Monday, December 5, 2011

जश्न मनाता चला गया... (देव आनंद)

देव आनंदचे वयाच्या अठ्ठय़ाऐंशीव्या वर्षी निधन झाले, ही बातमी समजताच चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांपासून सामान्य प्रेक्षकांपर्यंत सर्वाची प्रतिक्रिया एकच होती- अविश्वासाची, धक्का बसल्याची. अठ्ठय़ाऐंशी वर्षाच्या अन्य कोणाही माणसाच्या निधनाने कोणालाही असा धक्का बसला नसता आणि अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली नसती. हे वय ‘जाण्या’चेच वय असते, हे गृहीत आहे. हे गृहीतक देव आनंदला मात्र लागू नव्हते. सामान्यजनांना लागू असलेले वयाशी संबंधित अनेक नियम त्याला लागू नव्हते- जे लागू झाले, ते धुडकावून लावण्यात तो शेवटपर्यंत यशस्वी झाला; इतका की आकाशातील देवाप्रमाणे हा देवही अजरामर आहे, अशी त्याच्या चाहत्यांना खात्री होती- आपण चिरतरुण आहोत, अशी खुद्द देव आनंदची खात्री झाली होती, तशीच आणि तेवढीच पक्की. त्यामुळेच, देव आनंदचे पक्व फळापरी गळण्याच्या वयातील निधनही ‘आकस्मिक’ ठरले. या वयात सर्रास ‘वृद्धापकाळामुळे’ होणारे निधन देव आनंदच्या भाळी रेखाटण्याची खुद्द देवाचीही हिंमत झाली नाही. एखादा तरुण-तडफदार माणूस कर्तबगारीच्या ऐन भरात हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात जावा, तसा देव गेला. त्याच्या सतत अपडेटेड असलेल्या ट्विटरच्या अकाऊंटवरील शेवटचे ट्वीट दोन डिसेंबर या तारखेचे आहे. म्हणजे मृत्यूच्या दिवसापर्यंत तो नव्या पिढीशी नव्या पिढीच्या संवादसाधनांनिशी संवादरत होता. या अकाऊंटवर तो- इतर सर्व ठिकाणी असायचा, तसाच- हायपरअ‍ॅक्टिव्ह होता, जुन्या पिढीतील अभिनेते, गीतकार, संगीतकार, कलावंत मित्रांचे किस्से नव्या पिढीशी समरसून शेअर करत होता. छोटय़ातील छोटय़ा माणसाच्या फुटकळ प्रश्नाला न कंटाळता, न थकता उत्तर देत होता. त्याच्या घरातील फोनही शेवटपर्यंत तोच उचलत असे आणि फडर्य़ा इंग्रजी उच्चारांत ‘देव स्पीकिंग’ अशी संभाषणाची सुरुवात करत असे. 1923 साली जन्मलेला, 1946 साली म्हणजे 65 वर्षापूर्वी चित्रपटांत आलेला देव आजही किती ‘आजचा’ होता, याचे हे दर्शन होते. देव आनंद कधीच जुना झाला नाही, ‘मागच्या पिढी’चा झाला नाही. पणजोबा होण्याच्या वयात साधा ‘आजोबा’सुद्धा झाला नाही. डॅशिंग-डायनॅमिक देवच राहिला. त्याच्या पिढीतील अनेक कलावंत आज हयात नाहीत. जे हयात आहेत, ते हयात ‘होते’, हे अनेकदा त्यांच्या निधनाच्या बातमीतूनच समजते. देव आनंद मात्र आजच्या पिढीलाही ‘समकालीन’ राहिला. राज कपूरचा समकालीन देव त्याच्या नातवाचाही समकालीन अभिनेता-दिग्दर्शक होता. देवचे बहुचर्चित सदाबहार तारुण्य ते हेच. एरवी काळाने कोणाला क्षमा केली आहे? देवच्या बाबतीतही तो काही खास क्षमाशील झाला नव्हता. वयाच्या साठीत देवने पद्मिनी कोल्हापुरेबरोबर ‘स्वामीदादा’मध्ये काम केले, तेव्हा तो साठीचा दिसत नव्हता, हे खरेच; पण, त्या चित्रपटात तो ‘जाल’, ‘बाजी’, ‘तेरे घर के सामने’मधला र्तुबाज कोंबडय़ाचा किंवा ‘गाइड’, ‘ज्युएल थीफ’, ‘जॉनी मेरा नाम’मधला बिनकोंबडय़ाचा तरणाबांड देवही दिसत नव्हता. कालौघात त्याचाही चेहरा सुरकुतला, गाल खप्पड झाले, पाठीचे पोक निघाले, तो म्हातारा दिसू लागला; तरीही शेवटपर्यंत कोणी त्याला ‘चरित्र अभिनेता’ म्हणून अडगळीत टाकू धजले नाही. प्रत्यक्ष कळिकाळही त्याच्या आंतरिक तारुण्यावर साधा चराही उमटवू शकला नाही. चित्रपटनिर्मितीचा, लेखनाचा, बोलण्याचा, व्यक्त होण्याचा, जगण्याचा बालसुलभ उत्साह आणि देहबोलीतून सतत व्यक्त होणारी सृजनशील अस्वस्थ सळसळ हे त्याचे टॉनिक होते. उभ्या आयुष्यात नकारात्मक भावना त्याच्या मनाला कधी शिवलीच नव्हती की काय, असा प्रश्न पडावा इतका तो सकारात्मक ऊर्जेने सदैव चैतन्यभारित असे आणि सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला तिने भारून टाकत असे. राज कपूरने दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना ‘आय ड्रीम सिनेमा, आय ब्रीद सिनेमा, आय लिव्ह सिनेमा’ अशा शब्दांत आपल्या आयुष्याचे सार सांगितले होते. ते देव आनंदलाही लागू होते. वयाच्या तेविसाव्या वर्षी, 1946 साली ‘हम एक हैं’मधून केलेल्या पदार्पणापासून 1978 पर्यंत सलग तेहतीस वर्षे तो पडद्यावर झळकत राहिला. त्यानंतर त्याचे पडद्यावरील दर्शन टप्प्याटप्प्याने दुर्मीळ होत गेले, तरी ते कधीच संपूर्णपणे थांबले नाही. दर दशकाला त्याची कारकीर्द वेगवेगळी वाटा-वळणे घेत गेली, पण आटली नाही- सतत खळखळत राहिली. त्यामुळे, देव आनंदचा एकच एक काळ सांगता येत नाही. वेगवेगळय़ा काळातील ‘तरुण’ देव आनंदच्या जरतारी आठवणींनी मोहरलेल्या पिढय़ा बदलत गेल्या, थकल्या, म्हाता-या झाल्या, काळाच्या पडद्याआडही गेल्या. पण, देव आनंद प्रत्येक पिढीसोबत राहिला. सदैव समकालीनच राहिला.

पिढ्यानपिढ्यांचा आनंद

देव आनंद-राज कपूर-दिलीपकुमार या त्रिमूर्तीने जवळपास तीन दशके चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या त्रिमूर्तीतील श्रेष्ठ कोण, हा वादाचा प्रश्न मात्र कायम राज आणि दिलीप यांच्याभोवतीच फेर धरून राहिला. दोघेही मुरब्बी अभिनेते होते, राज ग्रेट दिग्दर्शकही होता. देवने ‘काला पानी’साठी अभिनयाचा एकमेव फिल्मफेअर पुरस्कार पटकावला असला आणि ‘काला बाजार’, ‘गाइड’, ‘ज्युएल थीफ’, ‘जॉनी मेरा नाम’ ‘तेरे मेरे सपने’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये त्याच्या बेहतरीन अदाकारीचे दर्शन घडले असले, तरी प्रेक्षक काही त्याचा अभिनय पाहायला जात नसत. ते देव आनंदच्या सदाबहार रूपाच्या, अदांच्या आरशात आपले प्रतिबिंब न्याहाळण्यासाठी जात. सामाजिकपटांपासून थरारक गुन्हेगारीपटांपर्यंत विविधरंगी चित्रपटांमध्ये देव आनंदने काम केले, पण, सर्व चित्रपटांत त्याने सतत देव आनंदचीच भूमिका साकारली. गाण्यांमध्ये तिरकी मान करून, लकवा भरल्यासारखे हातवारे करीत धावणे आणि प्रसंग कोणताही असो, मान लक्लक् हलवत सुपरफास्ट एक्प्रेसच्या गतीने संवाद फेकणे, ही देवची पेटंट स्टाइल होती. तरीही या मदनासारख्या देखण्या, तुटक्या दाताचे लडिवाळ, मोहक हास्य विखुरणा-या दिलफेक स्टाइलबाज नटावर प्रेक्षक जीव ओवाळून टाकत. सुरय्याचा धोतर-बंडीतील शामळू नायक नंतर पन्नासच्या दशकात केसांचा कोंबडा काढून तिरकातिरका धावणारा सहृदयी गुन्हेगार बनला. साठच्या दशकात रोमँटिक हीरोची इमेज धारण केली आणि त्या दशकाच्या अखेरीस कोंबडय़ाला चाट दिली. पन्नाशी ओलांडल्यावर नायकाच्या भूमिका मिळणार नाहीत, हे ओळखून स्वत:च दिग्दर्शक बनला. ‘हरे राम हरे कृष्ण’, ‘स्वामीदादा’, ‘लूटमार’ यांसारख्या त्याच्या दिग्दर्शनातील काही चित्रपटांनी यश कमावले असले, तरी ते अपवादात्मकच होते. दिग्दर्शक म्हणून देवच्या नावावर एकही ग्रेट चित्रपट नाही. स्वत: दिग्दर्शनाच्या फंदात पडण्यापेक्षा त्याने, त्याच्या मर्यादांमध्ये त्याच्याकडून सवरेत्कृष्ट अभिनय करवून घेणा-या विजय आनंदसारख्या थोर दिग्दर्शक भावाच्या दिग्दर्शनात काम केले असते, तर कदाचित तो अभिनेता म्हणून अधिक प्रगल्भ झाला असता, वाखाणला गेला असता. 
 पण, स्वप्रेमात अंतर्बाह्य मश्गुल देवला अशा वाखाणणीची गरज नव्हती. कोणी वंदते आहे की निंदते आहे, हे पाहण्याची फुरसत त्याने स्वत:ला कधीच दिली नाही. गतकाळातील आठवणींनी गहिवरत बसण्यात वेळ दवडला नाही. त्याच्या डिक्शनरीत ‘काल’ हा शब्दच नव्हता. तो सदैव ‘आज’चा माणूस होता. अहोरात्र काळाबरोबर धावणारी त्याची कुडी आता अचेतनच झाल्यामुळे विसावली आहे. पण, पडद्याचा कोपरा न् कोपरा उजळून टाकणारे, आश्वस्त करणारे, प्रेमात पाडणारे त्याचे हास्य जोवर प्रतिमारूपात शिल्लक आहे, तोवर देव पिढय़ान्पिढय़ांना आनंद देत राहणार आहे.

(प्रहार, ४ डिसेंबर, २०११)

 

1 comment:

  1. देवानंदच्या व्यक्तिमत्वाला साजेसा लेख लिहिलाय!

    ReplyDelete