नेहमीच्या हिंदी सिनेमांपेक्षा `चायना गेट' हा भलताच वेगळा सिनेमा आहे.
या सिनेमात रुढार्थानं नायक- नायिका नाहीता,
प्रेमप्रकरणं नाहीत, परदेशी चित्रणस्थळांवरची कवायती
नाचगाणी नाहीत, `माँ-बहन का प्यार'
वगैरे कौंटुबिक झमेले नाहीत. थोडक्यात,
नेहमीच्या हिंदी सिनेमाला रुचकर बनवणारा कुठलाही मालमसाला नाही.
नायक म्हणता येईल अशा वयारुपाचा तरुण इथे आहे पण दुय्यम-सहाय्यक भूमिकेत. नायिका म्हणावी अशी तरुण-सुंदर मुलगी आहे पण, ती नटवी-नाचरी
नाही, तर शांत-गंभीर. इथे कथानकाचे `नायक' आहेत एरवी
सहाय्यक भूमिकांमध्ये झळकणारे दहा चरित्र अभिनेते... पन्नाशीच्या
आसपासचे. पडद्यावर सर्वात जास्त वेळ दिसतात ते हे दहा मध्यमवयीन
`हीरो' आणि एक खलनायक. हा खलनायक नेहमीसारखा क्रूर- खुनशी खरा, पण नेहमीपेक्षा पुन्हा वेगळा. हिंदी सिनेमातून आताशा
कालबाह्य झालेला डाकू... घोडेस्वार दरोडेखोरांची फौज बाळगणारा
डाकू.
असला पठडीबाहेरचा जामानिमा घेऊन व्यावसायिक हिंदी सिनेमा काढायचा म्हणजे धाडसच...
तेही हिंदीतलं आजतागायतचं सर्वात मोठं बजेट ओतून करायचं म्हणजे शुद्ध
वेडेपणाच. पण, असला वेडेपणाच सिनेमाच्या
मुख्य प्रवाहाला वेगळं वळण देऊ शकतो. त्यामुळे, तो करण्याची जिगर दाखवल्याबद्दल निर्माता- दिग्दर्शक
राजकुमार संतोषीला सलाम ठोकला पाहिजे.
सिनेमा हे कथेचं माध्यम नाही तर दृश्यभाषेतून उलगडणाऱया पटकथेचं माध्यम आहे,
हे मर्म त्याला ठाऊक आहे. त्यामुळं, घट्ट विणीची, बंदिस्त प्रेक्षकाला विचार करायला उसंत
न देणारी वेगवान आणि खणखणीत पटकथा रचून थेट अकिरा कुरोसावांना आदरांजली वाहण्याचं धाष्टर्य़
त्यानं `चायना गेट' मधून केलं आहे.
पण, त्याच्या नजरेसमोर `राशोमान'
देणारे कुरोसावा नाहीत तर `सेव्हन समुराई'
देणारे व्यावसायिक युगप्रवर्तक कुरोसावा आहेत.
इथे `समुराई' आहेत दहा पराजित योद्धे.
केवळ पराजितच नव्हेत तर अवमानास्पद लांछन लादले गेलेले भारतीय सैन्यातले
दहा जाँबाज सैनिक. 17 वर्षांपूर्वी कर्नल कृष्णकांत पुरी (ओम पुरी) याच्या नेतृत्वाखाली ही 10 जणांची बटॅलियन `चायना गेट' या
मोहिमेवर गेलेली असते. पण ऐनवेळी केवळ माणुसकीच्या भावनेतून चकलेल्या
कर्नलची चलबिचल झाल्यानं सगळीच मोहीम फसते. या शूरवीरांवर पळपुटेपणाचा
शिक्का बसतो आणि कोर्टमार्शल होऊन त्यांना सैन्यातून अवमान करून हाकलून देण्यात येतं.
मधला 17 वर्षांत पांगापांग होऊन प्रत्येकजण आपापल्या
आयुष्यात मग्न आहे. पण, त्या फसलेल्या `मिशन'चे, `भगौडा' म्हणून हिणवले जाण्याचे चटके त्यांना आयुष्यभर भोगावे लागले आहेत. कर्नल लष्करी कारवाईविरुद्ध न्यायालयांत दाद मागतोय. न्यायालयानंही लष्कराच्याच निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यावर कर्नल पुरीकडे
जगण्याचं कारणच उरत नाही. तो स्वत:वर गोळी
झाडून आत्महत्या करणार, इतक्यात दरवाजा ठोठावला जातो.
