Monday, December 26, 2011

हेही तेही बरोबर (डोली सजा के रखना)


 
 एका `निष्पक्षपाती' न्यायाधिशाची ही गोष्ट.
 त्यांच्यासमोर खुनाचा खटला सुरू होता. सरकारी वकिलांनी आवेशपूर्ण युक्तिवाद केला... `आरोपीनं अत्यंत थंडपणे, निर्घृणपणे ही हत्या केली आहे... अशा नरराक्षसांना फासावरच लटकावलं पाहिजे...'
  न्यायाधीश भारावून म्हणाले... `बरोबर आहे.'
 आरोपीच्या वकिलानं भावनेला हात घालणारा युक्तिवाद करताना आरोपीचं कोवळं वय, त्याची सज्जन पार्श्वभूमी, स्वसंरक्षणासाठी नाईलाजानं करावा लागलेला खून अशी रचना करून `या कोवळ्या मुलाला सुधारण्याची एक संधी द्यायलाच हवी', असं प्रतिपादनं केलं.
  न्यायाधीश डोळे टिपत म्हणाले... `बरोबर आहे.'
 कामकाज ऐकत बसलेला तिसरा वकील चक्रावला. तो म्हणाला, `मिलॉर्ड, असं काय करताहात आपण? सरकारी वकिलांचं म्हणणंही बरोबर आहे म्हणता आणि आरोपीच्या वकिलांचंही. हे न्यायदानाच्या दृष्टीनं गैर आहे.'
  न्यायाधीश लगेच उत्तरले, `बरोबर आहे तुमचंही!'
....................................
 `डोली सजा के रखना' दिग्दर्शित करताना प्रियदर्शनची स्थिती काहीशी या न्यायाधिशांसारखी झालेली दिसते. नेहमीच्या प्रेमपटांपेक्षा `डोली...'ची कथा वेगळी आहे. इथे प्रेमिक जगाला धुडकावून प्रेमाची सफल फलश्रुती करण्याऐवजी आपपल्या कुटुंबियांच्या सुखासाठी प्रेमाचा त्याग करून घरी परततात. घरच्यांच्या `मर्जी'नंच. तरुणांनी प्रेमाच्या आवेगात वाहावून जाऊन कुटुंबियांना दु:खी करु नये, असा `निकाल'वजा संदेशही प्रियदर्शननं दिलाय. त्यानं सिनेमातून कोणता संदेश द्यावा, हा त्याचा प्रश्न आहे. पण, तो देताना किमान एका बाजूचा युक्तिवाद प्रबळ व्हायला हवा होता. `डोली...'मध्ये प्रेमिकांचं प्रेमही `बरोबर' आहे, घरच्यांचा विरोधही `बरोबर' आहे. इथे सिनेमाचा तोल ढळतो.
 ही कथा आहे सधन घरांमधल्या इंदर आणि पल्लवीची. इंदर (अक्षय खन्ना) कॉलेजच्या लायब्ररीत पल्लवीला (ज्योतिका सढाणा) पाहतो, प्रथमदर्शनीच प्रेमात पडतो. तिचा प्रतिसाद जाणून घेण्याआधीच आपलं प्रेम जाहीर करून तिच्या तीन भावांचा (परेश रावळ, तेज सप्रू, मोहनीश बहल) वेळोवेळी मार खात राहतो.
 इंदरचा सत्शील स्वभाव, प्रेमाकडे पाहण्याचा निरोगी दृष्टीकोन आणि त्याच्या प्रेमाचा सच्चेपणा यांचा पल्लवीवर अनुकूल परिणाम होतो. तीही त्याच्या प्रेमात पडते. आधी एकमेकांना समजून घेऊयात आणि योग्य वेळी कुटुंबियांना सांगून गरज पडल्यास त्यांची मनं वळवूयात, असा व्यवहारी आणि सुजाण निर्णय ते घेतात. दुर्दैवानं, त्यांचं प्रेमप्रकरण पल्लवीच्या भावांना वेळेआधीच समजतं. पल्लवीला इंदरबरोबर पलायन करावं लागतं.
 इंदरचे आईवडील (अनुपम खेर, मौसमी चटर्जी) मुलीच्या कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध तिला सून म्हणून स्वीकारायला राजी होत नाहीत. इंदरच्या रक्ताला तहानलेल्या पल्लवीच्या भावांपासून दूर जाण्यासाठी ते पीटर (निनाद कामत) या मित्राकडे गोव्यात जातात. तिथे त्यांच्या रजिस्टर्ड लग्नाची तयारीही होते.  
 त्याचवेळी, त्यांच्या लक्षात येतं की कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न करून, त्यांना दु:खी करून आपण सुखी होणार नाही. समजूतदारपणे ते एकमेकांपासून अगल होऊन आपापल्या घरी परततात.
  पल्लवीच्या लग्नाची तयारी सुरू असताना इंदर तिची सोन्याची चेन परत देण्यासाठी आईवडिलांसह तिच्या घरी जातो. संघर्षाचा मुद्दाच न उरल्यानं त्यांचं उत्तम स्वागत होतं. अचानक दोन्ही घरातल्यांना साक्षात्कार होतो, की ही जोडी काही वाईट नाही आणि मुलंही किती चांगली आहेत. झाला शेवट गोड!
