Friday, December 16, 2011

2 + 2 + 1 + आपण (प्रायव्हेट डिटेक्टिव्ह : दो जमा दो जमा एक)


किती आत्मकेंद्रित असतो आपण? आपला जन्म, वंश, उपजत बुद्धीमत्ता, विचारक्षमता, प्रवृत्ती, त्यावरचे संस्कार यांच्या अद्वितीय रसायनातून आपली विचारपद्धती घडते आणि तीच जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देते... एखाद्या रंगीत चष्म्यासारखा. त्यातून जग आपल्याला त्याच रंगाचं दिसत राहातं. कधीतरी हा चष्माच `दृष्टी' बनून जातो आणि जग याच रंगाचं आहे, असं `सत्य' आपल्याला सापडतं. हे सापेक्ष सत्यच अंतिम सत्यही भासू लागतं.
 सापेक्ष सत्य आणि सत्य यांच्यातल्या धूसर सीमारेषेवरचं नाटय़ टिपून तत्त्वचिंतनाच्या पातळीवर पोहोचणारा `राशोमान' जगप्रसिद्ध दिवंगत जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांनी काढला होता. जगातील सर्वेत्कृष्ट कलाकृतीपैकी एक मानल्या जाणाऱया या चित्रपटात एकच घटना वेगवेगळ्या माणसांच्या नजरेतून कशी वेगवेगळी भासते आणि प्रत्येकापुरती ती `सत्य'च कशी असते, हे सूत्र होतं. हेच सूत्र गाभ्यात घेऊन रजत कपूर यांनी बनविलेला `प्रायव्हेट डिटेक्टिव्ह : दो जमा दो जमा एक' हा सिनेमा या अर्थानं कुरोसावांना ठोकलेला कडक सलाम आहे. कुरोसावांच्या निधनानं या सिनेमाला कलात्मक श्रद्धांजलीचं मोल लाभलं आहे.
 कुरोसावांनी सत्यासत्याचा पट विणण्यासाठी स्त्राe-पुरुष आकर्षणाच्या आदिम भावनेचे धागे निवडले होते. पती-पत्नी-परपुरुष या सर्वपरिचित त्रिकोणातून त्यांनी हे विलक्षण गुंतागुंतीचे समीकरण मांडले आहे. `प्रायव्हेट डिटेक्टिव्ह...' मध्येही कहाणी आहे व्यभिचाराची, त्यातून घडणाऱया खुनाची आणि त्या खुनाच्या बहुस्तरीय `तपासा'ची पण, इथेच या दोन सिनेमांमधलं साम्य संपतं. `राशोमान'ची दिशा धरून, त्याच मुक्कामाकडे प्रवास करण्यासाठी दिग्दर्शक रजत कपूर वाट मात्र वेगळी पकडतात... `ब्लॅक कॉमेडी'च्या पद्धतीने खुलणाऱया निर्दय विनोदाची.
 `प्रायव्हेट डिटेक्टिव्ह...'मध्ये प्रमुख पात्र आहेत मुंबईतील दोन उच्चभ्रू जोडपी. राज (केनेथ देसाई) आणि अमृता (कश्मिरा शाह) ही एक जोडी. त्यांचे जिवलग मित्र आहेत हरीश (अली खान) आणि मेघना (शांभवी कौल) हे जोडपं. अमृता आणि हरीश यांचं चोरटं लफडं सुरू आहे. त्याला प्रेमप्रकरण म्हणणं कठीण आहे; कारण त्यात शारीरिक पातळीवरचाच व्यवहार प्रबळ दिसतो. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र फ्लॅटही घेऊन ठेवलाय. आपापल्या जोडीदारांना थापा मारून हे दोघे तिथे चोरून भेटतात. भर दुपारी असोशीनं शारीरिक सुख लुटतात.
  या दोन अधिक दोनच्या समीकरणात आणखी एकाची भर पडते... एका खाजगी गुप्तहेराची (नसिरुद्दीन शाह) राजला अमृताबद्दल शंका आहे. तिच्यावर नजर ठेवायला त्यानं या गुप्तहेराला नेमलंय. तो तिचा पाठलाग करतो. अमृता-हरीशच्या गुप्त फ्लॅटपर्यंत पोहोचतो. त्यांचे आलिंगनबद्ध स्थितीतले फोटो काढतो. राजकडे सोपवतो.
 संतप्त राजच्या मनात व्यभिचारी पत्नीचा काटा काढण्याचे विचार घोळू लागतात. अमृता एकदा डिस्कोथेकमध्ये मद्याच्या अमलात मेघनाकडे आपल्या चोरटय़ा अफेरविषयी बोलते... अर्थात हरीशचं नाव न घेता. पण काही `खुणा'मधून मेघनाला आपला पतीच अमृताचा यार असल्याचं समजून जातं. तीही संतापानं वेडीपीशी होते.
 इकडे खाजगी गुप्तहेर राजकडून अमृताला `गायब' करण्याची सुपारी घेतो. दुसरीकडे `ते'च फोटो दाखवून अमृताला `ब्लॅकमेल' करून तिच्याकडून तुला धोका आहे', असा इशारा देऊन तिला मदत करण्याची तयारी दर्शवतो. घाबरलेली अमृता कोणालाही न सांगता मुंबई सोडून स्वत:च काही महिने गायब व्हायचा निर्णय घेते.
 पण तिला जिवंतपणी गायब होण्याचं सौभाग्य काही लाभत नाही. ती निघायच्या तयारीत असतानाच तिचा खून होतो. खून करणारी व्यक्ती एक. तिचा मृतदेह बेवारस स्थितीत सोडतो दुसराच. गुप्तहेराला वाटतं नवऱयानंच मारली तिला. नवरा समजतो गुप्तहेरानं काटा काढला तिचा. पोलिस पकडतात याराला. आणि मेघना ओरडून सांगते की, हा खून तिनेच केलाय.
 पैशाच्या लालचेपायी दोन अधिक दोनच्या या मूळ गुंत्यात `अधिक एक' बनून शिरलेला गुप्तहेर खरंतर उपरा. तो हे उपरेपण प्रेक्षकांना सतत सांगत असतो, पण त्या गुंत्यातून बाहेर काही पडत नाही योग्य वेळी. जेव्हा तो विचार येतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते...
  वरवर पाहता एखाद्या `मर्डर मिस्टरी'सारख्या वाटणाऱया या कथानकाला पटकथाकार- दिग्दर्शक रजत कपूरच्या वेगळ्या वळणाच्या हाताळणीने रहस्यपटापेक्षा वरच्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अमृताचा खून प्रेक्षकांच्या नजरेसमोर घडतो. तत्पूर्वी आणि त्यानंतरही प्रमुख पाच पात्रं एकमेकांपासून जी लपवाछपवी करतात ती प्रेक्षकाला ठाऊक असते. त्यातल्या प्रत्येकाला जे सत्य वाटत असतं ते किती खोटं आहे, हेही प्रेक्षकालाच माहिती असतं. तरीही प्रेक्षकाचे प्रत्येक पात्राविषयी सिनेमातल्या त्या त्या क्षणाला जे आडाखे असतात तेही खोटे निघतात आणि त्या पात्राचं वेगळंच रुप समोर येत राहातं. म्हणजे प्रेक्षकालाही `अंतिम सत्य' ठाऊक नसतंच. हीच या सिनेमाची खरी मजा आहे.
  पटकथाकार- दिग्दर्शक या नात्यानं रजत आपल्या पात्रांकडे तटस्थ निर्दयतेने पाहतो. उच्चभ्रू समाजातली दोन्ही जोडपी भावनाहीन यांत्रिकतेने एकमेकांशी वागताना दिसतात. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यांमधल्या चढउतारांतून ती सुखी, दु:खी होत राहतात, पण त्यांच्या सगळ्या भावनांना निखळ स्वार्थाचीच प्रेरणा असल्यानं त्यांच्याशी प्रेक्षक तादात्म्य पावत नाही. त्यांच्या सुखदु:खात समरस होत नाही. सुरुवातीला सूत्रधाराच्या रुपात भेटणारा डिटेक्टिव्ह प्रेक्षकाला आपल्यातला वाटतो; कारण या पात्रांबद्दल तो तिरस्कारयुक्त भाष्ये करतो. माजी सैनिक असलेल्या या डिटेक्टिव्हनं 71 च्या युद्धात गाजवलेली मर्दुमकी त्याच्याच तोंडून आपल्याला कळते. `केवळ पोटासाठी'या श्रीमंतांचे उकिरडे तो फुंकतो आहे, असा त्याचा आव असतो. त्यानं व्यभिचारी पत्नीचे फोटो दाखवून पतीकडून कामाचा मोबदला घेणं आणि त्याच फोटोंच्या आधारे त्या पत्नीला ब्लॅकमेल करणंही प्रेक्षकाला `हिरॉईक'च वाटतं त्याक्षणी.
 पण तो मृत अमृताच्या देहावरून दागिने उतरवून घेतो, इतर चीजवस्तूंवर हात मारतो तेव्हा आणि तिला जिवंतपणी `गायब' केल्यावर तिच्याशी सूत जुळवण्याचा मनसुबा होता, हे तिच्या पतीला सांगतो, तेव्हा प्रेक्षकाला त्याच्याबद्दलही सहानुभूती उरत नाही.
 रजतची चित्रणशैलीही कमालीची तटस्थ आहे. तो अकारण कुठलाही प्रसंग कॅमेऱयाच्या नाटय़मय हालचालींमधून `बिल्टअप' करण्याच्या फंदात पडत नाही, अगदी खुनसुद्धा. या मंडळींचा परिसर श्रीमंतीमुळे सुंदर आहे, पण ते सौंदर्यही आखीव, बेतीव आणि निर्जीव वाटावं, अशा दृश्यचौकटी रजतनं रचल्या आहेत. मुंबईचा बाह्य परिसरही आपल्याला दिसतो, गाडय़ांची-माणसांची सततची हालचाल रजत टिपतो, पण त्याला यांत्रिकतेचं परिमाण आहे.
 या सिनेमाची भाषाही गंमतीची. एखाद्या हिंदी सिनेमाला इंग्रजी सब-टायटल्स असतात, त्यात हिंदी संवादांचा इंग्रजी अनुवाद केलेला असतो. तशा इंग्रजी सब-टायटल्स याही सिनेमात आहेत. पण सिनेमातली मुख्य चार पात्रं जी हिंदी बोलतात ते जणू मूळ इंग्रजी सब- टायटल्सचा हिंदी अनुवाद वाचताहेत, अशा पद्धतीची. डिटेक्टिव्ह आणि अन्य पात्रं मात्र साधी सोपी परिचित हिंदी बोलतात. हा फरक त्या दोन जोडप्यांची संस्कृतीहीन अधांतर स्थिती अधोरेखित करतो. अमृताच्या खुनानंतर जसजसा सर्वच पात्रांच्या प्रवृत्तींवर प्रकाश पडू लागतो तसतसा सिनेमात `जाने भी दो यारो'ची आठवण करून देणारा विनोद प्रवेशतो. गुदगुल्या करणारा, पण रक्तही काढणारा.
  `प्रायव्हेट डिटेक्टिव्ह...' केवळ एक कथा सांगत नाही. जी सांगायची ती कथा नेटकेपणानं सांगतो. क्वचित एखाददुसऱया प्रसंगात बदनाम `आर्टी' दुर्बेधता डोकावते, पण ती अगदीच असह्य नाही. हा सिनेमा कथानकापलीकडचं काही मांडत जातो आणि प्रेक्षकाच्या बुद्धिमत्तेला चालना देऊन त्याला काही ना काही शोधायला भाग पाडतो, हे रजतचं मोठं यश आहे. त्याला रफी महमूदचं छायालेखन आणि केदार आवटींचं पार्श्वसंगीत यांची उत्तम साथ आहे.
  या सिनेमातला नसिर पाहणं, हा मोठा आल्हाददायी अनुभव आहे. एक फार मोठा अभिनेता आपल्यात आहे, याची जाणीव नासिरच्या या `प्रायव्हेट डिटेक्टिव्ह...'च्या भूमिकेतून सतत होत राहते. तो या पात्राला आधी प्रेक्षकांशी जोडतो आणि योग्य वेळी तोडतोही, कुठेही टाळीबाज अभिनय न करता. अलीखान, कश्मिरा शाह, केनेथ देसाई, शांभवी कौल हे आपल्याकडच्या रूढ शैलीपलीकडचा अभिनय सराईतपणे करतात. संजीव शर्माचा भुरटा चोर आणि इरफान खानचा इन्स्पेक्टर खान ही पात्रं मानवी पातळीवरची असल्यानं प्रेक्षकाला चटकन् भावून जातात.
    `प्रायव्हेट डिटेक्टिव्ह...'सारखे सिनेमे देशी-विदेशी फेस्टिव्हलांमध्ये तथाकथित जाणकारांच्या वर्तुळात फिरत राहतात. अलीकडे `हैद्राबाद ब्लूज'सारखा या वर्तुळातला सिनेमा शृंगार फिल्म्सनं वितरित करून चतुर मार्केटिंगच्या बळावर व्यावसायकिदृष्टय़ा यशस्वीही करून दाखवला. `प्रायव्हेट डिटेक्टिव्ह...' सामान्य प्रेक्षकापर्यंत कुणी योग्य रीतीनं पोहोचवला तर त्यालाही तो निश्चित भावेल.

No comments:

Post a Comment