Tuesday, June 28, 2011

फक्त पाहा! (नगमा)

ती ' आर्ट ऑफ लिव्हिंग ' ची शिक्षिका आहे...

...
पण , हे फारसं कुणाला ठाऊक नाही

...
हिंदीतल्या टॉपच्या नट्यांना दहा लाख रुपये मिळण्याची मारामार होती , तेव्हा तामिळ आणि तेलुगू सिनेमात ती वाजवून 20 लाख घेत होती...

...
तेही फारसं कुणाला ठाऊक नाही...

...
ती काँग्रेसची कार्यकतीर् आहे... सोनिया गांधींवर निष्ठा असलेली आणि राहुल गांधींमध्ये ' भावी पंतप्रधान ' पाहणारी... ' पक्की काँग्रेसवाली '. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये खासदारकीचं तिकीट मिळाल्यात जमा होतं तिला...

...
पण , ते आताशा कुणाच्या लक्षात नाही...

...
एका आगामी थ्री डी अॅनिमेशन फिल्मची ती दिग्दशिर्का आहे!... ' श्रेक ' आणि ' अँट्झ ' च्या पद्धतीचं अॅनिमेशन असलेला हा सिनेमा भारतातला या प्रकारचा पहिला बालचित्रपट ठरू शकेल...

...
हे तर अगदीच कुणाला ठाऊक नाही...

...
पण , ती... ती सर्वांना ठाऊक आहे...
 

... अधूनमधून ती सार्वजनिक विस्मरणात जाते , पण पुन्हा परततेच...

...
काल तिनं पब्लिक मेमरीमध्ये ' पुनरागमन ' केलं होतं ते सौरव गांगुलीची गुप्त गर्लफ्रेंड म्हणून...


...
आज तिनं पुनरागमन केलंय , ते दाऊद इब्राहीमच्या भावाची , अनीस इब्राहीमची ' पगारी मैत्रीण ' असल्याच्या बातमीतून...

...
गेल्या वर्षी निवडणुकांच्या धामधुमीत ती दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात गेली होती , अंबिका सोनींना भेटायला. दिल्लीला फिल्मवाल्यांचं जाम फॅसिनेशन. भेटीनंतर बाहेर पडलेल्या नगमाभोवती पत्रकारांचा गराडा पडला. तिनं त्यांच्याआधी आपणच पहिला प्रश्ान् विचारला आणि सर्वांची विकेट काढली (पाहा , क्रिकेटवीरांच्या संगतीचा गुण कसा लागतो!) तिनं विचारलं , ' तुम्ही सगळे मला भेटायला आला आहात की मला पाहायला ?...'

...
त्यांनी तिला काय उत्तर दिलं ठाऊक नाही , पण नगमाच्या प्रश्ानचं प्रामाणिक उत्तर ' पाहायला ' असंच आहे. कारण ती आहेच ' फक्त पाहा ' वर्गातली. तेही स्त्रीसौंदर्याबाबत विशिष्ट ' टेस्ट ' च्या मंडळींसाठीच. त्यापलीकडे तिची कोणी दखल घ्यावी , असं तिनं काही केलंच नाही कधी!
 
 
नम्रता सढाणा ऊर्फ नगमा हिचं पंधराएक वर्षांपूवीर् सलमान खानबरोबर ' बागी ' मधून पदार्पण झालं. जरा वेगळ्या कथानकाचा हा सिनेमा ( कथा स्वत: सलमान खाननं लिहिलेली होती) बेतास बात चालला , पण आनंद- मिलिंदची गाणी बेफाम गाजली (चाँदनी रात है , तू मेरे साथ है/ कैसा लगता है , अच्छा लगता है/ टप टप टपोरी). पण नगमा ही हिंदी सिनेमाची नव्हे , तर ' मदासी ' सिनेमाची हिरोइन आहे , हे या सिनेमातच स्पष्ट झालं होतं. पिटुकल्या सलमानपुढे ही धिप्पाड हिरोइन ' मनात येईल तर कडेवर उचलून घेईल हिरोला ' अशी दिसली होती... आणि तो काळ कडेवर उचलून घेण्यासारख्याच नायकांचा असल्यामुळे अखेर नगमाने , तिला कडेवर उचलून घेण्याइतकी शारीरिक- मानसिक ताकद असलेल्या नायकांच्या प्रांताकडे , दक्षिणेकडे कूच केली... तत्पूवीर् तिनं हिंदी सिनेमात जम बसवण्याचा प्रयत्न केला , पण तिच्या वाट्याला बेवफा से वफा (नायक : विवेक मुश्रन) , कौन रोकेगा मुझे ( गोविंदा) , दिलवाले कभी ना हारे (राहुल रॉय) , पुलिस और मुजरिम (विनोद खन्ना) , यलगार (संजय दत्त) , हस्ती ( जॅकी श्ाॉफ) असले काही फुटकळ सिनेमे आले...

मददेशात मात्र या आक्रमक आणि उग्र तांेडवळ्याच्या भरभक्कम सुंदरीचं जोरदार स्वागत झालं. प्रभुदेवाबरोबरच्या शंकर दिग्दशिर्त ' कादलन ' मुळे ती रातोरात तिकडची सुपरअॅक्ट्रेस झाली... तिचं मंदिरबिंदिर बांधलं जाण्याइतपत. हाच सिनेमा हिंदीत डब होऊन ' हम से है मुकाबला ' नावाने जोरात चालला. (आठवा , ' मुक्काला मुकाबला '). रजनीकांतबरोबरचा ' माणिक बाश्शा ' ही बेदम चालला. मग नगमा सुटलीच.
 

रुटीन दक्षिणी सिनेमांमध्ये नायिकेला फार महान काम नसतं. आधी नायकाशी जरा वाह्यात , चावट वगैरे पद्धतीनं ' इंट्रोडक्शन ', आधी भरपूर नखरे करून नायकांमार्फत वठणीवर येणे , यादरम्यान काही ढांगचिक गाणी , मग सिनेमात लग्नबिग्न झालंच , तर सुहागरात वगैरेचं घसटयुक्त गाणं , त्यात पावसात चिंब होणे , नंतर क्लायमॅक्सला खलनायकाच्या बलात्कारातून नायकानं सुटका करेपर्यंत वेगवेगळ्या अँगल्सनी भरपूर ' धडपड ' करणे , नायक- खलनायकाच्या हाणामारीत नायकाच्या बाजूने टाळ्या पिटणे , बास! या नायिकांनी शरीराने ' बोलणे ' अपेक्षित असते , ते नगमा करत गेली... चेहऱ्यावरची रेष न हलवता... इतक्या वर्षांच्या कारकिदीर्ला तिनं स्वत:वर अभिनयाचा तीळभरही बट्टा लागू दिला नाही , हे केवढं मोठं यश!
 

तिकडे दक्षिणेत वेगवेगळ्या नायकांबरोबर तिचं नाव जोडलं जायचंच. ते तेवढ्यापुरतं राहायचं. साक्षात सौरव गांगुलीबरोबर नाव जोडलं गेल्यावर मात्र ती एकदम प्रकाशात आली. सौरवचं केविलवाणं ' रनिंग बिट्वीन द विकेट ' पाहून , तो डोना आणि नगमा यांच्यामध्ये धावत असल्यासारखा धावतोय , अशी खास ऑस्ट्रेलियन कॉमेंटही पदरात पडली होती त्याच्या. पण भारतीय सिनेमात जे घडतं तेच या भारतीय लग्नातही घडलं. सौरव नगमाला साफ नाकारून डोनाचाच राहिला. ' सौरव आणि डोनाच्या संसारात सगळं काही आलबेलच होतं , तर तो माझ्याकडे कशाला आला होता ?' असं तळतळण्यापलीकडे नगमा काही करू शकली नाही...

मधल्या काळात ' गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा ' ( सुहाग) म्हणत अधूनमधून ती हिंदी पडद्यावर येऊन जायची , पण अगदीच बेदखल. सौरव प्रकरणानंतर ती पाच वर्षं भरकटल्यासारखी भिरभिरली. त्यात तिचा साउथमधला शेर संपल्यात जमा झाला. हिंदीत तर ती कायम परकीच होती.

आता म्हणे बक्कळ पैसे घेऊन तिनं तेलुगूत चक्क ' ज्युनियर एनटीआर ' च्या आईची भूमिका स्वीकारलीये. ' अब तुम्हारे हवाले वतन साथियो ' मध्ये तिनं बॉबी देओलच्या आईचं काम केलं आहेच. (चला आता तमाम नायकांना गाजर का हलवा खाऊन ' माँ ' म्हणून गळ्यात पडायला सुयोग्य आई लाभणार!)

ही तिची दुसरी इनिंग सुरू होत असतानाचा वादंगांचीही दुसरी इनिंग सुरू झाली आहे. अनीसनं तिला पाठवलेले 10 लाख रुपये स्वहस्ते पोहोचवल्याचा दावा करणाऱ्या गुंडानंच हा गौप्यस्फोट केलाय...
  

... हिंदी सिनेमातल्या नट्या आणि दुबई यांचा ' नातेसंबंध ' फार पुरातन आणि गहिरा आहे... एका बाजूने सक्तीचा आणि चंगळीचाही!

...
आणि मुळात सिनेमात , ' फक्त पाहा ' वर्गातच राहणं जाणीवपूर्वक स्वीकारल्यावर नगमाच्या नशिबी वेगळं काय येणार होतं






(महाराष्ट्र टाइम्स)



No comments:

Post a Comment