Thursday, December 15, 2011

निर्मळ हास्यतुषारांचा तजेलदार शिडकावा (ढूँढते रह जाओगे)


`जाने भी दो यारो'ला इतकी वर्षं झाली, पण आजही त्यातला एखादा प्रसंग आठवला की, चेहऱयावर हास्याची रेषा आपोआप आणि हमखास उमटते. स्मितहास्यापासून गडबडा लोळायला लावणाऱया हास्यस्फोटापर्यंत हर प्रकारचा विनोदाविष्कार होता त्यात. एकाच वेळी निर्विष- निरागस आणि अस्वलाच्या गुदगुल्यांसारखा बोचकारणारा असा चावरा विनोद, त्यानंतर कधी एका सिनेमात तेवढय़ा प्रभावी पद्धतीने भेटलाच नाही.
कुमार भाटिया लिखित- दिग्दर्शित `ढूँढते रह जाओगे' पाहताना `जाने भी दो यारो'ची आठवण येते. अं।़ हं।़ हं! गैरसमज नको. `ढूँढते...' आणि `जाने भी दो...'चा अर्थाअर्थी काही संबंध नाही. `ढूँढते...'मध्ये `जाने भी दो...'च्या पद्धतीचं कथानक नाही, असा तिरकस विनोद नाही, हा त्या जातकुळीचा (खरेतर त्या प्रतीचाही) सिनेमा नाही, तरी तो पाह्यल्यावर `जाने भी दो...'ची आठवण येते खरी!
  मधल्या काळात सिनेमातल्या विनोदाचा ठेका डेव्हिड धवन- गोविंदा- कादर खान या त्रयीनं घेतल्यामुळे असेल कदाचित; पण निर्मळ आणि सुबुद्ध विनोदाचा दुष्काळच जाणवत होता सिनेमात. `ढूँढते रह जाओगे' हा हास्यतुषारांचा मुसळधांर वर्षाव नसला तरी वातावरणात आल्हाददायक थंडावा आणणारा तजेलदार शिडकावा निश्चितच आहे.
ढूँढते रह जाओगे'मध्ये शोध सुरू आहे एका हिऱयाचा... तोही कुठेही न हरवलेल्या हिऱयाचा. राजनूर नावाचा हा `बेशकीमती' हिरा सेठ मोतीचंद (सतीश शाह) या कोटय़धीशाच्या मालकीचा. या हिऱयाचा गोव्यातील `रेनेसान्स' हॉटेलात लिलाव होणार आहे. त्यासाठी देवदास या आपल्या (नावाला जागणाऱया) दारुडय़ा पर्सनल सेक्रेटरीसह तो हॉटेलात येऊन थडकतो.
 मोतीचंदच्या कुणा अज्ञात दुष्मनानं टायगर (नासिरुद्दिन शाह) या भाडोत्री मारेकऱयाला मोतीचंदला उडविण्याची सुपारी दिली आहे. तोही या हॉटेलात येऊन थडकतो. सलीम ऊर्फ सुमडी (जावेद-जाफ्री) हा टपोरी भुरटा चोर हिरा लंपास करून मोठा हात मारण्यासाठी `शीबीआय' ऑफिसर बनून हॉटेलात राहतो आहे. परम धूम धाम नावाच्या एका स्वामीला (टिनू आनंद) लिलावापूर्वीच मोतीचंदकडून हिरा खरेदी करायचा आहे. मोतीचंद लिलावापूर्वी तो विकायला तयार नाही म्हटल्यावर स्वामी एका बँक दरोडेखोराला- टोनीला (दलिप ताहिल) हिरा चोरण्यासाठी पाचारण करतो.
  एका मेडिकल कॉलेजच्या दोन उडाणटप्पू पोरांनी कधीतरी सेठ मोतीचंदचा जीव वाचवला आहे. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून मोतीचंद राजनूरच्या विक्रीची रक्कम त्यांच्या कॉलेजचा देणगीदाखल देणार आहे. त्याने या दोघांना- अजय (अमर उपाध्याय) आणि संजय (बबलू मुखर्जी) यांना लिलावासाठी खास पाहुणे म्हणून बोलावले आहे. अजयची प्रेयसी रेणू (अंतरा माळी) आधीच हॉटेलमध्ये आली आहे... मिस मल्होत्रा (शशिकला) या आपल्या हिटलर छाप आंटीसोबत. मिस मल्होत्रा लिलावात हिरा खरेदी करण्यासाठी आली आहे.
यांच्याशिवाय हॉटेलचा कडक शिस्तीचा मॅनेजर (प्रेम चोप्रा), बेशिस्त वेटर (दिनेश हिंगू), सुंदर आणि मठ्ठ रिसेप्शनिस्ट मुलगी, `स्वामी परम धूम धाम बाबा की जय' असा एकसुरात घोष करणारे चार शिष्य- कम- बॉडीगार्ड आणि मोतीचंदची अल्पवस्त्रांकित मदनिका प्रेयसी रिटा या पात्रांची भर पडते आणि `ढूँढते...'चा धूमधमाल खेळ सुरू होतो.
इथे प्रत्येक जण विशिष्ट हेतूनं आलाय. कुणाला हिरा पळवायचाय तर कुणाला पोरगी. कुणी मोतीचंदचा खून करू पाहतोय तर कुणाला तो जिवंत राहणंच अत्यावश्यक आहे. मोतीचंदला जीवही वाचवायचाय, हिराही जपायचाय, तो लिलावात विकायचाय आणि त्यापलीकडचंही काही साधायचंय. या सगळ्या `पात्रां'च्या गदारोळातून, धावपळीतून, पाठलागातून, शोधाशोधीतून `ढूँढते...'चं कथाबीज परदेशी मातीत अंकुरले असण्याची बरीच दाट शक्यता आहे. पण ते कुमार भाटियानं इथल्या मातीत व्यवस्थित रुजवलंय. (`सुबह' मालिका आठवतेय, सलीम धौसची? त्यातला नायक म्हणजे कुमार भाटिया.) `ढूँढते...' सुरू झाल्यावर बराच काळ पात्रपरिचयात जातो. तो माफक विनोदी असला, तरी कथानक फारसं पुढे सरकत नसल्यानं कंटाळवाणा होतो. पण, एकदा हा पात्रांचा भला मोठा ताफा `एस्टॅब्लिश' झाला की पुढे (साधारणत: मध्यंतराच्या पंधरा-वीस मिनिटे अलीकडे) सिनेमा छान वेग घेतो आणि हशा पिकवत- पिकवत एका चकवणाऱया कल्पक शेवटाकडे घेऊन जातो.
 लेखक म्हणून (कथा-पटकथा- संवादकार) कुमार भाटियानं पात्रपरिचयाची लांबण वगळता बाकीचा सिनेमा खुसखुशीत नर्मविनोदी प्रसंग- संवादांनी सजवलाय. स्वत:च दिग्दर्शकही असल्यानं पटकथा खूपच आटोपशीर लिहीलीये त्यानं. एवढी पात्रं एका सिनेमात आणताना त्यांचं स्वभावरेखाटन, बाह्य व्यक्तित्व, पटकथेतील नेमकं स्थान, पटकथेच्या प्रवासातला त्या-त्या पात्राचा आलेख रचणं आणि सर्व पात्रांना एकमेकांमध्ये गुंतविणारी प्रसंगनिर्मिती ही कुठल्याही लेखकाची परीक्षाच. या कसोटीला कुमार पुरेपूर उतरला आहे. प्रत्येक पात्रामध्ये त्यानं विशिष्ट मानवी स्वभाववैशिष्टय़ांचं अर्कचित्रच रेखाटलं आहे.
लेखकाच्या पर्यायाने स्वत:च्याच कल्पनेतील पात्रांना योग्य चेहरा मिळवून देण्याची दिग्दर्शकीय जबाबदारीही कुमारने शंभर टक्के यशस्वीपणे पार पाडली आहे. `ढूँढते...'मध्ये मोतीचंदपासून वेटरपर्यंत प्रत्येक पात्रासाठी अत्यंत अचूक अभिनेते निवडले गेले आहेत. एवढी पात्रं सिनेमात झटकन `एस्टॅब्लिश' होतात आणि सिनेमा संपल्यावरही लख्ख लक्षात राहतात, याचं इंगित या अत्यंत चपखल `कास्टिंग'मध्ये दडलंय.
 अचकट- पाचकट संवाद, विचित्र हालचाली, विक्षिप्त हावभाव यांना फाटा देऊन प्रसंगामधून, फुलणारा अंगभूत विनोद पकडण्याचा त्याचा प्रयत्नही विशेष दाद देण्याजोगा आहे. टायगरने चित्रविचित्र हत्यारे वापरून, क्लृप्त्या लढवून मोतीचंदवर केलेले हल्ले आणि ते विफल होऊन प्रत्येक वेळी मॅनेजरच अधिकाधिक जायबंदी होत जाण्याच्या प्रसंगमालिकेची मूळ कल्पना फारशी नावीन्यपूर्ण नाही. पण, `ती हास्यस्फोटक होते कल्पकतेमुळे. त्यातले `स्पेशल इफेक्टस्'ही उत्तम जमलेले आहेत.
 `क्लायमॅक्स'मध्ये कुमार प्रेक्षकाला एका वेगळ्याच वाटेवर घेऊन जातो आणि चकवून त्या वेळी अनपेक्षित अशा शेवटापुढे आणून उभा करतो. हा शेवट पडद्यावर पाहूनच त्यातला चकवा अनुभवावा. सलीम आणि टोनी या दोन वेगवेगळ्या `क्लास'च्या चोरांमधला विरोधाभास, त्यांची एकमेकांवर कुरघोडय़ा करण्याची धडपड आणि हिरा चोरूनही दोघांच्या हाती लाभणारा काचेचा खडा, हा कथाभागही धमाल जमलाय. एकमेकांच जीव घ्यायला निघालेले हे वीर हॉटेलच्या छपरावर घमासन मारामारी करण्याऐवजी चक्क परस्परांची स्तुती करून भागीदारी करण्याचा घाट घालतात, हा प्रसंगही मस्त मजेशीर.
 बुद्धिबळाच्या पटासारखा पायघोळ झगा घातलेला स्वामी आरामखुर्चीत झोपलाय आणि त्याचे चेले त्याचा झगा टेबलावर पसरून खरोखरीच बुद्धिबळ खेळताहेत, या प्रसंगातील विनोदबुद्धीची चमक उत्स्फूर्त हशा कमावते.
 कुठेही तंत्रचमत्कृती वा अतिसफाईदार हाताळणीतून `दिसण्या'चा अट्टाहास न धरता, सरळ-सोप्या मांडणीतून विनोद फुलवणाऱया कुमारला फक्त एकच गोष्ट साधलेली नाही.
 अजय- रेणूचं प्रेमप्रकरण आणि ती ठरीव शैलीतील अनाकर्षक चालींची गाणी काही कथानकात मुरलेली नाहीत. हे ठिगळ सिनेमात नाचगाण्यांची आणि नायक-नायिकेची सोय यापलीकडे काहीच साधत नाही. उलट सिनेमा रंगत आला असताना वारंवार रसभंग करीत राहते.
सतीश शहा आपल्या सहजशैलीत मोतीचंद उत्तम साकारतो. प्रेम चोप्रा, शशिकला, दलिप ताहिल, दिनेश हिंगू, टिनू आनंद, बबलू मुखर्जी आणि इतर कलावंताची साथही जोमदार आहे. जावेद जाफ्रीला बऱयाच काळाने मोठय़ा पडद्यावर पाहणे, हा सुरेख अनुभव आहे. त्याची ती खास भटियारी बोली, अस्सल टपोरी शब्दकळेचे संवाद, विलक्षण लवचिक चेहरा आणि शरीर यातून उभा राहणारा सुमडी विशेष लक्षात राहतो. `द मास्क' प्रसिद्ध जिम कॅरीसारखीच गुणसंपदा लाभलेला हा कलावंत मोठय़ा पडद्यावर अधिकाधिक भेटावा, असं वाटायला लावतो.
  नवोदित नायक अमर उपाध्याय आत्मविश्वासाने वावरतो, पण त्याच्या भूमिकेत खास दम नाही. अंतरा माळीची चण शाळकरी मुलीची, चेहरा स्मृती मिश्रा आणि `करीब'वाल्या नेहाचं मिश्रण असलेला, चेहऱयावरचे भाव माधुरी दीक्षित पद्धतीचे आणि अंगातले कपडे `रंगीला'च्या ऊर्मिलाची आठवण करून देणारे, असा सगळा जामनिमा आहे. तिचा वावर अतिउत्साही वाटतो आणि तिची भूमिकाही मूळ कथानकाशी फटकून वागणारीच.
  या सगळ्या गर्दीत सर्वात संस्मरणीय कामगिरी बजावतो नसिरद्दीन शाह. त्याला एक पानभरसुद्धा संवात नसतील. त्यातही प्रत्येक वेळी हल्ला केल्यावर खुश होऊन `काम हो गया, बाकी के पैसे भिजवा दो' हे फोनवरून सांगायचं आणि नंतर हल्ला फसला हे उमगल्यावर `काम अभी नहीं हुआ है' हे सांगायचं, हेच संवाद. पण प्रत्येक वेळी हा संवाद म्हणताना तो चेहरा, आवाज, संवादातले पॉझेस यातून जे काही अभिनयदर्शन घडवतो, ते `अभिनेता' होऊ इच्छिणाऱया प्रत्येकाने अभ्यासण्याजोगे आहे.
 टायगरने `काम झालं' या समजुतीनं खुशीत येऊन हातमोजे भिरकावणं, काल्पनिक ऑर्केस्ट्राचा काल्पनिक `कंडक्टर' असल्यासारख्या वेगवान हालचालींमधून आनंद व्यक्त करणं, रुममधल्या फळ्यावर शंभरावा बळी मिळवल्याची- `सेंच्युरी'ची नोंद करणं आणि मग मोतीचंद दिसल्यावर `हा।़।़।़' करून किंचाळणं, दु:खावेगानं पुन्हा फळा पुसणं... सगळंच लाजवाब. सर्वात शेवटी मोतीचंद दिसल्यानंतर वेडाचा झटका आल्यासारखा असा काही धमाल प्रकार त्यानं केला आहे; त्या एका प्रसंगातून नरिससाब संपूर्ण सिनेमा खिशात घालून जातात. केवळ त्याच्या अभिनयासाठीही `ढूँढते...' पाहायला हरकत नाही.
  पण हेच एक कारण का असावं? एकीकडे आपण हिंदी सिनेमाच्या कल्पनादारिद्रय़ाला हसायचं, त्याच त्याच घटकांच्या अतिरेकाला नावं ठेवायची आणि दुसरीकडे
 `ढूँढते...' सारख्या वेगळ्या, सकस प्रयत्नांकडे ढुंकूनही पाहायचं नाही, ही वृत्ती काही प्रेक्षकांच्या अभिरुचीची श्रीमंती दाखवीत नाही त्यामुळे, `जाने भी दो यारो'च्या आठवणी उगाळण्यात धन्यता मानण्याऐवजी थोडी वाट वाकडी करून, `ढूँढते...'चं थिएटर शोधून काढलं तर (सर्व त्रुटींसहही) एक बरा सिनेमा पाह्यल्याचं समाधानही मिळेल आणि भविष्यात असे सिनेमे `धुंडाळण्या'ची पाळी येणार नाही.

(महाराष्ट्र टाइम्स, १९९८)

No comments:

Post a Comment