Thursday, December 29, 2011

ना धग, ना आग... नुसतीच राख! (अंगारे)


एखादा सिनेमा किती चुकीच्या वेळी यावा? अगदी ठरवूनही `अंगारे'च्या रिलीजइतका वाईट मुहूर्त मिळवता येणार नाही.
   हा सिनेमा `ऍक्शन' आणि `इमोशन'ची सांगड घालून पाहणारा. हेच करणारा `गुलाम' नुकताच रिलीज होऊन धो धो गल्ला गोळा करून गेलाय.
  `अंगारे'ची पार्श्वभूमी गँगवॉरची. तीच चित्रित करणारा `सत्या' हा `ऑफबीट' असूनही देशभर प्रचंड यशस्वी झालाय आणि `सत्या' पाहिल्यानंतर `अंगारे' पाहणं म्हणजे खऱयाखुऱया भायलोकांनी एखाद्याचा `गेम' केलेला पाहिल्यानंतर गल्लीत गोटय़ा खेळणाऱया पोरांमधली हमरीतुमरी पाहण्यासारखं आहे... एकदम पिळपिळीत.
  गँगवॉरवरच्या सिनेमांमधला `सत्या' हा काही अंतिम शब्द नाही. यापुढे त्याहून प्रत्ययकारी सिनेमा कुणी काढू शकेलही. पण `अंगारे' तसा नाही; कारण, महेश भटची विचारपद्धती पूर्णपणे फिल्मी आहे.
  एकेकाळी स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरंगांमध्ये डोकावून त्यातून अफलातून चिजा काढून मनोव्यापारांची उलथापालथ दाखविणारे सिनेमे या दिग्दर्शकानं दिले आहेत. पण, हल्ली तो ईझीचेअर विचारवंतांसारखा `ईझीचेअर दिग्दर्शक' झालाय. सिनेमा बनवण्यासाठी तो इकडेतिकडे किंवा स्वत:च्या आतही डोकावत नाही. तो इतर तयार सिनेमेच पाहतो. (तेही बहुधा इतरांचे नव्हे तर स्वत:चेच.) त्यामुळे, `अंगारे'मध्ये सगळी फिल्मी माणसं भेटतात. गँगस्टर, त्यांच्या मारामाऱया, गरीब वस्ती, तिच्यातले लोक आणि त्यांची दु:खं... सगळी तद्दन फिल्मी.
  रॉबिन भट आणि जावेद सिद्दीकी या `ईझीचेअर लेखकां'नी ही मुंबईच्या बदनाम गल्ल्यांमधल्या माणसांची गोष्ट घरबसल्या लिहिली आहे. अक्षयकुमार, नागार्जुन असे (शरीरानं) तगडे नट आणि पूजा भट, सोनाली बेंद्रे या ग्लॅमरस नटय़ांना `गरीब' बनवून स्टुडिओतल्या झोपडपट्टीच्या सेटवर महेश भट पद्धतींचा वेगळा `दिसणारा' खलनायक, त्याचा विचित्र विक्षिप्त घर- कम - अड्डाही आहेच.
  एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर लहानपण घालवलेला अनाथ अमर (अक्षयकुमार) बंगलोरमध्ये पोलिस इन्स्पेक्टर बनतो. मुंबईत बडय़ा मंडळींचा पैशासाठी खात्मा करणाऱया टोळीचा बिमोड करण्यासाठी त्याची खास नेमणूक करण्यात येते. तो इन्स्पेक्टर असल्याचं लपवून या अंडरवर्ल्डच्या काळ्या दुनियेत शिरकाव करतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की हे सगळे त्याचे बालपणीचे जीवश्चकंठश्च मित्रच आहेत. त्यातला राजा (नागार्जुन) हा तर त्याचा जिगरी यार. सूर्या (इरफान कमाल) आणि जग्गूभाई (परेश रावळ) हे मित्र आणि राजाही लाला (गुलशन ग्रोव्हर) या बडय़ा भाईसाठी काम करताहेत. सूर्याची बहीण पूजा (पूजा भट) ही अमरची बालपणापासूनची प्रेयसीही त्याला भेटते.
  अमर आपल्या मित्रांना या काळ्या धंद्यांमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू करतो. पोलिस कमिशनरना तो सांगतो, की ही फक्त प्यादी आहेत. ही विषवल्ली नष्ट करायची असेल, तर फक्त फांद्या मोडून चालणार नाही, मुळावर म्हणजे लालावर धाव घालायला हवा. पुढच्या घटनाक्रमात लालाला अमरचा संशय येऊ लागतो. लालाने आखलेले काही `गेम' फसतात. त्यातून लाला सूर्याची हत्या घडवून आणतो. अखेरीस लालाला संपवून अमर आपल्या उरलेल्या मित्रांना कसा वाचवतो, याची ही गोष्ट.
 गोष्टीत कसलंही नावीन्य नाही आणि दमही नाही. तच गत पटकथेची- संवादांची आणि दिग्दर्शनाची. महेश भटचं त्याच्या शैलीतलं गुन्हेगारी विश्वाचं चित्रण `नाम', `सडक', `सर'च्या काळात वेगळेपणामुळे लक्षवेधी ठरलं होतं. पण, पुढे प्रेक्षक मोठे झाले. गुन्हेगारांच्या पद्धती बदलल्या. भटभाऊ मात्र होते तिथेच (म्हणजे मागे) राहिलेले दिसतात. त्यांचय सिनेमातला `डॉन' अजूनही लांब केस, कपाळाला टिळा, चेहऱयावर विक्षिप्त भाव आणि विचित्र काळे कपडे घालून वावरतो.
  अक्षयकुमारचे जबरदस्त स्टंटसीन आणि संयत अभिनय वगळता `अंगारे'मध्ये कसलीच धग नाही. बहुमजली इमारतीवरून उडी, गच्चीच्या कठडय़ावरून पळत जाऊन घेतलेली झेप, धावत्या मोटीरी, डबलडेकरवर उभे राहणे, असे डेरिंगबाज स्टंटसीन अक्षयकुमारनं स्वत: (डुप्लिकेट न वापरता) केलेले दिसतात. त्याहीपेक्षा त्याच्या भावदर्शनात आणि संवादोच्चारातही कमालीची सुधारणा जाणवते. इतर मंडळींमध्ये चक्क सोनाली बेंद्रे भाव मारून जाते. नागार्जुनच्या प्रेयसीच्या भूमिकेत तिनं ठसकेबाज अदाकारी दाखवली आहे.
  आदेश श्रीवास्तव, अनु मलिक आणि राजू सिंग या तीन संगीतकारांनी मिळून `तनहा, तनहा', `ओ मेहेरबाँ' आणि `आंदे आंदे आंदे 'ही तीनच बरी गाणी दिली आहेत. समीर आर्यसारख्या गुणी छायालेखकाकडून घिसीपिटी कामगिरी करवून घेण्यात भटसाहेब यशस्वी झाले आहेत.
  भटसाहेबांनी लवकरच दिग्दर्शनातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय म्हणे! हा निर्णय (खूपच उशिरा घेतला असला तरी) किती स्तुत्य आहे, ते `अंगारे' पाहिल्यावर पटतं.

No comments:

Post a Comment