Tuesday, June 28, 2011

मॅजिकल रिअॅलिटी (जान-ए-मन)

सामान्य हिंदी सिनेमाच्या कथा सांगण्याच्या तंत्राला सरावलेल्या प्रेक्षकांना धक्के देत शिरीष कुंदेर दिग्दशिर्त 'जाने-ए-मन' पुढे जातो, तेव्हा हिंदी सिनेमाच्या पडद्यावर प्रथमच आणलेल्या 'मॅजिकल रिअॅलिझम'मुळे रूटीन प्रसंगांमध्ये बहार येते. हे 'वास्तवा'त घडत नाहीये, तर भावनांच्या प्रवाहांनी निर्माण केलेल्या चौथ्या भिंतीतल्या जगात घडतंय ही मॅजिकल रिअॅलिटीचा अनुभव देण्यात शिरीष यशस्वी झालाय...

चा, तुम्हाला कसं सांगू माझ्या आयुष्यात काय झालं ते,' बोनीचाचाच्या स्टायलिश ऑफिसमध्ये सुहान कपूर आपल्या प्रेमाची, लग्नाची दास्तान सांगू लागतो... खाडकन दोघांचे चेहरे अंधारात जातात. मागच्या भिंतीच्या जागी सिनेमाचा पडदा तयार होतो. चक्रावून चाचा विचारतो, 'ये क्या है?' सुहान सांगतो, 'फ्लॅशबॅक!' ... आणि चाचाचा हात धरून त्याला थेट त्या पडद्यातच घेऊन जातो.
 
 
चाचा आणि सुहान हे दोघे मिळून अगस्त्य नामक 'बकऱ्या'ला पटवण्यासाठी आयडिया लढवताहेत. चाचाच्या तोंडून नकळत गाण्याच्या ओळी बाहेर पडतात... खड् खड् खड् खड्... दरवाजा वाजू लागतो... तिघेही चक्रावून दारापाशी येतात. दार उघडून कव्वालीचे साजिंदे आत येतात. जागा पकडतात. चाचा चक्रावून विचारतो, 'तुम्ही सगळे कोण?' त्यांच्यातला एक उत्तरतो, 'म्युझिक क्या तेरा बाप बजाएगा?' ... आणि संगीतसाथीत गाणं सुरू होतं.

 
शिरीष कुंदेर लिखित, दिग्दशिर्त, संकलित (शिवाय बॅकग्राऊण्ड म्युझिकही त्याचंच) 'जान-ए-मन' हा सिनेमा, सामान्य हिंदी सिनेमाच्या कथा सांगण्याच्या तंत्राला सरावलेल्या प्रेक्षकाला असे धक्के देत पुढे जात राहतो. तो संपल्यावर बाहेर पडलेल्या प्रेक्षकाला तो आवडलेला असो वा नसो, पण काहीतरी अद्भुत पाहिल्याचं सुख त्याला मिळालेलं असतं.

 

'मै हूँ ना'चा संकलक आणि कोरिओग्राफर फरहा खानचा नवरा ही आजवरची ओळख असलेल्या शिरीषचा हा पहिलाच सिनेमा आहे. पहिल्या सिनेमावर दिग्दर्शक किती प्रकारची मेहनत घेऊ शकतो आणि एकाच माणसात वेगवेगळ्या क्षेत्रातली किती गुणवत्ता ठासून भरलेली असते, याची चुणूक हा सिनेमा देतो. 'जान-ए-मन' ही वरवर पाहता एक सामान्य प्रेम त्रिकोणाची फिल्मी स्टोरी आहे. अगदीच ढोबळ, प्रेडिक्टेबल आणि ओव्हरइमोशनल! त्याबद्दल काही परीक्षकांनी त्याला धारेवरही धरलंय. पण, मुळातच स्टोरीटेलिंगचं अतिशय धक्कादायक, नॉव्हेल तंत्र वापरलेलं असताना कथाही वेगळी घेण्याचा जुगार शिरीषने खेळलेला नाही, हे योग्यच म्हणायला हवं. एवढा खर्च करून एकीकडे सिनेमॅटिक लिबर्टी घेत असताना दुसरीकडे निर्मात्याचा पैसा वसूल करून देणारं काहीतरी सिनेमात राखणं आवश्यकच होतंच.
 
 
एक मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेले दोन तरुण, ही स्टोरी इथे थोड्या वेगळ्या पद्धतीने येते. शेवटापासून सुरू होते. थेट अंतराळात. तिथूनच हे प्रकरण वेगळं आहे, हे समजू लागतं. नंतर सुहान कपूर (सलमान खान), पिया गोयल (प्रिटी झिंटा) आणि अगस्त्य राव (अक्षयकुमार) हा त्रिकोण आणि चाचूच्या डबल रोलमधला अनुपम खेर या चार जणांमध्ये जेव्हा हा सिनेमा फिरतो, तेव्हा शिरीषने हिंदी सिनेमाच्या पडद्यावर प्रथमच आणलेल्या 'मॅजिकल रिअॅलिझम'मुळे रूटीन प्रसंगांमध्ये बहार येते. हे 'वास्तवा'त घडत नाहीये, तर भावनांच्या प्रवाहांनी निर्माण केलेल्या चौथ्या भिंतीतल्या जगात घडतंय, इतकं समजत जातं आणि ते छान एन्जॉय करता येतं. 'ऑपेरा' पाहिलेल्या किंवा नाटकातल्या काही प्रयोगांची ओळख असलेल्या प्रेक्षकाला यात अनेक ओळखीच्या खुणा सापडू शकतात.

 
सिनेमाच्या उत्तरार्धात खास पंजाबी वळणाने लग्न ठरणं, प्रपोझ करणं, ४२ नातेवाईकांनी मिळून एका सुरात गाणे म्हणणं वगैरे कंठाळी प्रकार सुरू होतात, तेव्हा उबग येतो. तीन माणसांच्या भावविश्वातून हा सिनेमा आसपासच्या वास्तवात थेट उतरतो, तिथे जाम बोअर मारायला लागतं. अर्थात, त्यातून सावरून तो पुढे मूळ पदावर येतो आणि इंटरेस्टिंग शेवटावर जातो, पण तोवरचा वेळ सहनशक्तीची कसोटीही पाहू लागतो.

 
ही स्टोरी थोडीशी बाजूला ठेवून हा सिनेमा पाहायला हवा. सेट्स, लायटिंग, सिनेमॅटोग्राफी, सीन्सची रचना, दृश्यरचना, मिक्सिंग, स्पेशल इफेक्ट्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पटकथा-संवाद लेखन यांच्यातून शिरीषने एक जादुई प्रतिसृष्टीच निर्माण केली आहे. आश्चर्य म्हणजे, कागदावर काळ्यापांढऱ्या अक्षरांत वाचून अशा सिनेमाची काहीच टोटल लागू शकत नाही. तरीही सलमान, अक्षय, प्रिटी आणि अनुपम खेर यांनी पहिल्या फ्रेमपासून सिनेमाची जातकुळी परफेक्ट पकडून त्यासाठी योग्य अभिनयशैली वापरली आहे. सरप्राइझ पॅकेज आहे तो अक्षयकुमार. त्याचा बावळट, नीरस चिम्पू पुढे 'नासा'चा शास्त्रज्ञ झाल्यानंतरही अवघडलेला राहतो, हे त्याने फारच झकास दाखवलंय. 
(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment