ग्लॅमरच्या जगातील श्रेष्ठ छायाचित्रकार ही गौतम राजाध्यक्ष यांची मुख्य ओळख असली, तरी
त्यांच्या अभिजात आस्वादक व्यक्तिमत्त्वाचा तो एक छोटासा पैलू होता. गौतम
यांच्या सखोल मर्मग्राही वृत्तीचे प्रतिबिंब त्यांच्या छायाचित्रणातही पडले
होते. जाहिरात विश्वात छायाचित्रकार म्हणून सुखाची कारकीर्द घडत असताना
चित्रपट कलावंतांची छायाचित्रे काढण्याची ऑफर गौतम यांनी आव्हान म्हणून
स्वीकारली, तो चित्रपट कलावंतांच्या दैवतीकरणाचा
काळ होता. या छायाचित्रकाराने फिल्मी सिता-यांच्या ग्लॅमरआड
जाणता-अजाणता झाकले जाणारे माणूसपण टिपले आणि ग्लॅमर फोटोग्राफीला
नेत्रसुखद आकर्षकतेच्या पलीकडे काही परिमाण असू शकते, याचा
हिंदी चित्रपटसृष्टीला साक्षात्कार झाला. हे काम सोपे नव्हते. तत्कालीन
चित्रपट कलावंतांना त्यांच्या खऱ्या-खोटय़ा सौंदर्याचे दर्शन घडविणा-या
ठोकळेबाज छायाचित्रांची सवय झाली होती. असे ‘कँडिड’ क्षण टिपण्यातील गंमत त्यांना समजावून सांगणे, पडद्याबाहेरही सुरू असलेल्या ‘अभिनया’तून नेमका क्षण टिपणे, हे काम गौतम यांनी चिकाटीने केले आणि अनेक कलावंताच्या लखलखीत भावमुद्रांचा चिरंतन ठेवा उभा केला. त्याला गौतम यांच्या प्रवाही, मिश्कील
लेखणीतून उतरलेल्या नेमक्या मजकुराची जोड असायची. चलतचित्रण करणा-या
कॅमे-यासमोर अभिनयातून हवी ती व्यक्तिरेखा उभी करणा-या अमिताभ बच्चनसारख्या
महानायकालाही स्थिरचित्रण करणा-या कॅमे-यासमोर बुजायला होते. अनेक नामवंत
कलावंतांना स्थिरचित्रण ही आफत वाटते. अशा कलावंतांशी बोलून त्यांना मोकळे
करण्याची विलक्षण हातोटी गौतम यांच्याकडे होती. कलावंतांबद्दलचा अकृत्रिम
जिव्हाळा आणि चित्रपट कला, छायाचित्रण, चित्रकला, संगीत- विशेषत: पाश्चात्य
संगीत आणि ऑपेरापासून स्वयंपाकापर्यंत अनेक विषयांमधील गौतम यांचा स्तिमित
करणारा व्यासंग त्यासाठी उपयोगी पडायचा. त्यामुळेच काम झाले की पाठ
फिरवणा-या चित्रपटसृष्टीत गौतम यांनी जिव्हाळय़ाची नाती जोडली. लता मंगेशकर, आशा भोसले, नूतन, तनुजा यांसारख्या ‘ताई’, शबाना आझमी, रेखा, डिंपल यांच्यासारख्या मैत्रिणी आणि काजोल, माधुरी दीक्षित, सलमान खान अशी ‘मुलेमुली’ यांचे एक भलेथोरले कुटुंब या एकटय़ा माणसाभोवती गोळा झाले होते. चित्रपट कलेच्या आस्वादनाचे प्राथमिक धडे देणा-या ‘चंदेरी’ या नियतकालिकाच्या संपादनातून त्यांनी रसिकांचेही असेच एक कुटुंब निर्माण केले होते. ‘चंदेरी’ बंद झाल्यानंतरही त्यांचा वारसा घेऊन चित्रपट अभ्यासकांची एक पिढी निर्माण झाली. गौतम यांच्या अकाली ‘एक्झिट’ने हे सारे कुटुंब पोरके झाले आहे.
(प्रहार, १४ सप्टेंबर २०११)
(प्रहार, १४ सप्टेंबर २०११)
No comments:
Post a Comment