Tuesday, June 28, 2011

पकडा गया वो चोर है...

आधी शक्ती कपूर... आता अमन वर्मा... उद्या आणखी कोणी...

...
पब्लिकला पैसा फेकण्याचीही तोशीस न देता तमाशा सुरू आहे... फाकडू पोरींच्या रूपानं एका चॅनेलनं जाळं टाकलं आहे... त्यात बडे मासे अडकलेले आहेत... त्यांचे कामुक कारनामे आणि पर्दाफाश झाल्यानंतरची लोळण पाहून मंडळी टाळ्या पिटताहेत... ' यांना बहिष्कृत करा ' , ' फासावरच लटकवा साल्यांना ' अशा शिक्षा फर्मावल्या जाताहेत...

...
साहजिकच आहे... संधीच न मिळाल्यानं सज्जन राहिलेल्यांची समाजात नेहमीच बहुसंख्या असते. त्यांना प्रकाशझोतातल्या माणसांचं हे ' नैतिक अध:पतन ' पाहताना ' हिट अँड हॉट ' सिनेमा पाहात असल्यासारख्या मिटक्याही मारता येतात आणि डोळे निवल्यानंतर नीतीमूल्यांवरची पुस्तकी लेक्चरंही झोडता येतात...

 
या सगळ्या प्रकाराला लैंगिक शोषणाचा जो अँगल दिला जातोय , तो कितपत खरा आहे ?...

या ' स्टिंग ऑपरेशन ' मध्ये तथाकथित महिला ' शोधपत्रकार ' इतका सातत्यपूर्ण , सुस्कारेबाज गळेपडूपणा करीत होत्या की शक्ती कपूर किंवा अमन वर्मा यांच्या जागी आपण असतो तर ? अशी कल्पना करून प्रामाणिक उत्तर (अर्थातच स्वत:शी) द्या , म्हणजे या प्रकाराचा फासिर्कल बाज लक्षात येईल.

 
इथे एक गैरसमज तात्काळ दूर करू या... सुंदर स्त्रियाच या ' शोषणा ' च्या बळी ठरतात , हे मिथक आहे. इथे पुरुषांनाही बऱ्याचदा संधीसाठी शरीराचीच किंमत मोजण्याचा मार्ग पत्करावा लागतो. बेढब शरीराचे अतृप्त निर्माते जेव्हा नट्यांच्या मागे धावत असतात , त्याचवेळी या निर्मात्यांच्या अतृप्त , बेढब बायकांपासून ' पेज थ्री ' च्या सकिर्टमध्ये वावरणाऱ्या हाय सोसायटी ' लेडीज ' पर्यंत अनेक मालदार बायका तरुण , पिळदार नटांच्या मागे धावत असतात. आणि आघाडीच्या अनेक नटांसह इथे स्त्रीदेहाच्या ' मोनोटोनी ' ला विटलेल्या पुरुषांची संख्या कमी नाही. त्यांना , कोवळे पुरुष पुरवण्याचीही व्यवस्था इंडस्ट्रीत आहे...

...
हे सगळं काय आहे ?

 

... हा एक रोकडा व्यवहार आहे. हा एक बाजार आहे. त्यातली विक्रयवस्तू ठरलेली आहे. तिची किंमतही ठरलेली आहे. काही लोक ती वसूल करतात , काहींना ती चुकवावी लागते. आणि पडद्यावरून सुंदर शरीरच ( सुंदर चेहऱ्यापासून ते ठसठशीत अवयवांपर्यंत) विकायचं ठरलं असेल , तर मग पडद्यामागची ' कमॉडिटी ' वेगळी कशी असेल ? शरीर ही इथली ' करन्सी ' आहे , व्यवहार त्याच चलनात होतात.

पण , असं अभद ' चलन ' चालतं तरी कसं ?

 
आणखी एक विचार करून पाहा. आज कोणत्याही क्षेत्रात पारंगत व्हायचं , तर आपण किती मेहनत करतो ? किती वर्षांच्या उरस्फोडीनंतर आपल्याला ' लाइफ ' मध्ये ' सेटलमेंट ' मिळते ? त्या स्थिरावण्यानंतर आपलं उत्पन्न काय असतं ? काही लाख रुपये आपल्या गाठीला जमा व्हायला किती वर्षं जावी लागतात ?

मग , त्याच्या कैकपट पैसे एका दिवसात , एका रात्रीत मिळावेत , प्रसिद्धीचं , ग्लॅमरचं वलय लाभावं अशी या जगात येऊ पाहणाऱ्या कितीजणांची किंवा जणींची खरी पात्रता असते ? मग समृद्धीची कवाडं उघडणारी ती संधी देणाऱ्यानं तरी त्यांनाच का द्यावी ?...
 
 
तिची ' किंमत ' मोजावीच लागते...

...
ती रंगमंचाची किंवा कलेची किंवा मायबाप रसिकांची सेवा करण्याच्या कंडापोटी मोजत आहोत , असा समस्त कलाकारांचा एक रुद्ध कंठाने करायचा दावा असतो. पण , इथे येणारे बहुसंख्य येतात झटपट ग्लॅमर आणि पैशासाठीच!

 
कलेची ओढ आणि टॅलेंट यांच्या बळावर पोहोचणारे आणि टिकून राहणारेही इथे आहेतच , पण त्यांची संख्या कमी आहे. मोठ्या प्रमाणावर अर्धकच्च्या मंडळींनाच इथे रातोरात स्टार बनायचं असतं. ती संधी त्यांना देण्यासाठी निर्माते ' स्टोरी सिटिंग ' करतात , त्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी किंवा दूर गोव्यात भावी नट- नटीला घेऊन जातात. काही व्यवहार देशांतर्गत मिटवणं अशक्य असतं. तेव्हा परदेशांतली प्रेमगाणी हा उत्तम मार्ग निघतो. कुणाच्याही मागे देशी भुणभुणी नसतात. तिथे ' हिशोब ' सेटल केला जातो. ही हौस इतकी दांडगी की , अमुक एक नटी उपभोगायला मिळावी म्हणून सिनेमा काढणारे कमी नाहीत. नव्या नट्या उपभोगून वाऱ्यावर सोडण्यासाठी सिनेमांचे खोटे मुहूर्त करून , काही रिळांचं फुटकळ शूटिंग करून कार्यभाग साधला की सिनेमा डबाबंद करणारे महाभागही आहेत.
 
 
आणि जसा या व्यवसायातला वावर वाढतो तसा व्यवहार वाढतो , त्याहून जास्त गैरव्यवहार वाढतो. तो झाकायची , रेग्युलराइझ करायची गरज पडते. सर्व ठिकाणांहून बेकायदा फेवर स्वीकारण्याची चटक लागते. नाहीतर , उच्चपदस्थ राजकारणी , इन्कमटॅक्ससारख्या खात्यांचे उच्च अधिकारी , दुबईवाल्या डॉन मंडळींचे शार्पशूटर ' बच्चे ' यांना या ग्लॅमरस मंडळींच्या ' सेवा ' सहज , मोफत आणि स्वत:हून उपलब्ध करून दिल्या जातात , त्या कशासाठी ? शिवाय , पडद्यावरचं दुकान बंद पडलं किंवा दुय्यम दर्जाच्या कामातच अडकून पडलं की शरीर ' उपयोगी ' पडतंच. तीही दुकानं जुहू , अंधेरी परिसरात बड्या हॉटेलांमध्ये अहोरात्र उघडी असतातच!

 

... तेव्हा उगाच शक्ती आणि अमन यांना (त्यांच्यावर मनातल्या मनात जळत) हसू नका , नावंही ठेवू नका.

...
ते फार छोटे मासे आहेत...

...
त्यांची चूक इतकीच झाली की , ते गळाला लागले...

बॅड लक! दॅट्स ऑल!
(महाराष्ट्र टाइम्स)No comments:

Post a Comment