Thursday, December 22, 2011

दू रि याँ! नजदीकियाँ... (करीब)


एक तरूण आणि एक तरुणी प्रेमात पडतात, लग्न करून एकमेकांचे आयुष्याचे जोडीदार बनायचं ठरवतात. त्यात परिस्थिती आडवी येते, अडथळे निर्माण करते. त्यावर मात करून ते अखेर एकत्र येतात, ही `करीब'ची गोष्ट.
  ही गोष्ट आपण यापूर्वी हिंदी सिनेमात किती वेळा पाह्यलीये? मग `करीब' कशाला पाहायचा, असा विचार मनात येण्यापूर्वी एक जरा आठवून पाहा. यापूर्वीचा शेवटचा प्रेमपट आपण पाहिला, तेव्हाही हाच प्रश्न डोक्यात आला असेल. पण, तरीही तो आपण पाह्यलाच होता, `एंजॉय'ही केला असेल. तीच ती गोष्ट पाहायला आपण थिएटरात स्वेच्छेनं जातो कारण इथे बुद्धीवर भावना मात करते... प्रेमभावना.
 असूद्या, प्रेमाचं हे तेजाब जाळणारं तरीही विलक्षण आकर्षक असतं. पडद्यावर तर ते कमालीचं मोहक रुप धारण करून येतं. काही जुने सुखद अनुभव ताजे करून देतं. काही नव्या अनुभवांची ओळख घडवून देतं. त्यात विधू विनोद चोप्रासारखा कल्पक दिग्दर्शक प्रेमाच्या नव्हाळीला दवबिंदूंची टवटवी देतो आणि कथा कितीही सपक असली तरी तो शेवटपर्यंत पाहायला लावतो.
 प्रेमभावनेबद्दल कुणीतरी असं म्हणून ठेवलंय की, ही भावना सामान्य स्त्राeला लावण्यवती ग्रीक देवता बनवते आणि सामान्य पुरुषाला रुपसुंदर ग्रीक देव. फक्त त्याच्याकडे पाहण्यासाठी तिची नजर हवी आणि तिच्याकडे पाहण्यासाठी त्याची. विधु विनोदनं `करीब' या नजरेतून बनवलाय.
  त्यासाठी त्यानं परिसरही निवडलाय पडद्यावर आतापर्यंत फारशा न दिसलेल्या नितांतरमणीय हिमाचल प्रदेशातला. इथे एका तलावाच्या काठी वसलेलं, मेघांशी गुजगोष्टी करणाऱया पर्वतरागांनी वेढलेलं रिवालसर गाव हे `करीब'च्या प्रेमकहाणीचं घटनास्थळ.
  इथल्या श्रीमंत कापड दुकानादाराचा (सौरभ शुक्ला) धाकटा मुलगा बिरजू (बॉबी देओल) ऐदी आणि कामचुकार पण खटय़ाळ आणि खोडकर. रिवालसरच्या तलावात मातीच्या हजारो दिव्यांचं दीपदान सुरू असताना तो नेहाला (नेहा) पाहतो... पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडतो. तिचा पिच्छाच पुरवतो. तिला भेटवस्तू देण्यासाठी घरातल्या घरात चोऱयाही करतो, खोटं बोलतो. नेहा त्याच्या उत्कट प्रेमभावनेला प्रतिसाद देते पण पुढे चोरी वा लांडीलबाडी न करण्याच्या वचनावर.
 बिरजूच्या वडिलांना हे प्रेमप्रकरण कळतं तेव्हा ते भरपूर हुंडा मिळणार असेल तरच बिरजू-नेहाच्या लग्नाला संमती देण्याचा मनसुबा जाहीर करतात. नेहाची विधवा शाळाशिक्षिका आई (मौसमी चटर्जी) एवढा हुंडा जमा करू शकणार नाही, हे लक्षात घेऊन बिरजू घरातलेच पैसे चोरून गुप्तपणे वडिलांना हुंडा देतो. लग्नाच्या धामधुमीत वडिलांना या फसवणुकीची माहिती मिळते. लग्न मोडतं. फसवणुकीचा आळ आल्यानं धक्का बसलेली नेहाची आई अंथरूण धरते. वचनभंगानं चिडलेली नेहा बिरजूला `आपलं तोंड दाखवू नकोस' म्हणून सांगून आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी सिमल्याला घेऊन जाते. तिच्यामागे बिरजूही घरी काही न सांगता सिमल्यात जाऊन पोहोचतो. योगायोगानं भिंगेलालच्या (जॉनी लिव्हर) लाँड्रीत त्याला कपडे धुण्याचं, इस्त्राe करण्याचं काम मिळतं. नेहाला चेहरा न दाखवता तो तिला दुरून पाहात राहतो, तिच्या नजरेत पुन्हा स्थान मिळवण्यासाठी कष्ट उपसतो. इकडे नेहाच्या आईवर उपचार करणारा तरुण डॉक्टर (अभय चोप्रा) नेहाच्या प्रेमात पडतो. आईच्या ऑपरेशनसाठी एक लाख रुपये गोळा करायचे की ते फुकट होण्यासाठी डॉक्टरशी लग्न करायचं, या दुविधेत नेहा अडकते.
 एक लाख रुपयांची गरज बाहेरून समजल्यावर `बिरजू' वेडापिसा होतो. हमखास लॉटरी लावून देणाऱया एका वृद्ध पण बनेल जोडप्याच्या (शम्मी कपूर, सुषमा सेठ) नादी लागून कष्टानं जमवलेला पैसाही गमावतो. शेवटी भिगेलालच्या पैशावर हात मारून तो नेहाच्या गरजेसाठी तिलाच दिलेलं वचन पुन्हा मोडतो. पण, तोवर बिरजूचे पश्चात्तापदग्ध वडील सिमल्याला पोहोचतात आणि सगळा घोळ विसरून आधीच्या पापातून उतराई होतात. बिरजूच्या प्रेमाचा आवेग आणि त्यासाठी त्यानं केलेले कष्ट लक्षात घेऊन नेहाही त्याला माफ करते.
  कामना चंद्रा यांच्या मूळ कथेवर अभिजित जोशी आणि स्वत: विधु विनोद यांनी `करीब'ची पटकथा लिहिली आहे. मध्यंतरापूर्वी हळुवार खुलणारी प्रेमकथा असलेल्या `करीब'चा वेग मध्यंतरानंतर सुसाट वाढतो. अनेक अतर्क्य प्रसंगांची उतरंड रचून ही कथा अडनिडय़ा वळणांनी नेहमीच्या शेवटाला पोहोचते. सिनेमाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांच्यातला असमतोल हा `करीब'चा सर्वात मोठा दोष आहे.
  पण विधु विनोदची अप्रतिम हाताळणी या दोषाकडे डोळेझाक करायला लावते, तो किमान सुसह्य करते. सिनेमाच्या पूर्वार्धात विधु विनोद सिनेतंत्राची सारी जान पणाला लावून बिरजू-नेहा यांचं प्रेम अनोख्या ढंगानं फुलवतो. रिवालसरच्या `व्हर्जिन' लोकेशनचा त्यासाठी सुरेख वापर करून घेतो.  
 बिरजूला नेहा पहिल्यांदा दिसते तेव्हाचा लक्षलक्ष दिव्यांनी उजळून गेलेला तलाव आणि जणू आपल्याच कांतीच्या तेजानं हातातला दिवा उजळवलाय, अशा थाटात तिचं घडणारं प्रथमदर्शन पुढच्या प्रेमप्रकरणाला एक काव्यात्म परिमाण देऊन जातं. बिरजू पावसात स्वत:ची छत्री लपवून नेहाच्या छत्रीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो, खुल्या आसमंतात भरणाऱया कॉलेजात तिला चिठ्ठी, फुलं हातोहाती पाठवतो आणि तिच्या वाढदिवसाला दुपट्टा भेट देण्यासाठी आपल्या कुमारवयीन मित्राला, चंद्रुला (अमित फाळके) बुरखा घालून स्वत:च्याच दुकानात गिऱहाईक बनून पाठवतो. एकीकडे  प्रेमप्रकरण खुसखुशीत पद्धतीनं पुढे नेणारे हे प्रसंग `चोरी, चोरी जब नजरें मिली' या गाण्यात विधु विनोदने `ग्रेट' वापरले आहेत
बिरजूला नेहा या प्रसंगांमध्ये भेटलेली आहे. हे प्रसंग त्याच्या मनावर पक्के ठसलेले आहेत. त्यामुळं, हे स्वप्नमय प्रेमगीत जेव्हा पडद्यावर येतं तेव्हा त्यातलं एकेक कडवं त्याला `फ्लॅशबॅक'सारखं त्या त्या प्रसंगात घडताना दिसतं. पहिल्या भेटीत तिनं पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते म्हणून बिरजू तिला पिवळा दुपट्टा भेट देतो. डोंगराच्या शिखरावर उभा राहून निळ्याशार आकाशात हा दुपट्टा फडकावणारा बिरजू या गाण्यात दिसतो. पुढे या प्रेमिकांमधला धागा ठरलेला हा दुपट्टा अनेक प्रसंगांमध्ये आपल्याला `भेटत' राहतो, अगदी शेवटपर्यंत.
 बिरजूकडून नेहाला मिळणारी गुलाबाची फुलं, खारे दाणे, `ये मेरे साथही ऐसा क्यूं होता है' हे बिरजूचं पालुपद, इतकंच काय, पण बिरजूला सतत येणाऱया शिंकांनाही `करीब'मध्ये खास स्थान आहे. हे घटक वेगवेगळ्या पद्धतींनी योग्य ठिकाणी पेरून विधु विनोदनं त्यांना पात्रांबरोबरच प्रेक्षकांच्याही भावजीवनात प्रेवश मिळवून दिलाय.
 `करीब'मध्ये पूर्णपणे काळ्या रंगातलं एकही खलनायकी पात्र नाही, कुणी कुणाला साधा ठोसाही मारत नाही, हे आणखी एक सुखद वैशिष्टय़. त्यामुळं इथे रक्ताचा लाल रंग दिसत नाही, दिसतो तो टवटवीत गुलाबांचा.
 उत्तम पात्ररेखाटन आणि चपखल पात्रयोजना हे `करीब'चे `प्लस पॉइंट' आहेत. बिरजूचा पैशाला हपापलेला बाप, मुलाला सतत सांभाळून घेणारी आई (गोपी देसाई), त्याचा बथ्थड मोठा भाऊ, मुलीची मैत्रीणच होणारी नेहाची आई, बिरजूसाठी वाटेल ते करायला (घाबरत घाबरत का होईना) तयार होणारा लहानगा चंद्रू, बापानं साठवलेली दुर्मिळ नाणी विकून लंडनला जाण्याचे स्वप्न पाहणारा भिगेलाल, नेहाला मदत करणारा अंतर्मुख- अबोल डॉक्टर आणि बिरजूबरोबरच प्रेक्षकांच्या भावनेला हात घालून नंतर निर्दय फसवणूक करून जाणारं बदमाश वृद्ध जोडपं, ही सगळी पात्रं मोजक्या प्रसंगांमध्ये, रंगरुपाबरोबरच हाडामांसामध्येही पडद्यावर साकार होतात. अभिजित जोशी आणि कामना चंद्रा यांनी सहजस्फूर्त वाटतील, असे साधे, सुटसुटीत संवाद लिहून `करीब'ला `लाऊड'होऊ दिलेले नाही.
 संगीत हा भारतीय प्रेमकथेचा प्राण. इथे राहत इंदौरी यांच्या अर्थपूर्ण गाण्यांना अनु मलिकनं सुमधुर चाली दिल्या आहेत आणि त्यांचं चित्रण करताना विधु विनोदनं कमाल केली आहे. `चोरी चोरी' या गाण्यात `फूलों के ख्वाबोंमे आकर/खुशबू चुरा ले गयी, बादल का आँचल भी आकर/ पागल हवा ले गयी' किंवा `रिश्तों के नीले भंवर/ कुछ और गहरे हुए, तेरे मेरे साये है/ पानी पे ठहरे हुए' अशा कवितेसारख्या तरल प्रतिमा वापरणारे इंदौरी `हाँ जुदाई से डरता है दिल'मध्ये `मैं अकेला न रह पाऊंगा/ दूर तक रातही रात है, जिंदगी एक अलग चीज है/ जिंदा रहना अलग बात है' अशा ओळींतून विरहाची वेदना नेमकी पकडतात. `रात परबत है कटती नही/ दिन है दरिया उतरता नही' किंवा `मेरी नींदोमें आ जाएगी/ धूप सूरज का खंजर लिए' अशा अनवट चमकदार प्रतिमा वापरतात. याच गाण्याच्या दुसऱया भागात `इक खुशी दिल ने क्या माँग ली/ हर खुशी को नजर लग गयी, जिंदगी जब करीब आयी तो, जिंदगी को नजर लग गयी' अशा