  मुलांनी आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन प्रेमलग्नाचा निर्णय घ्यावा, असा `डोली...'चा संदेश. पण, सिनेमात इंदर-पल्लवी कुठेही अपरिपक्वपणा करत नाहीत. त्यांचं पलायनही परिस्थितीमुळं (तेही पल्लवीच्या `मोठय़ा' भावांच्या आडमुठेपणामुळं) घडून येतं. म्हणजे ते `दोषी' नाहीत.
  मग, सतत आक्रस्ताळेपणा करणारे पल्लवीचे भाऊ दोषी ठरायला हवेत. पल्लवीला ते घराची `रोशनी, बहार' म्हणतात. ती कधीच चूक करणार नाही, असा विश्वास वारंवार साभिमान व्यक्त करत राहतात. तरीही, तिचं इंदरवरचं प्रेम मात्र समजून घेऊ शकत नाहीत. कारण सोप्पंय. पल्लवीनं `स्वतंत्र'पणे कुठलाही निर्णय न घेणं, हेच त्यांच्या दृष्टीनं तिच्या चांगुलपणाचं एकमेव लक्षण आहे. ती स्वतंत्रपणे, आपल्याला न विचारता प्रेमात पडते, हेच त्यांना खपत नाही. हे बहिणीवर `मालकीहक्क' गाजवणारं त्यांचं आततायी, आत्मकेंद्रित प्रेमच `डोली...'मधल्या `फसाद की जड' आहे, हे प्रेक्षकाला उमगतं, पण दिग्दर्शक काही तसं म्हणत नाही. तो पल्लवीच्या भावांचं तिच्यावरचं बालिश प्रेम कसं गहिरं आहे, हेच स्पष्ट करायचा तोकडा प्रयत्न करत राहतो.
  किंचित लांबलेला तरीही शांततेतून परिणामकारक होणारा शेवटचा प्रसंग वगळता तर `डोली...'मध्ये कुठलाही भाग प्रभावी होत नाही. कॉलेजमधले सुरुवातीचे प्रसंग, `तारारमपम' हे झकास गाणं, पल्लवी इंदरच्या भेटी, त्यांना समवयस्क मित्रांकडून मिळणारे प्रेमाचे `धडे', असे काही प्रसंग तुकडय़ातुकडय़ांमध्ये बरे वाटतात. पण, सिनेमाच्या मुळ सूत्राला पुढे नेईल, असं त्यांत काही घडत नाही. त्यामुळे, दृश्यांचा वेग भरपूर आणि कथानक मात्र जिथल्या तिथे, असा प्रकार पूर्वार्धात घडतो.
  सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक फाजिल यांच्या मूळ चमकदार कथाबीजावर पटकथा आणि संवाद रचणाऱया नीरज व्होराकडे या फसगतीचं अपश्रेय जावं. अनेकदा त्याची पात्रं त्याच-त्याच भावना व्यक्त करणारे तेच तेच संवाद बोलत राहतात. निनाद कामत आणि अमरिश पुरी हे गोवेकर ख्रिश्नच बापलेक नको इतकं बोलतात.
  प्रियदर्शनचा सिनेमा असल्यानं तांत्रिक अंग चकाचक आहेत. .आर. रहमाननं `तारारमपम', `किस्सा हम लिखेंगे', `बोल सजनी' ही गाणी श्रवणीय केली आहेत. पण, ती पूर्वी ऐकल्यासारखी वाटत राहतात. एरवी शुद्ध हिंदीत बोलणारे नायक-नायिका मेहबूब यांच्या गाण्यांमध्ये यमकं जुळवण्यासाठी `उर्दूप्रचुर' गाऊ लागतात. नायिका तर `बचा ले खुदा- ओ मेरे खुदा' असं गाताना टेंपररी धर्मांतरही करते.
  अक्षय खन्नाचा कमालीचा सहज वावर इंदरच्या व्यक्तिमत्त्वाला गोडवा आणि `डिग्निटी' देतो. `स्टार'पण दाखवणारे `स्टायलिश' कपडे, अविर्भाव, शैली यातल्या कशाचाही आहारी न जाता हा तरुण अभिनेता इंदरला इंदरसारखाच पेश करतो, ही प्रगल्भतेची साक्ष मानायला हवी. ज्योतिका सढाणाकडे सध्याच्या `चलनी' सौंदर्याचे गुणविशेष नाहीत. ती सर्वसामान्य मुलींसारखीच साधी-सरळ आणि निरागस दिसते... थोडीशी स्थूलही. पण, पल्लवीचा स्वभाव तिच्या चेहऱयातून थेट पोहोचतो. शेवटच्या प्रसंगातील तिचं भावदर्शनही अभिनयक्षमतेची चुणूक दाखवतो. प्रमुख जोडीइतकाच लक्षात राहतो तो निनाद कामतचा पीटर. लेखकानं गोव्याचा `ऍक्सेंट' म्हणून त्याला मुंबईच्या टपोरी हिंदीत बोलायला लावलयं. ते खटकलं तरीही तो पडद्यावर नैसर्गिक सहजतेनं वावरून लेखकाला सावरून घेतो. तो आणि सुरेश मेनन. उमेश शुक्ला ही मित्रकंपनी `डोली...'ला तरुणाईचा टवटवीत स्पर्श देतात.
  या तरुणांसाठी () पाहायचा ठरवला तरच `डोली...' पाहा. तो पाहून तुम्ही `चांगल्या कथा कल्पनेला न्याय नाही दिला दिग्दर्शकानं' असं म्हणालात तरी `बरोबर आहे तुमचंही' असं म्हणण्यावाचून प्रियदर्शनकडे पर्याय नाही.

No comments:

Post a Comment