`मऊ लागलं की कोपराने खणायचं' हा वाक्प्रचार माणसं अनेक ठिकाणी वापरतात... खरंतर तो सगळय़ात चपखलपणे लागू होतो तो माणसाच्या निसर्गाविषयीच्या वर्तनाला... त्यातही हा वाक्प्रचार अगदी फिट्ट बसतो तो माणसाच्या खरोखरीच्या जमीन खणण्याला... खाणकामाला.
पृथ्वीच्या भूस्तरावर ओरबाडण्यासारखं काय काय आहे, याचा माणसाचा शोध संपला, त्यानंतर माणसानं पृथ्वीचं काळीज कुरतडायला सुरुवात केली असतार... माणसाच्या विकासासाठी आवश्यक अशी खनिजं नाहीतरी पृथ्वीच्या पोटात निरुपयोगी अवस्थेत पडूनच होती, ती माणसाने बाहेर काढली, तर त्या बिघडलं काय, असा विकासवाद्यांचा सवाल असणार. त्यावरचं उत्तर सोपं आहे. मनुष्यजातीचा विकास हे फारतर मनुष्यजातीचं ध्येय असू शकतं, पण, हे काही मनुष्येतर निसर्गाचं, पृथ्वीचं, अखिल विश्वाचं ध्येय नाही. माणसाच्या विकासाच्या हव्यासात निसर्गाचं संतुलन बिघडलंच तर ते दुरुस्त करण्याची जबाबदारी निसर्गाची नाही. ती माणसाची आहे... कारण, संतुलन बिघडल्याने निसर्ग नष्ट होणार नाही (पृथ्वीवरची सगळी सजीवसृष्टी संपली तरी निर्गुण निराकार निसर्ग असेलच)... नष्ट झालाच तर माणूस नष्ट होणार आहे... याचं भान माणसाला आहे, असं त्याचे माकडचाळे पाहून वाटत नाही.
आपल्या उद्योगांनी आपण निसर्गाचं काय नुकसान करतो आहोत, याचं भान तर दूरच राहिलं, आपण त्यातून मानवजातीचा विकास साधतो आहोत, म्हणजे नेमकं काय साधतो आहोत, हे स्पष्ट नसलं की काय होतं, याचं धगधगतं उदाहरण म्हणजे `ब्लड डायमंड' किंवा रक्तरंजित हिरेउद्योग.
`ब्लड डायमंड' किंवा `कॉन्फ्लिक्ट डायमंड' किंवा `वॉर डायमंड' हा आफ्रिकेतल्या सुमारे 15 देशांच्या खाणींमधून निघालेल्या हिऱयांना उद्देशून वापरला जाणारा निर्भर्त्सनादर्शक शब्द आहे. जेणेकरून तो खरेदी करणाऱयाला तो खरेदी करीत असल्याबद्दल शरम वाटावी. असा हिरा `अधिकृत' मानला जात नाही, अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांमध्ये त्याच्यावर बंदी आहे.
कारण ते अनेक देशांमध्ये स्थानिक यादवीला प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या पैशावर अनेक देशांमधील दहशतवादी संघटना पोसल्या जातात. आफ्रिका खंड हा जगातला सगळय़ात मागासलेला खंड. इथल्या आदिम टोळय़ांनी आधुनिक युगामध्ये नाना नावांच्या संघटनांचं रूप धारण केलं आहे. त्यामुळे कोणतीही पक्की राज्यव्यवस्था इथल्या अनेक देशांमध्ये तग धरू शकलेली नाही. अंगोला, लायबेरिया, सिएरा लिओन, आयव्हरी कोस्ट, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (पूर्वीचा `झैरे'), रिपब्लिक ऑफ काँगो, झिंबाब्वे या देशांमध्ये कुठे हुकुमशाही आहे तर कुठे नावापुरती लोकशाही, तर कुठे आणखी काही. सर्वत्र वेगवेगळय़ा गटांमधले दहशतवादी उठाव करत असतात, त्यांना शेजारी राष्ट्रांची फूस असते, कधी उघड तर कधी छुपी मदत असते. या सगळय़ा यादवी बंडाळय़ांना किंवा दोन राष्ट्रांमधील युद्धांना रसद मिळते ती हिरेविक्रीतून मिळणाऱया अमाप पैशातून.
म्हणजे पाहा, ज्या खाणकामातून देशाचा विकास होऊ शकतो, ज्यातून मिळालेल्या उत्पन्नातून पायाभूत सुविधा उभ्या राहू शकतात, राष्ट्राचं जीवनमान उंचावू शकतं, त्या पैशावर लुटारूंच्या टोळय़ा डल्ला मारतात आणि देश भकास करण्यासाठी त्याचा वापर करतात. या देशांमधल्या खाणींवर कधी सरकारचं वर्चस्व असतं कधी दहशतवादी संघटनांचं. दोन्हीही खाणकामगारांना जनावरांसारखीच अमानुष वागणूक देतात. सरकारच्या बाजूने उभं राहिलं तर दहशतवादी शिरकाण करतात. दहशतवाद्यांची साथ दिली तर सरकार चामडी सोडवटतं, अशा पेचात सामान्य नागरिक राहतात. अशात मुलं असलीच तर शाळा शिकतात.
या भयाण परिस्थितीला कारक असलेले हिरे सुसंस्कृत जगानं खरेदीच करता कामा नयेत, असा फतवा आंतरराष्ट्रीय समुदायानं काढला आणि या देशांच्या हिऱयांवर बंदी लादली गेली. त्यातून 2000 साली जागतिक हिरे संघटनेने किम्बर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम ही योजना आणली. यात एखादा हिरा बाजारात विकण्याआधी त्याला त्याचा उगम कोणत्या खाणीत, कधी झाला याची संपूर्ण अधिकृत (म्हणजे स्थानिक सरकारची) नेंद असलेलं प्रमाणपत्र दिलं जातं. थोडक्यात म्हणजे, हा ब्लड डायमंड नाही ना, याची यथाशक्ती खात्री करून घेण्याचा हा प्रकार आहे. अनेक खरेदीदार देशांमध्ये या सर्टिफिकेटशिवाय हिऱयांची खरेदी-विक्री करण्यालाच बंदी आहे. त्यामुळे, वॉर झोन किंवा कॉन्फ्लिक्टमधलया प्रत्येक देशाला त्यांचं अधिकृत हिरेउत्पादन करण्याचं, त्याची नोंद ठेवण्याचं बंधन आलं. आता जिथे कायदा येतो, कडक निर्बंध येतात, तिथेच गैरप्रकार आणि स्मगलिंगसारख्या पळवाटाही निर्माण होतातच. त्यानुसार बेकायदा खणून काढलेले हिरे अधिकृत केले जाणे, या देशातले हिरे त्या देशाच्या नावावर खपवणे आणि बिना सर्टिफिकेटचे हिरे तस्करी करून खरेदीदारांपर्यंत पोहोचवणे यासारख्या अनेक गैरप्रकारांनाही उधाण आलं.
ही सगळी ढोबळ माहिती सुरुवातीलाच देण्याचं कारण असं की ती नसेल, तर `ब्लड डायमंड' या सिनेमाविषयी बोललेलं काही कळणंच शक्य नाही.
`ब्लड डायमंड' हा सिनेमा नावातच स्पष्ट केल्याप्रमाणे उपरोल्लेखित ब्लड डायमंडवर तर आहेच; पण, त्यात सिनेमाच्या केंद्रस्थानी असलेला लालसर गुलाबी रंगाचा मोठय़ा आकाराचा, अतिशय महागडा हिराही त्याच्या रंगामुळे `ब्लड डायमंड' म्हणूनच ओळखला जातो, असाही संदर्भ आहे.
`ब्लड डायमंड'चं कथानक घडतं सिएरा लिओन या देशात. हे कथानक काल्पनिक असलं तरी त्यातला संघर्षही खरा आहे आणि काही घटनांचा संदर्भही.
1996-97मधल्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. सिएरा लिओनमधल्या एका खेडय़ावर रिव्होल्युशनरी युनायटेड फ्रंट (आरयूएफ) नावाच्या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी हल्ला चढवतात, तिथून सिनेमा सुरू होतो. या हल्ल्यात ते सॉलोमन व्हँडी (जीमान हाश्नसू) या कोळय़ाला पकडतात. तत्पूर्वी सॉलोमन आपल्या कुटुंबाला मात्र पळून जायला लावतो. आरयूएफ सॉलोमनला बंदी बनवते आणि कॅप्टन पॉयझन नावाच्या एका टोळीप्रमुखाच्या ताब्यात गुलाम म्हणून सोपवते. त्याचवेळी सॉलोमनचा मुलगा डिया- ज्याने मोठं होऊन खूप शिकावं, चांगलं आयुष्य जगावं अशी कोणत्याही प्रेमळ कर्तव्यदक्ष बापाप्रमाणे सॉलोमनचीही खूप इच्छा असते- त्याला आरयूएफच्या दहशतवादी गटात टाकलं जातं. मुलांचे मेंदू लहानपणीच द्वेष आणि वैमनस्याने भरून टाकले की त्यांच्यातून नृशंस दहशतवादी घडवणं सोपं असतं, या तत्त्वाचा अवलंब करून डियाचं पद्धतशीर ब्रेनवॉशिंग केलं जातं. तो पापणीही न लववता, मनात अपराधाचा पुसटसा ठिपकाही न उमटवता कोणाचाही खून पाडण्यात पारंगत होतो. आरयूएफचा सगळा खर्च हिऱयांच्या व्यापारातून भागत असतो. त्यांच्या हिऱयाच्या खाणीवर सॉलोमनला कामगार म्हणून नेमलं जातं. तिथे त्याला एक मोठा, अनमोल हिरा सापडतो. तो हुशारीने तो हिरा पायाच्या बेचक्यात दडवून बाहेर नेतो आणि जंगलात एका झुडपाखाली पुरतो. सॉलोमनने हिरा पळवलाय हे कॅप्टन पॉयझनला समजतं पण त्याचा छडा लागण्याच्या आत सरकारी फौजा या खाणीवर छापा मारतात आणि सॉलोमन, पॉयझन हे सगळेच पकडले जातात. तुरुंगात पॉयझन हा सॉलोमनला सतत दरडावत, धमकावत त्या हिऱयाविषयी विचारत असतो. ही चर्चा डॅनी आर्चर (लिओनार्डो डिकॅप्रिओ) हा त्यांच्याबरोबरच कैदेत असलेला व्यावसायिक मारेकरी ऐकतो. झिंबाब्वेमध्ये जन्मलेला गोरा आफ्रिकन डॅनी हा आरयूएफच्याच कमांडरांकडून हिरे घेऊन त्यांना त्याबदल्यात शस्त्रZ पुरवण्याचं काम करत असतो. लायबेरियामध्ये चोरून हिरे नेत असताना पकडला गेल्याने तो तुरुंगात आलेला असतो. कर्नल कोएत्झी या आफ्रिकन स्मगलर कम शस्त्रविक्रेत्यासाठी डॅनी काम करत असतो. कोएत्झीला व्हॅन डे काप या आफ्रिकेतल्या प्रसिद्ध हिरे व्यापारी कंपनीच्या अधिकाऱयाने नेमलेले असते. कोएत्झी आणि डॅनी यांच्यात आणखी एक नाते असते ते सैन्यातले. दक्षिण आफ्रिकेच्या सीमा सुरक्षा दलातल्या सर्वात नावाजलेल्या तुकडीत कोएत्झी हा एकेकाळी डॅनीचा कमांडर असतो. डॅनीकडून हस्तगत केल्या गेलेल्या हिऱयांची किंमत डॅनीलाच चुकवायची असते. त्यासाठी त्याला मोठा हात मारण्याची गरज असते. अशात कॅप्टन पॉयझनच्या तोंडून त्या मोठय़ा हिऱयाचा उल्लेख त्याच्या कानी पडतो. तो हिरा शोधून काढला तर आपला अमाप फायदा होईल, हे त्याच्या लक्षात येतं. तो तुरुंगाधिकाऱयांना पैसे चारून सॉलोमनची सुटका घडवून आणतो. त्याने हिरा मिळवून दिला तर त्याच्या कुटुंबाशी गाठ घालून देण्याचा सौदा डॅनी करतो.
सॉलोमनचं कुटुंब कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी आर्चर आणि सॉलोमन मॅडी बॉवेन (जेनिफर कॉनेली) या अमेरिकन पत्रकार महिलेला भेटतात. आर्चरसारखा मुरलेला गुन्हेगार सॉलोमनचा फक्त हिरा शोधण्यापुरता वापर करतोय, हिरा सापडताक्षणी तो हिरा चोरून आफ्रिकेबाहेर पळून जाईल आणि सॉलोमनला दिलेली आश्वासनं वाऱयावर विरून जातील, हे मॅडीच्या लक्षात येतं. मानवतावादी बॉवेन मग आर्चरशी सौदा करते. त्याने तिला आफ्रिकेतून ब्लड डायमंड्सचा व्यापार कसा चालतो, त्याबद्दलची माहिती द्यायची आणि त्याबदल्यात ती सॉलोमनच्या कुटुंबाचा शोध घेण्यात आर्चरला मदत करणार, असा हा सौदा असतो. ब्लड डायमंड्सच्या बाजारपेठा समजल्या की त्यांचा व्यापार रोखता येईल, त्यातून यादवी युद्धखोर टोळय़ांना पैसा मिळणं बंद होईल आणि आफ्रिकेत शांतता नांदेल, अशी तिची आदर्शव्रादी मांडणी असते. आर्चर तिच्यापुढे नमतो. तिला हवी ती माहिती देतो आणि तिच्या मदतीने पत्रकारांच्या काफिल्यात शिरून हिरा शोधायला निघतो. व्हॅन डे कापकडे लोकांना वाटतं त्यापेक्षा जास्त हिरे आहेत, ते तो व्हॉल्ट्समध्ये दडवून ठेवतो आणि हिऱयांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करतो, त्यामुळे हिऱयांना अधिक किंमत मिळते, ही गुप्त माहितीही आर्चर मॅडीला पुराव्यासह देतो. ही माहिती बाहेर पडेल, तेव्हा व्हॅन डे कापचा पूर्ण पाया उद्ध्वस्त होऊन जाईल आणि हिरेव्यापार कोलमडेल, असं भाकितही तो करतो. हा प्रवास सुरू असतानाच आरयूएफचा हल्ला होतो आणि डॅनी-सॉलोमन रात्रीच्या अंधारात हिरे शोधायला पळ काढतात. ते कर्नल कोएत्झीच्या कॅम्पवर जातात. तेथील सैनिक सिएरा लिओनवर कब्जा करण्यासाठी युद्धाच्या तयारीत आहेत, हे कळल्यावर तिथून बराचसा शस्त्रसाठा, दारुगोळा घेऊन हे दोघे पळ काढतात. मॅडी परदेशी नागरिकांना सुरक्षित बाहेर नेणाऱया विमानातून देशाबाहेर जाते. हिऱयाच्या शोधात लपून छपून जात असताना सॉलोमनला आरयूएफच्या गाडीत त्याचा मुलगा डिया दिसतो. दहशतवाद्यांची ही तुकडी सॉलोमनने जिथे हिरा लपवलेला असतो, त्या भागातच तैनात असते. कॅप्टन पॉयझनही तिथेच त्याच हिऱयाच्या शोधात असतो. त्याचवेळी कर्नल कोएत्झीची तुकडीही याच मौल्यवान हिऱयासाठी आरयूएफच्या तुकडीवर हल्ला करते. त्या गदारोळात सॉलोमन पॉयझनला ठार मारतो. कोएत्झी सॉलोमनला तो हिरा काढायला भाग पाडतो. पण, हिरा सापडल्यावर कोएत्झी हा सॉलोमन, डिया आणि आपल्यालाही ठार मारेल, हे लक्षात आल्यावर डॅनी कोएत्झीवर हल्ला चढवतो आणि त्याला ठार मारतो. दहशतवाद्यांनी पुरते ब्रेनवॉशिंग केलेला डिया स्वतःच्या बापावरच बंदूक रोखतो. पण, सॉलोमन त्याला ताळय़ावर आणतो आणि डिया त्याच्यासोबत घरी परतायला तयार होतो.
