Tuesday, June 14, 2011

ऍण्ड मराठी गोज टू ऑस्कर... (श्वास)


`आम्ही मराठीत ऑस्कर खेचून आणू' असं स्मिता तळवलकर दहा-बारा वर्षापूर्वी म्हणाल्या होत्या तेव्हा ऐकणारे खुखुखुखु ते खदाखदा अशा सर्व प्रकारांत हसले होते... हसणं अनावर होऊन खुर्चीतून खाली पडून गडाबडा लोळले होते... ही प्रतिक्रिया स्वाभाविकच होती म्हणा!... सलाइनवर कसाबसा जिवंत असणाऱया काडीपैलवानानं अंगात जरा धुगधुगी येताच, `मी आता कुस्तीत ऑलिंम्पिक गोल्डमेडलच जिंकून आणतो'
 अशी, आडव्याच स्थितीत, घोषणा करण्याइतकं विनोदी वाटलंच होतं तेव्हा हे विधान... पण, अवघ्या दहा बारा वर्षात मराठी सिनेमानं खरोखरच छातीभरून `श्वास' घेतला आणि झेप घेतली ती थेट ऑस्करपर्यंत!
 मराठी सिनेमाला अर्धशतकानंतर देशातल्या सर्वेत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ मिळवून देणारा `श्वास' भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवला जाणं, ही प्रत्येक मराठी माणसासाठी अतिशय सुखद आणि अभिमानाचीच घटना आहे. पण, ऑस्कर पुरस्कारांविषयी, त्यांच्यातल्या स्पर्धेविषयी, आंतरराष्ट्रीय सिनेमाविषयी अगदी कालपरवापर्यंत संपूर्णतया अजाण आणि कालपरवानंतरही मोठय़ा प्रमाणावर अजाण असलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनी आणि मराठीच्या अत्याभिमानींनी `आता श्वास ऑस्कर घेऊन आलाच' अशा प्रकारे ढोल पिटायला सुरुवात केली, तो प्रकार `शादी किसी की हो, हम तो नाचेंगे छाप आहे. `श्वास'च्या वाढत्या यशानंतर महाराष्ट्रात, मराठी माध्यमांत उमटलेली आणि जनमानसातही प्रतिबिंबित झालेली एकंदर प्रतिक्रियाही दुर्दैवाने याच प्रकारची आहे. मुळात मराठी समाजाचा स्वभाव कशानंही पटकन उचंबळणारा आहे. त्याला कोणतंही `निमित्त' पुरतं; `कारण' लागत नाही. `कारणा'साठी विचार करावा लागतो, `निमित्ता'ला ती अडचण नाही. `श्वास'च्या यशामागचं सामाजिक नेपथ्य पाहिलं तर काय आढळतं? महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत मराठीची, मराठी माणसाची पीछेहाट होत आहे. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत. इंग्रजीचं चलन आणि वळण वाढीस लागलं आहे. राज्यातली महत्त्वाची शहरं परप्रांतीयांनी `काबीज' केली आहेत. मराठी भाषा जगते का मरते, असा प्रश्न विचारवंतांना पडला आहे. मराठी जगताच्या मानबिंदूवर कुणीही कसलेही गलिच्छ शिंतोडे उडवतो आहे. आणि महाराष्ट्र तो अवमान मूग गिळून सहन करतो आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर येत्या काही वर्षांत वृत्तपत्रांत वाचकांची पत्रे लिहिणाऱया एखाद्याची वर्णी लागली तर आश्चर्य वाटायला नको, अशी स्थिती. मराठी कलांचीही तीच रड. काही विनोदी नाटकं वगळता मराठी नाटकाला प्रेक्षकांचं दुर्भिक्ष्य. मराठीत अजूनही सिनेमे निघतात हेच मुंबईसह राज्यातल्या काही शहरांमधल्या प्रेक्षकांच्या गावीही नाही. अनुदानाच्या सलाइनवर कसाबसा तगलेला मराठी सिनेमा विनोदपटांच्या आणि कौटुंबिक रडारडपटांच्या चक्रातून बाहेर पडण्याची धडपड करतो आहे... यातला अतिशयोक्तीचा भाग (तो सगळ्यांच मराठी `एक्स्प्रेशन्स'मध्ये काही टक्के गृहीत धरावा लागतो) सोडला, तर आपल्या मराठी असण्याबद्दल अहंकार सोडा, अभिमान बाळगावा असंही वातावरण नसण्याचा हा काळ. म्हणूनच येऊनजाऊन लता मंगेशकर, आशा भोसले, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर अशा, एका हाताच्या बोटावर मोजता येण्याजोग्या नावांमध्ये आपल्या अभिमानबिंदूंची गिनती संपते.
 अशा ढगाळ वातावरणाची कोंडी `श्वास'च्या अनपेक्षित यशानं फोडली आणि मग आपल्या एकदम उचंबळून आलेल्या अभिमानाचा बोजा आपण त्वरेनं `श्वास'वर लादून मोकळे झालो... वाहा आता लेको आयुष्यभर! 50 वर्षांपूर्वी आपण वनमालाबाइभवर मारलेला `श्यामची आई'चा शिक्का, माधव वझेंवर मारलेला श्यामचा शिक्का किती पक्का आहे, हे `श्वास'च्या निमित्तानं ते दोघे पुन्हा उजेडात आल्यावर समजलंच! `श्वास'कर्त्यांच्या नशिबीही त्यापेक्षा वेगळं काही असणार नाही. याची चिन्हं `श्वास'च्या टीमचे गावगन्ना सत्कार आणि `ऑस्करवारी'साठीच्या मदतफेऱयांमधून दिसताहेत.
 इथे `श्वास'कर्त्यांची कामगिरी, त्यांनी मराठी सिनेमाबद्दल मराठी समाजमानसात घडवून आणलेलं आश्चर्यकारक परिवर्तन, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये उमळून आलेलं प्रेम यांचा अनादर करण्याचा उद्देश अजिबात नाही, पण भावनेला, खासकरून लोकभावनेला पूर आला की त्यात आधी वाहून जाते ती सारासार विचाराची तर्कबुद्धी. `श्वास'च्या कौतुकासाठी शब्दांचे पाणलोट वाहवताना आपल्याला कशाकशाचा विसर पडतो आहे?
 अवघ्या वर्षभरापूर्वी मराठीत, चित्रपटाची भाषा बोलणारा एक चांगला सिनेमा तयार करण्यासाठी काही लोकांना सहकारी तत्त्वावर एकत्र येऊन, फायद्याच्या अपेक्षांना तिलांजली देऊन, केवळ हौस म्हणून काही रक्कम उभी करावी लागली होती. त्यांच्या चित्रिकरणातही अनंत अडचणी आल्या, सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी मराठीत वितरकच नाहीत. त्यामुळे, थिएटरवाल्यांच्या सोयीनं, ते सांगतील त्या अटींवर ठिकठिकाणी सिनेमाच्या प्रिंट घेऊन जाण्याची अकलात्मक हमाली `श्वास'कर्त्यांनाही करावी लागलीच. आता कोणी म्हणेल, अशा बिकट परिस्थितीतही `श्वास' निघाला, त्यानं यश कमावलं, म्हणूनच तर ते कौतुक आहे ना? तर मग विचार करा, जागतिक सिनेमाशी स्पर्धा करू इच्छिणाऱया एका सिनेमासृष्टीची अवघ्या सहा महिन्यांपूर्वी इतकी बिकट स्थिती होती?
 घटकाभर, वादाकरता हेही मान्य केलं की `श्वास'च्या यशाच्या आधीची स्थिती कुठल्याही समीकरणात गृहीत धरणंच चूक आहे. आणि आता `श्वास'च्या यशानं 1. मराठीवरचं सावट/मळभ दूर करून मराठीचं कुंद आभाळ मोकळं केलंय. 2. मराठी सिनेमाला नवसंजीवनी दिलीय, 3. मराठीची कक्षा रुंदावलीय, 4. मराठी मातीचा गंध लॉस एंजलिसला पोहोचवलाय. 5. मराठी सिनेमाला  नवा `श्वास' दिलाय... 6. मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून आलाय... संपला सगळा विशेषणं, उपमा, उत्प्रेक्षा वगैरेंचा स्टॉक? आता सांगा. `श्वास'नं उपरोल्लेखित सर्व पराक्रम गाजवल्यामुळे 1. खुद्द `श्वास'ची कमाई किती झाली? 2. `श्वास'च्या वितरणासाठी किती वितरक पुढे आले? 2. `श्वास'पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांना किती गर्दी लोटली? 3. `श्वास'कर्त्यांवर देशा-परदेशांतून, किमान मराठीतून किती ऑफर्सचा वर्षाव झाला? 4. `श्वास'च्या (राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या सिनेमाच्या सरकारी पातळीवर होतात त्या वगळून) किती भाषांमध्ये सबटायटल्ड प्रिंट निघाल्या? 5. किती भाषांमधून `श्वास'च्या हक्कांसाठी मागणी आली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे. 6. `श्वास'कर्त्यांना त्यांचा पुढचा सिनेमा हिंदीत का करायचा आहे?
 या सगळ्या प्रश्नांची खरीखुरी उत्तर शोधली तर आपण जरा जमिनीवर येऊ आणि आपल्याच गल्लीतल्या सत्कारबाजीच्या, हारतुऱयांच्या पलीकडच्या यशाची वाट, जी नि:शंकपणे `श्वास'नंच मोकळी केली आहे, नेमकी कशी आहे, ती किती बिकट/ सुकर आहे, याचा विचार करायला लागू.
 प्रतिष्ठेचं सुवर्णकाळ मराठीच्या वाटय़ाला येईल, अशी शक्यता सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या `वास्तुपुरुष'च्या वेळीच निर्माण झाली होती; काही तांत्रिक कारणांनी तो डिबार झाला होता. असं म्हणतात. तसं असेल, तर ते दुर्दैवाचं आहे. कदाचित आज `श्वास'ला लाभलेलं कौतुक त्याला लाभलं असतं... पण, खरंच तेवढं कौतुक लाभलं असतं का? कारण, सुवर्णकमळांनतर `श्वास'ला उदंड गर्दीचाही प्रतिसाद लाभला आहे; तो `वास्तुपुरुष'ला  लाभला असता का? उत्तर कठीण आहे. `वास्तुपुरुष' हा `श्वास'इतका आकलनाला सोपा पचायला हलका, सुबोध सिनेमा नाही. अर्थात, तसं असणं हा `श्वास'चा दोष नाही. एकतर कथानकानुसार सिनेमाची प्रकृती ठरते आणि सोपा सिनेमा काढणं हे सोपं लिहिण्यासारखंच अवघड काम आहे. मुद्दा इतकाच की, आपल्या प्रेक्षकांना सिनेमात किंवा अन्य कलांमध्ये व्यामिश्रता, गुंतागुंत, सखोल सघन अनुभव यांचं वावडं आहे. घटकाभर विचार करा की, `श्वास'ला हेच यश लाभलं असतं आणि त्याची कथा मात्र आतासारखी सरळमार्गी, डोळ्यांत पाणी किंवा घशात आवंढा दाटून आणणारी नसती, तर त्याला एवढा मोठा प्रेक्षक प्रतिसाद लाभला असता का? तशी भारतात परंपराच नाही. नाहीतर ज्या सिनेमांनी सत्यजित राय यांना जगभरात नावलौकिक मिळवून दिला, सगळ्या जगानं ज्या सिनेमांमधून `भारतीय सिनेमा' आस्वादला, ते राय यांचे सिनेमे भारतात सुपरडय़ुपर हिट ठरायला हवे होते. (हेच भागधेय जपानमध्ये अकिरा कुरोसावाच्याही वाटय़ाला आलं होतंच)
 कलामाध्यमांमधून दुसऱयाचं दु:ख पाहून जेव्हा माणूस वरकरणी हळहळतो, तेव्हा आतून मात्र आपल्या किंवा आपल्या आप्तजनांच्या वाटय़ाला ते दु:ख आलेलं नाही, त्याबद्दल तो सुटकेचा सुस्काराच टाकत असतो, असं कलाआस्वादनाचा मानसशास्त्राeय धांडोळा घेणारे सांगतात. त्यातूनच तयार झालेला. एका असहाय पात्रावर कोसळणाऱया असामान्य दु:खाचा, ट्रजेडीचा सुपरहिट फॉर्म्युला (नकळत का होईना) `श्वास'मध्ये आहे. कौटुंबिक मराठी `कुबल'पटांच्या यत्तेपेक्षा `श्वास'यत्ता फारच वरची आहे. पण, निव्वळ कथासूत्राच्या पातळीवर पाहिलं तर तिथे दु:खांचा डोंगर उपसणारी असहाय बाई असते. इथे एक छोटा मुलगा आहे. (छोटय़ा निरागस मुलांचा वापर हाही यशाचा एक फॉर्म्युलाच; `श्वास' कर्त्यांचं यश असं की, हा मुलगा त्यांनी `फिल्मी' पद्धतीनं लाघवी वगैरे होऊ दिलेला नाही.) इथेही मोठय़ा प्रमाणावर, जवळपास 95 टक्के सिनेमा या ट्रजिडीभोवती फिरतो... `परश्यावर म्हणजेच विचारे कुटुंबाच्या वंशाच्या दिव्यावर कोसळलेला प्रसंग' आपण पाहात असतो. पण, हा काही `श्वास'च्या मूळ कथासूत्राचा पाया किंवा गाभा नाही. सिनेमातले आजोबा जेव्हा अंत:प्रेरणेतून एक क्रांतिकारक निर्णय घेतात आणि मुलाचे/ नातवाचे डोळे कायमचे अंध:कारात लोटले जाण्याआधी त्याला हवंहवंसं जग त्याच्या डोळ्यांत साठवून घेण्यासाठी फिरायला नेतात, तेव्हा तो सामान्यांमधल्या असामान्यत्त्वाची प्रचीती देतो आणि ते कथानक `श्रेष्ठते'च्या पातळीवर पोहोचतं...
 `श्वास'च्या आस्वादनात मात्र ट्रजेडीचा भाग ठळक राहतो आणि कथानकाचा उत्कर्षबिंदू पाहता पाहता निसटून जातो... सिनेमा साधा ठेवायचा, काहीही `हॅमर' करायचं नाही, अकारण गडद करायचं नाही, अशी प्रतिज्ञा घेऊनच दिग्दर्शक सिनेमाच्या मैदानात उतरला आहे. (असा एक दिग्दर्शक मराठीत निर्माण झाला आहे, हे आपलं, माहेरचं म्हणा वा सासरचं, सौभाग्यचं.) पण, परश्यानं `शेवटचं' पाहिलेलं जग ही एक घडामोड त्याच्या आयुष्यात आणि सिनेमाच्या अवकाशात सर्वात महत्त्वाची आहे, ती या चिजेची सम आहे; तिच्यावर येताना, तिच्यातले सर्व नाटय़मय पैलू आणि भावनिक कल्लोळ दृश्यरुपात व्यक्त करताना दिग्दर्शकानं थोडं भावनाशील व्हायला काय हरकत होती? साथीला संजय मेमाणेसारखा अफलातून कॅमेरामन असतानाही हा प्रसंग कोरडय़ा माँताजसारखा सरकतो; परश्या आंधळा होणार, तर त्याला आंधळ्यांची शाळा फिरवून आणण्याइतका ढोबळ होतो. आणि परश्यानं पाहिलेलं जग दिग्दर्शक `त्याच्या' नजरेतून कधीच दाखवत नाही...!
 गंमत म्हणजे, इथे `साधेपणा' न सोडणाऱया पटकथाकार- दिग्दर्शकानं या कळसाध्यायाला येण्याआधी बऱयाचदा अकारण व्याप वाढवला आहे. या कथानकाचा जीवच मुळात लघुकथेचा, त्यामुळे लघुपटाचा. त्याची 90 मिनिटांची फिल्म करण्यासाठीही पटकथेत बराच `मालमसाला' तो तसा भासणार नाही अशा रीतीनं, पेरावा लागला आहे. सिनेमातली सोशल वर्कर मुलगीच पाहा. सगळ्या सिनेमाशी विसंगत अशा, अभिनयाच्या वरच्या पट्टीत सतत वावरणाऱया या व्यक्तिरेखेचं नेमकं प्रयोजन काय? सिनेमात कॅन्सरसारखा, प्रेक्षकाला `समजावून सांगणं आवश्यक असलेला अवघड वैद्यकीय विषय आहे. पण, ते काम डॉक्टर साने व्यवस्थित करतात, त्यासाठी या `ताई'ची गरज नाही. हॉस्पिटलमधली गुंतागुंतीची कागदपत्रं भरण आणि परश्याला त्याचे डोळे जाणार हे समजावून सांगणं या कामांत तिचा मोठा रोल दिसतो; पण, मुळात ही सगळी प्रक्रियाच गरजेपेक्षा ताणलेली, वाढीव दिसते.
 सगळ्या घटनाक्रमाचा फोकस आजोबा आणि परश्या यांच्यावर ठेवण्यासाठी परश्याच्या मामाला बिचारेपणा करत वावरत राहण्यापलीकडे काम उरत नाही. पण, हा हेतू साधण्यासाठी मोबाइलच्या युगातली परश्याची आई, लेकराचे डोळे जाणार म्हटल्यावरही, आहे तशी उठून पुण्याला यायला निघतच नाही, हे पचणं कठीण आहे. ऑपरेशनच्या घाईमुळे असं होतं म्हणावं, तर मुळात परश्याच्या ऑपरेशनची अर्जन्सीच सिनेमात संदिग्ध आहे. एका ठिकाणी डॉक्टर साने सांगतात, `सहा महिने किंवा वर्षभरानंतर आलात, तर माझ्याही हातात काही उरणार नाही. आता या वाक्याचा व्यत्यास काढला, तर हे ऑपरेशन लगेचच, तातडीनं करावं लागेल असा अर्थ निघत नाही. महिना-पंधरवडय़ाची मुदत मिळू शकते, म्हणजे ठरवल्यास परश्याची कोकणची वारी, आईची भेट, चांदणी या वारसाचं नामकरण असं सगळं घडू शकतं. `सडय़ावरचं चांदणं त्याला दाखवायचं राहिलं', अशी खंत आजोबांना व्यक्त करायची पाळीच आली नसती.
 आणि सिनेमा जास्तीत जास्त `साधा' `सरळ' `कमी माणसांचा' ठेवण्यासाठी इतक्या तडजोडी करणारी ही पटकथा ऐन मोक्याच्या क्षणी मात्र भलत्याच `फिल्मी ड्राम्या'त अडकते. परश्याच्या आजोबांनी त्याला `पळवून' नेणं, त्या घटनेला दिलेला एका मोठय़ा ऍक्सिडेंटचा बॅकड्रॉप, त्यात आजोबांनी परश्याबरोबर आत्महत्या तर केली नसेल ना, अशा शंकेनं सोशल वर्कर ताई आणि मामा यांनी केलेला `मेलोड्राम्याटिक अभिनयकल्लोळ' या सगळ्या फाफटपसाऱयातून साधतं काय? तर प्रेक्षक या अतिरंजित नाटय़ातून सावरतो ना सावरतो, तो तोच सिनेमाचा उत्कर्षबिंदू येतो आणि तो मात्र अगदी थोडक्यात आटोपतो; प्रेक्षकाचं अनुसंधान जुळेजुळेपर्यंत निसटूनही जातो...
 ... साधेपणा हाच सर्वात मोठा गुण असलेला हा सिनेमा जिथे जिथे सिनेमॅटिक मांडणीच्या ओढवून घेतलेल्या कम्पल्शन्सपायी कथेचा अंगभूत साधेपणा सोडतो, तिथे तिथे कृत्रिम आणि रेंगाळवाणा होतो. `लाइफलाइन' किंवा तत्सम वैद्यकीय पार्श्वभूमीच्या मालिका आणि `आनंद'च्या धाटणीचे (दर्जाचे नव्हे) आशावादी `संदेश' देणारे सिनेमे यांच्यापेक्षा या सिनेमाला कैक योजने वर नेणारं एलिमेंट `श्वास'च्या कथानकात आहे. ते ऐन मोक्याच्या क्षणीच बाजूला पडतं आणि सिनेमा `ग्रेट' न बनता `चांगल्या सिनेमा'च्याच कॅटेगरीत राहतो.
 आता, या सगळ्या ऊहापोहाचा `श्वास'च्या ऑस्करवारीशी संबंध काय?
 तर तो असा की, मराठी सिनेमाच्या एकूण वाटचालीमध्ये `श्वास' हा मैलाचा दगड आहे. सिनेमाच्या भाषेची भारतवर्षाला ओळख करून देणारा मराठी सिनेमा नंतर बराच काळ साहित्यिकांची जड भाषा बोलत राहिला, मग शिवरायांचे पवाडे गात राहिला, काही काळानं त्यानं लावणी घुमवली, मग द्वयर्थी चाबरटपणा करून पाहिला, मग द्वयर्थासाठी आवश्यक अक्कलही न लढवता नुसताच चाबरटपणा करत राहिला. या सगळ्या भानगडीत मराठी सिनेमा, सिनेमाची भाषा विसरूनच गेलाय की काय, अशी शंका येण्याजोगी परिस्थिती होती. काही मोजक्या दिग्दर्शकांनी सिनेमाची भाषा उत्तम रीतीनं बोलणारे सिनेमे दिले खरे; पण, सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल, भिडेल असं कथानक, साध्या माणसांची साधी गोष्ट, पॉप्युलर गिमिक्सच्या वाटेला न जाता, निखळ सिनेमाच्या भाषेत मांडू पाहणारा पटकथाकार- दिग्दर्शक हा योग मराठीत खूप काळानंतर जुळून आला आहे. अनुदानावर न विसंबता यशाचे आडाखे नाकारून आपल्याला हवी तशी निर्मिती करून एवढं मोठं यश कमावता येतं, हा विश्वासही `श्वास'नं मराठी सिनेमातल्या तमाम धडपडणाऱया मुलांना दिला आहे.  
कोकणच्या निसर्गसंपन्न भूमीचं आपल्याच सिनेमात घडलेलं सर्वात उत्तम दर्शन इथे आहे. डॉक्टर सानेंची `अदृश्य' बायको, ब्रशच्या मोजक्या फटकाऱयांत साकारणाऱया चित्रासारखी परश्याची आई, लघळपणा न करता लहान मुलांसारखंच नैसर्गिक (बऱयाचदा मोठय़ांना वात आणणारे) वागून मनांत घुसणारा परश्या, परश्याचे डोळे जाणार आहेत. हे त्याला सांगण्यासाठी घडवून आणलेला डॉक्टर सान्यांच्या घरातल्या प्रभावी प्रसंग, त्यात परश्यानं अभावितपणे टाकलेला गुगली, त्याचा हॉस्पिटलमधला मूक उद्रेक, त्याचा गावातला, घरातला मुक्त वावर टिपताना सहजतेची कमाल गाठणारी, मनावर कोरली जाणारी दृश्यं, धावत येऊन दरीकडे झेपावणारा परश्या आणि चपापून त्याला ओढून घेणारे आजोबा... अशी मराठीनंच नव्हे, तर जगातल्या कोणत्याही भाषेतल्या सिनेमानं अभिमानानं मिरवावी, अशी दृश्यं या सिनेमात आहेत. मराठीसाठी हा अतिशय अनोखा अनुभव आहे.
 पण, प्रामुख्यानं मल्याळम आणि बंगाली या दोन्ही भारतीय भाषांत आणि काही प्रमाणात कानडीमध्ये अशा सिनेमांची सशक्त परंपरा आहे. तिथे साध्या माणसांचा साधा पण प्रभावी सिनेमा ही नवलाई नाही. त्या सिनेमाशी परिचय असणाऱया प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, आपल्याला आवडो वा नावडो, `मराठी सिनमाही आता या पातळीवर पोहोचला तर', अशी आणि एवढीच, प्रतिक्रिया उमटू शकते.
 आणि ऑस्करमध्ये ज्या श्रेणीत `श्वास'नं पहिली फेरी पार केली आहे, तिथली परिस्थिती काय?
 ऑस्करनं भारताला आणि भारतानं ऑस्करला सिरीयसली घ्यायला सुरुवात होऊन फारसा काळ लोटलेला नाही. हा हॉलिवुडच्या केंद्रस्थानी दिला जाणारा तोही मुख्यत: `पॉप्युलर' धाटणीच्या सिनेमांसाठीचा पुरस्कार आहे. सिनेमाकलेत क्रांती घडवून आणणाऱया, जागतिक सिनेमाच्या वाटचालीत श्रेष्ठतम ठरलेल्या अनेक सिनेमांना तो लाभलेला नाही. तरीही, जगातल्या कोणत्याही भाषेतल्या सिनेमाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक वेगानं घेतली जाते ती ऑस्करचा टिळा लागल्यावर.
 `मदर इंडिया' जेव्हा ऑस्करच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा भारतालाही ऑस्करची मातब्बरी वाटत नसावी बहुतेक त्या सिनेमासाठी कुणी काही खास प्रयत्न केल्याची नोंद सापडत नाही. आणि `मदर इंडिया' जेव्हा पाश्चात्य जगात पहिला गेला तेव्हा त्यावरच्या प्रतिक्रिया फारच एकांगी होत्या. भारत नामक देशाची स्वत:ची काही सांस्कृतिक सामाजिक परंपरा असू शकते आणि तिच्यातून आकारलेली काही सिनेमानिर्मितीची स्वतंत्र शैली असू शकते, याचं भानच या टीकाकारांना नव्हतं, त्यामुळे त्यांनी `बटबटीत' असा शिक्का साक्षात `मदर इंडिया'वर मारला होता. त्यानंतरही बराच काळ हॉलिवुडची मंडळी भारतीय सिनेमाचा वास आला की नाकावर रुमाल दाबून घेत असत. आणि त्यांचं ते काम सोपं करणाऱया बाळबोध एन्ट्रय़ा भारताकडून जात होत्या भारतातून जाऊन स्थायिक झालेल्या अनिवासींनी पाश्चात्य देशात सन्मानाचं स्थानं मिळवलं आणि भारत ही मोठी बाजारपेठ आहे, याचं तिकडे भान आलं तेव्हा भारतीय सिनेमाची शैली हा एक वेगळा प्रकार आहे. याला मान्यता मिळू लागली. `लगान'साठी आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर यांनी घेतलेल्या मेहनतीनंतर खऱया अर्थानं भारतात ऑस्करयुग सुरू झालं...
 ... पण, ऑस्करमध्ये भारतयुग सुरू होणार का? आणि ते सुरू करण्याचा मान `श्वास' पटकावू शकेल का?
 ...संधी निश्चितच आहे. आता `श्वास'नं दुसरी फेरी गाठल्यानंतर तर ती वाढलीही आहे. पण, `लगान'ला `श्वास'पेक्षा जास्त संधी होती; कारण, `लगान'ची चित्रभाषा ऑस्करवाल्यांसाठी नवी होती. तिथे `लगान' त्याच्या `भाषे'तला एकमेव सिनेमा होता, त्याला स्पर्धा नव्हतीच. परीक्षकांना हिंदी मेनस्ट्रीम सिनेमाची शैली भावली असती तर `लगान'ला पर्याय नव्हता...
 पण, `श्वास' आंतरराष्ट्रीय सिनेमाची `प्रमाणभाषा' बोलतो, त्यामुळे त्याला त्या भाषेतल्याच अधिक ताकदवान स्पर्धकांशी झुंजायचं आहे... त्यामुळेच `श्वास'ची लढाई अधिक बिकट आहे आणि यश लाभलंच, तर त्याचं मोलही तेवढंच मोठं असेल...
 ... पण, आजघडीला एका मराठी सिनेमाच्या `ऑस्कर'मधल्या चान्सेसविषयी आपण बोलतो आहोत, आडाखे बांधतो आहोत, `अँड मराठी गोज टू ऑस्कर...' ही कामगिरी आपण करू शकलो आहोत, हेच स्वप्नवत आहे...
 ... तर मग `ऑस्कर कम्स टू मराठी...' हे स्वप्न पाहायला हरकत काय!


(महाराष्ट्र टाइम्स, दिवाळी, २००४)


No comments:

Post a Comment