Thursday, December 22, 2011

स्वत्वशोधाचा विषमभुज त्रिकोण (वजूद)


`वजूद' म्हणजे अस्तित्व... एक्झिस्टन्स... पण एन.चंद्रांच्या `वजूद'मध्ये अर्थ आहे ओळख... स्वत्व... आयडेंटिटी असा. हा सिनेमा फिरतो तीन प्रमुख पात्रांच्या स्वत्वशोधाभोवती.
  मल्हार अग्निहोत्री (नाना पाटेकर) हा एक नाटय़दिग्दर्शक अभिनेता. कॉलेज शिक्षण संपल्यावर 10 वर्षांनंतरही कॉलेजसाठी स्पर्धांची नाटकं बसवणारा.
 अपूर्वा चौधरी (माधूरी दीक्षित) ही त्या कॉलेजची विद्यार्थिनी. एका उद्योगपतीची (राजीव वर्मा) एकुलती एक मुलगी.
  निहाल जोशी (मुकुल देव) हा स्थानिक कमिशनरचा (परीक्षित सहानी) मुलगा. अपूर्वाचा प्रियकर.
  मल्हारच्या नाटकाची अपूर्वा नायिका आहे, तशीच त्याच्या भावविश्वाचीही ती सम्राज्ञी आहे. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करतो... भक्तीच्या पातळीवर जाणारं. तो राहतो एका चाळीत... विधुर बापाबरोबर (हेमू अधिकारी). मल्हार काही कमावत नसल्यानं बापाला ऑफिसच्या कामानंतरही घरी टायपिंगची कामं करून दोन माणसांचा संसार चालवावा लागतोय. मल्हारला खर्डेघाशीची कुठली नोकरी करायला जमणार नाही... कारण नियतीनं त्याच्या भाळी अभिनेत्याचं नशीब रेखलंय... त्याला नाटकाशिवाय काहीच करता येत नाही आणि आपला जन्मच नाटकासाठी झालाय, अशी त्याची खात्री आहे.
  बापाची कटकट, परिस्थितीचे टक्केटोणपे, अपूर्वावरचं पछाडल्यासारखं आत्यंतिक प्रेम आणि सदैव नाटकाच्या जगात कल्पनांचे इमले रचणारं अस्वस्थ मन... मल्हारचा मानसिक तोल ढळायला कारक अशीच विलक्षण परिस्थिती.
 हा तोल पूर्णपणे ढळून मल्हार विस्कटून जातो अपूर्वाचं निहालशी लग्न ठरल्यावर. कारण, तत्पूर्वी मल्हारच्या दिग्दर्शनानं, अभिनयकौशल्यानं भारलेली अपूर्वा त्याचं खुलेआम कौतुक करत असते. `आय अडोअर यू' असं चारचौघांदेखत सांगते. तिचं आपल्यावर प्रेम आहे, असाच याचा अर्थ मल्हारनं सतत लावलेला असतो. त्याच्या मनातली अपूर्वा आणि वास्तवातली अपूर्वा यांच्यातली सीमारेषाच पुसली गेलेली असते. अपूर्वाचं भलत्याशीच लग्न करू नका असं तिच्या वडिलांना सांगायला गेलेल्या मल्हारकडून चुकून निहालच्या वडिलांचा अपघाती खून घडतो. मल्हार गजाआड होतो.
  निहालचे वडील वारल्यावर अपूर्वाचे वडील त्याला वास्तवाची जाणीव करून देतात की, त्याची ओळख `कमिशनरचा मुलगा' हीच होती. अपूर्वाशी लग्न करून तो `अपूर्वा चौधरीचा पती' अशी (पुन्हा परप्रकाशित) ओळख मिळवणारं. मग `निहाल जोशी'ची स्वतंत्र ओळख कशी तयार होणार? हा व्यवहारी उपदेश निहालला पटतो. तो जाणीवपूर्वक अपूर्वाशी फारकत घेतो, स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्यासाठी. अपूर्वालाही श्रीमंत बापाची मुलगी बनून राहण्यास रस नसतो. तीही आपल्या स्वत्वाचा शोध घेण्यासाठी टीव्ही-पत्रकार बनते.
 तुरुंगातही अपूर्वाच्याच स्वप्नांमध्ये रमलेल्या मल्हारलाही आपला `वजूद' प्रस्थापित करायचाय. एकदा संधी साधून तो तुरुंगातून पळ काढतो. तो अपघातात मरण पावला, अशी सर्व जगाची समजूत झालेली असताना तो अपूर्वा-मल्हारच्या शहरात धूमकेतूसारखा उगवतो... एका बहुरूपी अभिनेत्याच्या रुपात.
 मध्यमवयाच्या लग्नेच्छु बायकांच्या जाहिरातींना उत्तर देऊन त्यांना भेटायचं... त्यांच्या मनातल्या आदर्श पुरुषाचं रुप घेऊन; कधी तबलावादक, कधी सर्जन, तर कधी लष्करी अधिकारी बनून. त्यांच्यावर मोहजार फेकून त्यांना गुंगीच्या औषधानं बेशुद्ध करायचं आणि त्यांचा पैसा-अडका लुटायचा, असा उपक्रम तो सुरू करतो. अभिनयकलेच्या या अहिंसक प्रदर्शनाला लागतं एका धनाढय़ विधवेचा (कुनिका) खून होतो तेव्हा. या विधवेच्या मोलकरणीला रिटाला (रम्या कृष्णन) मल्हार आवडतो. त्याचा लुटीचा इरादा लक्षात आल्यावर ती मालकिणीचा मुडदा पाडते आणि त्याला सामील होऊ त्याची साथीदार बनते.
 आपल्या `अभिनया'च्या बळावर मल्हार वृत्तपत्रांच्या आतल्या पानांपासून पहिल्या पानांपर्यंत मजल मारतो. अपूर्वाला सतत निवावी फोन करून आपल्या भावी कामगिरीची माहिती देत राहतो. निहालवर आणि पोलिस खात्यावर कुरघोडय़ा करून `रॉबिनहूड' स्टाईल प्रसिद्धी मिळवतो. एका क्षणी त्याची ओळख अपूर्वासमोर उघड झाल्यावर निहाल आणि मल्हार यांच्यातल्या संघर्षाला वेगळीच धार चढते. तिघे आमोरासमोर आल्यावर अपूर्वा मल्हारला वास्तवाची जाणीव करून देते. तिचं आपल्यावर कधीच प्रेम नव्हतं हे समजल्यावर मल्हार आतून संपून जातो. मनानं मरतो.
 शरीरानं मरण्यासाठी तो एक महानाटक रचतो... अपूर्वाच्या आठवणींचा- प्रेमाचा खेळ जिथे रंगला त्याच रंगमंचावर... आपलं एकही नाटक न पाहिलेल्या बापाला प्रेक्षक बनवून...
  `वजूद'ची कथावस्तू भलतीच सशक्त आहे. एखाद्या महानाटय़ाच्या पातळीवर घेऊन जाईल, अशा दर्जाचं कथाबीज आहे. एका फ्रस्ट्रेटेड अभिनेत्यानं जगाच्या रंगमंचावर घडवलेलं नाटक, त्याचं आर्त एकतर्फी प्रेम, त्याच्या स्वप्नातलं जग आणि वास्तवातलं जग यांची सरमिसळ, स्वत्वाच्या बळावर उभी राहणारी पात्रं त्यांच्या कर्तृत्वाच्याही दशांगुळे वर उरणारी अटळ नियती यांचा विलक्षण गुंतागुंतीचा पट म्हणजे एका सकस प्रभावी आणि चित्रपटकलेच्या सर्व अंगांना आव्हान देणाऱया सिनेमासाठीची आदर्श सामुग्री आहे.
 व्यावसायिक सिनेमाच्या चौकटी- बाहेरची, आजच्या तरुण पिढीच्या भावविश्वाशी काही नातं सांगणारी ही धाडसी कथा निवडल्याबद्दल लेख-दिग्दर्शक एन. चंद्रा यांचं अभिनंदन केलं पाहिजे. तिच्यातल्या काही शक्यतांना पटकथाकार आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी यथोचित न्यायही दिला आहे.
  `वजूद'चा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, मल्हारचं भावविश्व आणि वास्तवविश्व यांच्यातली जीवघेणी विसंगती ती चंद्रानी मोठय़ा ताकदीनं मांडलीय. मल्हारचं नाटकात हरवून जाणं, त्यानं रंगमंचावर अपूर्वाला अभिनय शिकवणं, `कैसे बताऊँ मै तुम्हें मेरे लिए तुम कौन हो' या भावविभोर कवितेचा वापर, धर्मवीर भारतींच्या `अंधायुग'मधील अश्वत्थाम्याच्या रुपात मल्हारनं स्वत:ला पाहणं, स्वत:मधल्या दिग्दर्शकाला- नटाला जिवंत ठेवण्यासाठी त्यानं कल्पनेतल्या अपूर्वाची साथ घेणं, तिच्याबरोबर स्वप्नातलं आयुष्य समरसून जगणं, हा कथाभाग सिनेमात विलक्षण प्रभावी होतो.
 तेवढाच किंवा त्याहूनही अधिक परिणाम घडवतं मल्हार आणि त्याचा बाप यांच्यातलं विलक्षण नातं. मल्हारचा बाप त्याला सतत घालूनपाडून बोलतो, त्याच्यावर कातावतो- करवादतो. मल्हारच्या नट-दिग्दर्शक असण्याला त्याच्या लेखी शून्य किंमत आहे. त्याच्या मनात या एकुलत्या एका लेकाबद्दल एवढी घृणा आहे, की बोलूनबोलून थकल्यावर तो सगळा विखार कागदावर टाइप करून टाकतो. हा कमालीच्या एकसुरी आयुष्यानं पिचलेला चाळकरी म्हातारा अंगावर काटा आणतो.
  गंमत म्हणजे चारचौघांत चपलेनं मारून घराबाहेर काढणाऱया या बापाला मल्हारच्या आयुष्यात अपरिहार्य अविभाज्य स्थान आहे. त्याचं भावविश्व एका टोकाला अपूर्वानं तोललंय तर दुसऱया टोकाला त्याच्या बापानं. बापाच्या त्या कडकट् कडकट् टायपिंगचा आवाजही मल्हारच्या विश्वात मुरून गेलाय. म्हणूनच तो जेव्हा सुखाचं स्वप्न पाहतो तेव्हा त्यात अपूर्वाबरोबर `सुखी'बापही आहे.
  माणसाचं भावविश्व पुर्णपणे रिकामं राहू शकत नाही. त्याला सर्व प्रकारची नाती लागतात. घृणेचंसुद्धा एक नातं असतं आणि प्रसंगी तेही अत्यावश्यक बनून जातं, याची प्रगल्भ समज व्यक्त करणारं हे बापलेकाचं नात, हा `वजूद'मधला सर्वात हृद्य भाग आहे... प्रेक्षकाला आतून हलवून टाकणारा आणि अधिक परिपक्व करणारा. निहाल आणि मल्हार यांच्यातल्या तिरस्काराच्या नात्याकडेही पटकथाकार दिग्दर्शक अशाच प्रगल्भ नजरेनं पाहतो.
 कमी लांबी असतानाही लक्ष वेधून घेणारी दोन पात्रं `वजूद'मध्ये आहेत. एक थिएटरचा कफल्ल्क, पण नाटय़वेडा मालक (राजदत्त) आणि दुसरी रिटा. थिएटरच्या मालकाला संवाद जवळपास नाहीतच. पण त्याच्या अस्तित्वाचा पटकथेत करून घेतलेला वापर नाटकांच्या जगावर आणि तिथल्या `वेडय़ां'वर अचकू प्रकाश टाकतो. रिटा ही लातूरहून आलेली अनाथ मुलगी. तिचं अनाथ असणं एरवीपेक्षा वेगळं आहे. भूकंपाच्या रात्रीपर्यंत काही नाव-गाव-ओळख असलेल्या रिटाचं सर्वस्व भूकंपानं गिळून टाकलंय. तिची मल्हारला मिळणारी अबोल पण एकनिष्ठ साथ, तिचं फुलणं आणि वास्तव उमगल्यावर करपून जाणं सिनेमाच्या केंद्रस्थानी असलेल्या त्रिकोणाला वेगळी मिती मिळवून देतं. या चार-पाच पात्रांमधल्या ताण-तणावातून गाठला जाणारा `वजूद'चा कळसाध्याय अत्यंत नाटय़मय आणि शोकात्मिकेची उंजी गाठणारा वठला आहे.
 मल्हार आपल्या आयुष्यातला शेवटचा `प्रयोग' ठरवतो तेव्हा एकच प्रेक्षक निवडतो... स्वत:चा बाप. चाळीत जाऊन तो आपल्या दिग्मूढ बापाला स्वत:च्या हातानं पोशाख चढवतो. त्याला थिएटरात बसवतो. तिथे बोलावलेल्या अपूर्वाला तो नाटकाचा प्रसंग सांगतो... `मी तुला लग्नासाठी विचारीन, तू हो म्हणायचंस'... ती अर्थातच हे म्हणून धजत नाही. तो परोपरीनं तिला विनवतो... `अगं, हे फक्त नाटक आहे. तुझं माझ्यावर प्रेम नाही हे मला माहितीये आणि स्वप्नात पूर्ण आयुष्य जगलोय मी तुझ्याबरोबर... आता फक्त या मंचावर, माझ्या बापासमोर एकदा `हो' म्हणायचा अभिनय कर'... ती नकार देत राहते, तेव्हा तो पिस्तुल काढतो... अधारातून हे नाटय़ पाहणारा निहाल मल्हारवर गोळ्या झाडतो. मल्हार मरून पडल्यावर त्याला कळतं की, मल्हारच्या हातातलं पिस्तुल खोटं होतं... नाटकातलं. दचकून मागे सरकलेल्या अपूर्वाच्या धक्क्य़ानं बटण दाबलं जातं आणि या नाटकावर अचूक पडदा पडतो. मल्हारच्या मरणाला मरणाचा अभिनय समजून, त्याचं डोकं मांडीवर घेऊन त्याच्या जबरदस्त अभिनयाची बेफाट तारीफ करत सुटलेला बाप एका वेगळ्याच पातळीवरचं आक्रंदन त्या मंचावर पेश करतो.
 हा `क्लायमॅक्स' तारेवरच्या कसरतीसारखा... जरा तोल ढळला तर कपाळमोक्षच... तो चंद्रानी खूपच प्रगल्भपणे हाताळलाय... `काय' घडणार आहे, याची पूर्ण कल्पना असलेल्या प्रेक्षकालाही तो बांधून ठेवतो...
  पण, या अप्रतिम `क्लायमॅक्स'पर्यंतचा सर्व प्रवास काही प्रेक्षकाला पूर्णपणे बांधून घेत नाही. आधी उल्लेखलेले सर्व प्रसंग आणि सर्व घटक यांच्यापलीकडेही `वजूद'चा मोठा भाग शिल्लक उरतो. हा हिस्सा आहे व्यावसायिक यशाच्या आडाख्यांवर बेतलेल्या गणितांचा कमअस्सल भाग. हे हिणकस `वजूद'चा कस कमी करून टाकतं.
 सिनेमात सुरुवातीला रंगमंचावर मल्हार अपूर्वाला नाटकाची पार्श्वभूमी सांगतो. प्रेमाच्या उ:शापानेच ज्याला पूर्वस्थिती प्राप्त होईल, अशा शापित यक्षाची कहाणी तिच्यात भिनवतो. आणि `नाटक' म्हणून पडद्यावर दिसतं काय, तर `रंगमंचा'च्या चौकटीहून कितीतरी मोठय़ा `सेट'वर भव्यदिव्य नेपथ्यात सादर होणारं `मै क्या करू' हे तद्दन `फिल्मी' नृत्यगीत.
  तीन प्रमुख पात्रांच्या `वजूद'च्या शोधाची ही कहाणी फक्त मल्हारवर केंद्रित होते. त्याच्यातल्या नटाला, उपेक्षित मुलाला भरपूर फुटेज देताना अपूर्वा आणि निहालवर मात्र अन्याय करते. मल्हारच्या आगमनानंतरचा सगळा सिनेमा आपल्याला त्याच्या चष्म्यातूनच पाहावा लागतो.
  अपूर्वाचं आपल्यावर प्रेम आहे, अशी मल्हारची समजूत शेवटपर्यंत कायम राहिल्याचं कथानकात दिसतं. मध्यंतराच्या वेळी मात्र जेव्हा अपूर्वा आणि निहाल नव्या ओळखींसह एकमेकांसमोर येतात, तेव्हा लपलेला मल्हार नियतीला आव्हान देतो... `माझ्यामुळं विभक्त झालेले हे दोघे एकत्र आलेत खरे पण मीच त्यांचं जगणं हराम करून दाखवतो.' या संवादात अपूर्वा-निहाल यांच्यात `काहीतरी' आहे, याचं भानच मल्हार दाखवतो आणि `व्हिलन' बनून मोकळा होतो. हे त्याच्या मुळ समजुतीशी सरळसरळ विसंगत आहे.
  मल्हारनं बहुरुपी बनून केलेल्या करामती आणि त्यातून त्याला मिळणारी प्रसिद्धी हा `वजूद'चा सर्वात अविश्वसनीय भाग. इथपासून सिनेमा मल्हारच्या `आहारी' जातो. त्याच्या भोवतीची सगळी पात्रं, संपूर्ण पोलिस दल आणि जनता खुरटी होऊन जाते, मल्हार `सुपरमॅन' बनू लागतो. मल्हारचा (पर्यायानं नाना पाटेकरचा) अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आवाज अपूर्वा ओळखू शकत नाही, हे कथानकाच्या सोयीसाठी मान्य करता येईल; पण निहालचं काय? तो तर एका झटापटीत मल्हारचा चेहराही स्पष्टपणे पाहतो. ज्या माणसामुळं आपलं संपूर्ण आयुष्य बदललं, उलटपालटं झालं, त्याला तो दोन फुटांवर ओळखू शकत नाही?
  मल्हार मेलाय, अशी जगाची समजूत आहे, असं या घोळाचं पटकथेतलं समर्थन आहे. ते फारच तोकडं आहे. कारण, मल्हार अपघातात बेपत्ता झालाय, त्याचं शव सापडलेलं नाही, तो मेलाय, असं फक्त गृहीत धरलं गेलंय, हे निहालसारख्या इन्स्पेक्टरला त्या क्षणी कसं कळत नाही?
  शिवाय मल्हारचं बाह्य रंगरुप (चेहऱयाची ठेवण, दाढी आवाज) न बदलताच तो विविध रुपं धारण करताना दाखवलाय. मग त्याच्याकडून लुटल्या गेलेल्या स्त्रियांच्या आठवणीतून पोलिस त्याचं कल्पनाचित्र कसं तयार करत नाहीत?
  पोलिस कमिशनरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घुसणं, त्याच्या घरात (वेळ सांगून) शिरणं, असले अचाट उपक्रम मल्हार राबवतो, त्यात `सिनेमॅटिक लिबर्टी'चा अतिरेक होतो. त्याहून खेदजनक भाग म्हणजे एक अभिनेता म्हणून मल्हार त्यात कुठेही कसाला लागत नाही. त्याचं तथाकथित `अभिनय' कौशल्य वेषांतराच्या पातळीवरच राहतं, `रुपां'तराच्या उंचीवर जात नाही.
  मल्हारला प्रसिद्धी माध्यमांकडून मिळणारी आवाजवी प्रसिद्धीही खटकणारी. त्याचा आवाज रेडिओवरून ऐकवला जातोय आणि सगळं शहर `बिनाका गीतमाला' ऐकल्यासारखं ठिकठिकाणी गोळा होऊन तो ऐकतंय, हे तर अतिरंजितच त्यातून पत्रकार मंडळी केवळ पेपर खपवण्यासाठी सनसनाटीबाज बातम्यांना कसं अवास्तव महत्त्व देतात, अशी टिप्पणी पटकथाकार- दिग्दर्शकाला करायची आहे. वास्तवात काही अंशी तो खरंही आहे. पण ज्या प्रसारमाध्यमावर दिग्दर्शक `कॉमेंट'करू पाहतोय, त्या माध्यमाचं त्यांचं आकलन मर्यादित असल्याचं अपूर्वाच्या भूमिकेतून स्पष्ट होतं. ही पत्रकार व्हिडिओ कॅमेरा सोबत घेऊन वेगवेगळ्या घटनांचं `ऑन द स्पॉट' चित्रण करते, वृत्तपत्रासाठी रिपोर्टर म्हणून बातम्याही टाईप करते आणि टीव्हीवर `वजूद' याच नावाच्या एका लोकप्रिय कार्यक्रमाचं सुत्रसंचालनही करते. पत्रकारितेचं हे `फ्यूचरिस्टिक' दर्शन वेगळ्या अर्थानं `मनोरंजक' ठरतं.
  मल्हार आणि पोलिस यांच्यातल्या एकतर्फी लपाछपीमुळं सिनेमाच्या शेवटी फार गोंधळ निर्माण होतो. किमान दोन वेळा, एकदा अपूर्वाच्या नृत्याच्या वेळी आणि नंतर रेल्वे यार्डात हाच `क्लायमॅक्स' असेल, असं प्रेक्षकाला वाटतं. पण खरा क्लायमॅक्स त्याच्याही नंतरच घडतो. तो उत्तम असला तरी तोवरचा प्रवास अकारण दमछाक घडवतो.
  या व्यावसायिक तडजोडी गृहीत धरूनही सर्व प्रमुख कलाकारांना `इन्स्पायर्ड' अभिनय आणि एन.चंद्रा यांचं मुरब्बी दिग्दर्शन यामुळे `वजूद'चा अनुभव सामान्य हिंदी चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो. मल्हारच्या भूमिकेत नाना पाटेकर साजून दिसतो; कारण अशा `सटक'लेल्या भूमिकाच त्याची `ओळख' होऊन बसल्या आहेत. इथेही काही क्षणात डोळ्यातून पाणी काढणे, जीव खाऊन समुद्राकडे धावणे, पोलिसाच्या प्रश्नाला कवितेत (नानाच्याच) उत्तर देणे वगैरे खास नाना शैलीतले प्रसंग आहेत, पण तुरळक. चंद्रांना नानाच्या फुटेजला कात्री लावता आली नसली तरी त्याचे संवाद मात्र गोळीबंद करण्यात आले आहेत. एरवी `नेहमी'चाच वाटणाऱया नानानं मतिमंद मुलाच्या सोंगात मजा आणली आहे. बोटांनी खटखट ताल धरण्याच्या सवयीमागची कारणमीमांसा, `शेवटच्या नाटका'ची रम्याबरोबरची रिहर्सल आणि `क्लालमॅक्स'मधला भावाविष्कारही नानाची ताकद दाखवून देतो. जावेद अख्तरनी सुरेख लिहिलेल्या `कैसे बातऊँ मैं तुम्हें' या कवितेतही त्यानी जान ओतली आहे.
  माधुरी आणि मुकुल देव यांना नानाइतक्या तपशीलसमृद्ध भूमिका नाहीत; पण तरीही दोघेही समान ताकदीनं नानापुढे उभे राहतात. माधुरीला लंपट बॉसला धडा शिकवण्याच्या प्रसंगासारखे स्वतंत्र अस्तित्व दाखवणारे काही प्रसंग लाभले आहेत. मुकुलला तीही संधी मिळालेली नाही. पण तो कुणाहीपुढे न दबता नैसर्गिक सहजतेनं कॅमेऱयापुढे वावरतो. या दोघांच्या समंजस अभिनयामुळंच हा विषमभुज त्रिकोण सावरला जातो.
 रम्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वातच एक आवाहक मादकता आहे. `वजूद'मध्ये तिनं त्याला निरागसतेचं परिमाण दिलं आहे. कमी लांबीच्या भूमिकेतही ती लक्षात राहते. शिवाजी साटम, जॉनी लिव्हर, राजीव वर्मा, तेज सप्रू वगैरे मंडळी सफाईदार कामे करून जातात. मुख्य त्रिकूटाइतकेच लक्षात राहतात हे हेमू अधिकारी. त्यांच्या कातावलेला, एकसुरी करवादणारा, एकाचवेळी भयाण आणि केविलवाणा भासणारा बाप केवळ लाजवाब आहे. खरंतर एन. चंद्रांच्या शैलीतलं, अत्यंत टोकाच्या भडक भावना भडक पद्धतीनं व्यक्त करणारं हे पात्र आहे. पण हेमू अधिकारींनी शरीरयष्टी, चेहरा आणि त्यातही डोळ्यांच्या वापरातून ते हाडामांसाचं करून दाखवलंय. केवळ एक व्यक्ती नव्हे, तर चाळीच्या खरटलेल्या जगाची संस्कृतीच त्यांनी या भूमिकेत जिवंत केलीये.
 कमलेश पांडे यांनी चुरचुरीत मार्मिक, खोचक संवाद लिहिताना संधी मिळेल तिथे सामाजिक भाष्य केलंय. `थोडासा रुमानी हो जाए'मधील `चल लेकर अपनी नाँव चले, चंदन-चांदनी के गाँव चले' हा (तिथेही नानाच्याच तोंडी असलेला) नितांतसुंदर काव्यात्म संवाद त्यांनी चपखल वापरून घेतलाय. जावेद अख्तर यांच्या गीतांना अनु मलिकनं संगीतात न्याय दिलाय. `सनम तुम हमपे मरते हो'मधला `संजीदा, पोशीदा, ख्वाबीदा' हा उर्दू शब्दांचा खेळ आकर्षक असला तरी सामान्य प्रेक्षकांच्या डोक्यावंरून जाणारा. `कि टुट गयी तडक करके' आणि `और हम तुम' ही अन्य दोन गाणीही श्रवणीय आहेत. त्यांचं `टेकिंग'ही गाण्यांना कथानकाचा हिस्सा बनवतं. विशेषत: `और हम तुम' या स्वप्नगीतात नानाच्या सायकलवर माधुरीबरोबर हेमू अधिकारीही असणं खूपच तरल आशय मांडतं. अन्य तांत्रिक अंगे समाधानकारक आहेत. छायालेखक डब्ल्यू.बी.राव यांची थिएटरमधल्या दृश्यांची प्रकाशयोजना लक्षवेधी. आर. राव यांचं पार्श्वसंगीतही अपेक्षा वाढविणारं आहे.
   हिंदी व्यावसायिक सिनेमात वेगळी कथानकं नाहीत, प्रयोगशीलता नाही, अशी सुजाण प्रेक्षकांची सततची ओरड असते. `वजूद'मध्ये कथाबीज आणि काही तुकडय़ांमध्ये रसरशीत प्रयोगशीलतेचा अनुभव मिळतो. काही तुकडय़ांमध्ये पलायनवादी रंजनाची डोकेदुखी. त्यात महत्त्व कशाला द्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं.

No comments:

Post a Comment