Tuesday, June 28, 2011

एपिसोड

मध्यंतरी एका मराठी 'डेली सोप'च्या लेखकाला काही सुचता सुचेना. त्याने हे दिग्दर्शकाला सांगितलं. तो म्हणाला, 'तुला थोडंफार काही सुचलं असेलच ना?' लेखक उत्तरला, 'मला फक्त रडिकाच्या घरी भयाणी येते, एवढंच सुचलंय.' दिग्दर्शकानं चुटकी वाजवली आणि म्हणाला, 'अरे, मग झाला एपिसोड!'

हा एपिसोड टीव्हीवर असा दिसला...

... मालिकेचं शीर्षकगीत संपताच बिछान्यात बसलेली रडिका दिसते. तिच्या चेहऱ्यावर आशंकेचं काहूर. पण, तिच्या नेहमीच्या रडवेल्या चेहऱ्यावरून हा भाव समजणार नाही, हे लक्षात घेऊन मागे तिच्या अंतर्मनातले डायलॉग सुरू... ''माझं मन असं का हुरहुरतंय? ही कसली चाहूल लागतेय? काही अशुभ घडणार आहे का? ही कसली सावली पडतेय माझ्या संसारावर? बधिरेश माझ्यापासून दुरावणार तर नाही ना? (हा सर्व काळ दरवाजा, तिचा चेहरा, मग वेडेवाकडे अँगल्स वगैरे- म्हणजे नेहमीप्रमाणे दिसत होतं.) यात तीन मिनिटं गेली.

मग दारावर सावली आली. ती पुढे पुढे येतेय, रडिकाचा चेहरा अधिकाधिक रडवेला होत चाललाय, कान किटवणारं पार्श्वसंगीत आता कानाचे पडदे फाडू लागलंय... नुसती सावली फ्रेममध्ये पूर्ण दिसेपर्यंत दोन मिनिटं गेली. मग रिकाम्या फ्रेमच्या चारही बाजूंनी भयाणीचा चेहरा फ्रेममध्ये येण्यात (आघाती संगीतासह) आणि तिला पाहून दचकणारी रडिका ७५ अँगल्समधून दाखवण्यात आणखी तीन मिनिटं गेली. मग रडिकाच्या थिजल्या चेहऱ्यावर पुन्हा तिच्या अंतर्मनातले विचार सुरू, 'ही भयाणी इथे काय करतेय या वेळी? मला वाटलंच होतं हिचीच ती काळी सावली असणार? या... या बाईने माझ्या सुखी संसाराची राखरांगोळी करण्याचा विडा उचललाय की काय?' वगैरे वगैरे. यात पुन्हा तीन मिनिटं गेली.

आता कॅमेरा कल्याणीवर. तिच्याही मनाला चेहऱ्याचे व्यायाम करत डायलॉग मारण्याचा छंद लागलाय ना टीव्हीवर काम करून करून. 'ही रडिका का बसलीये इथे? या दळभदी पोरटीने माझ्या सोन्यासारख्या बधिरेशला नादी लावलं? त्यालाही भिकेचेच डोहाळे लागले होते त्याला कोण काय करणार? पण या सटवीच्या कचाट्यातून त्याला सोडवेन, तरच नावाची कल्याणी...'वगैरे वगैरे. आता यात तीन मिनिटं गेली.

मग 'आता काय होणार?' असं एकदा रडिकाचं मन म्हणतंय, एकदा भयाणीचं मन म्हणतंय. एकदा रडिका, एकदा भयाणी... यात दोन मिनिटं गेली. दोघींपैकी एकीच्या चेहऱ्यावर कॅमेरा फ्रीज. एण्ड टायटल्स चालू. संपला एपिसोड.

' आयला सॉलिड!' लेखक टुणकन उडी मारून म्हणाला, 'म्हणजे पुढे मी 'भयाणी, तू इथे कशी?' हा एक डायलॉग लिहिला होता तोही वाचला!'

दिग्दर्शक म्हणाला, 'मित्रा, तेच तर आपल्या पुढच्या संपूर्ण एपिसोडचं स्क्रिप्ट आहे.No comments:

Post a Comment