Thursday, December 22, 2011

स्मरण खरे; रंजन खोटे (झूठ बोले कौवा काटे)


`झूठ बोले कौवा काटे' हा एक स्वच्छ खुसखुशीत, कौटुंबिक मनोरंजनपर सिनेमा आहे.
 त्यात मारामाऱया नाहीत, आरडा ओरडा नाही, स्त्रीदेहाचं गलिच्छ प्रदर्शन नाही, हिंसा नाही, विनोदाच्या नावाखाली पाचकळपणा नाही, वेडेविंद्रे नाच नाहीत, कर्णकटू संगीतात घोळलेली कंठाळी गाणी नाहीत. थोडक्यात, ज्या घटकांमुळे आजकालचा हिंदी सिनेमा संपूर्ण कुटुंबाला न शरमता एकत्र पाहता येत नाही, त्यातला एकही घटक या सिनेमात नाही. कारण `झूठ बोले...' या वर्षी प्रदर्षित झाला असला तरी `आजकाल'चा सिनेमाच नाही, तो `काल'चा सिनेमा आहे.
 ऋषीकेश मुखर्जीच्या नेतृत्वाखाली प्रामुख्यानं बंगाली दिग्दर्शक ज्या काळात हिंदी सिनेमामध्ये नर्मविनोदातून हास्याची खसखस पिकवीत होते त्या काळाशी `झूठ बोले...'चं नातं आहे. आणखी स्पष्ट सांगायचं तर, उत्पल दत्त आणि अमोल पालेकर ही जोडगोळी उच्च मध्यमवर्गीय संवेदनांच्या चौकटीत जेव्हा निखळ निर्मळ विनोदाची धमाल उडवत होती. त्या काळातला हा सिनेमा आहे.
 त्या काळाच्या घडणीत मोठा वाटा असणारे बुजुर्ग दिग्दर्शक ऋषीकेश मुखर्जी यांनी `झूठ बोले...'च्या रुपानं कालयंत्रच बनवले आहे. आजच्या भडक सिनेमाला विटलेले प्रेक्षक भूतकाळाच्या रम्य सफरीसाठी मोठय़ा अपेक्षेनं या यंत्रात बसतात. यंत्र सुरू होतं... गतकाळाच्या काही सुरेख स्मृतींना हलका उजळा मिळू लागतो आणि अचानक... अर्ध्यातच खड्खड् खट् खट् होऊन यंत्र बंद पडतं.
 ऋषीदांच्या या कालयंत्रातले काही ढोबळ बिघाड चटकन समजतात. एकतसा `गोलमाल'च्याच कथानकावर बेतलेल्या `झूठ बोले...'मध्ये `गोलमाल'च्या पुढे जाणारं काही घडत नाही. आणि अमरीश पुरी आणि अनिल कपूर यांची अभिनयक्षमता वादातीत असली तरी त्यांना (अनुक्रमे) उत्पल दत्त आणि अमोल पालेकर यांची सर नाही. ही तुलना अमरीश-अनिल यांच्यावर अन्याय करणारी असली तरी ती अपरिहार्य ठरते. कारण `झूठ बोले...'च्या कथानकात सतत उत्पल-अमोल जोडीचा संदर्भ रेंगाळत राहतो.
 `झूठ बोले...' मध्ये हरीप्रसाद अभ्यंकर (अमरीश पुरी) हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आपली आजारी पत्नी सावित्री (रिमा) हिच्यासह एका थंड हवेच्या ठिकाणी बंगल्यात राहतोय. किरकोळ उत्पन्नाचं साधन म्हणून आणि सोबत मिळण्याच्या उद्देशानं बंगल्याचा काही भाग सीझनल पर्यटकांना भाडय़ानं देण्याचा निर्णय ते घेतात, तशी जाहिरात देतात.
 शहरात शिकणारी त्यांची मुलगी उर्मिला (जुही चावला) तिथे शंकर शर्मा (अनिल कपूर) या नाटकवेडय़ा सुखवस्तू तरुणाच्या प्रेमात पडली आहे. पण, मुलामुलीचा लग्नाआधी परिचय असणंही वडिलांना खपणार नाही, म्हणून ती चिंतेत आहे. वडिलांच्या जाहिरातीचा आधार घेऊन उर्मिला-शंकर एक नाटक रचतात. शंकरनं उर्मिलाच्या घरात `पेइभग गेस्ट' बनून शिरकाव करायचा, हरीप्रसाद आणि सावित्री यांची मनं जिंकायची आणि मग योग्य वेळी प्रेमप्रकरण जाहीर करून आईवडिलांची संमती मिळवायची.
  योजनेनुसार शंकर उर्मिलाच्या घरात खोटय़ा पत्राच्या आधारे रामानुज शर्मा या खोटय़ा नावानं प्रवेश करतो. सावित्रीला आपला दिवंगत मुलगाच त्याच्यात दिसत असल्यानं तिचं मन जिंकणं कठीण जात नाही. पण कडक हरीप्रसादचं मन जिंकणं मात्र फारच अवघड असतं. ते अधिक अवघड बनवतो एक कावळा. हरीप्रसादशी कोणी खोटं बोललं की हा कावळा कावकाव करतो (अशी निदान हरीप्रसादची समजूत असते.) रामानुज जेव्हा जेव्हा हरीप्रसादचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा कावकाव करून हा कावळा हरीप्रसादच्या मनात रामानुजबद्दल संशय उत्पन्न करतो.
  त्यात हरीप्रसादनं उर्मिलाचं लग्न आपला डॉक्टर मित्र नर्मदाप्रसाद (हरीश पटेल) याच्या लंडन- रिटर्न्ड भाच्याशी, चाणक्यप्रसाद ऊर्फ चंकी (साजिद खान) याच्याशी ठरवलेलं असतं. उर्मिला- शंकर हे चंकीचं मन वळवतात. अभ्यंकर कुटुंबाच्या घरातलाच एक घटक झालेल्या रशीदमामालाही (अनुपम खेर) आपल्या कटात सहभागी करून घेतात. पण, या चौकडीनं रचलेले सगळे बनाव उधळत जातात. हरीप्रसादच्या संशयाला त्यातून सतत बळकटी मिळत जाते. तो रामानुजच्या घरापर्यंत जाऊन पोहोचतो. तिथे त्याचा संशय फिटून रामानुजच्या खोटेपणाबद्दल खात्रीच पटते. भडकलेल्या हरीप्रसादला वस्तुस्थिती सांगून पश्चात्तापदग्ध शंकर चुकांची कबुली देतो, शिक्षा भोगायला तयार होतो. अर्थात हरीप्रसादचं अंत:करण द्रवून प्रेमिकांचं मीलन होतंच सरतेशेवटी.
  या कथानकात हरीप्रसादचा (हे नाव `अभ्यंकर कुलोत्पन्न' वाटत नाही) स्वभाव थेट उत्पल दत्तची आठवण करून देतो. त्याला गंडवण्यासाठी केस चपटे बसवून, सुसभ्य भासवण्याचा शंकरचा प्रयत्न `गोलमाल'च्या रामप्रसादची आठवण करून देतो. (रामानुज हे त्यानं घेतलेलं नावही `राम'धारी.) पण, `झूठ बोले...'च्या सगळ्या गोंधळाचा पाया असलेला तोतयेगिरीचा बनाव फारच भुसभुशीत आहे.
  हरीप्रसादचं मन वळवण्यासाठी शंकरला त्याच्या घरात बनाव रचून शिरकाव करावा लागतो, हे पटतं. पण, त्यासाठी त्यानं नाव बदलण्याचं प्रयोजन काही उमगत नाही. मनच जिंकायचं तर ते खऱया नावानं जिंकण्यात हरकत  काहीच नव्हती.
  कधी ना कधी खरं सांगूनच लग्न करायचं तर अपरिहार्य तेवढाच खोटेपणा करावा; आपली पूर्वीपासून ओळख आहे एवढंच फक्त दडवावं, असा सूज्ञ विचार उर्मिला-शंकर का करत नाहीत, हे समजत नाही.
  सिनेमाच्या शीर्षकात स्थान मिळवलेल्या कावळ्यालाही पटकथेत न्याय मिळालेला नाही. अभ्यंकरांच्या घरात बनवाबनवीचे अनेक प्रकार सुरू असताना तो कावकाव करत नाही. मध्यंतरानंतर तर तो गायबच होतो. सिनेमाचं सूत्र बनू शकली असती अशी एक चमकदार कल्पना पटकथेत वाया गेली आहे. चटपटीत- चुरचुरीत संवाद हे ऋषीदांच्या सिनेमाचं एक बलस्थान. `झूठ बोले...'मध्ये झेड. डी. चारी यांच्या संवादांमध्ये तेवढी गंमत नाही.
  उर्मिला-शंकर यांचं प्रेम कसं जमलं, याचा फ्लॅशबॅक सुरू असताना त्यात एक माथेफिरू कर्नल आणि त्याची गलेलठ्ठ बहीण यांचं एक उपकथानक घडतं. शंकरला पाहून त्या मुलीनं चेकाळणं, त्याच्या गळ्यात पडू पाहणं आणि जमिनींवर कोसळून वगैरे भाग डेव्हिड धवनच्या सिनेमात शोभला असता. हा शारीर व्यंगावर आधारित हिणकस विनोद `झूठ बोले...'च्या अभिरुचीसंपन्न विनोदाला गालबोट लावतो.
  `झूठ बोले...'ची गाणीही कथानकात मुरलेली वाटत नाहीत. श्रेयनामावलीसाठी वापरलेलं श्यामक दावरचं लोकप्रिय शीर्षकगीत, `मामा आय लव्ह यू' हे जुही-अनुपम यांचं गाणं आणि `बडी मुश्किल है' हे गंमतगीत ही गाणी कथानकात चपखल बसतात. पण, `आँखो में अकेली रातों मे,' `चाँद कहूँ, फूल कहूँ,' `दिल ये दिल डरने लगा है' ही प्रेमगीतं मात्र टिपिकल पद्धतीनं चित्रित केल्यामुळं नीरस वाटतात. आनंद बक्षींच्या नजाकतदार शब्दांना आनंद-मिलिंद यांनी अतिशय सुरेल, शांत संगीत दिल्यानं ही गाणी खरंतर खूपच श्रवणीय आहेत. `झूठ बोले...'मध्ये ती प्रेक्षणीय झालेली नाहीत.
  सिनेमाच्या शेवटी शंकरचं बिंग फुटल्यावर हरीप्रसादनं डोक्यात राख घालून घेणं, सावित्रीचा आजार बळावणं, शंकरनं तिची सेवा करणं आणि अखेरीस उर्मिला-शंकरच्या लग्नाला मंजुरी मिळणं, हा कथाभाग हृद्य झाला असला तरी सिनेमाच्या प्रवृत्तीशी विसंगत वाटावा, इतका गंभीर झाला आहे. शिवाय, अशा सिनेमाच्या शेवटी घोळांचा परमोत्कर्ष होऊन वेगवान दृश्यांमधून कळसाध्याय गाठला जातो. `झूठ बोले...'मध्ये घोळांना खील बसून हा भावुक शेवट घडतो तोही बऱयापैकी लांबण लावूनच.
  आजकालच्या सिनेमापेक्षा खूप वेगळं `नॉस्टॅल्जिया' जागवणारं कथानक हा `झूठ बोले...'चा सर्वात महत्त्वाचा `सेलिंग पॉइभट आहे. ऋषीदांनी 77 व्या वर्षात आपल्या पद्धतीनं, फारशा तडजोडी न करता नर्मविनोदाचा शिडकावा करून `झूठ बोले...'ला माफक मनोरंजक बनवले आहे. सर्व कलाकारांकडून त्यांनी अतिशय नैसर्गिक कामे करून घेतली आहेत.
  अमरीश पुरींनी हरीप्रसादचा संशयी स्वभाव आणि कठोर शिस्त उत्तम साकारली आहे. रिमाची आईची प्रेमळ आणि भावुक झाली आहे. अनिल कपूर, शंकर-रामानुजचा घोटाळा सफाईनं साकारतो पण, साधेपणा दाखवताना तो निस्तेजही वाटतो. जुहीची बडबडी, अवखळ, हसरी प्रतिमा ठरीव साच्याची झाली आहे. `झूठ बोले...'मध्ये त्यापलीकडे काही करण्याची संधी मिळालेली नाही. अनुपम खेर, हरपाल, हरीश पटेल, अनंग देसाई, रेणुका इसरानी यांची कामगिरी समाधानकारक. टीव्हीप्रसिद्ध साजिद खान मात्र पदार्पणातच निराशा करतो. त्याचा वावर अवघडलेला वाटतो.
 तांत्रिक अंगांमध्ये जाल मिस्त्राe यांचे छायालेखन सिनेमाला प्रसन्न `लुक' देते आणि ही जुनी कहाणी जुनाट भासू देत नाही.
 `गोलमाल,' `खुबसूरत,' `चुपके चुपके'चे ऋषिदा `झूठ बोले...'मध्ये शोधायचे नाहीत, हे पथ्य पाळायची तयारी असेल तर `झूठ बोले...' पाहा.

No comments:

Post a Comment