Tuesday, June 28, 2011

रिमेक बनाना मुमकिन है (नवा डॉन-१)



'डॉन को फिर से बनाना मुश्किल ही नही, नामुमकिन ही है...' फरहान अख्तरकृत 'डॉन' प्रदशिर्त झाला आणि संध्याकाळपासूनच एसेमेसिंग सकिर्टमध्ये हा एसएमएस फिरू लागला. नवा 'डॉन' पाहून पकलेल्या कुणा एकाने पाठवलेला हा एसएमएस नंतर 'डॉन'विषयीची सार्वत्रिक कॉमेण्ट बनली... जणू जुना 'डॉन' हा फार श्ाेष्ठ दर्जाचा क्लासिकच होता!
 
कमशिर्यल सिनेमाचं पाठ्यपुस्तक मानल्या जाणाऱ्या 'शोले'चा रिमेक हे आव्हान ठरू शकतं. पण 'डॉन' हा आजवर (म्हणजे फरहान अख्तरने रिमेकचा घाट घालून त्याला चचेर्त आणेपर्यंत) अमिताभयुगात त्याच्या परीसस्पर्शानं धो धो चाललेला एक बऱ्यापैकी थ्रिलर होता. या पलीकडे तो फार काही गणला गेलेला नाही. 'कल्ट' सिनेमा ठरण्याची त्याची योग्यताही नव्हती. नाहीतर दिग्दर्शक चंदा बारोट हा मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा यांच्या पंक्तीत नसता का जाऊन बसला असता? किमानपक्षी आजघडीला त्याच्या नावावर 'डॉन'शिवाय आणखी काहीतरी बरं जमा झालं असतं.
 
 
उत्तम वेग असलेली, विचाराला अवसर न देणारी सलिम-जावेदची ऐन फॉर्मातली पटकथा. विषय अगदी वेगळा, अमिताभला डबल बॅटिंगची संधी देणारा डबल रोल, झकास संगीत असं जुळून आलेलं ते अमिताभच्या 'डॉन'चं गणित होतं. जर तंत्रावर हुकूमत असलेला दिग्दर्शक 'डॉन'ला लाभला असता, तर 'डॉन'मध्ये 'कल्ट' फिल्म होण्याची पात्रताही होती. अमिताभ नावाच्या पडदा व्यापून उरणाऱ्या महानायकाच्या सावलीत तांत्रिक आणि दिग्दर्शकीय उणिवा दडून गेल्या आणि 'डॉन'ने गोल्डन ज्युबिली यश मिळवलं.
 
 
फरहानला 'डॉन'मधलं पोटेन्शियल समजलं आणि आजच्या तंत्राच्या साह्यानं हा सिनेमा अधिक थ्रिलिंग होऊ शकतो, हेही उमगलं. त्याने तसा प्रयत्न केला आहे. अर्थातच हा प्रयत्न फसलाय. नव्या 'डॉन'चा पहिला अर्धा भाग आधीच्या 'डॉन'मधल्या प्रसंगांची चकचकीत उजळणी करण्यापलीकडे काहीच साधत नाही. 


त्यात सुरुवातीपासूनच शाहरूखने घेतलेलं बेअरिंग हे कधी हास्यास्पद तर कधी ओव्हरअॅक्टिंग वाटतं. हेलनने गाजवलेलं 'ये मेरा दिल...' पुन्हा साकारण्याच्या प्रयत्नात करीनाने स्वत:चं हसं करून घेतलंय. करीनावर सूड घेत असल्यासारखं शेंडा ना बुडखा प्रकारचं इनोदी नृत्यदिग्दर्शन त्या गाण्याचं वांगं करण्यात यशस्वी झालंय.  
 तिरपागडे अँगल, अतिजॅझी सेटिंग, शाहरुखचं हॅमिंग आणि सिनेमाच्या वेगाचा वाजलेला बोऱ्या यामुळे हा र्फस्ट हाफ अक्षरश: असह्य होतो.

सेकंड हाफमध्ये सिनेमाने झकास वेग घेतलेला असताना 'खई के पान बनारसवाला...'ची अजब सिच्युएशन येते. ते गाणं स्वतंत्रपणे बरं झालंय, पण त्यात अमिताभ-किशोरकुमार यांच्या मॅजिकचा अंशमात्रही नसल्याने ते सिनेमात स्पीडब्रेकरसारखंच आलंय. या कारणांनी नवा 'डॉन' फसला असला, तरी त्यापायी फरहानला जाम बडवायचं कारण नाही. किंबहुना त्याला पटकथेच्या अपग्रेडेशनचे मार्क द्यायला हवेत.
 
नव्या 'डॉन'चा शेवट वेगळा अधिक लॉजिकल आणि थ्रिलिंग झालाय. गंगाकिनारेवाला छोरा विजय एका रात्रीत सोफिस्टिकेटेड 'डॉन'ची जागा कशी घेऊ शकतो, हा प्रश्न मूळ 'डॉन' पाहणाऱ्या प्रेक्षकांनी कधी पाडून घेतला नव्हता. त्यांनी हिंदी सिनेमाला आणि आपण त्यांना माफ केलंय. पण, या प्रश्नाच्या आधारावर 'डॉन'ला तर्कसुसंगत ट्विस्ट देण्याचा प्रयत्न फरहानने केलाय. चाणाक्ष प्रेक्षकांना हा ट्विस्ट ओळखता येईल, अशा खुणाही चतुराईने पटकथेत पेरल्या आहेत. 
  'डॉन'चा हा शेवट अधिक विश्वासार्ह आहे. त्यात वर्धान नामक व्यक्तिरेखेचा एक वेगळाच सस्पेन्सही या सिनेमात आहे. तोही थ्रिल वाढवणारा आहे. या गुणांच्या बळावर 'डॉन' सेकंड हाफमध्ये बऱ्यापैकी श्वास रोखायला लावतो. दोन मुले पाठुंगळीला मारून उत्तुंग इमारतींना बांधलेल्या दोरावरून चालत जाणाऱ्या प्राणपेक्षा मलेशियातल्या पेट्रोनास टॉवर्सचा जोडरस्ता पार करणारा अर्जुन रामपाल अधिक विश्वासार्ह आहे. विमानातल्या मारहाणीचा खुल्या आकाशात होणारा शेवटही थरारक आहे. 


फरहान अख्तरने जुन्या 'डॉन'चं जोखड जरा आणखी दूर भिरकावलं असतं तर... हा प्रश्न नवा, असमाधानकारक 'डॉन' पाहिल्यावर पडतो.
(महाराष्ट्र टाइम्स)



No comments:

Post a Comment