काम आहे.
ते ती आहे तसं दाखवते. ओम पुरी, टिकू तलसानिया वगैरे बुजुर्ग नट आपापली कामं चोख बजावतात.
छायालेखक निर्मल जानींना प्रेमकथेसाठी आवश्यक अशी `नेत्रसुखद'
छायाचित्रणाची जबाबदारी उत्तम पार पाडली आहे. रेमो
आणि जसपिंदर नरुलानं जोशात गायलेलं शीर्षकगीत, `जब किसी की तरफ
दिल'हे कुमार सानूचं गाणं, आशाबाइभचं `अजनबी' आणि `आज हे सगाई'
हे लग्नगीत ही गाणी किमान थिएटरात तरी श्रवणीय आहेत.
त्यातही, गीतकार समीरनं `जब किसीकी
तरफ `हे गाणं सुरेख लिहिलंय. `जब किसी की
तरफ दिल झुकने लगे/ बात आकर जुबांपर रुकने लगे/ आंखोआंखोंमे इकरार होने लगे/ बोल दो अगर तुम्हे प्यार
होने लगे' हा मुखडा सोप्या शब्दात सिनेमाचं सार सांगून जातो.
`चाहने जब लगे दिल किसी की खुशी/ दिल्लगी ये नहीं
ये है दिल की लगी' या अंतऱयाच्या ओळींमधून या सिनेमातल्या प्रेमाची
जातकुळी तो सहज मांडून दाखवतो.
याच गाण्यात एक अंतरा असा आहे... `उसकी खुशबू अगर अपनी
साँसोंमे हो/ उसका सपना अगर अपनी आँखोमें हो/ जब ना दिल के बहलने की सूरत लगे/ जब कोई जिंदगी की जरुरत
लगे'... असं कुणी खास माणूस आयुष्यात असेल तर `प्यार तो...' अवश्य पाहा.
`तसं' कुणी नसेल आणि यावंसं वाटत असेल तरी हरकत नाही.
कारण, `इट कुड बी युवर लव्ह स्टोरी' असं या सिनेमाचं `ब्रीद' वाक्यच
आहे.
नवीनच मिळालेल्या माहितीनुसार, जब किसी की तरफ हे गाणं कोणी विनू महेंद्र यांनी लिहिलं आहे. समीरने नाही!
ReplyDelete