डॅनीने जंगलातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी एका विमानाची व्यवस्था केलेली असते. डॅनी, डिया आणि सॉलोमन हे तिघेही जंगलाकडे निघतात. तेव्हा आपल्यालाही एक गोळी लागली आहे आणि तिने फुप्फुसाला भोक पाडले आहे, हे डॅनीच्या लक्षात येते. त्या जखमेतून सतत रक्तप्रवाह सुरू असतो. सॉलोमन त्याला काही अंतर उचलून घेऊन जातो. डॅनी त्याला सांगतो, ``मी आता मरणार आहे. माझा नाद सोड. तू तुझ्या मुलाला घेऊन घरी जा.'' मरणासन्न डॅनी त्यांच्या मागावर असलेल्या मारेकऱयांना रोखून धरतो. मरण्याआधी तो मॅडीला फोन करून डिया आणि सॉलोमनची काळजी घेण्याचं वचन तिच्याकडून घेतो आणि आफ्रिकेच्या निसर्गसौंदर्याचे अखेरचे दर्शन डोळय़ांत साठवून शांतपणे मरतो.
सॉलोमन लंडनला जातो. तिथे मॅडीच्या मदतीने तो हिरा 20 लाख पौंडांना विकतो. त्याची मुलं आणि बायको यांची तिथे भेट होते. मॅडी सॉलोमनच्या हिऱयाच्या सौद्यावर आधारित खळबळजनक बातमी प्रसिद्ध करते. त्यातून व्हॅन डे कापचा पर्दाफाश होतो. सॉलोमन ब्लड डायमंडविषयीच्या एका परिसंवादात आपले अनुभव सांगून ब्लड डायमंड्सवर बहिष्कार घाला, असं भावपूर्ण आवाहन टाळय़ांच्या गजरात करत असताना सिनेमा संपतो.
ज्या सिनेमाच्या शेवटी सिनेमातले लोकच टाळय़ा वाजवत असतात, त्या सिनेमाविषयी सिनेमारसिकाच्या मनात धास्ती असते... असा सिनेमा हा आत्मतुष्ट भाषणासारखा असतो... भाषण करणारा (सिनेमाच्या संदर्भात दिग्दर्शक) स्वतःच शेवटी टाळय़ाही वाजवून घेतो.
`ब्लड डायमंड'ची अगदी ही गत नसली, तरी टाळय़ांचा धोका बऱयाच अंशी सार्थ ठरवणारी काही एलिमेंट्स त्याच्यात आहेतच.
