Thursday, December 22, 2011

आलामंतर कोलामंतर, गंमत मात्र छू।़।़।़ (सोल्जर)


स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होण्यासाठी फार मोठी आध्यात्मिक साधना करावी लागले म्हणे!
 `टिप्स फिल्म'च्या अब्बास- मस्तान दिग्दर्शित `सोल्जर'नं हे काम सोपं केलंय. आता स्थितप्रज्ञ अवस्थेचा अनुभव घेण्यासाठी खडतर साधना करायला नको. फक्त तिकीट काढायचं आणि `सोल्जर' पाहायचा.
  म्हणजे `सोल्जर' हा बंडल सिनेमा आहे का? तर नाही. मग तो चांगला सिनेमा आहे का? तसंही नाही. तो पाहताना कधी उत्सुकता चाळवते, कधी हास्याचे फवारे उसळतात, कधी दुष्टनिर्दालनाचं स्फुरण चढं; पण संपूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर बाहेर पडताना आपण शून्य परिणाम घेऊन बाहेर पडतो.
 खरंतर `ऍक्शन थ्रिलर' अशी जाहिरात झालेल्या सिनेमाच्या शेवटी प्रेक्षकाला थराराचा कळसाध्याय गाठला गेल्याचं समाधान मिळायला हवं. पण `सोल्जर'च्या शेवटी घटनाक्रमाचा आलेख चढत जात नाही; तो सरळ रेषेत जाऊन एका ठिकाणी संपून जातो.
 इथे `सोल्जर' आहे विकी ऊर्फ राजू (बॉबी देओल) हा सूडानं पेटलेला तरुण. त्याचा लहानपणी त्याच्या लष्करी अधिकारी असलेल्या वडिलांची (पंकज धीर) त्यांच्याच सहकाऱयांनी हत्या केली आहे. लष्कराच्या शस्त्रसामुग्रीचा चोरटा व्यापार करणारे हे खलनायक त्या चोरीचा आळही विकीच्या वडिलांवर ढकलतात. कोर्टमार्शल होऊन त्यांच्या मृतदेहावरून सारी पदके उतरवून घेतली जातात. देशद्रोह्याची पत्नी आणि मुलगा विकी आणि त्याच्या आईची (राखी) संभावना केली जाते.
 विकीच्या वडिलांचा पोलिस मित्र (आशिष विद्यार्थी) त्याला आईकडून घेऊन मुंबईत आणतो. तिथे तो मोठा होऊन सुडाची संधी शोधतो. दरम्यानच्या काळात ऑस्ट्रेलियात जाऊन गडगंज श्रीमंत झालेल्या खलनायकांपैकी प्रतापच्या (सुरेश ओबेरॉय) मुलीला, प्रीतीला (प्रीती झिंटा) तो प्रेमात पाडतो. वीरेंद्रला (दलीप ताहिल) तो त्याचाच मुलगा असल्याचं भासवतो. त्यासाठी त्याच्या परित्यक्ता पत्नीचीही (फरिदा जलाल) मदत घेतो. वीरेंद्र, त्याचा रेम्याडोक्या भाऊ (शरत सक्सेना) त्याचा कार्टून मुलगा (जीतू वर्मा) यांचा काटा काढताना हे आपण प्रतापच्या वतीनं करीत आहोत, असं तो भासवतो.
 या तिघांचा जसवंत (सलीम घौस) हा साथीदार आधीच (तोही विकीकडून) मारला गेला आहे, अशी प्रतापची समजूत असते. त्यामुळे उरलेल्या `डीके' या एकाच साथीदाराची हत्या केली की, सर्व साम्राज्याचा मालक प्रतापच होणार असतो. `डीके'च्या परिपत्यासाठी विकी प्रतापला घेऊन भारतात येतो. तिथे 20 वर्षे एका देवळात आपल्या पतीच्या नावावरील कलंक धुवून निघावा म्हणून तपश्चर्या करीत बसलेल्या आईसमोर नेऊन प्रतापला आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या `डीके'ला जायबंदी करून गिधाडांसाठी जिवंत भक्ष्य बनवून सूड घेऊन मोकळा होतो.
  थ्रिलर असल्यानं ही कथा सिनेमात (अर्थातच) इतक्या सरळसोट पद्धतीनं सांगितली जात नाही. आधी विकीची ओळख होते. `कॉन्ट्रक्ट किलर' म्हणून. तो जसवंतला बंदरात पकडून बेशुद्ध करण्याची गोळी मारतो तेव्हा तो मेलाच प्रेक्षकाला असं भासवण्यात येतं. प्रीतीच्या प्रेमप्रकरणात हा तिलाही मारून टाकणार की काय (कारण `बाजीगर' याच दिग्दर्शद्वयाचा), अशी शंका येत राहते. तो वीरेंद्रचा मुलगा असल्याची बतावणी फरिदा जलालच्या साथीनं करतो, तेव्हा प्रेक्षकालाही `बनवण्या'चा दिग्दर्शकांचा मनोदय स्पष्ट होतो आणि इथल्या सगळ्यात मोठा सस्पेन्स म्हणून गूढ `डीके'ची ओळख. हा सस्पेन्स इतका फुसका की, सिनेमाच्या पहिल्या सीनमध्ये पांढऱया दाढीमिशा लावलेला सलीम घौस `डीके' म्हणून दिसतो तेव्हा प्रेक्षक `डीकेच्या भूमिकेत सलीम घौस' अशी मेंदूत नोंद करतो. पुढे तोच जसवंत बनून दिसतो, तेव्हा रहस्य काही राहातच नाही अशा सुरुवातीलाच उघडय़ा पडलेल्या रहस्याचा शेवटी भेद कसला डोंबलाचा करणार?
  पटकथाकार सचिन भौमिक आणि श्याम गोयल यांनी आणि दिग्दर्शकांनी सिनेमात ठराविक अंतरानं जे धक्के योजले आहेत, ते प्रेक्षकाला बसतच नाहीत, हे `सोल्जर'चं मोठं अपयश आहे. असे अनेक सिनेमे कोळून प्यायलेले प्रेक्षक `शॉकप्रुफ' झालेले आहेत; ते सिनेमा पाहतानाही डोकं वापरतात. त्यामुळे त्यांना खरोखरीच धक्के द्यायचे तर आपणही डोकं वापरायला पाहिजे, हा विचार या चौकडीनं केलेला दिसत नाही. शिवाय संवादांमध्ये `सोल्जर' या शीर्षकाची विकीच्या `सोल्जर'गिरीशी सांगड घालून नाव सार्थ करण्याचा प्रयत्न हास्यास्पद वाटतो.
  एखादा हौशी जादूगार खूप आरडोओरडा, हातवारे वगैरे करून रिकाम्या टोपीतून कबूतर काढणार म्हणून सांगतो. सगळे उत्सुकतेनं पाहात असताना टोपीतून त्याचा हात रिकामाच निघतो. तो पुन्हा सावरून `आता निदान चिमणी तरी काढतोच' म्हणून पुन्हा सगळा साग्रसंगीत अभिनय करतो, पुन्हा काहीच निघत नाही, असा हौशी जादूगाराच्या खेळासारखा `शोल्जर'चा खेळ झाला आहे.
 एक मात्र मानायला हवं की, जादूगाराचे हातवारे लक्षवेधी आणि बऱयापैकी मनोरंजक आहेत. उत्तम लोकेशन्स, खटाखट पार पडणारे प्रसंग, थॉमस झेवियरची चकाचक सिनेमॅटोग्राफी आणि अन्य उत्तम तांत्रिक-निर्मीतीमूल्यं यांच्या जोडीनं अब्बास-मस्तान यांचं कथा मांडण्याचं कौशल्यही सिनेमाला सावरून धरतं. त्यामुळे `सोल्जर'च्या पहिल्या रिळातच पुढची पंधरा रिळं काय घडणार, हे उमगलेला प्रेक्षकही `बोअर' होत नाही. प्रत्येक प्रसंगात त्या-त्या प्रसंगापुरता रस निर्माण करण्यात आणि पुढच्या (अपेक्षित) प्रसंगाची वाट पाहायला लावण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत.
 कलावंतांमध्ये बॉबी देओलच्या अभिनयात लक्षणीय सुधारणा जाणवते; पण त्यामुळेच त्याच्या मर्यादाही अधिक स्पष्ट होतात. प्रीती झिंटाला हसऱया-नाचऱया बाहुलीसारखी. `शो पीस' भूमिका आहे. पण पडद्यावर ती टवटवीत प्रसन्न दिसते आणि एकदम बिनधास्त (`त्या' अर्थानं नव्हे) वावरते. तरुण प्रेक्षकांपैकी अनेकजण तिच्या गालाच्या गोड खळीत हरवून जाण्याची दाट शक्यता आहे. इतर बुजुर्ग मंडळी नेहमीप्रमाणे सफाईदार वावरतात. जॉनी लिव्हरचा कथानकाशी सुतराम संबंध नसलेला जुळ्या भावांचा गोंधळ जॉनीच्या अफलातून अदाकारीमुळं मजा आणतो.
  अनु मलिकनं शीर्षक गीत `मेरे दिल जिगर से गुजरी है', `मेहफिल में बार बार' आणि `तेरा रंग बल्ले बल्ले' ही श्रवणीय गाणी दिली आहेत. मात्र, बहुतेक गाणी (विशेषत: उत्तरार्धातली) ऑस्ट्रेलियाची नेत्रसुखद सैर, एवढाच परिणाम साधतात, कथानकात खीळच घालतात.
 `सोल्जर' काही आवर्जून पाहायची गरज नाही. पण केवळ टाईमपास म्हणून थिएटरमध्ये दाखल झालात तर `सोल्जर'मधून उठून यावंसं वाटणार नाही, एवढं नक्की.

No comments:

Post a Comment