Monday, December 26, 2011

मुरली मोहनांची पिचकी सुरावट (बंधन)


पत्नी ही पतीची चरणांची दासी असते. एकदा `डोली'त बसून नवऱयाच्या घरी गेलेल्या मुलीची तिथून `अर्थी'च बाहेर निघावी.
  पती कितीही बदफैली, दुर्जन, नालायक असला तरी पत्नीनं त्याच्या आज्ञेत राहायचं असतं.
    हे विचार तुम्हाला पटतात' तुम्हाला पटत नसेल तरी याच कालबाह्य समजांना कवटाळून बसलेले, उघडपणे छुपेपणे त्यांचं समर्थन आणि पालन करणारे, त्यांना साभिमान `सनातन भारतीय मूल्ये' मानणारेच आपल्या समाजात बहुसंख्येने आहेत, हे तुम्ही मान्य करता? त्यांना त्यांची मूल्ये ठरवण्याचा अधिकार आहे, हे मान्य असेल आणि त्या मूल्यांचं विकृत उदात्तीकरण करून पैसे कमावण्याचं चित्रपटकारांचं स्वातंत्र्यही तुम्ही मनात असाल, तर आणि तरच `बंधन'च्या वाटेला जा.
  कारण कपडय़ांवरून, भाषेवरून हा सिनेमा आधुनिक काळात घडतोय, असा आभास निर्माण होत असला तरी त्यातली मनोवृत्ती आणि विचारपद्धती मध्ययुगीन म्हणावी, इतकी मागासलेली दिसते. इथे एक गरीब घरातली बहीण (आश्विनी भावे) एका श्रीमंत ठाकुराशी (जॅकी श्रॉफ) लग्न करताना आपल्या लहान भावाला (सलमान खान) घेऊन सासरी जाते. मेव्हण्याच्या घरात लहानाचा मोठा झालेला हा राजू त्याचा प्रत्येक शब्द झेलतो, त्याची हरएक आज्ञा पाळतो. शहरात शिकून परतलेली ठाकुरची धाकटी बहीण (रंभा) या राजूची प्रेमिका.
  या हसऱयाखेळत्या घरात आग लावते वैशाली (श्वेता मेनन) ही नौटंकीवाली. आपल्या मादक अदेनं बडय़ाबडय़ा जमीनदारांना घायाळ करून त्यांची संपत्ती बळकावणारी ही नागीण ठाकुरावरही मायाजाल फेकते. त्यात तो फसतो. त्यातून सगळ्या नात्यांची बंधनं तटातट तुटतात. वैशाली, तिची दलाली करणारा तिचा भाऊ (मुकेश ऋषी). आणि तिच्यावर लट्टू होऊन शेवटी तिचे चाकर बनलेले दोन आचरट जमीनदार (अशोक सराफ, शक्ती कपूर) यांच्या षडयंत्रातून प्रेमाचं बंधनं कसं अतूट राहत, याची ही के.मुरली मोहन राव कथित कहाणी.
  के. मुरली मोहन राव हे खरंतर या सिनेमाचे फक्त दिग्दर्शक. पण, कथा-पटकथा यांचं श्रेयच कुणाला न दिल्यानं ही, सगळी मुरली मोहनांच्याच (पिचक्या) बासरीतून उमटलेली सुरावट असावी.
   याआधी `प्रेमकैदी' आणि `अनाडी'सारखे हिट सिनेमे देणाऱया मुरली मोहन यांनी खास मद्रासी कौटुंबिकपटांचा सगळा मालमसाला या कथानकात ठासून भरलाय. भाऊ-बहिणीचं प्रेम, नवरा-बायकोचं प्रेम, पालक-मुलांचं प्रेम, प्रियकर-प्रेयसीचं प्रेम यात आहे. श्वेता मेननची अंगप्रदर्शक, उत्तान नृत्ययुक्त मादक अदा आहे. शिवाय स्वप्नगीतांच्या रेलचेलीत नायिका रंभाच्या अंगप्रत्यंगांचं झटकेबाज दर्शन आहे. सुरुवातीलाच सांगितलेली `मूल्यं' आहेत, त्यांचं उदात्तीकरण करणारे संवाद आहेत. पार्श्वभागांवरच्या लाथा आणि परस्पर निर्भर्त्सनाकारी संवादांमधून फुलणारा गटारी विनोद आहे. हवेत गरगरगरगरगर फिरून आपटणाऱया गुंडांबरोबरच्या नायकांच्या धुमश्चक्री आहेत. मालकाला सलाम करणारा, मानेनं होकार-नकार दर्शवणारा, लॉकअपचं कुलूप लाथा घालून तोडणारा बुद्धिमान इमानी घोडा आहे.
  एरवी या सगळ्या तर्कदुष्ट घटकांची भट्टी जमली तर असले सिनेमे चार घटकांची निर्बुद्ध करमणूक हमखास पुरवतात. पण `बंधन'मध्ये मुरली मोहनांची खिचडी काही धड शिजलेली नाही. मध्यंतरापर्यंत बऱयापैकी सुसह्य वाटणारा `बंधन' उत्तरार्धात मात्र सहनशक्तीचा अंत पाहतो. बंदिस्त पटकथेचा अभाव हे याचं प्रमुख कारण आहे. पत्नी, मेहुणा आणि बहिणीवर अमाप प्रेम करणारा ठाकूर वैशालीसारख्या चंचलेसमोर इतक्या सहजगत्या पाघळतो कसा, हे नीट पटवून देण्यात दिग्दर्शक अपयशी ठरतो. सज्जन माणसाचाही पाय घसरू शकतो, पण तशा प्रसंगानंतर तो सगळं घरदार एखाद्या छम्मकछल्लोच्या नावावर करू देईल, हे काही संभवनीय वाटत नाही. ठाकूरला आपल्या कृत्याबद्दल कुठे पश्चात्ताप झाल्याचंही दिसत नाही. त्याचं हे विसविशीत पात्र भावनिक संघर्षनाटय़ाचा गाभाच भुसभुशीत करून टाकतं.
  तीच गत नायक- नायिकेच्या प्रेमकहाणीची. नायिकेनं दाखवलेल्या राजूच्या सहवासासाठीचा हपापलेपणा तिच्या प्रेमाला ग्राम्य शारीर आकर्षणाच्या बीभत्स पातळीवर आणून ठेवतो. त्यात भार तोकडय़ा मिनीस्कर्टांमध्ये केलेल्या नृत्यगीतांची. दिग्दर्शकाचा स्वप्नगीतांचा हा कवायती साचा `तेरे नैना मेरे नैनोंकी क्यों भाषा बोले' या सुरेख चालीच्या, उत्कट शब्दरचनेच्या गाण्याचं पार मातेरं करून टाकतो.
  सलमान खानचा कमालीचा आत्मविश्वासपूर्ण मोकळा वावर हे `बंधन'चं एकमेव बलस्थान आहे. भाबडा, निरागस राजू सलमाननं झक्क रंगवलाय आणि विनोदाचा उत्तम सेन्सही दाखवलाय. त्याच्या उत्साही वावरामुळेच सिनेमाचा पूर्वार्ध बऱयापैकी मजा आणतो. उत्तरार्धात त्यालाही मळलेली रक्तरंजित वाट चालायला लागते. जॅकी आपली एकांगी भूमिका नेहमीच्या रुबाबात सफाईदारपणे पार पाडतो. श्वेता आणि रंभा यांची जबाबदारी `कायिक' अभिनयाची. ती त्यांच्या काया पार पाडतात. अशोक सराफ आणि शक्ती कपूर यांच्यातला वाह्यातपणाची स्पर्धा शक्ती कपूर जिंकतो पण अशोक सराफ भावदर्शनात बाजी मारतो.
  तीन गीतकार आणि दोन संगीतकार असूनही `बंधन'मध्ये `तेरे नैना मेरे नैनोंकी' वगळता सांगितिक खडखडाटच जाणवतो. `मै दिवानी, मै मस्तानी' हे श्वेतावर चित्रित झालेलं उन्मादक गाणं थोडंफार चालेल ते संगीतेतर आकर्षणांमुळं.
  सलमान किंवा जॅकीचा प्रत्येक सिनेमा आपण पाहिलाच पाहिजे, अशा कट्टर फॅनच्या निष्ठेचं `बंधन' नसेल, तर या बंधनात न अडकलेलंच उत्तम.

No comments:

Post a Comment