Monday, February 14, 2011

बॅड बॉय...(सलमान खान)


...तुम्ही काय वाट्टेल त्या शिव्या घाला, काहीही नावं ठेवा... त्याला काहीएक फरक पडणार नाही...
...तो काय वाट्टेल ते करूदेत... दारवा पिऊन भरवस्तीत धिंगाणे घालू देत, लोकांना एसएमएसवरून किंवा मोबाइलवरून अर्वाच्च्य बोलून त्रास देऊ देत, भाईलोकांचं नाव सांगून खरी-खोटी हूल देऊ देत, मारामाऱया करूदेत, सुसाट गोळय़ांनी हरणांची शिकार करूदेत, नाहीतर सुसाट मोटारीनं माणसांची...
...त्याचं कूसही वाकडं होणार नाही... कधीच!
...अहो, कोर्टानं दिलेल्या शिक्षेचं कौतुक नका हो सांगू फार! अशा कितीतरी बडय़ांना कितीतरी कोर्टांनी मोठमोठय़ा शिक्षा सुनावल्या आहेत... आणि वरच्या कोर्टांतून हे बडे बिलंदर सहीसलामत बाहेरही पडलेले आहेत...
...आणि सलमानची या केसमधली शिक्षा वरपर्यंत कायम राहिली, तरी बुद्धीनं मरेस्तोवर अकरावीतच राहण्याचा चंग बांधलेल्या त्याच्या चाहत्यांच्या मनातल्या त्याच्या 'सुपरस्टारडम'ला धक्का लागणार आहे का? बॉक्स ऑफिसवरचा त्याचा 'पुल' घटणार आहे का?...
...संजय दत्त ऊर्फ संजूबाबाची केस प्रमाण मानली तर या प्रश्नाचं उत्तर नाही, असं आहे... आणि हे फार गंभीर आहे... संजय दत्तनं आयुष्यात फार मोठे उतार-चढाव पाहिले होते, टोकाचीवेदना सहन केली होता (तरी त्याचे गुन्हे क्षमापात्र होत नाहीत)... सलमान खानकडे तर सांगायला असा काही खास ढवळलेला भूतकाळही नाही... तो फक्त एक अतिलाडाकोडानं बिघडलेला बालिश, उर्मट, तऱहेवाईक, उतावळा मुलगा आहे... येस्स वयाच्या चाळिशीतही 'मुलगा'... 'अँड अ व्हेरी व्हेरी बॅड बॉय'...
दुर्दैवानं सिनेमानटांमध्ये देव वगैरे पाहणाऱया, आपल्या आयुष्याचे हीरो शोधून माती करून घेणाऱया तथाकथित 'चित्रपटशौकिनां'च्या या देशात 'बॅड बॉइज'चं अतीव, आत्मघातकी आकर्षण आहे... इथले बाप्ये पडद्यावरच्या निरर्थक, बिनडोक चाळय़ांना स्टाइल मानतात आणि इथल्या बायका हिंसक, उद्रेकांमध्ये प्रेमाची इन्टेन्सिटी शोधतात आणि टपोरीगिरीत रफ टफ पौरुषाचं 'इर्रेझिस्टिबल सेक्स अपील'... 
...अशा रांगडय़ा नटांचंएरवी सुबुद्ध भासणाऱया महिलावर्गातलं अपील महा'भयंकर' असतं. सलमाननं वांद्रय़ात फुटपाथवर झोपलेल्या कामगारांना चिरडल्याचीबातमीआली, तेव्हा एक मुलगीप्रचंड हळहळून चित्कारली, 'आई ग्गं! आता तुरुंगात जावं लागेल ना बिच्चाऱयाला?'... मेले ते मेले आणि हाच बिच्चारा???... आपली काय अपेक्षा आहे हो मॅडम? पोलिसांनी शनिवारवाडय़ावर सत्कार करून तुमच्यासारख्या सवाष्णींकडून दृष्ट ाैाढून घ्यावी काय त्याची?... ' आणखी एक सुकन्या, सलमानला शिकार प्रकरणात झालेल्या सजेबद्दल ऐकून सहजगत्या म्हणाली, 'धिस इज टू मच यार! सल्लू म्हणेल, मी जेव्हा माणसं मारलीहोती तेव्हाही मला तुरुंगात टाकलंनव्हतं आणि आता साधी हरणं मारल्याबद्दल जेल? धिस इज नॉट फेअर.'
साधारण अशाच प्रतिक्रिया फिल्म इंडस्ट्रीतून ऐकायला मिळाल्या. सलमान हा स्टार, सेलिब्रिटी असल्यामुळे त्याच्याशी कायदा जरा जास्तच कडकपणा करतोय, असं सलमानच्या पिताश्रींपासून अनेकांचं मत आहे... त्यांचाही दोष नाही म्हणा! पब्लिकनंच पोसलेले हे भस्मासूर आहेत... आपण सेलिब्रिटी आहोत म्हणताच चार बोटं जमिनीवरूनच चालू लागतात ही मंडळी आणि मग या जमिनीवरचा कायदाही आपल्याला लागू होत नाही, अशी त्यांची स्वाभाविक समजूत असते... केवळ सेव्हंटी एमएमच्या पडद्यावर सुखद कोनांतून, यांची मेकअप थापून सुंदर केलेली अंगप्रत्यंगं दिसतात या एकमात्र पात्रतेच्या बळावर जेव्हा पब्लिककडून, सिस्टमकडून लायकीपेक्षा जास्त लाड होतात यांचे, तेव्हा कधीकुणी विचारत नाही की, माझ्याशीच असा 'दुजाभाव' का?...
सलमानवर इंडस्ट्रीत किती पैसा लागलाय, त्याचे किती सिनेमे अडकलेत, आणि तो आत गेला तर इंडस्ट्रीतल्या कितीतंत्रज्ञ-कलावंतांवर भुके मरण्याची पाळी येईल, असाही गळा काढला जातो. याच्यावर पैसे लावताना, हे किती 'गुणी बाळ' आहे, हे ठाऊक नव्हतं की काय तुम्हाला? की कितीही उत्मात केला तरी सल्लू काही अडकणार नाही, असा माज होता मनात? आणि आपल्यावर एवढा पैसा लागला आहे, आपल्यावर इतके लोक अवलंबून आहेत, याचं भान ठेवून स्वतŠ सलमाननं जबाबदारीनं वागायलाच नको की काय कधी?
आता याहीवर एक झकास आर्ग्युमेंट असतं... सलमान फार दयाळू आहे, खूप समाजकार्य करतो, खूप हळवा, खूप प्रेमळ आहे... मग त्याच्या 'कार्या'ची उदाहरणं दिली जातात... अच्छा, तो हे सगळंकाही आहे, म्हणून त्याला आणि त्याच्यासारख्यांना काय काय माफ करायचं, याची यादी देईल का कुणी? गंमत पाहा, तोंडी लावण्यापुरतं समाजकार्य तर अनेक भोंदू बुवाही करतात... आणि मग आपण आपल्या 'पादुका' एका रात्रीसाठी 'भक्ता'च्या घरीठेवण्यासाठी पाच लाखांची बोली लावतो, हे समाजानं त्या 'कार्या'च्या बदल्यात विसरून जावं, अशी अपेक्षा असते त्यांची...
...या बुवांचं कधी ऑडिट होत नाही... सलमानसारख्यांच्या गैरकृत्यांचा कधी समाजमनात रोकडा हिशोब होत नाही...
टु बी फेअर टु सलमान, तोत्यानं ठरवल्यास एक बरा नट असू शकतो अधूनमधून... थोडासा धरमप्राजींसारखा... संजय लीला भन्साळी, सूरज बडजात्या, राजकुमार संतोषी यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडे तो उत्तम श्रेणीचा अभिनय करतो... एकेकाळचं सुकडं शरीर भल्याभल्यांना हेवा वाटावा, असं प्रमाणबद्ध करण्यासाठी घाम गाळलाय त्यानं... पण, दुर्दैवानं त्याची आजची ओळख आणि लोकप्रियता मेहनती अभिनेत्याची नाही, तर, स्वप्रेमात प्रचंड बुडून गेलेल्या, वय वाढलं तरी बुद्धीनं वाढणंच नाकारणाऱया अतिशय देखण्या, पण सांगण्यासारखं तेवढंच असलेल्या 'स्टार'ची आहे...
तसा माणूस म्हणूनही सलमान उमदा असतो कधीकधी. आपल्याकडे जे आहे, ते ज्याच्यावर जेवढा काळ जीव जडेल, तेवढा काळ भरभरून देण्याची दानतहीआहे त्याच्यात... म्हणूनच ऐश्वर्यावरून ज्याला इतकं पिडलं, त्या विवेक ओबेरॉयला ऍशनं डच्चू दिल्यावर हा त्याच्या पाठिशी उभा राहिला होता... त्याला सिनेमे मिळावेत म्हणून प्रयत्न करत होता... उद्या ऐश्वर्यावर काही संकट कोसळलं, तर गतस्मृतींना स्मरून सलमान तिच्यासाठीही धावून जाईल, असं सांगतात त्याचे यारदोस्त! काही मोजक्या माणसांसाठी साक्षात देवही असेल तो! पण, त्याचं सगळं वावरणंच अळवावरच्या पाण्यासारखं आहे... जरा तोल ढळला कीअळवाचं पान कोरडंठाक! सरळ असेल, तर उत्तम काम, अतीव प्रेम आणि बिघडला तर सगळा राडा... कम्प्लीट किचाट!
...पडद्यावर अशी पात्र बघायला ठीक असतं हो, प्रत्यक्षात अशी 'माणसं' सहन करणं फार अवघड असतं... आणि असल्या मनोरुग्णांना मनमानी करण्याचं स्वातंत्र्य नसतं... त्यांच्यावर उपचार करण्याचं बंधन असतं... सलमानवर त्याच्या आसपासच्यांकडून कधी धड संस्कार झालेले दिसत नाहीत, उपचार कोण करणार?...
...सहसा माणसं असे उपचार करायचे टाळतात तेव्हा काळ, खासकरून पडता काळ ते उपचार करतो... निर्ममतेनं... सलमानवर आलेली ही संकटं त्याला शहाणी करून जाऊ शकतात आणि त्याच्या आतला तो उमदा माणूस परिपक्व होऊ शकतो... पण, त्यासाठी त्याचे चाहते म्हणवणाऱयांनी आपला अडाणी आक्रोश आवरायला हवा... सलमाननं स्वतŠच्या हातानं आखलेल्या नियतीला त्याचा ताबा घेऊ द्यायला हवा... टाकीचे घाव त्याच्यावर पडू द्यायला हवेत...
...तसं नाही झालं, तर मात्र काही खरं नाही... त्याचंही आणि आपलंही...


...कारण, सगळय़ाच संस्थात्मक गोष्टींच्या फुटकळीकरणानं ग्रासलेल्या या देशात हरएक सलमान खान हा शिशुपालाचा खापरपणजोबाच असतो...
...शिशुपालाला शंभर गुन्हे माफ होते... यांना तहहयात आणि लाखोगुन्हे माफ असतात...
...बिवेअर ऑफ द बॅड बॉय!
 

(महाराष्ट्र टाइम्स)

1 comment:

  1. अभिनयाचा गंध नसतानाही सलमान खानला प्रचंड प्रसिद्धी मिळतेय. (खरं तर असे कित्येक अभिनेते-नेत्री आहेत की त्यांना लाथा घालून हाकलून द्यायला पाहीजे. पण, ते आपल्या हातात नाही.) संजय दत्तला बाँबस्फोटात आरोपी ठरवलं तरी, मुन्नाभाई ऍमबीबीऍस आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातून त्याचं चारित्र्य उजाळण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न चांगलाच यशस्वी ठरला. यावरून भारतीय प्रेक्षकांनी या हिरोंना किती डोक्यावर घेतलंय हेच दिसून येतं. बॅड बॉय बरोबरच बॅड बायसुद्धा आहेत.. ऍकीकडं परदेशात पॅरिस हिल्टन सारख्या बड्या हस्तीला रॅश ड्राईव्हींग केल्यामुळं शिक्षा आणि दंड भोगावा लागतो. दुसरीकडं भारतात रेल्वेचं तिकीट न काढलं म्हणून हेमा मालिनीला पकडला असता, तिच्या सुटकेसाठी नेते-अभिनेते यंत्रणा हलवून टाकतात. त्यानंतर, त्या टीसीला हेमा मालिनीची माफीही मागावी लागते. भारतात क्रिकेटर आणि अभिनेत्यांना दैवत्व बहाल झालंय. मूळात दिग्दर्शकांनी भारतीय प्रेक्षकांना कधी शहाणचं होऊ दिलं नाही. आणि भारतीय प्रेक्षकही १००-१५० (मल्टीप्लेक्स असेल तर, ३००-४०० रुपये) रुपयांत आपली अक्कल गहाण ठेवून चित्रपटात दाखवलेलं जशास तसं स्विकारतात. ज्या अजय देवगणला गुटखा खाल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला. जो चैन स्मोकर आहे, त्यालाच मुंबई पोलिस सजग मुंबईकर आणि धुम्रपानमुक्त मुंबई असा संदेश देण्यासाठी ब्रँड अम्बेसेडर बनवते. या अभियानाच्या लाँचींगला आयपीऍस अधिकारीही त्याच्या मागे-पुढे करत होते. (ही हुजरेगिरी पोलिस-अभिनेत्यांच्या अडी-अडीचणींनाही उपयोगी पडतं) तेव्हा, देव (खरं तर माझा देवावर विश्वास नाही. पण, लोकांच्या विश्वासावर माझा विश्वास आहे.) अक्कल वाटत असताना, पोलिस आयुक्त संजीव दयाळ यांच्यासह ईतर अधिकारी फुगडी खेळायला गेले होते काय, असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्याच्या मनात पडतो. तुमचा लेख खूपच छान आहे.. आवडला.. धन्यवाद.

    ReplyDelete