' मॅट्रिक्स ' च्या पहिल्या भागाप्रमाणेच याही भागातल्या नजरबंदी करणाऱ्या ' कोरिओग्राफ्ड ' हाणामाऱ्या , मती गुंग करणारे स्पेशल इफेक्ट्स यांची जोरदार चर्चा आहे. पण , ' ही ' व्हिज्युअल ट्रीट ' बघाच ' अशी पंचतारांकित शिफारस करणाऱ्यांपासून ' मोठ्या पडद्यावरचा कम्प्यूटर गेम पाहायचा असेल तर जा बापडे थिएटरात! ' असं सिनेमाला बडवणाऱ्यांपर्यंत समस्त समीक्षकांनीही निव्वळ याच दोन पैलंूची चर्चा करावी , ही ' मॅट्रिक्स ' ची घोर शोकांतिका आहे...
... खरंतर ' मॅट्रिक्स ' ची मूळ कथाकल्पना अतिशय जबरदस्त आहे. एक भविष्यवेधी विज्ञान काल्पनिका म्हणूनही आणि तत्त्वज्ञान , धर्मसंकल्पना , ईश्वरसंकल्पना या पातळीवरही.
मूळ ' मॅट्रिक्स ' मध्ये आजच्या प्रगत युगात जगणारी माणसं दिसतात. सगळं जग आजच्यासारखंच. त्यातल्या निओ (किआनू रीव्ह्ज) या संगणकफोड्याला (हॅकर) अचानक वेगळ्याच मितीतून काही गूढ संदेश येतात. तो त्या मितीत ओढला जातो. मॉफिर्यस (लॉरेन्स फिशबर्न) आणि ट्रिनिटी (कॅरी-अॅन मॉस) यांच्या माध्यमातून त्याला विलक्षण उलगडा होतो. त्याची आणि त्याच्यासारख्याच अन्य माणसांची समजूत आपण पृथ्वीवर आधुनिक काळात जगत आहोत , अशी असली तरी प्रत्यक्षात हे जग म्हणजे एक मायाजाल आहे (खरंतर भ्रमजाल). अतिप्रगत संगणकांनी रचलेला एक महाप्रचंड प्रोग्रॅम आहे.
प्रत्यक्षात साल सुरू आहे ते काहीशे वर्षांनंतरचं. मधल्या काळात संगणक आणि अन्य यंत्रांनी मानवांविरुद्ध उठाव करून त्यांना पराजित केलंय. त्या युद्धात सूर्यापासून मिळणाऱ्या ऊजेर्त अटकाव आल्यानं , केवळ ऊजेर्चा स्त्रोत म्हणून संगणकांना मानवशरीरांची गरज आहे. ते माणसांची ' शेती ' करतात. पण , माणसं झाडांसारखी वाढत जगत नाहीत , त्यांना भावभावनांचं , प्रगती-अधोगतीचं ' जिवंत ' जग लागतं. ते संगणक माणसांच्या मेंदूंना पुरवतात. प्रत्यक्षात मानवशरीरं एका महाप्रचंड लॅबमध्ये निदिस्तावस्थेत आहेत. त्यांच्या मेंदूंना जोडलेल्या यंत्रणेनं त्यांना महाजालाशी जोडलंय. त्यांचं सगळं जगणं सरळसरळ स्वप्नाच्याच पातळीवरचं , निव्वळ मेंदूपुरतं आहे...
... मॉफिर्यस , ट्रिनिटी आणि आता निओ हे या महाजालातून बाहेर पडून यंत्रांविरुद्ध बंड पुकारतात. त्यांच्यासारखी बंडखोर आणि खऱ्या वर्तमानात जगणारी माणसं भूगर्भात झायन नावाच्या गुंफावजा शहरात कशीबशी राहात आहेत. यंत्रांना नेस्तनाबूत करून समस्त मानवजात स्वतंत्र करण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाला मायाजालातच असलेल्या ओरॅकल या भविष्यवेत्त्या स्त्रीचीही साथ असते. मानवांचा तारणहार निओच्या रूपानं जन्मलाय असं भाकित ती करते आणि तिच्यावर प्रचंड श्ाद्धा असलेला मॉफिर्यस निओमार्फत अंतिम उठाव घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे...
... विज्ञान काल्पनिका म्हणून भन्नाटच असलेली ही कल्पना अधिक गंभीर पातळीवर थेट नियतीवादाचं , दैववादाचं आणि ईश्वरी सत्तेचं रूपक सांगते. नियतीवाद वेगळं काय सांगतो ? जग हा कुणा जगन्नियंत्याच्या प्रोग्रॅम आहे , अशीच तर ही विचारप्रणाली आहे ना!
हा ' दृष्टांत ' लक्षात ठेवून पाहिलं तर ' मॅट्रिक्स ' चा कथात्मक प्रवास फार महत्त्वाचा ठरतो. ' मॅट्रिक्स ' च्या पहिल्या भागात ओरॅकल हा चकवा होता. संगणकीय प्रोग्रॅमचाच भाग असलेली ओरॅकल ' भविष्य ' कसं मांडू शकते , असा कूटप्रश्न वाचोवस्की बंधूंनी उत्तर न देताच सोडून दिला होता आणि विचारी प्रेक्षकांचा विरस केला होता.
' मॅट्रिक्स रिलोडेड ' मध्ये हे कूट उकलतं. ते सगळ्या नियतीवादी , ईश्वरवादी मांडणीतली भयावहता स्पष्ट करून टाकतं. ओरॅकल ही प्रोग्रॅमचाच भाग आहे आणि तिचं भविष्यही प्रोग्रॅमचाच भाग. इतकंच काय विश्वरक्षक निओची रचनाही प्रोग्रॅमचीच. कोणत्याही चतुर व्यवस्थेत ती ' अपडेट ' करण्यासाठी संभाव्य ' केऑस ' चा विचार असतो हा ' केऑस ' नियंत्रित करण्याची संगणकांनीच निमिर्लेली यंत्रणा म्हणजे निओ. (इथे त्याच्या सुपरहीरो छाप पराक्रमांचं पितळ उघडं पडतं.) आणि ओरॅकलचं भविष्य म्हणजे काय तर विश्वरक्षकानं यंत्रांशी तडजोड करायची. झायन त्यांच्याहाती सोपवायचं. त्यातली विश्वरक्षकाच्या खास गोटातली माणसं वगळून बाकीच्यांचं शिरकाण होणार. उरलेल्यांमधून विश्वरक्षकानं संगणकांच्या सोयीचं नवं जग निर्माण करायचं...
... आतापर्यंतच्या सर्व विश्वरक्षकांनीही हाच मार्ग पत्करलेला असतो... कारण तोच तर एकमेव मार्ग असतो मानवजात नष्ट न होण्याचा. ' मॅट्रिक्स: रिलोडेड ' मध्ये निओ (अर्थातच) हा पर्याय नाकारून कोणत्याही भविष्यवाणीविना , नियतीच्या आधाराविना , निव्वळ माणूसपणाच्या बळावर मानवजात वाचवण्याचा निर्धार करतो. हा उपक्रम पुढच्या भागात पाहायला मिळेल...
... अशा कथानकावरचा सिनेमा कोणतेही प्रश्न पाडून न घेता माणसं ' भोगू ' शकतात , हे वाचोवस्की बंधूंच्या व्यावसायिक हाताळणीचं महान ' यश ' आहे. एकतर त्यांनी आधीच्या सिनेमाचं अनुसंधान दुसऱ्या भागात स्पष्टच केलेलं नाही. आणि दोन्ही भागांत त्यांचा भर निव्वळ चित्तचक्षुचमत्कारिक ' सादरीकरणा ' वरच राहिलेला आहे.
' मॅट्रिक्स ' च्या कथाकल्पनेविषयी , तिच्यातल्या कच्च्या दुव्यांविषयी चर्चा-वाद संभवतात. पण , सिनेमाच्या केंदस्थानी ती आहे आणि ती एक विचारप्रवर्तक कल्पना आहे आणि सिनेमात लंब्याचौड्या चर्चांच्या स्वरूपात तिचा काथ्याकूटही आहे. तरीही हा कथाभाग गृहीत न धरता , किंबहुना त्याच्या झंझटातच न पडता प्रेक्षक सिनेमा ' एंजॉय ' करतात , त्याची ' समीक्षा ' ही होते , हे विलक्षण आहे. (जागतिक निर्बुद्धीकरणाचा विजय असो!)
(महाराष्ट्र टाइम्स)
या च्रित्रपटाचे भाग जस जसे रिलीज झाले तसे पाहिले होते. कुठेतरी संगती खंडीत झाल्यासारखी वाटत होता. काल तीन्ही भाग लग पाहिले. माचकर सर नेहमीसारखेच अप्रतिम परिक्षण.
ReplyDelete