इसवी सन 1893 चा मे महिना...
...दक्षिण आफ्रिकेतल्या दरबानहून बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी प्रिटोरियाला रेल्वेने निघाले होते. कडक सुटाबुटातल्या बॅ. गांधीकडे प्रथम वर्गाचे तिकीट होते. पण, ब्रिटिश अमलाखालील द. आफ्रिकेतल्या गोऱयांच्या लेखी ना त्यांच्या बॅरिस्टरकीला काही किंमत होती, ना त्यांच्याकडच्या प्रथम वर्गाच्या तिकिटाला. त्यांच्या डब्यातून प्रवास करणाऱया एका गोऱया प्रवाशाने, `त्याच्या' डब्यात एका `कूली' प्रवाशाच्या उपस्थितीला तीव्र हरकत घेतली आणि रात्रीच्या वेळी, नाताळची राजधानी असलेल्या पीटरमारित्झबर्गच्या स्थानकावर बॅ.गांधीना त्या डब्यातून धक्के मारून बाहेर काढण्यात आले. वर्णभेदामुळे मिळालेल्या या वागणुकीने खिन्न आणि विद्ध झालेल्या बॅ.गांधींनी सारी रात्र त्या स्थानकावर कुडकुडत काढली.
स्थानकावर वेळ घालविण्यासाठी आणि झालेल्या अपमानाच्या आठवणींमधून विरंगुळ्यासाठी गांधींनी आपल्यासोबतचे वर्तमानपत्र उघडले. त्यातील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. ती छोटीशी बातमी भारतातली होती. मध्य भारतातल्या चंपानेर नावाच्या एका गावातल्या खेडुतांनी कोणा भुवनच्या नेतृत्त्वाखाली क्रिकेट या ब्रिटिशांच्या खेळात ब्रिटिशांचा पराभव केल्याची कॅप्टन रसेल या मुजोर ब्रिटिश अधिकाऱयाची खोडकी मोडून संपूर्ण प्रांताचा तीन वर्षांचा `लगान' (सारा) माफ करून घेतल्याची.
ती बातमी वाचली आणि बॅ. गांधींच्या मनात उडालेली खळबळ काहीशी निवली. द. आफ्रिकेतल्या मूळ रहिवाशांना आणि तेथे वसलेल्या भारतीयांना ब्रिटिशांकडून मिळणाऱया दुय्यम दर्जाच्या वागणुकीविरुद्ध अहिंसक आणि कायदेशीर मार्गाने संघर्ष करण्याचा मार्ग त्यांना अंधुकसा दिसू लागला होता. बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधींचा महात्मा बनण्याकडे प्रवास त्या रात्री सुरु झाला...
छे,छे, हा इतिहास नाही. यातला गांधींना रेल्वेतून हुसकावून काढले जाण्याचा प्रसंग तेवढा ऐतिहासिक आहे. बाकीची कल्पना, निव्वळ फँटसी.
पण, `लगान' आणि भुवनची ओळख असलेल्या प्रत्येकाला यातली फँटसी वास्तवात किती चपखलपणे मिसळून जाते, हे सहज लक्षात येईल, ही अफलातून कल्पना आहे अर्थातच आशुतोष गोवारीकरची. `लगान'चा काळ कसा ठरवला, याबद्दल बोलण्याच्या ओघात त्यानं सांगितलेली. या एका सिनेमानं हिंदी चित्रपटसृष्टीतला `हॉटेस्ट' लेखक-दिग्दर्शक बनलेल्या आशुतोषच्या तोंडून ती ऐकताना जामच मजा येते आणि या कथा-पटकथेवर आशुतोषनं किती मेहनत केली असेल, याची कल्पनाही येते.
`लगान'मधला एका गावानं ब्रिटिश सत्तेशी केलेल्या संपूर्णतया काल्पनिक संघर्ष अनेक पातळ्यांवर गांधीजींच्या अहिंसक आणि सनदशीर लढय़ाला समांतर जातो, इतिहासात सहज विरघळून जातो, तो आशुतोषनं इतिहासाचं भान राखून केलेल्या कल्पनाविलासामुळे. त्यामुळेच अनेकांना `लगान' हा सत्यघटनेवर आधारित सिनेमा वाटतो. सिनेमाच्या शेवटी `... आणि भुवनचा लढा इतिहासाच्या पानांमध्ये कोठेतरी हरवून गेला' अशा आशयाच्या निवेदनामुळे तर ही गैरसमजूत आणखी बळावते.
`प्रभात'च्या `संत तुकाराम'मधला `आधी बीज एकले' हा अभंग शोधण्यासाठी अनेकांनी तुकाराम गाथा वारंवार पालथी घातली म्हणतात, त्यातलाच हा प्रकार. हा अभंग संतवाङ्मयाच्या अभ्यासकांनाही तुकारामांचाच वाटावा, हे तो लिहीणाऱया शांताराम आठवल्यांचं यश होतं. आणि `लगान' पाहिल्यावर भारताच्या नकाशात हे चंपानेर गाव कुठेच नाही किंवा कोणत्याही संस्थानावर बेतलेलं नाही, हे कळल्यावर विश्वास न बसणं, हे आशुतोष गोवारीकर या कथा-पटकथाकार- दिग्दर्शकाचं यश आहे.
हे यश किती मोठं आहे, ते `लगान'नं देशा-परदेशात मिळवलेल्या तुफान व्यावसायिक यशावरून दिसून येतंच. पण, त्याहून मोठं यश आहे ते भारतात त्याची `शोले' आणि `गंगा जमुना'सारख्या `ऑल टाइम ग्रेट' सिनेमांशी तुलना केली जाण्यात. काळाच्या ओघात ज्यांची टवटवी हरपणार नाही, अशा सिनेमांमध्ये गणना होण्यात.
नाचगाणीयुक्त भारतीय व्यावसायिक चित्रपटांकडे तुच्छतेने पाहणाऱया पाश्चात्त्य जगातल्या लोकार्ने चित्रपट महोत्सवात `लगान'नं प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार पटकावला आहे. फ्रान्स, इटली, जर्मनी यांसारख्या देशांत भारतीय सिनेमे फार पोहोचत नाहीत. व्यावसायिक हिंदी सिनेमा तर तिथे कोणाला फारसा ठाऊकही नाही. आणि `लगान'चा प्राण असलेल्या क्रिकेटचाही तिथल्या प्रेक्षकांना अजिबात परिचय नाही. अशा देशांतही `लगान' पोहोचला आहे आणि प्रेक्षकांनी तो जोरदार उचलून धरला आहे.
आणि आता ज्याला-त्याला प्रश्न पडलाय, की ही अफलातून, क्रांतिकारक कथाकल्पना आशुतोषला सुचली कशी?
``माझ्या डोक्यात मुळात कल्पना होती ती नॉर्मल व्यावसायिक सिनेमाचीचं. बट विथ अ डिफरन्स,'' वांद्रय़ातल्या `आमिर खान प्रॉडक्शन्स'च्या ऑफिसात आशुतोष सांगू लागला, अगदी सुरुवातीला माझ्या डोक्यात एकच कल्पना स्पष्ट होती. मला एका नायकाचा संघर्ष चित्रित करायचा नव्हता, तर एका समाजानं एकत्रितपणे दिलेला लढा दाखवायचा होता. समकालीन वास्तवात तो बसवायचा, तर खलनायक फारच रुटीन आणि बोअरिंग होत होते. भ्रष्टाचारी राजकारणी, स्मगलर, अतिरेकी, भ्रष्ट पोलिस अधिकारी, माफिया गुंड... तेच ते आणि तेच ते! मग, हीच कल्पना ग्रामीण भागात नेऊन पाहिली तर, तिथेही साखर कारखानदार, सरपंच- आमदार, जमीनदार वगैरे साचेबंदच खलनायक!
बऱयाच विचारानंतर मी ही कथाकल्पना स्वातंत्र्यपूर्व काळात नेऊन पाहिली. तिथे वेगळ्याच अडचणी होत्या. या काळावर सिनेमा काढताना त्यात ब्रिटिश राजवटीचा, स्वातंत्र्याच्या चळवळीचा संदर्भ नसेल, तर तो बेजबाबदारपणा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे; म्हणजे इतिहासाशी बांधिलकी आली. आणि मला तर निव्वळ उत्तम दर्जाचं मनोरंजन करणारा कल्पनारम्य सिनेमा बनवायचा होता, गंभीर इतिहासकथन करायचं नव्हतं. आता आली का पंचाईत?
स्वातंत्र्यलढय़ाचा संदर्भ टाळायचा तर महात्मा गांधींच्या उदयाच्याही मागे जावं लागेल, हे माझ्या लक्षात आलं. असा काळ होता 1885चा. हा फार वैशिष्टय़पूर्ण कालखंड आहे. 1857 चं बंड शमलं होतं. संस्थानिक राजे-महाराजांनी कंपनी सरकारचं मांडलिकत्व निमूटपणे स्वीकारलं होतं. `विंग्रजांच्या राज्यात काठीला सोनं बांधून काशीला जायची निर्धास्ती झाली' म्हणून आम जनतेनंही गोऱयांची राजवट मनोमन स्वीकारली होती. स्वातंत्र्याची कल्पना अजून धगधगू लागलेली नव्हती. इंग्रजांविरुद्ध असंतोष होता. पण तो किरकोळ आणि असंघटित. कारण, काँग्रेसनं अद्याप राष्ट्रीय स्वरुप धारण केलं नव्हतं. आणि हो, याच काळात बऱयाच भागांत दुष्काळही पडला होता.
इतिहासात या काळाची नोंद पुसटच आहे. याचाच फायदा घेऊन मी माझी कथाकल्पना या काळातल्या खेडय़ात नेली. तिथले दुष्काळग्रस्त शेतकरी हे माझे हीरो असणार, हे स्पष्ट झालं. आता संघर्ष घडवायचा तर तो ब्रिटिशांशीच घडवावा लागणार, हे उघड होतं. आणि हिंदी सिनेमांनी पार पचका करून टाकलेले, `टुम हिंडुस्टानी कुट्टा' असं किंचाळणारे स्टीरिओटाइप्ड ब्रिटिश मला दाखवायचे नव्हते. मग करायचं काय?
इथे मी जाम अडकलो. पण, तत्कालीन संस्थानिकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करत असताना मला लक्षात आलं की, इंग्लंडमध्येही नवीनच असलेल्या क्रिकेटचा त्यावेळी भारतातही नुकताच शिरकाव झाला होता. लढायांमधून उसंत मिळालेले कंपनी सरकारचे अधिकारी आणि लढायांचा जोमच नसलेले स्थानिक संस्थानिक यांना फावला वेळ भरपूर होता. इंग्रजांना शिकारीव्यतिरिक्त क्रिकेटचा विरंगुळा होता. स्वत:ची भव्य पोर्ट्रेट्स काढून घेण्याव्यतिरिक्त राजेरजवाडय़ांनाही काही कामधाम नव्हतंच. इंग्रजांची मर्जी राखण्यासाठी त्यांनीही क्रिकेटचा खेळ आत्मसात करून घ्यायला सुरूवात केली होती.
ही माहिती मनात घोळवत असताना अचानक डोक्यात बत्ती पेटली- क्रिकेटच्या मॅचमधूनच संघर्ष घडवता आला तर? मग मी त्या दृष्टीनंच विचार करू लागलो. ही कल्पना अनेक दृष्टींनी सोयीची होती. एकतर ती युनिक होती. मला टिपिकल संघर्ष टाळायचा होता. तो हेतू साधला यातून जात होता आणि कथेचं करमणूकमूल्यही सॉलिडच वाढणार होतं. पण, त्याचवेळी ही कल्पना फूलप्रूफ आणि लॉजिकल करून पटकथेत बसवण्याचं आव्हान छाती दडपवणारं होतं. कोण कुठल्या गावातले खेडूत, त्यांच्याशी ब्रिटिश अधिकारी क्रिकेट का खेळतील? आणि खेळलेच, तरी क्रिकेटचा गंधही नसलेले खेडूत त्यात कसे जिंकतील?
इथे जन्माला आला कॅप्टन रसेल... अत्यंत हेकट आणि विक्षिप्त असा इंग्रज अधिकारी त्याला तर्कटी बनवून मी माझी सोय साधली. ज्या ज्या गोष्टी सामान्यत: अशक्य आणि म्हणूनच हास्यास्पद झाल्या असत्या, त्या सगळ्या कॅप्टन रसेलच्या तऱहेवाईक खुनशीपणामुळं सोप्या झाल्या. शिकारीच्या वेळी भुवनला ठार न मारता त्यानं सशाला टिपणं, राजा पूरणसिंगना मांसाहार करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणं. यातून त्याचा हा स्वभाव आधीच स्पष्ट होत गेला आणि त्यानं लगान माफ करण्याच्या बदल्यात क्रिकेटच्या मॅचचा प्रस्ताव मांडण्याची कल्पना शक्यतेच्या पातळीवर आली.
आता प्रश्न होता रसेलची ही पैज गावकऱयांनी स्वीकारण्याचा. इथे भुवनची व्यक्तिरेखा स्पष्ट होऊ लागली. शिकारीच्या प्रसंगात भुवन कॅप्टन रसेलशी थेट झगडा करत नाही. तो प्राण्यांना वाचवण्यासाठी त्याला जमेल तेच (खडे मारून त्यांना उधळवणं) करतो. मात्र, छातीवर रसेलची बंदूक ताणली गेलेली असताना तो निडर असतो. या परक्या आणि जुलमी राज्यकर्त्यांबद्दल त्याच्या मनात सुप्त असंतोष आहे आणि संधी मिळाल्यास त्यांच्याशी दोन हात करण्याची जिगरही. म्हणूनच, दुप्पट लगान भरण्याचा हुकुम आल्यावर राजा पूरणसिंगना भेटून गळ घालण्याच्या कल्पनेत त्याचा पुढाकार असतो. रसेलचा क्रिकेटचा खेळ रंगात आलेला असताना गावकऱयांच्या अंगावर धावून जाणाऱया इंग्रजावर हात उगारण्यासही तो कचरत नाही. भुवनचा हा पीळ स्पष्ट झाल्यावर त्यानं मॅचचं आव्हान स्वीकारणं सोपं झालं. अर्थात त्याला मी भडक डोक्यानं, ताबडतोब पैज स्वीकारू दिलं नाही. सगळ्या प्रांताचा लगान माफ करवून घेण्याची ही संधी तो विचारपूर्वकच साधतो. चंपानेरच्या आणि पंचक्रोशीतल्या गावकऱयांना ही कल्पनाच अमान्य होणं आणि भुवन एकटा पडण्याचा कथाभाग रचायला सोपा होता. खरी परीक्षा होती भुवनची टीम तयार करताना अडाणी खेडुतांमधून तीन महिन्यांत खेळाडू कसे घडवायचे?
आता मी एकेका गावकऱयाचा विचार करू लागलो. क्रिकेटच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये विशिष्ट कौशल्याची गरज असते. त्यांना समांतर कौशल्य मला सापडली बलुतेदारांत, लाकूडतोडय़ा, लोहार, कोंबडय़ा पाळणारा मुलाणी, गोफणबहाद्दर अशा एकेका व्यवसायातून मला फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक गवसत गेले. पुढे दणादण विणकामच करत गेलो रे मी!''
आशुतोषनं विणकामाचा दृष्टांत देऊन मामला सोपा केला. पण, प्रत्यक्षात सगळ्यात अवघड भाग होता तो हाच. हा कथाभाग प्रेक्षकांना कन्व्हिन्सिंग वाटण्यासारखा झाला नसता तर पब्लिक इंटरव्हललाच गुल झालं असतं आणि उत्तरार्धातल्या मॅचला बांगलादेश- केनिया मॅचइतकाही प्रेक्षकवर्ग लाभला नसता. कोंबडीपकड भूरा, वैद्य ईश्वरकाका, ज्योतिषी गुरन, लोहार अर्जन, ढोलक वाजवणारा बाघा, फुटीर लाखा, इस्माइल, गोली आणि दलित कचरा या सगळया व्यक्तिरेखांना स्वतंत्र सुस्पष्ट बाह्यरुप आहे आणि व्यक्तिमत्वही आहे, त्यांचा या कथानकात एक आलेख आहे आणि या आलेखानुरूपच प्रत्यक्ष सामन्यातही त्यांचा खेळ दिसतो. त्यांना ऐनवेळी येऊन मिळणारा (आणि जलदगती गोलंदाजाची गरज पूर्ण करणारा) देवा आणि कचराच्या अधू हातांतून सुटणारी गुगली हे या विणकामातले सगळ्यात मस्त जुळलेले ताणेबाणे, `क्या बात है' अशी खुली दाद घेणारे.
इंग्रजांचा हा खेळ खेडुतांना झटपट समजणार कसा, या प्रश्नातून एलिझाबेथ रसेलचं पात्र निर्माण झालं आणि खलनायकाच्या गोटात राहून नायकावर एकतर्फी प्रेम करणारी सहनायिका आपसूक तयार झाली. भाबडी, पझेसिव्ह गौरी- तिच्यावर मनोमन प्रेम करणारा पण ते अव्यक्त ठेवून घेतलेल्या आव्हानावर लक्ष केंद्रित करणारा भुवन आणि त्याच्या बेडरपणावर खुश होऊन त्याच्या प्रेमात पडलेली एलिझाबेथ हा त्रिकोण रंगत गेला.
एलिझाबेथ चोरून गावकऱयांना क्रिकेट शिकवायला येते, तो प्रसंग दोन पातळ्यांवर घडतो. एकीकडे गावकऱयांना क्रिकेट समजावलं जात असतं आणि दुसरीकडे या गोऱया मेमनं आपल्या भुवनवर डोरे डालू नयेत, म्हणून गौरीची उलघाल होत असते. अत्यंत सुरेख हाताळलेल्या या प्रसंगात प्रेमत्रिकोणाचे सगळे पैलू अलवारपणे उलगडतात. हा प्रसंग कसा रचला, याबद्दल आशुतोषला विचारल्यावर त्याच्या उत्तरातून काही प्रसंग अपघातानं किंवा सर्जकाच्या नाईलाजातून कसे अचानक जमून जातात, याचीच खूण मिळाली. आशुतोषचं सगळं लक्ष यावेळी केंद्रित झालं होतं ते गावकऱयांना क्रिकेट शिकवण्याची व्यवस्था लावण्यावर.
``आता एलिझाबेथ आली, तिनं ग्राउंड, विकेट्स, बाउंडरी वगैरे कल्पना सांगितल्या. पुढे ती सगळं क्रिकेटचं आख्यान सांगताना दाखवली असती तर ते बोअरिंग झालं असतं. शिवाय वेळेत कसं बसणार? हे टाळण्यासाठी एलिझाबेथ माहिती सांगत असतानाच (`कट अवे' म्हणून) कॅमेरा गौरीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूला आणला आणि दोन्ही गोष्टी आपसूक साधल्या. एकीकडे गौरीची पझेसिव्ह इनसिक्युरिटी व्यक्त झाली आणि पलीकडे एलिझाबेथनं भुवन कंपनीला सगळा खेळ समजावूनही टाकला.''
बॉल टु बॉल झक्कास रंगलेली थरारक मॅच हा `लगान'चा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट. ती रचताना आशुतोषनं मोठय़ा प्रमाणावर सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे. आणि ती त्या घटकेला खटकणार नाही, अशी जस्टिफायही करून टाकली आहे. आधी पटकथेत दोन इनिंगची मॅच होती. पण, तेवढी चित्रित करणं वेळेच्या दृष्टीनं व्यवहार्य ठरलं नसतं. म्हणून त्या दोन इनिंग्जमधले हाय पॉइंट्स त्यानं एका इनिंगमध्ये आणले आणि ही मॅच आजच्या काळातल्या वन डे सामन्यासारखी टाइट आणि उत्कंठावर्धक झाली. शिवाय, फिरकी, मॅच फिक्सिंग (लाखाचा डबल गेम), बॉडीलाइन गोलंदाजी, बोलिंग ऍक्शनवरून होणारे वाद असे आधुनिक क्रिकेटरसिकाच्या परिचयाचे सगळे संदर्भही त्यानं त्या काळात जिरवून टाकले.
त्या काळात फक्त तीन दिवसांची आणि एकाच इनिंगची मॅच कशी दाखवायची, हा प्रश्न सोडवायला पुन्हा कॅप्टन रसेलच मदतीला धावला. तो सटकू आहे, हे एकदा एस्टॅब्लिश झाल्यावर त्यानं घेतलेला तीन दिवसांच्या सामन्याचा निर्णय तिरसटपणाच्या लेबलाखाली आपोआप धकून गेला. आता मी विचार केला की, गुन्हाच करायचा तर तो पूर्णच का करू नये? मग, त्या काळात अस्तित्त्वातच नसलेली सीमारेषा आणि चौकार- षटकारांची संकल्पनाही वापरून टाकली. गोलीची वादग्रस्त बोलिंग ऍक्शन धमाल मजा आणून गेली. इस्माइलसाठी रनर म्हणून आलेला टिपू नॉनस्ट्रायकर एंडला असताना, गोलंदाज पोहोचण्याआधीच क्रीज सोडून पुढे जातो आणि गोलंदाज त्याला बाद करतो, हा प्रसंग (क्रिकेटच्या भाषेत `मांकड विकेट') पाहिल्यावर असा नियम त्यावेळी अस्तित्वात नव्हता, हे अनेक क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आलं. पण, मुळात टीममध्ये नसलेला टिपू रनर म्हणून येणंच नियमबाह्य आहे, हे भावेच्या भरात कोणाला खटकलं नाही.''
`लगान' प्रदर्शित होऊन हिट-सुपरहिट झाल्यानंतर त्या पटकथेतल्या बलस्थानांबद्दल, चतुर आणि घट्ट विणीबद्दल चर्चा करणं सोपं आणि मजेचं आहे. पण, तो निव्वळ कागदावर असताना कोणाच्याही पचनी पडणं कठीणच होतं. आशुतोषनं आपल्या मित्राला, आमिर खानला सुरुवातीला ही कल्पना थोडक्यात सांगितली होती, तेव्हा त्यानंही ती धुडकावूनच लावली होती.
आणि त्यात आमिरची तरी काय चूक म्हणा, आशुतोषचं ट्रक रेकॉर्डच त्यावेळी फार गढूळलेलं होतं. गुणवान, पण अद्याप गुणवत्ता सिद्ध न करू शकलेला दिग्दर्शक असं एक फोकनाड बिरूद त्याला लाभलं होतं. लंबंचवडं, ऐकायला इम्प्रेसिव्ह, पण काम मिळवून द्यायला तद्दन निरुपयोगी.
आशुतोषची तोवरची एकूण कारकीर्दच न पेटूनही न फुटलेल्या फटाक्यासारखी झाली होती. प्रेक्षकांना त्याची पहिल्यांदा ओळख झाली ती अमोल पालेकरांच्या `कच्ची धूप' मालिकेतून. या मालिकेत(च) अप्रतिम सुंदर दिसलेल्या भाग्यश्री पटवर्धनचा तो नायक होता, त्यामुळे एका पिढीतल्या तरुणांच्या मत्सराचा विषय होता. पुढे `होली', `गूँज', `कभी हाँ कभी ना', `सलीम लंगडे पे मत रो'सारख्या सिनेमांमध्ये तो दिसला, पण, त्याच्या अभिनय कारकिर्दीनं कधी घट्ट मुळं रोवली नाहीत. मग, दीपक तिजोरी, रवीना टंडन, पूजा भट यांच्या प्रमुख भूमिका असलेला `पहला नशा' आला. आशुतोषचं दिग्दर्शन क्षेत्रातलं हे पदार्पण, या सिनेमाला माफक यशही मिळालं नाही. आमिर खान आणि ममता कुलकर्णी यांच्या `बाजी'मधून आशुतोषला दुसरी संधी मिळाली. आमिर प्रथमच `आउट एन आउट' ऍक्शनपटामध्ये काम करतोय, या चर्चेमुळे `बाजी'कडून सर्वानाच मोठय़ा अपेक्षा होत्या. हाही सिनेमा गल्लापेटीवर कोसळलाच. आशुतोषला या सिनेमांकडून `तांत्रिकदृष्टय़ा सफाईदार' दिग्दर्शक' असं एक बिरुद मिळालं. अर्थात, आशुतोष या बिरुदामागचा अर्थ जाणून होता. आपल्यात नेमकं काय कमी आहे, काय फसतंय, याचा त्यानं शोध घेतला. मधल्या काळात आलेल्या `तथाकथित व्यावसायिक' सिनेमांच्या ऑफर्स त्यानं नम्रपणे नाकारल्या आणि मनात घोळणाऱया एका कथेवर काम सुरू ठेवलं...
...ही कथा होती `लगान'ची.
दिग्दर्शकीय कारकिर्दीतले पहिले दोन्ही सिनेमे दणकून आपटल्यानंतर आशुतोषच्या डोक्यात ही कल्पना आली होती. काळ जुनाट, हिरो देहाती, सिनेमाची स्टोरी एका ओळीत सांगता येण्याजोगी आणि अंमळ चमत्कारिकच, आणि अत्यंत रिस्की अशा या सिनेमाचा खर्च... केवळ वीस-पंचवीस कोटी रुपये. साहजिकच या कल्पनेची `भिकेचे डोहाळे' म्हणून बोळवण होत गेली. 1996 साली डोक्यात आलेली ही कथाकल्पना त्यानं पहिल्यांदा ऐकवली, तेव्हा आमिरनं त्याला हसण्यावारी नेलं, यात नवल वाटत नाही, कोणाही सेन्सिबल राहण्यात अर्थ नसतो, हेच `लगान'नं सिद्ध करून दाखवलं. जिला कोणी काठीनंही शिवायला तयार नव्हतं, अशी कथा आता `ओरिजिनल नाविन्या' करता नावाजली जातेय. एका वाक्यात सांगता येणारी कथा मांडायला आशुतोषनं चार तासांचं दळण कशाला लावलं असेल, असा प्रश्न पडलेले लोक चार तासांचा काळ कसा भुर्रकन निघून जातो, ते कळत नाही, असं एकमेकांना टाळ्या देत सांगताहेत. आणि थिएटरमध्ये सव्वा-दीड तासाची क्रिकेट मॅच पाहायला कोण मरायला जाईल, म्हणून `लगान'कारांना वेडय़ात काढणारं पब्लिक बारा-बारा वेळा फक्त मॅचसाठी `लगान' पाहतंय. बाकी सोडा, व्यवस्थापन क्षेत्रातल्या तज्ञांना `लगान'मध्ये व्यवस्थापनाची दहा मूलभूत तत्त्वं गवसली आहेत आणि लखनऊच्या एका संस्थेनं `केस स्टडी' म्हणून `लगान'चा चक्क अभ्यासक्रमात समावेश केलाय.
``माझा माझ्या कल्पनेवर आणि तिच्यातल्या पोटेन्शियलवर शंभर टक्के विश्वास होता. दोनदा हात पोळल्यावर आता दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करायचं ते `लगान' करायला मिळाला तरच, हे इतकं पक्कं होतं माझ्या मनात, की पहिल्या नॅरेशननंतर आमिरनं नकार दिल्यावर कुमार दवे आणि संजय दायमा (आशुतोषचे सहपटकथाकार आणि अनुक्रमे सहदिग्दर्शक, मुख्य सहाय्यक दिग्दर्शक) यांना घेऊन मुंबईबबाहेर पडली. महिन्याभरात मी माझ्या कल्पनेला नीट पटकथेचं स्वरुप दिलं. काही काळानं मी आमिरला पुन्हा `लगान' ऐकवला तो आज पडद्यावर दिसतो तसाच्या तसा. प्रत्येक पात्राच्या, त्याच्या ढंगातल्या संवादांसह.''