मुळात ठरवून सर्वगुणसंपन्न होऊ पाहणाऱया माणसाचं जे होतं (पक्षी : माकड) तेच या सिनेमाचंही झालेलं आहे. आपल्याला नेमकं काय बनायचंय, हे ठाऊक नसलेल्या माणसाचा जसा गोंधळ उडतो, तोही या सिनेमाचा उडालाय. हा सिनेमा युद्धपट बनायचं की स्फोटक विषयावरचा हार्डहिटिंग डॉक्युड्रामा बनायचं की बापलेकाच्या बिछडण्याची करुण कहाणी मांडायची की लेकासाठी काहीही करायला तयार असलेल्या डेअरडेव्हिल बापाची `रॅम्बो'स्टाइल एकल-साहसगाथा मांडायची की एका जागतिक पटावरच्या ज्वलंत विषयाकडे अंगुलीनिर्देश करणारा सनसनाटी भव्यपट बनायचं, अशा वैचारिक गोंधळात सापडलेला हा सिनेमा आहे. त्यावर पटकथाकार चार्ल्स लीव्हिट आणि दिग्दर्शक एडवर्ड झ्विक या दोघांनी सोपा मार्ग काढलाय. जो भाग ज्या सिनेमाकुळीसारखा असेल, तो त्या पद्धतीनं लिहायचा आणि चित्रित करायचा. म्हणजे बापलेकांचा पोर्शन एकदम भावुक, युद्धाच्या प्रसंगांमध्ये ऍक्शन फिल्मचा आभास, वास्तववादी बनायचं तर एकदम दहशतवादी लोकांचे हात तोडताहेत वगैरे क्रूर प्रसंग, अशी ठिगळाठिगळांची गोधडी.
या सिनेमाची वनलाइन कथा (वर दिलेली) बारकाईने वाचली की लक्षात येतं की ही उत्तम साहित्यकृती नाही, तर परिणाम गृहीत धरून बेतलेली रचना आहे... म्हणजे कविता नाही, सिच्युएशननुसार रचलेलं गीत आहे... खरंतर जवळपास प्रत्येक सिनेमा तसाच असतो, पण चांगल्या सिनेमात बेतलेपण सफाईने झाकलेलं असतं... चांगल्या गीताला कवितेची क्वालिटी असते, तशीच ही गोष्ट. पण, `ब्लड डायमंड'ची कथा वाचतानाच हा जागतिक विषयावरचा इंग्रजी भाषेतला हिंदी सिनेमा आहे की काय, असं वाटतं... तो पाहताना तर त्याची खात्रीच पटत जाते.
अगदी शेवटचा दडवलेल्या हिऱयाभोवतीचा सीन पाहा. ज्यात अजित हा खलनायक आहे, प्रेम चोप्रा वगैरे मंडळी उपखलनायक आहेत, धर्म़ेंद्र वगैरे दोन-तीन नायक-सहनायक आहेत, अशा सत्तरच्या दशकातल्या कोणत्याही हिंदी सिनेमातला क्लायमॅक्स आठवतो. आधी याची सरशी, मग त्याची सरशी, फक्त हिरा आकाशात उडवून झेलण्याचा खेळ तेवढा नाही, बाकी तेच.
सिनेमातल्या सगळय़ा व्यक्तिरेखा पाहा. कार्डबोर्डच्या पुठ्ठय़ाची चित्र असतात, तशा. सपाट. त्यांना खोलीच नाही. एकच एक स्वभाव. तोही अतिशय प्रेडिक्टेबल. कारण सगळे हॉलिवुडचे स्टिरिओटाइप्स. नायक- गोरा- बेफिकीर- वाईट धंद्यातला उलटय़ा काळजाचा भासणारा- पण त्या पत्थरदिलाच्या कातळातून माणुसकीचा गुप्त झरा वाहतोय वगैरे छापाचा. नायिका- गोरीच. अतिशय स्मार्ट, मानवी हक्कवाली, माणुसकीची पुतळी. ती नायकातली मेलेली माणुसकी जागवते- इतर जागवलेल्या भावनांना `जागण्या'इतका वेळ दोघांनाही मिळत नाही, अशी `हाय रे दैवा' छापाची अधुरी प्रेमकहाणी. उपनायक- काळा. काळय़ा माणसाचे सगळे फिल्मी गुणावगुण धारण केलेला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची सगळी धडपड सुसंस्कृत होण्याची- म्हणजेच रंगानं नाही तर नाही, वृत्तीनं `गोरं' होण्याची. सगळे खलनायक- गोरे असूनही काळे काळेकुट्ट. त्यांना दुसरी शेडच नाही.
हे सगळे झाले सिनेमॅटिक आक्षेप. सिनेमारचनेचं तंत्र आणि कला यांचं उपयोजन सिनेमात नेमकं कशा प्रकारे व्हायला हवं होतं, या छापाचे. पण, या सिनेमावरचे सर्वात महत्त्वाचे आक्षेप आशयद्रव्याबद्दलचे आहेत. या कथानकाचा नायक डॅनी का आहे? हा पहिला आक्षेप. म्हणजे, गोऱया प्रेक्षकांचा एक `एजंट', एक `संजय', एक कॅटालिस्ट कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये असला पाहिजे- त्याच्या नजरेतून सिनेमा प्रेक्षकांसाठी उलगडला पाहिजे ही त्याची मुख्य गरज. परदेशातल्या टूरवर नाही का टुरिस्ट कंपन्या आपली भाषा बोलणारा (आणि पिझा-पास्ताच्या प्रदेशात जाऊनही वरणभातावर लिंबू पिळून वाढणारं) `आपला माणूस' सोबत देतात, त्यातला प्रकार. पण, तोच नायक असणं हा सिनेमातला वर्णवर्चस्ववादच आहे. म्हणजे अडाणी काळी माणसं एकमेकांमध्ये भांडताहेत. त्यांच्या भानगडीतून फक्त व्यापारी फायदा पाहणारा गोरा माणूस नामानिराळा आणि सांस्कृतिकदृष्टय़ा उच्च. शिवाय जेव्हा एका काळय़ा माणसाचं कुटुंब हिरावतं, दुरावतं, तेव्हा त्याच्या मदतीला दोन गोरी माणसंच धावतात, तेच तारणहार. युरोपात आल्यानंतरच त्याचं उन्नयन होतं, हा आणखी एक भाग.
या सगळय़ा `ब्लड डायमंड'च्या रक्तरंजित इतिहासाच्या मुळाशी युरोप-अमेरिकेची खनिज संपत्ती, जगात ती कुठे का असेना, लुटून ओरबाडून किंवा खरेदी करून वापरून संपवण्याची हावरी वृत्ती कारणीभूत आहे, या मुद्दय़ाला हा सिनेमा लांब काठीनेही स्पर्श करीत नाही, इतका तो `पोलिटिकली करेक्ट' आहे. (उगाच का पाच पाच ऑस्कर नामांकनं मिळतात.) हिऱयांचा काळाबाजार वाईट, हिऱयांच्या पैशातून युद्धं आणि यादवी बंडाळय़ा खेळल्या जाणं वाईट, असे हिरे खरेदी करणं वाईट- पण आफ्रिकेतल्या पर्यावरण समतोलाचे तीन तेरा वाजवत `अधिकृत'पणे होणारं हिऱयांचं उत्खनन वाईट नाही- कारण हीरा है सदा के लिए!
या सगळय़ा चर्वितचर्वणानंतरही एक तथ्य उरतेच- की हॉलिवुडच्या मुख्य प्रवाहात अशा विषयावरचा- सोयीची सत्यं मांडणारा का होईना- सिनेमा निघतो, त्याची निर्मितीमूल्यं अफाट असतात, त्यात अव्वल दर्जाचा अभिनय असतो आणि तो आधी प्रभावित करतो, हलवून सोडतो आणि मग प्रश्नात पाडतो. त्या प्रश्नांवरही अशी चौफेर चर्चा होऊ शकते.
आपल्याकडच्या मायनिंगच्या प्रश्नावर 100 वर्षांनी म्हणजे 3010 साली कोणी एखादा ऐतिहासिक सिनेमा बनवला, तरी खूप.
(साकव, दिवाळी २०१०)
No comments:
Post a Comment