संध्या (ममता कुलकर्णी) ही
तरुण मुलगी कर्नल पुरीसाठी जगण्याचं कारण घेऊन येते... एक `मिशन'... तिच्या वडिलांची (गिरीश
कर्नाड) निर्घृण हत्या करणाऱया, देवदुर्ग
गावाच्या परिसरात दहशतीचं थैमान घालणाऱया जगीरा (मुकेश तिवारी)
या डाकूचा नि:पात करण्याचं मिशन.
कर्नल पुरी आपल्या बटॅलियनच्या सर्व जुन्या सहकाऱयांना बोलावून घेतो.
हो- नाही करता करता सर्वचजण आपसूक या मोहिमेत सामील
होतात. 17 वर्षांपूर्वी `चायना गेट'च्या अपयशामुळं लागलेला बदनामीचा कलंक धुवून काढण्याची, गमावलेला आत्मसन्मान परत मिळवण्याची ही संधी असते त्यांच्यासाठी. म्हणून याही मिशनचं नाव तेच ठरतं... `चायना गेट'
पन्नाशी जवळ आल्यानं शरीरानं थकलेले आणि अपयशी भूतकाळाच्या सततच्या टोचणीनं
मानसिकदृष्टय़ा खचलेले हे दहा वीर जगीराशी टक्कर घेण्यासाठी कशी तयारी करतात,
जगीरापुढे सतत लोटांगण घालणाऱया नेभळट गावकऱयांमध्ये त्याच्याशी लढण्याचं
सामर्थ्य कसं निर्माण करतात आणि गिधाडांचे थवे घेऊन फिरणाऱया जगीराला त्याच गिधाडांचं
भक्ष्य कसं बनवतात, याची अतिभव्य कहाणी म्हणजे `चायना गेट.'
दहा हीरो हे `चायना गेट'चं वैशिष्टय़
आहे आणि बलस्थानसुद्धा. एका सिनेमात एवढी प्रमुख पात्रं घ्यायची,
त्यांच रंगरुप ठरवायचं, विशिष्ट स्वभाव द्यायचा,
स्वतंत्र ओळख द्यायची, त्यांच्या भूमिकांचा आलेख
ठरवायचा, एकमेकांमध्ये गुंतवायचा आणि ती सगळी पात्रं प्रेक्षकापर्यंत
स्पष्टपणे पोहोचवायची, हे पटकथेतलं सर्वांत मोठं आव्हान होतं.
ते पेलण्यात पटकथाकार राजकुमार संतोषी, अंजुम राजाबली
आणि के.के.रैना एकशे एक टक्के यशस्वी झाले
आहेत. तेवढेच किंवा त्याहूनही जास्त गुण द्यायला हवेत संतोषीच्या
अचूक पात्र निवडीला.
हिंदी प्रेक्षकांना सुपरिचित असणारे अमरीश पुरी, नसीरुद्दीन
शाह, डॅनी डेन्झोप्पा, कुलभूषण खरबंदा,
टून आनंद, अंजान श्रीवास्तव, विजू खोटे आणि जगदीप हे चरित्र अभिनेते निवडताना संतोषीनं पटकथेतल्या पात्रांच्या
`दिसण्या'चा विचार केला आहे. या अभिनेत्यांच्या प्रेक्षकांच्या मनातल्या ठळक प्रतिमांशी सुसंगत अशा प्रकारची
स्वभाववैशिष्टय़ं आपल्या पात्रांना बहाल केली आहेत. त्यांचं बाह्यरुपच
इतकं परफेक्ट जमल्यामुळं ही पात्रं प्रेक्षकांच्या मनात `एस्टॅब्लिश'
होण्यात वेळ जात नाही.
इथे अमरीश पुरी (कर्नल केवल किशन पुरी) हा बडबडय़ा, स्वत:ला शहाणा समजणारा,
सतत हुकूम सोडणार दांडगट शिपाईगडी. नसीरुद्दीन
शाह (मेजर सर्फराज खान) हा सैन्याबाहेरच्या
आयुष्यातही गुंडापुंडांशी बेधडक झुंजणारा, मृत्यूला न घाबरणारा
जबरदस्त सैनिक. डॅनी डेन्झोप्पा (मेजर रणजित
सिंग गुरुंग) हा कठोर शिस्तीचा, एकलकोंडा,
मितभाषी प्रशिक्षक. कुलभूषण खरबंदा (मेजर कैलाशनाथ गुप्ता) हा पोट सुटलेला पैसेवाला उद्योजक.
टिनू आनंद (कॅप्टन दासगुप्ता) हा लाडक्या कुत्र्याला घेऊन फिरणारा अट्टल बेवडा, अंजना
श्रीवास्तव (डी.के पांडे) हा घाबरट स्वभावाचा तर विजू खोटे (त्रिवेदी) हा अंधश्रद्ध भोळसट, जगदीप (रमय्या)
हा खुट्टू झालं की भेदरणारा आणि प्रेक्षकांना फारसे परिचित नसलेले के.डी.चंद्रन हे या टीमचे डॉक्टर.
प्रत्येकाचा सिनेमातला स्वभाव आणि आपल्या मनातली त्यांची इमेज यांची सांगड
किती फिट्ट बसते आणि त्याचं कल्पनाचित्र किती चटकन् उभं करता येतं, ते मनाशी ताडून पाहा म्हणजे या `कास्टिंग'चं सामर्थ्य लक्षात येईल. वेगवेगळया स्वभावाचे हे दहाजण
रेखाटताना त्यांची `ओळख' संतोषीनं एकेका
सीनमधून प्रभावीपणे करून दिली आहे. कर्नल पुरीचं `आमंत्रणा'चं पत्र पोहोचणं ही एकच घटा त्यासाठी कल्पकतेनं
वापरली आहे.
सतत भांडणाऱया-तंडणाऱया, तरीही
एकमेकांवर प्रेम करणाऱया आणि एकाच ध्येयानं एकत्र आलेल्या या दहाजणांचं सहजीवन हा `चायना गेट'चा प्राण आहे आणि `चायना
गेट' मधला सर्वात विलोभनीय, सर्वता प्रेक्षणीय,
सर्वात जमलेला भागही हाच आहे. डॅनीचा असाध्य आजार,
अमरिश पुरीला नसीरुद्दीनबद्दल (तो मुस्लिम असल्यामुळे)
वाटणारी द्वेषभावना, 17 वर्षांपूर्वीची मोहीम का
फसली, याचं ओम पुरीनं काळजात जपलेलं हृद्य कारण, अशा तपशीलांचा पटकथाकारांनी चपखल वापर करून त्यांचे नातेसंबंध फुलवले आहेत.
17 वर्षांपूर्वीचे सैनिक मधल्या काळात जोश गमावून बसले आहेत.
ते एकदम लढाईला तयार होणं शक्य नाही, याचं भान
ठेवून त्यांची शारीरिक, मानसिक तयारीही तपशीलवार पण लांबण न लावता
मांडली आहे. या तयारीतही त्यांची `कॅरेक्टर्स'
स्पष्ट होत जातील, अशी रचना खुबीनं केली आहे.
त्यांचा दिवंगत सहकारी टंडन याच कॉलेजयुवक मुलगा उदित (समीर सोनी) हाही या टीममध्ये आहे. पण, तरुण उदितला या सगळ्या `म्हाताऱयां'कडून मिळणारी लिंबूटिंबू वागणूक मध्यंतरापूर्वी सिनेमात धमाल उडवते.
जगदीपचा वेंधळा वावर आणि समीर सोनीची मोहिमेत खऱया अर्थानं सहभागी होण्याची
धडपड सिनेमाला अकारण गंभीर होऊ देत नाही.
जगीराला सामील असलेला स्थानिक इन्सेक्टर (परेश रावळ)
हे पात्र सडलेल्या व्यवस्थेचं प्रातिनिधिक दर्शन घडवणारं. त्याची `वर्दी'ची गुर्मी आणि परिस्थिती
उलटल्यावरची लाचारी `चायना गेट'मध्ये महत्त्वाची
भूमिका बजावते. शिवाय जगीराशी लढून प्राण गमावणारा सरपंच (शिवाजी साटम), त्याची लढाऊ पत्नी (इला अरूण), तिचा जगीराकडून मारला जाणारा लहान मुलगा शिवा
ही दुय्यम पात्रंही मोजक्या प्रसंगांमध्ये ठसणारी.
एवढय़ा मोठय़ा पात्रांच्या पटामध्ये केंद्रस्थानी आहे जगीरा. त्याच्या नि:पातासाठीच ही सगळी मोहीम आहे. राठ केस आणि दाढी- मिशांच्या जंगलात हरवलेला काळा खुनशी
चेहरा, गोणपाटासारखे विटके, जीर्ण कपडे,
पायात उंच बूट, कमरेचा पट्टा, हातात बंदूक, `ज्जे बात' या शब्दप्रयोगानं
सुरू होणारी देहाती बोली, त्याच्यासोबती घोडेस्वारांची फौज आणि
त्याचबरोबर फिरणारा गिधाडांचा थवा... या तपशिलांमधून सिनेमाला
व्यापून राहणारी जगीराची दहशत स्पष्ट होत राहते.
पात्रांचा हा विस्तीर्ण पट घेऊन संतोषी सिनेमामाध्यमाची सगळी जाणकारी पणाला
लावून एखाद्या बहुपेडी कादंबरीसारखी `चायना गेट'ची गोष्ट पडद्यावर उलगडवतो. बटॅलियनच्या सदस्यांचे परस्परसंबंध
दाखवताना सहजस्फूर्त विनोदाची खुमासदार पखरण करतो. त्यांचे भावबंध
स्पष्ट करताना हिंदू-मुस्लिम तेढीसारख्या विषयांनाही सहजपणे स्पर्श
करून जातो.
त्यामुळे, सर्वसाधारणपणे या जातीच्या सिनेमाकडून अपेक्षित
असलेले सर्व परिणाम `चायना गेट' घडवतो.
जगीराची दहशत प्रेक्षकालाही बसते. तो सर्व सैनिकांबरोबर
मनानं जगीराशी लढतो. त्या लढाईत गुंतून जातो. सैनिकांपैकी कुणी घायाळ- गतप्राण झाला तर इतरांबरोबर
हळहळतो. जगीराविषयीची चीड साठत जाते आणि जगीराचा नि:पात होतो तेव्हा प्रेक्षकालाही सूडाचं समाधान मिळतं आणि तो सुटकेचा नि:श्वासही सोडतो.
पण, हे सगळं होत असताना प्रेक्षकाला एखादी फँटसी पाहिल्याचाच
अनुभव मिळतो. दहा सैनिकांमधला भावबंध वगळता आजूबाजूचा सिनेमा
खोटा वाटतो. `चायना गेट'चा केंद्रबिंदू
असलेला संघर्ष वास्तवाच्या पातळीवर उतरत नाही, पडद्यावरचा खेळ
लुटुपुटूचा आहे, हे भान कधीच सुटत नाही.
`सेव्हन समुराई'ला काळाचा, परिस्थितीचा
काहीएक संदर्भ होता. `शोले'मध्येही चंबळच्या
खोऱयातल्या डाकूंचा संदर्भ भरपूर `सिनेमॅटिक लिबर्टी'
घेऊन वापरला होता. `चायना गेट'चा काळ 90 च्या दशकातला असावा, असं एका संवादातून अवमान काढता येतं. या आधुनिक काळाचा
संदर्भ सिनेमात नाही. देवदुर्ग ही एक प्रकारची फॅन्टसीलॅन्डच
आहे संतोषीची.
एरवी हिंसेच सामान्य माणसावर होणारा परिणाम टिपणारा, हिंसेचं तत्त्वज्ञान उलगडण्याचा प्रयत्न करणारा राज संतोषी `चायना गेट'मध्ये त्या बाबतीत ढोबळ होतो. हे देवदुर्ग गाव आहे कुठे, त्याचं भौगोलिक स्थान काय,
गावकरी पोटापाण्यासाठी काय करतात, जगीराच्या दहशतीची
आर्थिक-सामाजिक कारणं काय, इथले डाकू अजूनही
घोडय़ांवरूनच का येतात, जुनाट बंदुका का वापरतात, असले प्रश्न `चायना गेट' पाहताना
पडू नयेत, अशी संतोषीची अपेक्षा आहे. ज्या
गावात ओम पुरी आणि कंपनी धाडस जागवतात ते संपूर्ण गावच बिनचेहऱयाचं दिसतं. ते `उभारलेलं' असणंही सतत समजत
आण खटकत राहतं. परीटघडीचे खादीचे कपडे घातलेले `एक्स्ट्रॉ' कलावंत हर घटकेला घटनास्थळी `ऍक्शन'च्या पुकाऱयाबरहुकूम दीनवाण्या चेहऱयांनी दृश्यरचनेची
चौकट सांभाळत गोळा होतात. उत्तम `लोकेशन'
पाहून वसवलेलं गाव आणि कुठल्याही फुटकळ सिनेमातला `बस्ती'चा सेट यात गुणात्मक फरक काहीच राहात नाही.
हे गाव आणि इतर अनेक तपशील `शोले'ची आठवण करून देतात. दोन्ही सिनेमांचा प्रेरणास्रोत एकच
असल्यामुळे असेल कदाचित पण देवदुर्ग `रामगड'सारखं वाटतं. जगीरा `गब्बरसिंग'ची आठवण करून देतो. कधीकधी तो गब्बरचेच संवादही थोडे
फिरवून बोलतो. लहानग्या शिवाची हत्या `शोले'च्या करीमचा (सचिन) मृत्यूशी जुळवून
पाहता येतो. जागिरानं सर्फराजचे हात गोळ्या घालून निकामी करण्याचा
प्रसंग आणि संवाद `ये हाथ मुझे दे दे ठाकूर'ची सहीसही नक्कल वाटतात. घौडदौडीचे प्रसंग, गोळीबाराचे दणके आणि जगिराचा मोठमोठय़ा दगडांच्या परिसरातला वावरही `शोले'चीच स्मृती ताजी करतो. त्यामुळं
त्याची `शोले'शी तुलना नकळतच होत जाते.
`शोले'मध्ये गब्बरचा नि:पात हे ठाकूर,
जय, विरू वगैरेंचं व्यक्तिगत `मिशन' होतं. त्याचा काही सामाजिक
परिणाम घडत असला तरी तो उप-उत्पादन होता. `शोले'मधली पात्रं हिंसेच्या सामूहिक प्रतिकाराचं तत्त्वज्ञान
मांडण्याच्या फंदात पडत नव्हती. तद्वत `चायना गेट' फक्त दहा शूरवीरांची आत्मसन्मानाची लढाईच
राहिला असता तरी ठीक होतं. इथे संतोषी हिंसेच्या प्रतिकाराचं
सामूहिक नेभाळेपणा नष्ट करण्याचं फिल्मी तत्वज्ञान आपल्या पात्रांच्या तोंडून वदवतो.
पण, या उक्तींचं कृतीत परिवर्तन झालेलं सिनेमात
कुठेही दिसत नाही. गावकरी नेभळे का होते, याचं स्पष्टीकरण नसतं तसं ते अचानक लढायला कसे तयार झाले, याचंही तर्कसुसंगत स्पष्टीकरण दिलं जात नाही. जागिराचा
नि:पात हे फक्त संध्याचं आणि कर्नल पुरीच्या बटॅलियनचंच `मिशन'बनून राहतं. त्याला व्यापक
सामाजिक अधिष्ठान मिळत नाही. तसं मिळावं, असा काही नियम नाही; पण मग त्या छापाची भाषणबाजी किंवा
`दृश्यबाजी' सिनेमात हवी कशाला?
अर्थात हे सगळे विचार सिनेमा सुरू असताना सुचवण्याची पुरसत संतोषी देत नाही.
आणि गोष्टी खटकल्या तरी सिनेमा संपेपर्यंत खुर्चीतून हलावंसं वाटत नाही.
कारण, संतोषीनं एकातून एक उलगडत जाणाऱया प्रसंगांमधून,
जेवढय़ास तेवढय़ा आणि तीरीही आशयदृष्टय़ा भरगच्च दृश्यांच्या मालिकेतून
प्रेक्षकाला खुर्चीत खिळवून ठेवण्याचं काम चोख बजावलंय.
सर्व कलावंतांचा अप्रतिम अभिनय ही `चायना गेट'ची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. एरवी पाचकळ अविर्भाव
आणि अतिशैलीबाज उच्चारणात अडकलेल्या जगदीपला दिग्दर्शकानं नियंत्रणात ठेवून अव्वल दर्जाचा
परफॉर्मन्स मिळवलाय, यातच काय ते ओळखावं. ओम पुरी, अमरिश पुरी, नसिरुद्दीन
शाह आणि डॅनी यांना (अर्थातच) तुलनेनं जास्त
फुटेज आहे. त्यांनी ते सार्थकी लावलंय. या बुजुर्गांचा अभिनयाविष्कार पाहिल्यावर हिंदी सिनेमाचा `नायक' तरुण असण्याची भंपक गरज आपण का कुरवाळत बसलो होतो,
असा प्रश्न प्रेक्षकाला पडेल. ही राज संतोषीनं
घडवलेली छोटेखानी क्रांतीच आहे.
ममता कुलकर्णी संध्याच्या भूमिकेत शांत-गंभीर-पोक्त आणि निरागससुद्धा दिसते. पण, तिच्या पात्ररेखाटनावर फारशी मेहनत घेतलेली जाणवत नाही. खास तिचा असा एकही प्रसंग सिनेमात नाही. तिच्या तुलनेत
नवोदित समीर सोनीला दुय्यम भूमिकेतही चांगली संधी मिळाली आहे. त्याचा उत्साही, निरागस उदित चांगली छाप पाडून जातो.
मुकेश तिवारी या नव्या अभिनेत्यानं जगीराचा सॅडिस्टिक खलनायक झोकात साकारलाय.
जगीरा गब्बरसदृश असूनही गब्बरची भ्रष्ट नकुल वाटत नाही, हे मुकेशचं यश आहे. तुलनेनं कमी वाव असूनही परेश रावळ
लक्षात राहतो.
संतोषीनं शोधलेलं `लोकेशन' देवदुर्गचा
त्याला अपेक्षित ओबडधोडब परिसर यथातथ्य साकारतं. छायालेखक पियूष
शाहनं संपूर्ण सिनेमाला एक `रस्टिक लुक' दिला आहे. नैसर्गिक छाया प्रकाशाचा वापर करून सिनेमाची
दृश्यात्मक भव्यता वाढवली आहे. वनराज भाटिया यांच्या पार्श्वसंगीतात
वीररसाचा परिपोष होतो. पण, प्रत्येक प्रसंगाला
पार्श्वसंगीत असण्याचा अट्टहास झाल्याचं जाणवतं. काही प्रसंगांमध्ये
शांतता किंवा पार्श्वध्वनी अधिक परिणामकारक झाले असते.
ऍक्शन हे या सिनेमाचं मुख्य अंग. ती खूपच भव्य प्रमाणात
दिसते. प्रत्येक प्रसंग खूप मोठय़ा `स्केल'वर `माऊंट' केला आहे. `एरियल शॉट्स'चीही भरमार आहे. पण,
कोण कुठून कसा हल्ला करतंय, जगीराच्या टोळीत नेमके
डाकू आहेत किती, हे काही समजत नाही. खास
बनवलेल्या भुसभुशीत जमिनीत घोडय़ावरून धाडकन कोसळणारे डाकूही जरा जास्तच प्रमाणात दिसतात.
अनु मलिकच्या संगीतातलं `छम्मा छम्मा' हे गाणं खास आकर्षण म्हणून सिनेमात आहे. ते घुसवलेलं
असलं तरी रसभंग करत नाही. या गाण्याची ठेकेबाज चाल आणि उर्मिला
मातोंडकरचं पाहुण्या भूमिकेतलं दिलखेचक, तडक-भडक नृत्य उत्तम जमलंय.
हिंदी सिनेमात माणसा-प्रसंगांच्या एवढय़ा भव्य कॅनव्हासची
कल्पनाही दमछाक करणारी आहे. एवढा भव्य पट कल्पून तो पडद्यावर
याथतथ्य साकारण्याची किमया संतोषीनं करून दाखवली आहे. त्याबरोबर,
व्यावसायिक सिनेमाला रूढ चौकटीपलिकडे नेणारे महाद्वार उघडले नसले तरी
किमान दिंडी दरवाजा किलकिला केला आहे. दर्जेदार मनोरंजन हे आपलं
`मिशन' असेल तर `चायना
गेट'ला दाद देऊन संतोषीचं `मिशन'
आपण यशस्वी करायलाच हवं.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment