ऍक्शन आणि कॉमेडीची सरमिसळ जॅकी चॅनच्या चाहत्यांना
नवी नाही. हॉलिवुडमध्ये पूर्वापार होत आलेल्या
या `कॉकटेल'मध्ये जॅकी चॅन आणि अन्य आशियाई
नटांनी खास आशियाई भावना, संस्कृती आणि विनोदाची भर घालून हे
रसायन इतकं झिंगबाज केलं की, जेम्स बाँडलाही `टुमारो नेव्हर डाईज'मध्ये मार्शल आर्टसपटू आशियाई नायिकेची
मदत घ्यावी लागली.
कोलंबिया ट्रायस्टारचा `द बिग हिट'हा याच परंपरेतला `ऍक्शन कॉमेडी'पट. अमेरिकेतल्या विविध वर्णवंशांच्या भेसळीचा आधार या
सिनेमाला आहे. सिनेमा सुरू होतो तेव्हा मेल्विन (मार्क वॉलबर्ग), क्रंच (बोकीम वूडबाईन),
सिस्को (लोऊ डायमंड फिलिप्स) आणि व्हिन्स (अँटोनिओ सटॅटो ज्यु.) हे भाडोत्री मारेकरी एका माफिया डोनच्या अड्डय़ावर हल्ला चढवून त्याचा खून पाडतात,
एका हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर उडालेल्या धुमश्चक्रीत हे स्पष्ट
होतं की मेल्विन आणि क्रंच हेच जिवावरचा धोका पत्करताहेत... सिस्को
आणि व्हिन्स मात्र स्वत:ला सुरक्षित ठेवून जमेल तेवढी हाणामारी
करतात.
या यशस्वी कामगिरीबद्दल बॉस पॅरिस (ऍव्हरी ब्रुक्स)
मेलला (प्रेल्विनचं लघुरुप) बोनस देतो त्याला सिस्को आक्षेप घेतो. मेलनं त्या माफिया
डोनला फक्त जायबंदी केलं होतं, आम्ही त्याला ठार केलं,
असं तो खोटंच सांगतो. मेल नोटांची थप्पी सरळ त्याच्या
हाती सोपवतो.
इथे मेलच्या स्वभावाची दुबळी बाजू उजेडात येते. त्याला
सर्वांना खुश करण्याची वाईट खोड आहे. जगातल्या प्रत्येक माणसानं
आपल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे, अशी त्याची गरज झाली आहे.
सिस्कोसारख्या लफंग्याच्या नजरेतून उतरण्याच्या भीतीपोटी तो 25
हजार डॉलरच्या बोनसवर पाणी सोडतो. तसाच कमाईचा
बराचसा हिस्सा चॅन्टेल (लेला रॉशॉन) या
`अधिकृत' मैत्रिणीवर आणि पॅम (क्रिस्तिना ऍपलगेट) या अधिकृत भावी पत्नीवर खर्च करीत
असतो. मेलवर या दोघींचही खरं प्रेम नसतंच. मेलच्या दुबळ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्या आपापली घरं भरत असतात.
या दोघींना पुरवण्यासाठी पैसा कमी पडत असल्यानंच मेल स्वत:च्या इच्छेविरुद्ध सिस्कोची खाजगी कामगिरी स्वीकारतो. सिस्कोनं एका जपानी अब्जाधिशाच्या मुलीच्या अपहणाचा कट रचलेला असतो.
किको (चायना चाऊ) ही जिरो
निशी (साब शिमोनो) या अब्जाधिशाची मुलगी
पळवून न्यायची आणि दहा लाख डॉलर खंडणी उकळायची, असा हा डाव असतो.
किकोच्या ड्रायव्हरला उडवून मेल आणि मंडळी तिचं अपहरण करतात.
दुर्दैवानं अपहरणाची ही योजना मेल आणि मंडळींवरच उलटते. कारण एका पडेल सिनेमाला अर्थसाह्य करून निशीचं संपूर्ण दिवाळं वाजलेलं असतं
आणि तो मेल-सिस्कोच्या बॉसचा जिगरी दोस्त असतो.
आपल्या टोळीतल्याच कुणीतरी `निमयबाह्य' अपहरण केल्यानं पिसाटलेला बॉस पॅरिस या घरभेद्याचा शोध घेण्याची कामगिरी त्या
घरभेद्यांवरच म्हणजे सिस्कोवरच सोपवतो. खुनशी आणि स्वार्थी सिस्को
सगळा दोष मेलच्या माथी मारून मोकळं होण्याचा डाव आखतो.
दरम्यानच्या काळात मेलला आपली मैत्रीण आणि प्रेयसी यांच्या खऱया भावना उमगलेल्या
असतात. तो किकोच्या प्रेमात पडतो, तीही
त्याच्यावर प्रेम करू लागलेली असते. सिस्कोचा डाव त्याच्यावरच
उलटवण्यात मेल यशस्वी होतो, हे सांगायला नकोच.
`द बिग हिट'ची निर्मितीमूल्यं, दिग्दर्शन
(चे-कर्क वाँग), पटकथा
(बेन रॅम्से), छायांकन (डॅनी नोव्हॅक) आणि सर्व कलाकारांचा जामानिमा `बी ग्रेड' सिनेमाचा आहे. कोणतेही
खास आकर्षण नसताना हा सिनेमा केवळ विनोदाच्या बळावर माफक करमणूक करतो.
मेलनं ठार मारलेल्या माणसाचं प्रेत सहजगत्या घरात आणून टाकणं, चॅन्टेलनं ते फारसं सिरियसली न घेणं आणि किकोच्या ड्रायव्हरच्या खुनातून निर्माण
होणाऱया क्रूर विनोदापासून किकोला घरात लपवताना मेल, पॅम आणि
तिचे आईवडील यांच्यातली लपाछपी, दारू प्यायल्यावर खरं बोलण्याची
खोड असलेल्या पॅमच्या बापाचा दारू मिळू नये यासाठीची मायकेलींची धडपड, असा प्रासंगिक विनोद या सिनेमात घडतो. मेल हा जर्मन कॅथलिक,
पॅम ही ज्यू,चॅन्टेल ही आफ्रिकी, सिस्कोही मिश्रवंशीय आणि किको व निशी हे जपानी... या
सर्वांच्या वंशांवरून चुरचुरीत संवादांमध्ये शाब्दिक कोटय़ा घडतात. दिवाळं वाजल्यावर मोठमोठय़ानं निरोपगीत गात, हातात सुरा
घेऊन हाराकिरी करण्यासाठी सज्ज झालेला निशी आणि त्याच्या आत्महत्येमध्ये व्यत्यय आणणारी
फोनची घणघण भरपूर हशा पिकवते. या विनोदापासून मेलच्या सासऱयाच्या
किळसवाण्या ओकाऱयांपर्यंत हरतऱहेचा विनोद `द बिग हिट'मध्ये आहे.
त्या मानानं ऍक्शनदृश्यांमध्ये हॉलिवुडपटांच्या नेहमीच्या प्रेक्षकाला खास
नवं काही सापडणारा नाही. सर्व नटमंडळी आपापल्या भूमिका ठाकठीक
बजावतात. त्यात सिस्को साकारणारा लोऊ डायमंड फिलिप्स सिस्कोबद्दल
घृणा वाटायला लावतो. नायक मार्क वॉलबर्गला देखणा चेहरा आणि तगडी
शरीरयष्टी लाभली आहे. तो तसा निष्कपट आणि सरळमार्गीही वाटतो.
`द बिग हिट'मध्ये अनपेक्षितपणे मनावर ठसून जातो तो किकोच्या
ड्रायव्हरच्या हत्येचा प्रसंग. मेल, सिस्को
आणि मंडळी आपली गाडी रस्त्याकडेला उभी करून थांबतात. किकोची रोल्ससॉईस
शेजारून जाताना तिचा वेग मंदावतो. किकोला कॉलेजमध्ये `पिकअप' करण्याचं महत्त्वाचं काम सोडून ड्रायव्हर (तोही रोल्सरॉईसचा) केवळ माणुसकीपोटी यांना विचारतो,
गाडी बिघडली का तुमची? उत्तरादाखल त्याच्यावर गोळ्यांचा
वर्षाव होतो आणि देहाची चाळण होते.
माणुसकीला काळिमा फासणारं हे निर्घृण
कृत्य करणाऱयांमधल्या एकाला सिनेमाचा नायक मानून आपल्याला पुढचा सिनेमा पाहावा लागतो.
अमेरिकी समाजजीवनात कदाचित यात काहीच नवं किंवा अस्वस्थ करणारं नसेलही.
पण, भाबडय़ा हिंदी सिनेमांवर पोसलेल्या भारतीय प्रेक्षकाला
मात्र हा `कल्चरल शॉक' अस्वस्थ करून जातो.
No comments:
Post a Comment