Thursday, December 15, 2011

शहीद-ए-सजावट (शहीद-ए-मुहब्बत)


हिंदी सिनेमात प्रादेशिकता अभावानेच आढळते. दक्षिणी सिनेमांमधली कौटुंबिक आशयाची भडक मांडणी किंवा पंजाबी निर्मात्यांच्या सिनेमात हटकून दिसणारे `सरसोंके खेत,' कधी राजस्थानी ठसक्याची वाळंवटांमधली गाणी यांच्या रुपाने प्रादेशिकता हिंदीत दिसते खरी, पण केवळ लोणचे- चटणीसारखी, पानात एका कोपऱयात. मुख्य डिश नेहमीच्या एकसुरी मसालेदार `सर्वप्रिय' पदार्थांनी भरलेली असते. कारण हिंदी सिनेमावर देशभरातील प्रेक्षकांच्या अभिरुचीचा लसावि काढण्याचं बंधन असतं, व्यावसायिक असहाय्येतून आलेलं.
  पण हे बंध `शहीद--मुहब्बत'सारखा पंजाबी सिनेमामध्ये पाळलं गेलेलं दिसतं तेव्हा सखेद आश्चर्य वाटतं. अत्यंत हृदयस्पर्शी अशी, सत्यघटनेवर आधारलेली लोकविलक्षण प्रेमकथा लाभलेली असताना लेखक सूरज- सनीम आणि दिग्दर्शक मनोज पुंज यांनी तिची बाळबोध- सुबोध हाताळणी करून कथानकाचा परिणाम `शहीद' करून टाकला आहे.
`शहीद...' ची कथा घडते फाळणीच्या हृदयद्रावक पार्श्वभूमीवर. 1945 च्या आसपास दुसऱया महायुद्धात लॉर्ड माऊंटबॅटनच्या नेतृत्त्वाखाली `बर्मा फ्रंट'वर लढलेला बूटा सिंग (गुरुदास मान) जालंधरमधील आपल्या गावी परततो तेव्हा घरी सख्खं कुणी उरलेलं नसतं. माणसांअभावी उजाड झालेलं घर एकटय़ानं वसवण्याची जबाबदारी बूटावर येते. एखादी मुलगी पाहून लग्न करून संसार थाटण्याचीही इच्छा त्याच्या मनात असते, पण त्याच्यासारख्या निबर वयाच्या थेराडाला मुलगी कोण देणार?
  गावातला एक व्यापारी त्याला सांगतो, ``तू फक्त दोन हजार रुपयांचा बंदोबस्त कर. बिहार-यूपी साईडला आपल्या मुली लग्नासाठी विकणारे दरिद्री आईबाप पुष्कळ आहेत. तुझ्यासाठी मी मुलगी खरेदी करून आणतो.''
 बूटाचे कष्ट सुरू होतात. तीन वर्षात 1800 रुपये गोळा होतात. त्याच वेळी, भारत स्वतंत्र होताना 1947 साली झालेल्या फाळणीच्या वणव्यात सीमाभाग धुमसू लागतो. पाकिस्तानातील हिंदू आणि भारतातील मुसलमानांचे लोंढे सीमा पार करू लागतात. अशाच एका पाकिस्तानात निघालेल्या मुस्लिम कुटुंबावर काही हिंदू माथेफिरू हल्ला करून तरण्याताठय़ा झैनबला (दिव्या दत्ता) पळवून नेऊ पाहतात. ती जिवाच्या कराराने धावत येते बूटाच्या आश्रयाला. तिची इज्जत वाचविण्यासाठी त्या मस्तवाल गुंडाला तो लग्नासाठीचे 1800 रुपये देऊन टाकतो.
झैनब बूटाच्या घरची पाहुणी बनते. बूटाने एक मुसलमान मुलगी घरात ठेवली आहे, या बातमीने त्या छोटय़ा गावात गहजब माजतो. बूटा झैनबला मुस्लिम निर्वासितांच्या कॅम्पमध्ये सोडून येण्याचा प्रयत्न करतो. पण तोवर बूटाच्या रांगडय़ा- सरळ- भोळसट स्वभावाचा लळा लागलेली झैनब तिथे राहायला नकार देते. बूटाने झैनबशी लग्न करावे, असा तोडगा निघतो. तो झैनब आनंदानं मान्य करते. दोघांचं लग्न होऊन सुखी संसार सुरू होतो, एक मुलगीही होते, अचानक 1952 मध्ये भारत- पाकिस्तान करारानुसार फाळणीच्या वेळी भारतात मागे राहिलेल्या मुस्लिम मुलींची पाकिस्तानात रवानगी करण्याचा हुकूम निघतो.  
बूटाच्या हिश्श्याच्या मालमत्तेवर डोळा असलेले त्याचे काकाच पोलिसांना झैनबची माहिती देतात. पोलिस जबरदस्तीने बूटाच्या अनुपस्थितीत झैनबला घेऊन जातात. बूटा लहानग्या मुलीला घेऊन तिच्या शोधात दिल्ली कॅम्पला पोहोचतो. तिथे महिनाभर अनेक उच्चपदस्थांच्या मिनतवाऱया केल्यानंतरही त्याला झैनबचा ताबा मिळत नाही. तिची पाकिस्तानात रवानगी होते.
बूटा घरदार सोडून पाकिस्तानात तिचा शोध घ्यायला निघतो. तिच्या गावात तो मुलीसह पोहोचतो तेव्हा झैनबच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न लावलं जात असतं. न्यायालयात झैनबनं बूटाशी लग्न झाल्याचं मान्य केलं तर झैनबला तो भारतात परत नेऊ शकेल, असं न्यायाधीश सांगतात. मात्र, नातेवाईक आणि नव्या पतीच्या धमक्यांमुळे बूटाचा जीव वाचवण्यासाठी झैनब न्यायालयात त्याला ओळखण्यास नकार देते. जगण्याचं कुठलंच कारण न उरलेला बूटा चालत्या रेल्वेखाली मुलीसह स्वत:ला झोकून देतो...
  बूटानं प्रेमासाठी केलेल्या प्राणत्यागाने भारावलेले लाहोरवासी लाहोरमध्ये `शहीद- - मुहब्बत' बूटासिंगची कबर बांधतात. तिथे त्याचा रीतसर उत्सव सुरू होतो. एका भारतीयाच्या प्रेमाचं चिरंतन स्मारक पाकिस्तानात उभं राहतं.
  या कबरीच्या उत्सवात गायल्या जाणाऱया कव्वालीपासून `शहीद...'ची सुरुवात होते तेव्हाच त्याचं बाळबोध वळण लक्षात येतं. श्रेयनामावलीसाठी कव्वालीचं चित्रण अगदी ठरीव साच्यात केल्याचं जाणवतं. कव्वालीच्या शब्दसंगीतातून चढत जाणारी गती चित्रणात आढळत नाही. कव्वाली संपल्यावर कुणीतरी `भारतीयाची कबर पाकिस्तानात कशी' असं विचारतं. कबरीचा एक परमभक्त उत्तरादाखल बूटासिंगची कथा सुरू करतो, झाला सिनेमा सुरू.
 सर्वसामान्य प्रेक्षकाला (विशेषत: पंजाबी वा अन्य प्रदेशातील ग्रामीण प्रेक्षकाला) भावावी, यासाठी केलेली कथेची ही ढोबळ उलगडणी समजून घेता येते. मध्यमवयीन बूटाचं प्रेमबिमापेक्षा निव्वळ व्यवहाराच्या विचारावर आधारलेलं संसाराचं स्वप्न, त्यासाठी मुलगी खरेदी करण्याचीही सहज तयारी, त्याचं करुण एकलकोंडं श्रमजिवी आयुष्य हा कथाभाग साध्या-सच्च्या मांडणीमुळे विचारी प्रेक्षकालाही भिडतो. गावातल्या मंदिर, मशीद आणि गुरुद्वाराच्या प्रसादावर जगणारा बूटाचा मंदबुद्धी मित्र रमजानी (रघुवीर यादव) हे पात्र तर खास `सिनेमॅटिक' सर्वधर्मसमभावी पात्र. पण, त्याची बूटाला मिळणारी सोबतही या कथाभागात चपखल बसते.
