Monday, December 26, 2011

नाव Z पण ए-ग्रेड (द मास्क ऑफ झोरो)


एखादी गोष्ट खूप जुनी असल्यामुळं खूप नवी वाटण्याचा अनोखा अनुभव घेतलाय कधी? नसेल तर `द मास्क ऑफ झोरो' आवर्जून पाहा. हॉलिवुडचे सिनेमे विशेषत: ऍक्शनपट म्हणजे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची, संगणकीय दृक्चमत्कृतींची रेलेचल, असं समीकरण रुजलेलं असताना केवळ जिगर आणि तलवारबाजीचं अद्भुत कौशल्य या बळावर दुष्टांचा नि:पात करणारा, तलवारीच्या टोकानं शत्रूच्या कंठमण्यावर `झेड' (z) ही आपली खूण कोरणारा जुनापुराणा झोरो दणक्यात परतलाय. `स्पेशल इफेक्टस्'च्या गदारोळात हा मानवी नायक अगदी नवा आणि हवाहवासा वाटतो.
 या चमत्कारिक नाविन्यपलीकडे सिनेमात फ्रेमभरही नावीन्य तसं सापडायचं नाही. `फॉर्म्युला फिल्म'चे सगळे लोकप्रिय आणि चिरपरिचित घटक `झोरो'मध्ये आहेत. इतके परिचित की `कोलंबिया-ट्रायस्टार'नं हा सिनेमा हिंदीत डब करण्याचे पैसे वाया घालवले आहेत असंच वाटावं. कारण, इंग्रजी सिनेमाच्या वाऱयालाही न उभ्या राहणाऱया कुठल्याही भारतीय प्रेक्षकाला इंग्लिश झोरोही कुठेही न अडखळता सहज समजेल. काय घडतंय, हे तर सोडाच; पण पुढे काय घडणार आहे, हेही तो अचूक सांगू शकेल, असा या सिनेमाचा साचेबद्ध सांगाडा आहे. पण, तरीही हा सिनेमा अथपासून इतिपर्यंत निखळ प्रेक्षणीय आहे, धमाल मनोरंजक आहे, पैसावसूल आहे.
 कमाल आहे की नाही? एक सर्वपरिचित फॉर्म्यलाही किती आकर्षकपणे मांडता येतो, याचा `झोरो' हा आदर्श वस्तुपाठ आहे.
  याचं एक कारण अगदी सरळसोपं आहे. झोरो हा नायकच मुळी अफलातून आहे. 1919 मध्ये जॉन्स्टन मॅकली या पोलिस रिपोर्टरच्या डोक्यातून कागदावर उतरलेला झोरो हा इंग्लंडच्या सुप्रसिद्ध स्कार्लेट पिंपर्नेलचा स्पॅनिश अवतार. मॅकुलीनं स्कार्लेटच्या साहित्यिक व्यक्तिरेखेला वास्तवातल्या काही बदनाम पण सामान्यजनांना `हीरो' वाटलेल्या व्यक्तींच्या व्यक्तितत्वांची जोड देऊन झोरो घडवला. डोळ्यावर काळी पट्टी बांधलेला, काळ्या वेषातला, तिरकी टोपीधारी झोरो नियमानुसार दुष्टांशी लढून सामान्यजनांच्या हिताची काळजी वाहतो. पण, त्याच्याकडे `स्पायडरमॅन' `सुपरमॅन', `बॅटमॅन'सारख्या दैवी शक्ती नाहीत. आहे ती कुशाग्र बुद्धीमत्ता आणि तलवारीवर अद्भुत प्रभुत्व.
  त्याच्या दिलेरी, धाडस आणि शौर्याबरोबरच दोन महत्त्वाची अस्त्रं आहेत... विवेक आणि विनोद. तो खलनायकांचा आसुरी नि:पात करत सुटत नाही; बुद्धी वापरून दुष्टांना हतबल करतो. त्यांची रेवडी उडवतो. गरज पडेल तेव्हाच एखाद्याला कंठस्नान घालतो. त्याचे लढेही इतर महानायकांप्रमाणे `फँटसी'च्या पातळीवरचे नसतात तर भूतलावरचे, सच्चे भासणारे लढे असतात. या गुणांमुळे डग्लस फेअरबँक्सच्या `द मार्क ऑफ झोरो' या मूकपटापासून ऍलन डिलनच्या झोरोपटापर्यंत रजतपटावर झोरोनं कमालीची लोकप्रियता मिळवली.
 स्टीव्हन स्पीलबर्गच्या `अँबलिन'साठी टेड इलियट, टेरी रॉसो, रँडल जॉन्सन आणि जॉन एस्को यांनी `झोरो'चं पुनरुज्जीवन करताना झोरोसारखीच कुशाग्र बुद्धीमत्ता दाखवली आहे. त्यांनी `झोरो' हा निव्वळ ऍक्शनपट बनवलेला नाही. एखाद्या भव्य ऑपेरासारखी लय असलेला, प्रणय, साहस, प्रेम, वात्सल, द्वेष, अन्याय आणि अन्यायाविरुद्धचा लढा यांचा विलक्षण संयोग साधणारा भव्यपट लिहीलाय.
  एकेकाळी स्पॅनिश वसाहत असणाऱया मेक्सिकोनं स्पेनच्या जुलुमी राजवटीपासून स्वातंत्र मिळवण्यासाठी दिलेल्या कडव्या लढय़ाची पार्श्वभूमी या `झोरो'ला आहे. हा `झोरो' आहे डॉन डिएगो ड ला व्हेगा (अँथनी हॉपकिन्स) हा मध्यमवयीन सरदार. तो अल्टा कॅलिफोर्नियाचा स्पॅनिश गव्हर्नर डॉन राफाएल मॉन्टेरो (स्टुअर्ट विल्सन) याच्याशी लढा देतोय.
  सिनेमा सुरू होतो तेव्हा हा लढा यशस्वी होऊन स्पेनची राजवट संपुष्टात येण्याची घटना जवळ आलेली असते. जाताजाता तीन निरपराध शेतकऱयांना फासावर लटकावून `निषेध' नोंदवण्याचा मॉन्टेरोचा मनसुबा झोरो आपल्या `क्लासिक' शैलीत उधळतो. त्या धुमश्चक्रीत दोन किशोरवयीन पोरं `झोरो'चा जीव वाचवतात.
  या अपमानाचा बदला मॉन्टेरो लगेचच घेतो. तो डॉन डिएगोच्या महालावर छापा मारून डॉन डिएगोच झोरो होता हे पुराव्यानिशी सिद्ध करतो. मॉन्टेरोला एकेकाळी खूप आवडणारी एस्पेरान्झा) ज्युलिएट रोझेन) ही डिएगोची बायको असल्यानं मॉन्टेरोची खुन्नस जुनीच आहे. डिएगोला मारण्याच्या प्रयत्नात मॉन्टेरोच्या हातून एस्पेरान्झाच मरते. तो डॉनला कैदेत टाकून त्याची पाळण्यातली मुलगी एलेना हिला पळवून नेतो.
  डिएगोच्या तुरुंगवासाला 20 वर्षे पूर्ण होत असताना मॉन्टेरो पुन्हा कॅलिफोर्नियाला परततो. इतर जमीनदार डॉन्सच्या साह्यानं मेक्सिकोचा अध्यक्ष जनरल सांता ऍना याच्याकडून समृद्ध कॅलिफोर्निया `खरेदी' करण्याचा त्याचा डाव आहे. तो उधळून लावण्यासाठी म्हातारा डिएगो कैदेतून धाडसानं सुटका करून घेतो. पण वयानं वाढलेला, शरीरानं थकलेला डिएगो हे काम आपल्या आवाक्यातलं नाही, हे ओळखतो. मॉन्टेरोचा नि:पात करायला पुन्हा एकदा `झोरो'चाच अवतार व्हायला हवा, हे त्याला उमगतं.
