Tuesday, June 28, 2011

खरे सुपरस्टार! (सलीम-जावेद)

' सरहदी लुटेरा' नावाचा १९६६चा सिनेमा आज कुणाच्या लक्षात असण्याचं काही कारण नाही...

... तरीही तो लक्षात ठेवावा लागतो.

या दिवशी हिंदी सिनेमातले दोन सुपरस्टार एकमेकांना भेटले.

एक त्या सिनेमात अभिनय करत होता. त्याच्या अभिनेता म्हणून अखेरच्या सिनेमांपैकी तो एक. त्याच सिनेमात दुसरा क्लॅप देत होता. उरलेल्या वेळात रस्त्यावर फाके मारत फिरत होता. त्या सिनेमाच्या लेखकाच्या आजारपणामुळे सेटवर डायलॉग दुरुस्तीची आणि नंतर डायलॉग लिहिण्याची संधी क्लॅप देणाऱ्याला मिळाली. त्यानंतर हे दोघे एकत्र आले. सिप्पी फिल्म्सच्या रायटिंग डिपार्टमेंटमध्ये बराच काळ पेन झिजवल्यानंतर दोघांच्या दोन गोष्टी लक्षात आल्या... एक म्हणजे, आपण दोघेही डोकेबाज आहोत आणि दुसरी म्हणजे, आपलं छान ट्यूनिंग जमतं.
 
 
त्या आधारावर दोघांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला... सिप्पी फिल्म्सच्या रायटिंग डिपार्टमेंटमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे पण जोडीने काम करण्याचा...

... सलीम-जावेद या जोडीचा तो जन्म होता. या दोघा कफल्लक तरुणांच्याच आयुष्यातली ती क्रांती नव्हती. ती भारतीय सिनेमातली क्रांती होती.

काय केलं नाही सलीम-जावेदनी.

 
मास्टरजी-मुन्शी म्हणून हेटाळले जाणारे सिनेमाचे लेखक हेच सिनेमाचे खरे स्टार असतात- नव्हे सुपरस्टार असतात- याचं भान या मुर्दाड इंडस्ट्रीला आणून दिलं या दोघांनी. नट कोणताही असो, दिग्दर्शक कुणीही असो- सिनेमा 'सलीम-जावेदचा' म्हणून ओळखला जायचा. सिनेमाच्या पोस्टरवर सगळ्यांच्या टाळक्यावर 'सलीम-जावेद कृत' असं ठसठशीतपणे लिहायला लावलं या दोघांनी या इंडस्ट्रीला.

 
तोवरचे सिनेमे साजुक तुपातली भाषा बोलायचे आणि रागही पुस्तकी प्रमाणभाषेत व्यक्त करायचे. आदर्शांचा, मूल्यांचा जयघोष सुरू होता नुसता. स्वातंत्र्यानंतरच्या २५ वर्षांत झालेल्या ऱ्हासाचं कोणतंही प्रतिबिंब त्यात नसायचं, ना पब्लिकच्या भ्रमनिरासाचं. खदखदणाऱ्या असंतोषापासून दूर काश्मीर की वादियों में पळणारा हिंदी सिनेमा गोऱ्यागोमट्या गोड गुलगुलीत नायिकांचा आणि तशाच तुपकट तृप्त नायकांचा होता. त्यांच्या गराड्यात या पठ्ठ्यांनी भुकेनं वखवखलेला, संतापानं पेटलेला, मूल्यबिल्यं फाट्यावर मारून या कठोर जगात यशस्वी होण्यासाठी धडपडणारा 'अँग्री यंग मॅन' आणून उभा केला. त्यांचा 'विजय' साकारायला अमिताभ होता, हे एक बरे झाले. ('जंजीर' देव आनंदने नाकारला नसता आणि तो हिट झाला असता, तर काय झालं असतं विचार करा.)  


अतिशय चमकदार कथाकल्पना, वेगवान-बांधेसूद पटकथा आणि चुरचुरीत-खटकेबाज डायलॉग यांच्या बळावर सलीम-जावेदनी जवळपास दशकभर हिंदी सिनेमावर राज्य केलं. त्यांच्या स्क्रिप्टवरच नव्हेत, तर डोक्यात असलेल्या कल्पनेवरही पैसा लावला निर्मात्यांनी आणि तो वसूल केला. लेखकाला चपराशासारखं वागवणाऱ्या या इंडस्ट्रीची सलीम-जावेदच्या स्क्रिप्टमधला एक स्वल्पविरामही बदलण्याची टाप नव्हती...
 

 ... ते प्रसिद्धीच्या, यशाच्या शिखरावर होते तेव्हापासून ते अगदी आज त्यांची जोडी फुटल्यालाही २० वर्षं उलटून गेली तिथपर्यंत एक सवाल कायम त्यांचा पिच्छा पुरवत आलाय... 'सलीम-जावेदपैकी कोण काय लिहीत होतं?'

त्यावर तेव्हापासूनचं त्यांचं उत्तर होतं, ''आमच्यातला एक नामं लिहितो, तर दुसरा क्रियापदं लिहितो.''

 
हा एकोपा जेव्हा मनातून संपला (कसा, कधी वगैरे प्रश्ानंची उत्तरं दोघांनीही कधी दिली नाहीत) तेव्हा दोघांनीही क्रिएटिव्ह फारकत घेतली. स्वतंत्र मार्ग चोखाळून पाहिले. पण, दोघांनाही नामं आणि क्रियापदं दोन्हीही एकट्यानं लिहिणं तितकंसं जमलंच नाही.

सलीम अजरामर होईल की नाही, कोण जाणे. जावेद अजरामर होईल की नाही, कोण जाणे.

   
सलीम-जावेद मात्र अजरामर आहेत.




(महाराष्ट्र टाइम्स) 







No comments:

Post a Comment