आमिरचीही मजा पाहा! कथाकप्लनेच्या स्वरुपात त्यानं थेट नाकारलेली ही आशुतोषची गोष्ट पटकथेच्या रुपात ऐकल्यावर मात्र तो `लगान'च्या इतका प्रेमात पडला की, दुसरा कोणी निर्माता निगुतीनं निर्मिती करणार नाही. म्हणून तो स्वत:च निर्मितीच्या क्षेत्रात उतरला आणि पंचवीस कोटींचा जुगार खेळायला तयार झाला.
आमिर ढीग तयार झाला असेल हो, पण. खात्यात दोन फ्लॉप सिनेमे जमा असताना `लगान'सारख्या अत्यंत रिस्की, महाखर्चिक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं नेतृत्व करण्याच्या कल्पनेनं आशुतोषच्या पोटात गोळा नाही आला. कारण, कोणत्याही स्थितीत `अबकी बारी, आखरी बारी' ठरणार, हे पक्कंच होतं.
``नाही बुवा! मला पोटात जराही हललंसुद्धा नाही. एकतर माझा `लगान'च्या सामर्थ्यांवर पूर्ण विश्वास होता. आणि माझ्यासाठी ही एरवीही `मेक ऑर ब्रेक' सिच्युएशनच होती. मग मेल्या कोंबडय़ानं आगीला भ्यायचं तरी कशाला?''
एकदा आमिरनं निर्मितीची जबाबदारी घेतल्यावर खास आमिर पद्धतीच्या काटेकोरपणे व्यावसायिक शिस्तीत `लगान'ची आखणी झाली. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार ए.आर.रहमान, कलादिग्दर्शक नितीन देसाई, राजू खान, छायालेखक अनिल मेहता, गणेश हेगडे, राजू खान, सरोज खान आणि भैरवी मर्चंट अशी अव्वल नृत्यदिग्दर्शकांची फौज, वेशभूषाकार भानू अथय्या अशी बडीबडी तंत्रज्ञ मंडळी `लगान'च्या टीममध्ये समाविष्ट झाली. भानूताइभनी 1885 साली राणी व्हिक्टोरिया सुतकात असल्यामुळे इंग्रज स्त्रियांच्या कपडय़ांमध्ये काळ्या-पांढऱया- करडय़ाच छटा होत्या. याकडे लक्ष वेधलं आणि कथानकाचं साल 1893 करायला लावलं. लोकेशनची निवड, तिथे सेट निर्माण करणं, कलावंत- तंत्रज्ञांच्या ताफ्यासाठीची व्यवस्था इथपासून ते कलावंतांच्या निवडीपर्यंत- आजवर केवळ हॉलिवुडमध्येच ऐकिवात होतं एवढय़ा मोठय़ा स्केलवर आणि शिस्तबद्ध काम झालं. लंडनममध्ये ब्रिटिशि कलावंतांच्या स्क्रीन टेस्ट झाल्या. त्यांच्यासह प्रत्येक भूमिकेसाठी तीन पर्याय तयार ठेवण्यात आले होते. अभिनेता म्हणून अनेक ठिकाणी स्क्रीन टेस्ट देण्याच्या स्वानुभवाचा इथे आशुतोषला चांगलाच फायदा झाला. गावकऱयांच्या भूमिकांसाठी कलावंताना अवघी भाषेतले संवाद आणि गावकऱयाचे कपडे दिले होते.
``कपडे काही फक्त लुकसाठी दिले नव्हते. या कपडय़ांशी ते किती वेळात जुळवून घेतात आणि कितपत कम्फर्टेबल होतात. हे मी पाहात होतो. संवादांमध्येही अवधी बोली नैसर्गिक पद्धतीनं बोलली जाण्यावर भर दिला. ही बोली सहजगत्या बोलू न शकल्यामुळेच अनेक गुणवान मराठी कलावंताना मला नाईलाजानं बंद करावं लागलं.''
`लगान'च्या नायिकेचं, गौरीचं कास्टिंग बरंच गाजलं. नंदिता दास, रानी मुखर्जी, प्रिटी झिंटा अशी नावं चर्चेत होती.
``फायनल स्क्रीन टेस्टला सहा प्रस्थापित नायिकांसह एकूण 25 अभिनेत्री आल्या होत्या. सगळ्यांजाणींना `गाँव की गोरी'चा टिपिकल घुँघट वगैरे असलेला वेश दिला होता आणि त्यांना `होठों पे ऐसी बात' या गाण्यावर स्वत: बसवलेला नाच सादर करायचा आहे. अशी सूचना प्रत्येकीला स्क्रीन टेस्टच्या दोन दिवस आधी दिली होती. ग्रामीण वेशभूषेत त्या कशा दिसतात. त्या वेशाशी किती सहजतेनं जुळवून घेतात, हे मला पाहायचं होतं. आणि गौरीमध्ये आवश्यक नृत्यकौशल्याची, ग्रेसेची चाचपणी करायला `होठों पे ऐसी बात' अगदी फिट होतं.
स्क्रीन टेस्टच्या दिवशी ग्रेसी सिंग माझ्यासमोर आली आणि अगदी निरागसपणे तिनं विचारलं कहिये, क्या करना है? मी उडालोच. तुला काय करायचं ते ठाऊकच नाही? या प्रश्नावर तिनं गोंधळून `नाही' उत्तर दिलं. तिच्या सेक्रेटरीनं `होठों पे ऐसी बात'चा निरोपच तिच्याकडे पोहोचवला नव्हता. तिला परिस्थिती समजावून सांगितल्यावर ती म्हणाली, ओके, आता गाणं वाजवा. मला जे जमेल ते मी सादर करते. गाणं सुरू झालं आणि तिचं उत्स्फूर्त चैतन्यानं सळसळणारं नृत्यचापल्य, चपखल हावभाव पाहिल्यावर मला समजून गेलं की, हीच आपली गौरी.''
या सगळ्या अभिनेत्रींची आमिरबरोबर जोडी जमते की नाही, हे तपासण्यासाठी आमिरलाही त्यांच्याबरोबर भुवनच्या वेशात उभं राहावं लागलं आणि त्याचीही स्क्रीन टेस्ट आपसूक होऊन गेली. आमिरला मिशी लावायची की नाही, यावरही बरंच भवति न भवति झालं.पण, आमिरला मिशी देणं हे जॅकी श्रॉफची मिशी काढण्याइतकं वाईट दिसेल आणि प्रेक्षकांचं त्याच्याशी नातं जुळण्यात अडसर होईल, शिवाय, सफाचट चेहऱयातला राकट गोडवा मिशीनं मारला जाईल, अशी आशुतोषची धारणा होती. शेवटी टीमच्या कॅप्टनचाच शब्द प्रमाण मानला गेला आणि भुवनच्या मिशीला चाट मिळाली.
अफाट मेहनत, प्रचंड मनुष्यबळ, काटेकोर वेळापत्रक, कलाकारांच्या घामेजलेपणाचीही `कंटिन्युइटी' जपण्याचा अट्टहास, प्रत्येक फ्रेम दिग्दर्शकाच्या मनातल्या कल्पनेनुसारच परिपूर्ण उतरवण्याचा प्रयत्न आणि कलाकारांपासून भुजमध्ये चंपानेर उभं करायला झटलेल्या स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वाचं टीमवर्क यातून `लगान'चा अभूतपूर्व सामना रंगत गेला, चंपानेर आणि क्रिकेटचं मैदान बनवण्यासाठी अनेक गावांची जमीन वर्षभरासाठी भाडय़ाने घेणे, दुष्काळग्रस्त भागातल्या जमिनीचा पोत मिळवण्यासाठी तीन प्रकारची माती मिसळून ट्रक भरभरून ती चित्रणस्थळी आणून टाकणे, सामन्याच्या चित्रिकरणासाठी 10 हजार `प्रेक्षक' गावकऱयांचे अवाढव्य मॉबसीन रचणे, ताशी साठ किलोमीटर वेगानं जिथे सुसाट वारा वाहतो आणि हवाई दलाच्या तळामुळे दिवसभर लढाऊ विमानांचं घोंघावणं सुरू असतं अशा जागी डबिंगचा राजमार्ग सोडून चित्रणस्थळावरच फायनल संवाद ध्वनीमुद्रित करण्याचा हट्ट धरणे, कलाकारांच्या त्वचेचा योग्य लुक मिळवण्यासाठी त्यांना ठराविक वेळ उन्हात रापवणे, असले असंख्य अचाट प्रकार `लगान'च्या टीमनं केले आहेत. सामन्याचंच चित्रण तब्बल 40 दिवस चाललं. त्यातही, बॅट्समनचा शॉट घेताना सूर्य कुठे होता, हे पाहून नंतर त्याच्या विरुद्ध दिशेचा बोलरचा शॉट आणि तिसरीकडे कुठेतरी त्या बॉलच्या फिल्डिंगचा शॉट घेताना सूर्याचीही कंटिन्युइटी सांभाळण्यात आली होती. लाखाच्या हृदयपरिवर्तनानंतर त्यानं झेप घेऊन जमिनीवर कोसळत घेतलेला अप्रतिम कॅच हा त्या शॉटचा 27 वा टेक होता. भुवनच्या डोक्यावर बॉल आदळून तो जखमी होण्याच्या शॉटचा 32 वा टेक ओके झाला होता.
असल्या राक्षसी परफेक्शनच्या कथा `लगान'च्या युनिटकडून सर्रास ऐकायला मिळतात. शूटिंग सुरू झाल्यावर मध्येच एकदा आशुतोषचं पाठीचं दुखणं बळावून त्याला स्लिप डिस्कचा त्रास असल्याचं निष्पन्न झालं आणि डॉक्टरांनी त्याला महिन्याभराची बेडरेस्ट सांगितली. या पठ्ठय़ानं सेटवरच खाट मागवली. त्यामुळे `लगान'च्या नावावर खाटेवर आडवे पडून दिग्दर्शित केले जाण्याचा विक्रमही जमा झाला.
अर्थात, अशी मेहनत, अशी लगन आणि एवढा पैसा पणाला लावला गेला म्हणून सिनेमा चांगला झाला, असं होत नाही. त्यासाठी दिग्दर्शकाला गोष्ट कशी सांगायची आहे, याचं पक्कं गणित आखावं लागतं. आशुतोषनं ही ट्रीटमेंट पटकथा रचतानाच मनात पक्की केली होती. `व्वा, काय अँगल लावलाय, क्या सीन लिया है बाप' असली स्तुती गोळा करणाऱया, `दिग्दर्शकाचा टच'वाल्या टेकिंगच्या वाटेलाही तो फिरकला नाही. कथानकाच्या दृष्टीनं आवश्यक परिणाम `सहज'पणे साधणारं टेकिंग हीच सर्वेत्कृष्ट ट्रिटमेंट असते. हे सूत्र त्यानं पक्कं लक्षात ठेवलं आणि `लगान'चा काळ, बाज आणि पटकथेची लय लक्षात घेऊन दीर्घ दृश्यांवर भर दिला.
``जेव्हा छोटय़ाछोटय़ा अवधीचे शॉट भराभर जोडून फास्ट कटिंग पद्धतीनं सिनेमा चित्रित होतो, तेव्हा दिग्दर्शक प्रेक्षकाला सतत बकोट धरून `आता हे पाहा, ऊठ, आता हे पाहा' असं सारखं काहीतरी `दाखवत' असतो आणि गरज नसताना स्वत: `दिसत' असतो. मला प्रेक्षकाला मूर्ख गृहीत धरून सिनेमा बनवायचा नव्हता. म्हणूनच मी प्रेक्षकाला, त्याला काय पाहायचंय, हे निवडण्याचं स्वातंत्र्य देणारा दीर्घदृश्यांचा फॉरमॅट निवडला. गाण्यांमध्येही तुम्हाला हाच बाज दिसेल. अपवाद फक्त `बारबार हाँ, बोलो यार हाँ' या संघगीताच्या काही भागाचा तिथे रहमानच्या फास्ट बीटवर व्यायामाची दृश्य असल्याचे फास्ट कटिंगला वाव होतो.''
प्रेक्षकांना प्रत्येक दृश्याचा, घटनाक्रमाचा `खुलासा'रुपी `स्पूनफीडिंग' करायचे नाकारणं, हे आशुतोषचं सर्वात मोठं धाडस आहे. सिनेमाची भाषा ही दृश्यांची भाषा आहे आणि ती कळण्याइतका आपला प्रेक्षक बुद्धिमान आहे, असा त्याचा ठाम विश्वास आहे.
``म्हणूनच भुवनची आई `आज अगर तेरे बापू होते' म्हणत गळा काढताना दिसत नाही. ती फक्त तू तुझ्या बापासारखाच बोलतोस, असं म्हणते. रसेल आणि इंग्रजी कंपनी एतद्देशीय प्रेक्षकांच्या सोयीखातर एकमेकांशीही हिंदीत बोलण्याचा गाढवपणा करत नाहीत. ते साहेबी इंग्रजीच बोलतात. जिथे आवश्यक तिथेच निवेदक हिंदीत खुलासा करतो. थोडंबहुत स्पूनफीडिंग केलंय ते रामसिंगच्या कॉमेंटरीच्या माध्यमातून, तेही क्रिकेटशी परिचय नसलेल्या (पडद्यावरच्या आणि थिएटरातल्या) महिला प्रेक्षकांसाठी. आज हे निवेदन क्रिकेटची बिल्कुल ओळख नसलेल्या देशांतल्या प्रेक्षकांना सव्वा तासाच्या सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी उपयोगी पडतंय.''
`लगान'वर झालेला विचार, एका मोठय़ा टीमनं सुमारे चार वर्षं त्याच्यवर घेतलेली मेहनत याची माहिती ऐकली वाचली की प्रेक्षकाला प्रश्न पडतो की, सिनेमा बघताना यामागे एवढा कुटाणा असेल असं काही जाणवलं नव्हतं बुवा आपल्याला! आशुतोषचं यश काही असेल तर हेच आहे. सिनेमाच्या आशयाबाहेरच्या कोणत्याही घटकाचं अस्तित्व जाणवून जर प्रेक्षक थक्क झाला. तर तो सिनेमाचा पराभवच ठरतो. साधा सिनेमा हाच श्रेष्ठ कलाकृतीच्या पातळीवर जातो कारण, पडद्यावर तो साधेपणा मिळवणं, हेच पडद्यामागचं सर्वात अवघड काम असतं.
स्वत:च्या कामाची स्वत:च चिरफाड करण्याची सवय असलेल्या आशुतोषला हे ज्ञान अनुभवातूनच मिळालं. त्याच्याच आधीच्या सिनेमांतून.
``मी `पहला नशा' आणि `बाजी' केले ना, ते गणितं मांडून. पब्लिकको ये चाहिए, पब्लिकको वो चाहिए, असे हिशोब आखून रचलेल्या कथा-पटकथा आणि तशीच ट्रीटमेंट. त्यात आशुतोष गोवारीकरला काही सांगायचं आहे का, हा मुद्दाच मागे पडला. आणि खास पब्लिकच्या अभिरुचीवर बेतलेल्या दोन्ही सिनेमांचं भजं झालं. तेव्हाच मी ठरवलं की, आता कुणाच्याही आवडीनिवडींची आकडेमोड करत बसायची नाही. मला जे काही सांगायचंय, मांडायचंय ते मी माझ्या पद्धतीनं सांगणार. ते जे जाणून घेतील आणि ज्यांना ते आवडेल असे प्रेक्षक भरपूर असावेत, अशी मी फक्त आशा करू शकतो, तेवढीच मी करीन, कदाचित असे प्रेक्षक कमीही असतील, सिनेमा फारसा चालणारही नाही. पणा, जे पाहतील ते आशुतोषच्या टीमनं काहीतरी खास दिलं होतं, असं म्हणाले तरी भरून पावलं, इतका स्वच्छ आणि स्पष्ट विचार होता `लगान'च्या मागे.''
आणि आतापर्यंत हमखास यशाची पठडीबाज गणितं मांडून, प्रेक्षकांच्या मागणीबरहुकूम चौकार, षटकार ठोकायला जाऊन दोनवेळा स्वयंचीत झालेल्या आशुतोषनं जेव्हा ही सगळी गणितं धुडकावून आपल्या अंतर्मनातल्या आवाजाचा कौल मानला आणि नशिबानं फेकलेला शेवटचा बॉल चित्त एकवटून टोलवला तेव्हा तो स्टेडियमच्या चौकटी पालांडून बाहेर पडला...
... ही कप्तानाची, कप्तानाला साजेशी खेळी सार्थकी लागली आहे. `लगान'च्या टीमनं मॅच जिंकली आहे.
(महाराष्ट्र टाइम्स, दिवाळी, २००१)
No comments:
Post a Comment