  अशा वेळी त्याला भेटतो अलेजांड्रो म्युरिएटा (ऍन्टोनिओ बॅन्डेरास) हा भुरटा चोर. हा चोर म्हणजे `झोरो'च्या शेवटच्या साहसात त्याचा प्राण वाचवणाऱया दोन भावांपैकी एक भाऊ. तलवारबाजीचा गंधही नसलेल्या अलेजांड्रोकडे तारुण्याची ताकद, त्वेष, बुद्धिमत्ता, जिगर आणि सख्ख्या भावाला कपटानं मारणाऱया राज्यकर्त्यांबद्दलचा तिरस्कार हे गुण असतात. भडक-तापट स्वभाव आणि रांगडा-खेडवळ बाज हे त्याचे दोष. त्याला प्रशिक्षण देऊन `झोरो' बनवण्याची योजना डिएगो आखतो. `झोरो'चा किताब पेलण्याची पात्रता त्याच्यात निर्माण केल्यावर नकली डॉन बनवून त्याला तो मॉन्टेरोच्या गोतावळ्यात घुसवतो. डिएगोची आता तरूण झालेली सुंदर मुलगी एलेना (कॅथरिन झेटा-जोन्स) अलेजांड्राच्या प्रेमात पडते. कॅलिफोर्निया खरेदीसाठी मेक्सिकोच्याच भूमीवर सोन्याच्या बेकायदा खाणी काढून वेठबिगारांकरवी सोन्याच्या राशी गोळा करणाऱया मॉन्टेरोचा नवा `झोरो' कसा नि:पात करतो, याची कथा म्हणजे `द मास्क ऑफ झोरो.'
  झोरो या काल्पनिक नायकाला ऐतिहासिक वास्तवाशी हलकीशी डूब देऊन पटकथाकारांनी संघर्षाला अस्सल छटा दिली आहे. नवा झोरो घडवण्याच्या प्रक्रियेत एका गावंढळ मावळ्याचा `शिवाजी' बनण्यापर्यंतचा प्रवासही प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखणारा. त्यांच्यात बाप-लेकाच्या नात्यासारखं गंमतीदार भावुक आणि कठोर नातंही आपसूक निर्माण होत जातं. मादक सौंदर्य आणि तीक्ष्ण बुद्धी यांचा संगम असलेली एलेना आणि रांगडा अलेजांड्रो यांच्यातलं आवेगी झटापटीचं प्रेमही त्यांच्यातल्या `क्लास डिफरन्स'मुळं प्रेक्षकाला चटकन भावतं. अलेजांड्रो हा `झोरो'चा जीव वाचवणारा मुलगाच निघणं, एलेनाला डिएगोचा आवाज परिचयाचा भासणं वगैरे योगायोग फॉर्म्युल्याची चौकट भक्कम करतात. मॉन्टेरोलाच बाप समजणारी एलेना आणि तिला आपली ओळख न देऊ शकणारा असहाय्य डिएगो हे तर मनमोहन देसाइभच्या सिनेमातलेच वाटावे, इतके `युनिव्हर्सल.'
 या सगळ्या मसाल्याला `गोल्डन आय'फेम दिग्दर्शक मार्टिन कॅम्पबेलनं सफाईदार आणि कल्पक दिग्दर्शनाची खमंग फोडणी दिली आहे. `झोरो'च्या `एन्ट्री'तच त्याचं श्रेष्ठत्व निर्विवादपणे प्रस्थापित करणारा साहसप्रसंग त्यानं ग्रेटच चित्रित केलाय. अक्षरश: एखादं नृत्य सादर होतो आणि मॉन्टेरोचं नाक कापून (लाक्षणिक अर्थानं) झोरो आपल्या देखण्या अश्वावर विराजमान होऊन गढीच्या बुरुजावर ढळत्या सूर्यबिंबासमोर अश्वारूढ सलामी देतो तेव्हाच दिग्दर्शक प्रेक्षकांचा संपूर्ण ताबा घेतो. एलेना आणि अलेजांड्रो याचं कमालीचं सेन्शुअस, आक्रमक फ्लॅमेन्को नृत्यही बहारदार वठलंय. मॉन्टेरोच्या महालातून महत्त्वाचा नकाशा लंपास करून पळणाऱया अलेजांड्रोला एलेना घोडय़ांच्या पागेत गाठते. तिथे त्यांच्यातल्या लुटूपुटीच्या तलवारद्वंद्वात तिचा एकेक कपडा चिरून देहावेगळा होत जातो आणि या प्रसंगाच्या अंती ती त्याच्या मिठीत विसावते हा प्रसंग तर ऍक्शन, विनोद आणि प्रणयाची टेसदार सांगड घालतो. झोरोपटांमध्ये यादगार `क्लासिक' म्हणून गणला जाईल, अशा वकुबाचा हा प्रसंग आहे.
  ऍक्शनबरोबरच भावनाटय़ालाही समान महत्त्व देणाऱया कॅम्पबेलनं ऍक्शनचे प्रसंग `उरकलेले' नाहीत. त्यातली तलवारबाजी, झेपा, उडय़ा, मुष्टीप्रहार यांची `कोरिओग्राफी'च करून घेतली आहे. काही प्रसंगांना अभावितपणे घडणाऱया विनोदाची चपखल जोडही दिली आहे. नव्या झोरोचा नाठाळ घोडा हे पडद्यावरच पाहावं असं अस्सल विनोदी पात्र. झोरोचीही जिरवणारा हा घोडा झोरोमधला माणूस दर्शवतो.
 अँथनी हॉपकिन्स आणि अँटोनिओ बॅन्डेरास या नायकांचं सादरीकरणही कॅम्पबेलची कल्पकता दाखवून जातं. हॉपकिन्स आधी दिसतो `झोरो'च्या वेशात. मग घरात सरदाराच्या जाम्यानिम्यात. म्हाताऱया हॉपकिन्सचा चेहरा सुरुवातीला दाढीमिशांच्या जंजाळात हरवलेला असतो. नंतर त्यातली `झोरो'कट मिशी शिल्लक राहते. तिलाही चाट बसून शेवटी प्रेक्षकांना परिचित हॉपकिन्सचा चेहरा दिसतो. बॅन्डेरासही सुरुवातीला गलिच्छ कपडय़ांमध्ये दाढीमिशा वाढवलेल्या रुपात भेटतो तेव्हा फारच किरकोळ भासतो. नकली डॉन बनल्यावर तो तत्कालीन फॅशनची मिशी राखतो. झोरोच्या रुपात मिशीही गायब होतो तेव्हा तो राजबिंडा, ताकदवान `झोरो' दिसू लागतो. या साध्या भासणाऱया रंगभूषा-वेशभूषेतल्या बारकाव्यांचाही ही दोन पात्रं उभी राहण्यात मोठा हातभार लागतो.
 रंगभूषा, वेशभूषा, कलादिग्दर्शन आणि छायालेखनातून एक काळ यथातथ्य उभा करणाऱया `झोरो'ची ताकद जबरदस्त अभिनयानं दुणावली आहे. अँथनी हॉपकिन्स असल्या मसालापटात काय करताहेत, असा प्रश्न पडणाऱयानं त्यांचा डिएगो पाहायलाच हवा. जातिवंत अभिनेता अभिनयाच्या विविध शैली आत्मसात करून पठडीबाज भूमिकाही किती ताकदीनं साकारतो, याचं डिएगो हे उदाहरण आहे. हॉपकिन्स यांच्यामुळे डिएगोच्या भूमिकेला आवश्यक राजबिंड रुप, मर्दानी शरीर, चपळ हालचाली आणि उत्तम विनोदबुद्धीची मागणी ऍन्टोनिओ बॅन्डेरास शंभर टक्के पूर्ण करतो हॉपकिन्सच्या बरोबरीनं उभा राहतो. मॉन्टेरो साकारणारा स्टुअर्ट विल्सनही खास शैलीबाज व्हिलन झोकात साकारतो. एलेना साकारणारी कॅथरिन झेटा-जोन्स पदार्पणातच लक्ष वेधून घेते. आपल्या झीनत अमानची आठवण करून देणारी चेहरेपट्टी लाभलेली कॅथरिन म्हणजे मादकता आणि बुद्धिमत्ता यांचं विलक्षण आकर्षक रसायन आहे.
  `द मास्क ऑफ झोरो' हा उच्च दर्जाच्या निखळ मनोरंजनासाठी आचवलेल्या प्रेक्षकांकरता `मस्ट सी' सिनेमा आहे. हिंदी सिनेमाच्या () प्रेक्षकांनीही मूळ इंग्लिश `झोरो'सुद्धा बिनधास्तपणे पाहावा कारण, हा सिनेमा ना इंग्लिश भाषेत आहे ना हिंदी. तो जगाच्या पाठीवरच्या यच्चयावत मनुष्यमात्रांना समजणाऱया सिनेमाच्या भाषेतला सिनेमा आहे.

No comments:

Post a Comment