ओळींतून कथाभागच मांडून जातात. सिनेमाचं शीर्षक असलेला `करीब' हा शब्द या ओळींमध्ये गहिरा अर्थ भरतो. तसाच, `तुम जुदा होकर हमें'मध्ये `क्या खबर थी हमें, प्यार में होगी मजबूरियाँ, जितने हम थे करीब, उतनी नजदीक थी दूरियाँ' यातला `करीब' आणि `नजदीक' या समानार्थी शब्दांचा वापर लक्ष वेधून घेतो. गुलजार, जावेद अख्तर यांच्याप्रमाणेच ज्याची गाणी सिनेमाबरोबर किंवा सिनेमानंतरही शब्दकळेच्या बळावर लक्षात राहतात, असा गीतकार राहत इंदौरींच्या रुपानं हिंदी सिनेमाला लाभला आहे. हळुवार, हळवी प्रेमकविता लिहिणाऱया इंदौरींनी `चुरा लो न दिल मेरा' आणि `तेरा गुस्सा आय हाय' ही खास प्रसंगनिष्ठ फिल्मी गाणीही सराईतपणे लिहिली आहेत.
  अनु मलिकनं या गीतांना चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणारं संगीत `सॉफ्ट' दिलंय. त्याचा वाद्यमेळ शब्दांना मारत नाही, शब्दांच्या अर्थाबरोबर प्रवाहीपणे वाहतो. नायिकेसाठी त्यानं निवडलेली नवी नायिका संजीवनी कॅसेटमध्ये गाणी ऐकताना मुद्दाम अतिबालिश गाते की काय, असं वाटत होतं. पण, नवी नायिका नेहा हिचं हसणं आणि तिच्या आवाजाचा पोत लक्षात आल्यावर संजीवनीचा आवाज नेहाचाच आवाज वाटतो. गीता दत्तसारखा अवखळ स्वर लाभलेली ही गायिका विरहगीतंही दमदारपणे गाते.
 विधु विनोदनं कुठेही कवायतबाज सहनर्तकांचे ताफे न नाचवता, नायक-नायिकेला नाचायला न लावता गद्य प्रसंगांचं काव्यात्म `एक्स्टेंशन' अशा स्वरुपात गाणी पेश केली आहेत. ही गाणी कथानका उपरी नाहीत. कथाभागाशी एकजीव झालेली आहेत. `तेरा गुस्सा' मधल्या घरातल्या पळापळीतून बिरजूचा खोडकर स्वभाव व्यक्त होतो. `चुरा लो न दिल मेरा' तर किचनमध्ये घडतं. `शाद रख्खे, आबाद रख्खे' या लग्नगीतातून साखरपुडा ते लग्न कसा कथाभाग पुढे सरकतो. सिमल्यात नेहाची प्रदीर्घ काळानंतर प्रथमच भेट होणार, हे पक्कं झाल्यावर बिरजूच्या मनात आनंदाचं भरतं येतं. त्यावेळी, त्याचा उत्फुल्ल आनंद दर्शवणारा `चोरी, चोरी' या गाण्याचा दुसरा भाग दिसतो. यावेळी, लाँड्रीत झोपलेल्या बिरजूच्या स्वप्नातली नेहा त्याला स्पर्श करते, कपाळाचं चुंबन घेते. केवळ प्रकाशयोजनेतल्या बदलातून एकाच शॉटमध्ये वास्तव आणि स्वप्नाभास छायालेखक विनोद प्रधान यांनी सुरेख दाखवलाय. ते सिनेमाचे सहदिग्दर्शकही आहेत. त्यामुळे अस्सल प्रेमिकाच्या नजरेतून विनोदानं पाहिलेला `करीब' त्यांनी विनोदच्या नजरेतून पाह्यलाय आणि चित्रबद्धही केलाय.
  सर्व कलाकारांकडून विनोदनं अव्वल दर्जाचा अभिनय करून घेतलाय. बॉबी देओलचं `दिसणं' एकदा आपण स्वीकारलं, तर (ते अनेकांना जड जाईल, तरीही) तो बिरजूच्या रुपात आवडूही लागतो. विनोदी प्रसंगांमध्ये खास देओल पद्धतीचा भाबडा जाट `लुक' त्याच्या चेहऱयावर आपसूक येतो. प्रेमाची कशिश आणि विरहाची आर्तता तो सहजगत्या व्यक्त करून जातो. नवोदित नेहाला कमालीची नितळ आणि तेजस्वी कांती लाभलीये. त्यात, भावविभोर टपोरे डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे विलगणारे ओठ, मोत्यासारख्या दंतपंक्ती आणि जुईच्या फुलांचा सडा पडावा तसं खळाळणारं; कधी नाजूक किणकिणणारं हसू... बिरजूच्या भाग्याचा (भले तोही बॉबी देओल असला तरी) हेवा वाटायला लावणारं सौंदर्य लाभलंय नेहाला. अभिनयातही ती उणी पडत नाही. पूर्वार्धात सतत हसणारी, खोडय़ा काढणारी नेहा उत्तरार्धात विरहिणीची तगमग आणि कटु निर्णय घेण्याचा करारीपणाही दाखवते. सौरभ शुक्ला, गोपी देसाई, मौसमी चटर्जी, जॉनी लिव्हर हे बुजुर्ग या युगुलाला समर्थ साथ देतात.
  चंद्रू झालेला अमित फाळके हा राष्ट्रीय पारितोषिकविजेता बालकलाकार, तरुण वयातली त्याची ही पहिली मोठी भूमिका. ती लांबीरुंदीला फार मोठी नसली तरी त्याचा किंचित अर्धवट, एका लयीत बोलणारा भाबडा चंद्रू लक्षात राहतो. अभय चोप्राचा अंतर्मुख डॉक्टरही ठीकठाक. पण, त्यानं दिलीपकुमार स्टायलीत खूप खालच्या पट्टीत संवाद बोलण्याची गरज नव्हती.
  प्रेक्षकांना खरा धक्का देऊन जातात शम्मी कपूर आणि सुषमा सेठ. त्यांचं वृद्ध जोडपं सुरुवातीला सहृदय वाटतं, `हे करणार आता नायकाचा बेडा पार,' असा विश्वास निर्माण करतं आणि मग विश्वासघात करून परगंदा होतं. हा धक्का पोहोचवण्याचं श्रेय जितकं लेखकाचं तितकंच शम्मी-सुषमा या जोडगोळीचं.
  `करीब'ची जातकुळी समजून घ्यायलाही हे उपकथानक उपयोगी ठरतं. सिनेमाच्या शेवटी या जोडीनं फसवल्यानंतरही बिरजूला एक लाखाची लॉटरी खरोखरच लागली, असा बनाव भिगेलाल, बिरजूचे वडील, डॉक्टर आणि नेहा मिळून रचतात. कशासाठी, तर नेहाच्या आईवर आपल्या पैशानं उपचार केले, असं समाधान बिरजूला मिळावं म्हणून. बिरजूनं खरोखरीच त्यासाठी जिवानं रान केलंय. त्या श्रमांचं सार्थक करून त्याच्या भावनेचा मान राखण्यासाठी हे सगळे मिळून खोटं बोलतात.
  `करीब' चा एकूण परिणाम तसाच आहे. नसेलही आजच्या जगात प्रेम इतकं निरागस, इतकं लाघवी, इतकं आर्जवी, इतकं आवेगी, इतकं सहजसुंदर! पण ते खरंतर असंच असायला हवं. `करीब'ते स्वप्नातलं, अशक्यप्राय प्रेम अनुभवाच्या पातळीवर आणून दाखवतो. प्रेमात पडलेल्या वा `पडलेल्या'वा यशस्वी झालेल्या हर प्रकारच्या प्रेमिकाच्या मनातला आठवणींचा गुप्त कप्पा उघडतो. त्यात एखादा दुपट्टा, गुलाबाचं फूल किंवा खारे दाणेही सापडतात. कितीही काळ लोटला तरी या आठवणींवर पुटं चढलेली नाहीत, जळमटं धरलेली नाहीत आणि त्यांचे रंगही विटलेले नाहीत... ही भावना सुखावून जाते.
  `करीब' मधले दोष दुर्लक्षून ही भावना भोगायची की `कुठाय कथा' म्हणून करवादायचं, ते तुम्हीच ठरवा.


(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment