Thursday, July 7, 2011

प्रायोगिकतेचा शिरोमणी (मणी कौल)

चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांनी बेछूट शिव्या देणे हीच थोर प्रायोगिकता वाटण्याच्या आजच्या काळातील चित्रपटकारांनी आणि प्रेक्षकांनी मणी कौल यांचे चित्रपट पाहिले, तर पराकोटीची प्रायोगिकता म्हणजे काय हे त्यांना समजून येईल. चित्रपटांनी सुबोध, सुटसुटीत स्वरूपात गोष्ट सांगितलीच पाहिजे, असा लाडिक आग्रह आत्ता कोठे मोडीत निघायची सुरुवात झाली आहे. हा आग्रह आणि तज्जन्य प्रेक्षकानुनयी मनोरंजक चित्रपटांच्या सुवर्णकाळात आशय, रूपबंध, तंत्राचा वापर या सा-याच चौकटींची संपूर्ण मोडतोड करणारे चित्रपट मणी कौल यांनी काढले. 1969 साली आलेल्या ‘उस की रोटी’पासून 1999च्या ‘नौकर की कमीज’पर्यंत मणी कौल यांनी चित्रपट आणि डॉक्युमेंटरी मिळून 11 कलाकृतींची निर्मिती केली. देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांचे प्रेक्षक आणि चित्रपटकलेतील काही जाणकार वगळता अन्य प्रेक्षकांसाठी त्या सगळय़ा दुर्बोध आणि अगम्य राहिल्या. खरेतर उस की रोटी, आषाढ का एक दिन, दुविधा (ज्यावर नंतर अमोल पालेकरांनी ‘पहेली’ काढला), नजर, इडियट यांसारख्या कौल यांच्या चित्रपटांना मोहन राकेश, विजयदान देथा, दस्तोयव्हस्की यांच्यासारख्या ख्यातकीर्त लेखकांच्या साहित्यकृतींचा आधार होता. 
वाचताना एकरेषीय परिशीलनाला सोप्या भासणा-या साहित्यकृतींचे कौल यांनी केलेले चित्रपटरूपांतर मात्र दुर्बोध होत असे. कारण कथाभागाची काळ-अवकाश-क्रम यांची मांडणी मोडून किंवा उलटीपालटी करून अर्थनिर्णयनाची जबाबदारी ते प्रेक्षकांवर सोडत. भारतीय शास्त्रीय संगीतात रुची आणि गती असलेल्या कौल यांच्या मनात त्यांच्या चित्रपटकृती एखाद्या रागाप्रमाणे आकार घेत आणि त्यांचे चित्रणही ते ‘कथा सांगणे’, ‘कथा उलगडवत नेणे’ या दिग्दर्शकीय ‘कर्तव्यां’ना पूर्णपणे झुगारून देऊन करीत. ही मांडणी बहुतेकवेळा आत्यंतिक तार्किक असंगततेकडे झुकत असे आणि प्रेक्षकांची दमछाक करीत असे. साहित्य, अभिनय, संगीत, दृश्यमांडणीच्या अंगाने चित्रकला या सगळय़ा अभिजात कलांचा समन्वय असलेल्या चित्रपटकलेला गोष्ट सांगण्याच्या कामाला जुंपणे कौल यांना नामंजूर होते. साहजिकच त्यांच्या बुद्धिगम्य चित्रपटांना भारतात प्रेक्षक मिळाले नाहीतच- परदेशांतही सत्यजित राय यांच्यासारख्या ‘समजणा-या कलाकृतीं’च्या सर्जकाच्या वाटय़ाला आलेले कौतुक कौल यांना लाभले नाही. 
पण, बिकट वाटेपासून ते कधीही ढळले नाहीत. त्यामुळेच, एकाही चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालेले नसताना चित्रपट दिग्दर्शकांबरोबरच संगीत, चित्रकला, दृश्यकलांच्या क्षेत्रातील वेगळय़ा वाटा धुंडाळणा-या मुशाफिरांच्या अनेक पिढय़ांवर कौल यांचा एखाद्या तत्त्वचिंतकासारखा प्रभाव राहिला.

(प्रहार, ७ जुलै, २०११)

No comments:

Post a Comment