  हा जाडाभरडा पोत बिघडतो झैनबच्या रंगीत- सुळसुळीत आगमनानं. बूटाच्या खरखरीत आणि रखरखीत आयुष्यात झैनबच्या रुपानं सुगंधी झुळूक अवतरते खरी, पण तिच्या आगमनानंतर होणाऱया रंगांच्या, प्रेमाच्या उधळणीत तोवर सिनेमात दिसणारी प्रादेशिक अस्सलता आणि किमान तर्कशास्त्र वाहून जातं. झैनब बूटाच्या आश्रयाला आल्यानंतर दुसऱयाच दिवसापासून बूटाशी हक्काच्या `पाहुणी'च्या थाटात वागू लागते. तिच्या सुरुवातीच्या वास्तव्यात किंवा त्यानंतरही कधीही तिला आईवडिलांची आठवण आलेली दिसत नाही, ती कधीही उदास होत नाही. एका दांडजवान (तेही परधर्माच्या) पुरुषाच्या घरात आपण एकटय़ा आहोत, यातून समाजात केवढा कल्लोळ माजेल, याची पर्वा तिला दिसत नाही. ती सांगते की ती राजस्थानातून आली आहे, दिसते पंजाबीणच आणि वागणं- बोलणंही पहिल्यापासून अस्सल पंजाबी ठसक्यातलं. झैनब ज्या परिस्थितीतून बूटाच्या आश्रयाला आलेली असते त्या परिस्थितीतून आलेल्या कोवळ्या मुलीची कोणतीही लक्षणं तिच्यात दिसत नाहीत, हे या सिनेमाच्या पटकथेचं मोठं अपयश आहे.
 झैनबच्या आगमनांनंतरच्या कथाभागात गाण्यांचीही भरमार आहे. अमर हळदीपूर यांच्या गोड चालींची ही गाणी केवळ एकामागोमाग एक सतत आल्यानं एकाच चालीतली वाटू लागतात. झैनबला पोलिसांनी मुलीपासून तोडून नेतानाच दुसरीकडे तिच्यासाठी नवी बैलगाडी घेऊन येणारा बूटा `गड्डिये नी' हे उत्साही गाणं म्हणतो, यातून नियतीची क्रूर लीला दिसण्याऐवजी आधीच्या प्रसंगाचा परिणामच पातळ होतो. शिवाय नृत्यगीतांचं चित्रणही हिंदीत रुळलेल्या पंजाबी नाच दाखवतं. मनोज पुंज यांचं दिग्दर्शन आणि प्रमोद मित्तल यांच्या छायालेखनात प्रत्येक चित्रचौकट `नेत्रसुखद' करण्याचा आणि प्रत्येक प्रसंगात आपल्याला ठाऊक असलेलं सर्व सिनेमातंत्र ओतण्याचा अट्टहास दिसतो. त्यामुळे सिनेमाची सजावट देखणी होते पण कथेचा जीव मात्र घुसमटून जातो. सिनेमाच्या शेवटी लाहोरमधील मंडळी `शहीद- - मुहब्बत बूटासिंग झिंदाबाद'चे नारे देत त्याची अंत्ययात्रा काढतात, हा बाळबोधपणाचा कडेलोट होतो.
 तरीही, चांगली कथा, पंजाबची ग्रामीण पार्श्वभूमी, पाकिस्तानातली `वाटणारी' संबंधित कथाभागातली चित्रणस्थळं आणि सर्व कलावंतांची उत्तम कामगिरी ही `शहीद...'ची उजवी बाजू आहे.
  गुरुदास मान हा मुरब्बी अभिनेता नसतानाही त्याने बूटाची रांगडी-भाबडी व्यक्तिरेखा अगदी अस्सल साकारली आहे. रमजानीचं ठोळकेबाज पात्र केवळ रघुवीर यादवच्या अभिनयसामर्थ्यामुळं कथानकात परकं वाटत नाही. हिंदीत दुय्यम भूमिकांमध्ये वाया जाणाऱया दिव्या दत्ताच्या व्यक्तित्त्वात झैनबचा गोडवा आहे आणि तिची परवड दिव्या समरसून साकारते.
  बलाढय़ हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात `शहीद--मुहब्बत'च्या रुपानं प्रादेशिक सिनेमाचं छोटं पाऊल पडलं आहे. बाळबोधपणा आणि सजावटीच्या अतिरेकामुळे या सिनेमाला कृतक प्रादेशिकतेचा बट्टा लागला असला तरी पहिलं पाऊल म्हणून त्याचं स्वागतच करावं लागेल.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment