शरद उपाध्ये, दिवंगत लिंडा गुडमन आणि तमाम होराभूषण मंडळींची क्षमा मागून एक `होरा' मांडावासा वाटतो... महेश
भटची रास `मेष' असणार, त्याचा `नवा शेवटचा' सिनेमा `कारतूस' पाहिल्यावर तर खात्रीच वाटते या तर्काबद्दल!
आधी `नवा शेवटचा' ही काय भानगड
आहे ते समजावून घेऊ. गेली काही वर्षे महेश भटच्या प्रत्येक सिनेमाची
जाहिरात त्याचा शेवटचा सिनेमा अशी होते. आणि त्यानंतर पुढचा सिनेमा
येतोच. आता `कारतूस'ही महेशचा श्Zवटचा सिनेमा आहे म्हणतात. आपण त्याला महेशचा `नवा शेवटचा' सिनेमा म्हणावं, म्हणजे `फॅक्च्युअल
मिस्टेक' व्हायची नाही.
आता महेशच्या `मेषलक्षणां' विषयी.
मेष ही राशीचक्रातली पहिली रास असल्यानं माणसाच्या जीवनचक्रातील पहिल्या-
अर्भकावस्थेची लक्षणं या राशीत दिसतात म्हणे! (इतर राशींच्या दृष्टीकोनातून थोडक्यात वर्णन करायचं तर `बालिश')
आता `कारतूस'चं उदाहरण घ्या.
डॉल्बी, डिजिटल, डीटीएस ध्वनीमुद्रणतंत्र
भारतात पोहोचून केव्हाच जुनं झालंय. संगणकीकृत `स्पेशल इफेक्ट्स'ही (विशेष दृक्परिणाम)
काही नवे राहिलेले नाहीत. स्वत: महेशच्या `डय़ुप्लिकेट'मध्ये या
तंत्रचमत्कृतीतूनच शाहरुख खानचा डबल रोल साकारला होता. तरीही
`कारतूस'मध्ये महेशला जणू आधुनिक ध्वनीमुद्रण
तंत्राचा. `स्पेशल इफेक्टस्'चा नव्यानं
शोध लागला असावा किंबहुना जगातच ही तंत्रे प्रथम महेशनं याच सिनेमासाठी शोधून काढली
असावी, अशा अविर्भावात ती सादर करण्यात आली आहेत.
एखादं लहान मूल नवं खेळणं मिळालं की जसं कौतुकानं गावभर मिरवतं, तसं महेश या सिनेमात तंत्रज्ञान `मिरवतो.' म्हणजे या सिनेमाचा एक नायक महाखतरनाक गुन्हेगार आहे म्हटल्यावर त्याची `एंट्री' साध्या पार्श्वभूमीऐवजी धगधगत्या पार्श्वभूमीवर
घडवायची आणि ध्वनीपरिणामांतून तिची धग पोहोचवायची. थरारदृश्यांमध्ये
मुबलक दृक्परिणाम पेरायचे. ही हौस इतकी प्रबळ की `तेरी याद' हे एक अख्खं गाणं संपूर्णपणे `स्पेशल इफेक्टस्'च्या पार्श्वभूमीवर चित्रित झालंय.
केन घोषनं दिग्दर्शित केलेल्या या गाण्यावर निर्मात्यानं एक कोटी रुपये
खर्च केल्याची चर्चा आहे.
तंत्राबद्दलच्या या (मेषपात्री) उत्साहाच्या भरात की काय, पण कथा-पटकथा वगैरे फुटकळ जुनाट बाबींकडे महेशच दुर्लक्ष झालेलं दिसतंय (हल्ली त्याचं हे दुर्लक्ष सततच दिसायचं, यावेळी त्याला
एक कारण मिळालंय इतकंच.) आकाश खुराना आणि रॉबिन भट्ट या पटकथाकारांनी
`निकिता'या फ्रेंच सिनेमावरून उचललेली कथा
मनात फारशी मुरवून न घेता तिचं झटपट भारतीयीकरण करून दिलेलं दिसतं. (चिंतामणी लागूंच्या एका कादंबरीशीही या कथाबीजाचं विलक्षण साम्य आहे.)
भारतात बेकायदा हत्यारं आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱया जगत जोगिया
(गुलशन ग्रोव्हर) या परदेशात दडलेल्या गुन्हेगाराच्या
साम्राज्याविरुद्ध जय सूर्यवंशी (जॅकी श्रॉफ) या पोलिस अधिकाऱयानं दिलेल्या यशस्वी लढय़ाची गोष्ट `कारतूस'मध्ये आहे. जगत जोगियाला परक्या देशामध्ये जाऊन संपवायचं
तर पोलिस खात्यालाही बेकायदा उपाययोजना करावी लागणार, याची खात्री
झालेला जय एक धाडसी मार्ग शोधतो. फाशीची शिक्षा झालेल्या जीत
बलराज (संजय दत्त) या धंदेवाईक गुन्हेगाराला
हत्यार बनवून- `कारतूस' बनवून जगतचा वेध
घेण्याची योजना तो आखतो. फाशीच्या शिक्षेमुळे जगाच्या दृष्टीनं
मरण पावलेल्या जीतच्या हातून जगतचा नि:पात झाला की जय स्वत:च जीतलाही संपवणार असतो.
जीवनाच्या आणि स्वातंत्र्याच्या लालचीनं जीत
हे काम स्वीकारतो. जगतच्या भारतातील साथीदारांचा
खात्मा सुरु करतो. थेट जगतलाच भिडण्यासाठी परदेशात जाताना त्याला
मिनी (मनीषा कोईराला) ही वेंधळी-
बडबडी- निरागस मुलगी भेटते. तिच्या रुपानं त्याच्या राकट आयुष्यात प्रथमच प्रेमाची कोमल भावना फुलते.
मिनीमुळे त्याची जगण्याची ओढ जशी तीव्र होत जाते. तशीच जगण्यासाठी इतरांना मारण्याचं `कर्तव्य'
पार पाडणंही त्याला जड जाऊ लागतं. तो जगतला संपवतोच
पण जय त्याला सोडतो का. या प्रश्नाचं (अपेक्षितच)
उत्तर `कारतूस'च्या कळसाध्यायात
मिळतं.
इंग्रजी सिनेमातच शोभेल असं हे कथाबीज लेखक- दिग्दर्शकांनी
काही काळ मनात घोळवलं असतं तर एक उत्तम थरारपट तयार झाला असता. पण महेशभाऊंना मेषासारखी धडक देण्याची घाई! त्यांनी आधीच
इथे पचायला जड असलेली कल्पना कच्च्या ठेऊन पूर्णपणे अविश्वासार्ह केली आहे.
सिनेमाच्या सुरुवातीला एका स्फोटात मरण पावलेल्या लहान मुलांच्या आईबापांचे
(तद्दन फिल्मी) आक्रोश ऐकून जय सूर्यवंशी
जगत जोगियाला मुळापासून उखडून टाकायला उद्युक्त होतो, हेच तकलादू
वाटतं. जय आणि त्याचे बॉस कमल चोप्रा यांच्यातल्या उपाययोजनाविषयक
चर्चा तर थेट विनोदीच आहेत. आधीचा भाग चुकून न पाहिलेल्या प्रेक्षकाला
तर ही दोन पोलिस अधिकाऱयांऐवजी एक गुंड आणि एक हेडमास्तर यांच्यातलीच चर्चा वाटेल.
जय आणि जीत यांच्या स्वभावरेखाटनात ही गल्लत आणखी पुढे जाते. जय हा कठोर पोलिस अधिकारी असल्यानं तो गुंडासारखा निष्ठुरपणा दाखवतो.
हे चित्रण अनोखं आहे खरं! पण, त्या तुलनेत जयला अगदीच `भिगी बिल्ली' केल्यानं जय हाच खतरनाक गुंड वाटायला लागतो.
आधीच सांगितल्याप्रमाणं जीतचं नाव उच्चारल्याबरोबर पडद्यावर ज्वाळांच्या लोळात,
दाढीमिशांच्या रानटी जंगलात जीतचं दर्शन घडवून दिग्दर्शक एका तंत्रचमत्कृतीपूर्ण
मोंताजवजा फ्लॅशबॅकमधून जीतचा क्रूरपणा दर्शवतो आणि प्रेक्षकाच्या मनात त्याच्याबद्दल
धडकी भरवतो. मात्र, फाशीनंतर जय त्याचं
दाढीमिशांचं जंजाळ उतरवतो तेव्हा त्याचा खुनशीपणाही त्यात अडकून उतरून जातो बहुतेक!
कारण, त्यानंतरचा जीत हा इतका निवळलेला,
प्रेमविव्हळ आणि मऊ बिलबिलित दिसतो की, दिवाळीचा
आपटीबार पायाखाली वाजला तरी घाबरेलसा वाटू लागतो. मग,
त्याच्याकडून जगतसारख्या माफिया सम्राटाचा खात्मा होणं अशक्यप्रायच भासतं.
शिवाय, जीतकडून जगतचा नि:पात इतक्या
साचेबद्ध मार्गांनी होतो की, यासाठी पोलिस खात्याला एवढा आटपिटा
करायची गरज काय होती, असाच प्रश्न पडतो. माफिया डॉन इतक्या हास्यास्पद `संरक्षणा'त राहू लागले तर आपले दोन बिनहत्यारी कॉन्स्टेबलही तमाम दाऊद- मिर्ची वगैरे मंडळींना नुसत्या आवाजाच्या जरबेनं `बकोट'
धरून खेचत आणतील भारतात!
म्हणूनच, सिनेमा बनविण्यासाठी सर्व स्तरांवर असाव्या
लागणाऱया गांभिर्याच्या अभावाचा `कारतूस' हा आदर्श नमुना झाला आहे. एकीकडे एका गाण्यासाठी कोटी
रुपये खर्च केल्याचा बडेजाव मारणाऱया `कारतूस'कारांनी आपल्या सिनेमाची सुरुवात पहावी. एका बागेत खेळणाऱया
मुलांच्या `स्लो मोशन'मधील दृश्यांवरील
श्रेयनामवलीत कोणत्याही एका दृश्याची प्रकाशयोजना- रंगसंगती दुसऱया
दृश्याशी `मॅच' होत नाही. संपूर्ण प्रसंग घडतोय एकाच स्थळी आणि एकाच वेळी!
संजय दत्त- जॅकीमधील काही खटके, मिनी सोबत असताना जीतनं केलेला जगतच्या भावाचा `वध'
असे काही मोजकेप्रसंग वगळता `कारतूस'मध्ये प्रसंगरचना- संवादांची स्पोटक दारू कुठे सापडतच
नाही.
संजय दत्तच्या व्यक्तिरेखाटनातच झालेल्या गोंधळामुळे त्याचा जीत फारसा प्रभावी
ठरत नाही. त्याऊलट, शेवटपर्यंत एका तर्कसंगत
रासवटपणाचं दर्शन घडवणारा जॅकी जबरदस्त वाटतो. मनिषा कोईराला
सहसा अशा सिनेमांमध्ये मद्दड पाटय़ा टाकते. पण, महेशचा सिनेमा असल्यामुळं की काय, तिनं अगदी खुलुन काम
केलंय. ती खऱया अर्थानं सगळ्या रखरखाटातली हिरवळ वाटते.
बाकी मंडळींमध्ये श्री.व सौ. जसपाल भट्टी माफक धमाल करतात.
दिवंगत उत्साद नुसरत फतेह अली खान, बाली सग्गू आणि अनु
मलिक असे तीनतीन संगीतकार असूनही `कारतूस'चं संगीत काही खास जमलेलं नाही. `इश्क का रुतबा'
आणि `हो रब्बा तू ही बता' ही गाणी `आयटेम साँग्ज'सारखी उपरी
चित्रित झाली आहेत. अतिप्रसिद्ध `तेरी याद'
मध्ये अगम्य दृश्यांच्या पार्श्वभूमीवर उघडाबंब नाचत नायक विरहाची वेदना
एमटीव्ही स्टायलीत सादर करतो. आधीच्या प्रसंगांमध्ये ही वेदना
एमटीव्ही स्टायलीत सादर करतो. आधीच्या प्रसंगांमध्ये ही वेदना
टोकदार होण्याजोगं काही घडत नाही, ते सोडाच!
`कारतूस' हा महेश भटचा खरोखरीच शेवटचा सिनेमा ठरो,
म्हणजे प्रेक्षकांच्या राशीला लागलेली एक साडेसाती सरेल.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment