Tuesday, June 28, 2011

ऋतुपर्णच्या 'भन्साळी'लीला (चोखेर बाली)

' या कादंबरीचा असा शेवट केल्याबद्दल मला अतिशय खेद होतो. त्याबद्दल मला कठोर शिक्षाच व्हायला हवी... '
...'
चोखेर बाली ' या कादंबरीच्या शेवटाबद्दल गुरुदेव रवींदनाथ ठाकुरांनी काढलेल्या या उद्गारांनी ऋतुपर्ण घोष दिग्दशिर्त , बहुचचिर्त ' चोखेर बाली ' ची सुरुवात होते...

...
तो संपतो तेव्हा या कादंबरीचा शेवटच काय , रवींदनाथांना आपली ही संपूर्ण कादंबरीच लिहिल्याबद्दल खेद झाला असावा आणि रवींदनाथांच्या आत्म्यानंच ते ऋतुपर्णच्या कानात सांगितलं असावं , अशी भावना होते. अन्यथा , त्यानं रवींदांची ' चोखेरबाली ' संपूर्णपणे बदलून , व्यक्तिरेखांचं विकृतीकरण करून रूपेरी पडद्यावर सादर करण्याचा ' भन्साळीपणा ' केला असता का ?

नाही , हे विशेषणही चुकीचंच म्हणावं लागेल. कारण , ' चोखेर बाली ' च्या तुलनेत संजय लीला भन्साळीकृत ' देवदास ' ही मूळ कादंबरीशी अधिक प्रामाणिक आणि सुसंगत सिनेमा होता , म्हणजे बघा!

काही ' निव्वळ सिनेमा ' वादी मंडळी म्हणतील की , मूळ कादंबरी बाजूला ठेवून हा सिनेमा ' स्वतंत्र ' पणे कसा आहे ते पाहा. तर एकतर रवींदांच्या कादंबरीचा आधार , तिचं नाव , तिच्यातल्या व्यक्तिरेखा , सोयीचं कथानक वगैरे अधिकृतपणे ( ' विश्वभारती ' च्या मंजुरीने) वापरून काढलेल्या सिनेमाचा ' स्वतंत्र ' विचार कसा काय संभवतो ? त्यासाठी ऋतुपर्णनं ' स्वतंत्र ' सिनेमा काढायला नको का ? आणि घटकाभर केला तसा स्वतंत्र विचार ; तरी हा एक प्रचंड फसलेला सिनेमा आहे. कुठलाच एकसंध परिणाम मागे न ठेवता तो संपतो तेव्हा , ' संपला एकदाचा ' म्हणून हुश्श करावंसं वाटतं.
 
 
ऋतुपर्णसारख्या संवेदनशील , प्रतिभाशाली दिग्दर्शकाच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा असा बोऱ्या का वाजावा , या प्रश्नाच्या उत्तरासाठी कादंबरीकडेच वळावं लागतं. कारण , रवींदांसारख्या श्ाेष्ठ लेखकाची साहित्यकृती ठाशीव व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तिरेखांच्या आधारे विकसित होते. त्या व्यक्तिरेखांची फक्त नावं आणि बाह्यरूपं उसनी घेऊन त्यांच्याकरवी ' आपली गोष्ट ' सांगू पाहणाऱ्या कोणाचीही गत वेगळी काय होणार ?

ही ऋतुपर्णची ' आपली गोष्ट ' म्हणजे त्याच्या सिनेमाचं कथानक काय आहे ?  
बंगालमधल्या एका बड्या घराण्यातला महंेद (प्रसन्नजीत) हा कुलदीपक विनोदिनी (ऐश्वर्या राय) ही सांगून आलेली मुलगी नाकारतो ? त्याचा भावासमान जिगरी दोस्त बिहारीलाल (तोता रॉयचौधरी) हाही , केवळ महेंदनं तिला नाकारली , म्हणून तिला नकार देतो. तिचं कुणा बिपिनशी लग्न होतं आणि वर्षभरात ती विधवा होते.
 
 
दरम्यान , लग्नासाठीचा आणखी एक प्रस्ताव नाकारून महेंद , त्या मुलीशी बिहारीनं लग्न करावं अशी गळ घालतो. पण , तिला पाहण्याच्या कार्यक्रमाला बिहारीबरोबर गेल्यावर ही आशालता (रायमा सेन) बिहारीबरोबरच महेंदच्याही मनात भरते. तो आता बिहारीला तिच्याशी लग्न न करण्याची गळ घालून स्वत: तिच्याशी विवाहबद्ध होतो.

दिसण्यात , वागण्या-बोलण्यात सरधोपट असलेली आशा महेंदची हृदयसम्राज्ञी होते. महेंदच्या आईला हे खपत नाही. लेकावर चिडून ती आपल्या मूळ गावी जाते. तिथे तिला विधवा विनोदिनी भेटते. आपल्या सेवेनं विनोदिनी तिचं मन जिंकून घेते. महेंदची आई घरी पुन्हा परतते , ती या रूपसुंदर , गुणवान विधवेला सोबत घेऊनच.
 
 
इंग्रजी जाणणारी , चार बुकं शिकलेली विनोदिनी आशाची लाडकी सखी बनते. तिला लाडाचं नाव मिळतं ' चोखेर बाली '... म्हणजे डोळ्यात खुपणारा धुळीचा कण , किंवा चक्षुशल्य. महेंद आणि आशा यांची प्रणयगुपितं विनोदिनीला आशाकडून कळत राहतात. तिच्या तरुण , भुकेल्या शरीर-मनातल्या अतृप्त कामना जागवतात. महेंदचं पराकोटीचं बाईलवेड तिच्या मनात ईर्ष्याही निर्माण करतं. त्याचवेळी , अधूनमधून घरी येणाऱ्या , तिचा आदर करणाऱ्या शांत , मवाळ बिहारीकडेही तिचं मन ओढ घेत असतं. पण , खुद्द आशाच आपल्या सखीची पतीशी संवाद घडवते आणि विनोदिनीच्या मनाचा तोल महेंदकडे ढळतो. महेंदच्याही मनात विनोदिनीची कामना जागते. ती तो तिच्याकडे व्यक्त करतो. दोघे एका बंद बग्गीमधून नदीकिनाऱ्याची सैर करण्याच्या बहाण्यानं अनेकवार संग करतात.     
एका नाट्यपूर्ण प्रसंगातून या प्रकरणाचा भंडाफोड होतो आणि विनोदिनीवर महेंदचं घर सोडायची पाळी येते. ती लगेच साजश्ाृंगार करून रात्रीच्या वेळी बिहारीच्या घरी जाते. ' आता तू माझ्याशी लग्न करून मला आश्ाय दे ', असं त्याला विनवते. ते शक्य नसेल , तर दासी बनून राहण्याची गळेपडू तयारी दर्शवते. तो तिला झिडकारतो , तेव्हा ती आपल्या सासरी निघून जाते. पाठोपाठ घरदार , बायको , आई यांचा त्याग करून महेंद तिथे पोहोचतो. पण विनोदिनीच्या मनमंदिरात आता बिहारीची प्रतिष्ठापना झाली आहे. ती महंेदच्याच सोबतीनं त्याचा शोध घेत काशीला येते. तिथे आशाही संन्यस्त वृत्तीने राहात असते. बिहारीही तिला भेटतो. तिच्या प्रेमाची उत्कटता कळल्यावर तो तिच्याशी विवाह करायला तयार होतो. पण , ती ऐनवेळी गायब होते... एक चिठी ठेवून... तीही बिहारीसाठी नव्हे , तर आशासाठी. त्यात एकदम वंगभंग वगैरे गोष्टींवरची अनाकलनीय भाषणबाजी आणि सिनेमाचा शेवट.
 
 
हे कथानक नुसतं वाचतानाही त्यात काही सलगता , तर्क वगैरेंचा अभाव आहे , हे लक्षात येतं. पण , हे काहीच नाही हो! यातलं निम्म्याहून अधिक मूळ कादंबरीतलं नाहीच ना! विधवांच्या दु:खांना आपल्या बंडातून वाचा फोडणारी , शरीराच्या ओढीनं महेंदला समर्पण करणारी , कंठाळी स्त्रीवादी विनोदिनी मुळात रवींदांनी रेखाटलेली नाहीये. ती त्यांच्या कादंबरीची ' नायिका ' ही नाहीये. आणि रवींदांचा बिहारीही राजकीय कार्यकर्ता , स्वातंत्र्यसैनिक वगैरे काहीही नाही , त्यामुळे पुढचं वंगभंग वगैरेही फोकनाडच. (बिहारीचं हे विकृतीकरण बहुधा रवींदांच्याच ' घरे बायरे ' च्या प्रभावातून झालं असावं.)
 
 
मूळ कादंबरीत विनोदिनी केंदस्थानी नाही. केंदस्थानी असलाच तर महेंद आहे. खास बंगाली पद्धतीचा , आयुष्यात आलेल्या सर्व स्त्रियांनी लाडावून ठेवलेला , कितीही वाढला तरी कुक्कुला असा नायक. बालिश मातृप्रेमातून तो विनोदिनीला नाकारतो. मग आशाला नाकारतो. तिला पाहिल्यावर मात्र बिहारीला निर्लज्जपणे बाजूला सारून स्वत: तिच्याशी विवाहबद्ध होतो. तिच्याकडून हक्कानं , हवं तेव्हा , हवं तेवढं लैंगिक सुख मिळतं , म्हणून लगेच तिच्या पदराला बांधला जातो. तिचा कंटाळा येण्याच्या बेताला विनोदिनी त्याच्या आयुष्यात येते , तेव्हा तो (जणू तिचाच उद्धार करीत असल्याच्या थाटात) तिच्या भजनी लागतो आणि तिला आपल्या नादी लावण्याचा प्रयत्न करतो...
 

 ऋतुपर्णचा सिनेमा विनोदिनीला नायिका कल्पूनच सुरू होतो. पण निदान कथानकाच्या या टप्प्यापर्यंत तरी तो मूळ कादंबरीबरहुकूम चालतो. इथून पुढे मात्र त्यानं विनोदिनीच्या व्यक्तिमत्त्वाला अनाठायी बंडखोरीचे आयाम देण्याच्या प्रयत्नात तो तिला छचोर बनवून मोकळा होतो. कादंबरीतली विनोदिनी काही काळापुरती महेंदवर भाळते खरी , पण , ती कोणत्याही क्षणी त्याच्या आकंठ प्रेमात वगैरे बुडत नाही. अगदी शारीर भूक भागवण्याच्या व्यावहारिक गरजेपुरताही त्याला जवळ करीत नाही. तो या लायकीचा नाही , याचं भान तिला खूपच लवकर आलेलं असतं. महेंदच्या अहंकाराचा , दुटप्पी प्रेमाचा फुगा फोडण्यासाठी तसंच महेंद आणि बिहारी या दोघांच्याही ' आशाकेंदित ' आयुष्याला सुरुंग लावण्यासाठी ती महेंदला , अक्षरश: मांजरानं उंदराला खेळवावं तशी खेळवते , पुरता रस्त्यावर आणते , पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकते. यासाठी आपल्या देहाकर्षणाचा पुरेपूर वापर करून घेते , पण , ' हुकुमाचा पत्ता ' कधीच फेकत नाही. कारण , ती मूर्ख नाही.
 

ऋतुपर्ण तिला मूर्खही बनवतो आणि उच्छृंखलही. त्यासाठी तो बिहारीची व्यक्तिरेखा नीट फुलवत नाही. बिहारी आणि विनोदिनी यांच्यात निर्माण होणारा मधुर भावबंध तर सरळसरळ टाळतो. त्याची विनोदिनी सहजगत्या महेंदच्या गळाला लागते. नंतर हकालपट्टी झाल्यावर बिहारीशी गळेपडूपणा करते. तिच्या रवींदकृत व्यक्तिरेखेचं हे सरळ सरळ चारित्र्यहनन आहे. आणि ते करून तो त्याच्या ' नायिके ' ला काही उच्च पातळीवर नेत नाही. रवींदांची विनोदिनी इतका उत्पात घडवूनही ' खलनायिका ' बनत नाही ; आणि ऋतुपर्णची विनोदिनी मात्र ' त्यापुढे ' जाऊनही ठसा उमटवत नाही...

ठसा राहतो तो ऋतुपर्णचा ट्रेडमार्क झालेल्या अकृत्रिम शैलीतल्या खुमासदार संवादांचा , बऱ्याचदा गरज नसताना सौंदर्यानं ठासून भरलेल्या दृश्यचौकटींचा , पार्श्वगीत म्हणून साथसंगीताविना गायल्या जाणाऱ्या एका अप्रतिम गीताचा , ऐश्वर्याच्या खानदानी सौंदर्याचा , बिहारीकडून अकारण करवून घेतलेल्या अंगप्रदर्शनाचा (शिवाय काशीतल्या घाटावरच्या प्रत्येक प्रसंगात बॅकग्राऊंडला पैलवानांचे लंगोटावर व्यायाम) , ऋतुपर्णचा ट्रेडमार्क असलेल्या- पण , ऐश्वर्याच्या (ऑन स्क्रीन) चुंबनविरोधामुळे फसलेल्या- ऑकवर्ड चंुबनदृश्यांचा...
 

... रवींदांच्या आडून आपली गोष्ट सांगण्याचा हा ऋतुपर्णचा अट्टहास संजय लीला भन्साळीच्या ' देवदास ' पेक्षा घातक आहे. कारण , संजय स्वच्छपणे ' कमशिर्यल ' फिल्ममेकर आहे... त्याच्या ' तडजोडीं ' चा अंदाज तरी येतो. ऋतुपर्णवर संवेदनशील , अभिजात शैलीचा शिक्का आहे. तो मुळात मोडतोड करील , असं वाटत नाही. आणि त्यानं केलेली मोडतोड अर्थगर्भ वगैरे वाटायचा संभव अधिक.

'
चोखेर बाली ' ही रवींदनाथांची फार उजवी साहित्यकृती नाही. विशेषत: शेवटी तर अगदी हिंदी सिनेमा-मालिकांना साजेलसा सार्वत्रिक पश्चात्तापदग्धतेचा आणि मनोमीलनाचा सावळा गोंधळच आहे त्यात. बिहारी आणि विनोदिनी यांचं लग्न लावणं शक्य असूनही (बहुधा तत्कालीन सामाजिक स्थितीच्या दबावाखाली) त्यांनी ते केलेलं नाही. या अर्थानं त्यांनी त्या शेवटाबद्दल शिक्षा व्हावी , अशी भावना व्यक्त केलीये की काय , नकळे! तसे असेल तर तो अपराध क्षम्य कुळीतला आहे.
 
 
पण , त्यांनी केलेला शेवट ' सुधारण्या ' च्या मिषानं अख्खी कादंबरीच बिघडवून टाकण्याचा ऋतुपर्णचा अपराध मात्र अक्षम्यच ठरतो.

(महाराष्ट्र टाइम्स)



No comments:

Post a Comment