Tuesday, June 28, 2011

हीरो झाला झीरो!

सिनेमा संपेपर्यंत हीरोचं आयुष्य साधारणपणे कोणत्याही सर्व(अ)सामान्य हीरोचं असतं, तसंच होतं. तो चार बेडरूमच्या 'झोपडी'मध्ये आईच्या हातचा 'गाजर का हलवा' खाऊन मोठा झाला. आईने शिलाईयंत्रावर कपडे शिवून त्याला शिक्षण दिलं. अभ्यास न करता वयाच्या तिसाव्या वषीर् तो बीएमध्ये र्फस्ट क्लास र्फस्ट आला (तसा तो आहे चाळिशीचा, पण अजून दिसतो तिशीचा). त्याच्या या देदीप्यमान यशामुळे पोलिस दलाने त्याला खास आमंत्रण देऊन इन्स्पेक्टरच बनवून टाकलं (त्याच्या मापाचा ड्रेसही तयार होता, म्हणजे पाहा). पोलिस दलात केस हवे तसे वाढवण्याची सवलत असलेला तो एकमेव इन्स्पेक्टर. एका 'बडे घर की बेटी'च्या प्रेमात तो पडला होताच. काही समज-गैरसमजांनंतर तिच्याशीच त्याचं लग्न लागलं. तिचा सफेदपोश बाप स्मगलर निघाला. चित्तथरारक पाठलागांअंती त्याचा अड्डा उद्ध्वस्त करून हीरोने त्याला पकडवून दिले. या भानगडीत सासऱ्याच्या कैदेत बंदीवान असलेल्या हीरोच्या वडिलांचीही मुक्तता झाली आणि सगळेजण हात हातात घालून नाचत गात असताना 'दी एण्ड'ची पाटी आली आणि पब्लिक घरोघर निघून गेले... कुणी अशी फाकडू हीरोइन आपल्यावर कशी मरत नाही, याबद्दल खंतावलं- कुणी असं हॅपनिंग आयुष्य आपल्याला लाभत नाही, याबद्दल- तर कुणी 'असा गाजराचा हलवा कधी आमच्या घरी बनत नाही', याबद्दल. हीरो भाग्यवान आहे, यावर सगळ्यांचंच एकमत होतं. खुद्द हीरोलाही तसंच वाटत होतं...

...
त्या 'दी एण्ड'च्या पाटीनंतर आता काही वषेर् लोटली आहेत... 'पिक्चर तो खतम हो गयी, जिंदगी अभी बाकी है दोस्त', हे हीरोला समजलेलं आहे... त्याचं आयुष्य आता बदललंय... पोलिटिकल वजन वापरून त्याचा सासरा दोन दिवसांत सुटलाय... तेच वजन वापरून त्याने हीरोला सस्पेण्ड करवलंय... आठवतं का, हीरोने सिनेमातल्या शेवटच्या पाठलागात पाच-सहा फेरीवाल्यांच्या गाड्या उडवल्या होत्या... त्या सगळ्यांच्या वतीने फेरीवाला युनियनने हीरोवर केस करून नुकसानभरपाई मागितलीये...

स्मगलरच्या अड्ड्यावर आत शिरताच हीरोने लोळण घेत घेत केलेला अफलातून गोळीबार आठवतोय?... त्या गोळीबारात जी ३७ माणसं ठार झाली, त्यातले तीनजण गुंड नव्हते. एक चहावाला होता, दुसरा ड्रायव्हर होता आणि तिसरा खंडणीसाठी पकडून आणलेला व्यापारी! आता या तिघांच्या मृत्यूची 'मानवी हक्क आयोगा'ने दखल घेतलीये आणि हीरोवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलाय...

हीरोने अतिशय चतुराईने ऐन क्लायमॅक्सला स्मगलर डॉनच्या दोन प्रमुख साथीदारांना यमसदनी धाडलं होतं, ते लक्षात आहे ना?... त्या दोघांच्याही मुलांनी आपापल्या बापांच्या 'मारेकऱ्या'ला ठार मारण्याचा चंग बांधलाय आणि माफिया गुंडांना तशी सुपारी दिलीये... ...दुदैर्वाच्या दशावतारांनी गांजलेल्या हीरोला रात्र रात्र झोप लागत नाही... जेव्हा लागते तेव्हा त्याला याहून भयानक स्वप्न पडतं... जिच्यासाठी त्याने इतके पराक्रम गाजवले, जिच्याबरोबर तीन गाणी गायली-नाचली, तीच नायिका आता बायको झाल्यावर महामायेसारखी त्याच्या उशाशी येऊन करवादते, ''उठा आता. उन्हं वर आली तरी पडलेत कुंभकर्णासारखे लोळत. काम नाही, धंदा नाही, चार दिडक्या कमवून घरात आणत नाही आणि मी म्हणते यांना झोप लागतेच कशी. कोडगेपणाची हद्द आहे हा माणूस म्हणजे. रोज सकाळी उठून गाजर का हलवा पाहिजे. गाजरं काय माझा बाप आणून देणार का? उठा, आधी वाणसामान आणून द्या आणि मग भाजी आणायला जा...'' 


...
दचकून जागा झाल्यावर हीरोला समजतं... जे सगळ्यात भयानक होतं, ते स्वप्न नव्हतं!(महाराष्ट्र टाइम्स)


No comments:

Post a Comment