लहानपणापासून तो तसा बुजराच होता...
चारचौघांत आत्मविश्वासानं वावरण्यासारखी स्थितीही नव्हती... जीभ जड, उच्चार तोतरे, चेहरा देखणा, पण अंगकाठी फाटकी. त्यात चहूबाजूंना 'यशस्वी' आईबापांची चमको मुलं. त्यांच्या तुलनेत याचे बाबा तर फ्लॉपमध्येच जमा होणारे...
...तरीही एकदा त्यानं निर्धार केला आणि प्रचंड मेहनतीनं तोतरेपणा पूर्ण घालवून टाकला...
...हुश्श करेपर्यंत पुढच्या वळणावर पुढची सत्त्वपरीक्षा वाट पाहात होती... ऐन एकविशीत स्कॉलिऑसिस या मणक्यांचा किचकट आणि चिवट विकारानं त्याची अक्षरश: 'पाठ धरली'... या आजारात त्याला साधं चालणंही मुश्कील होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं... मग नाचणं, मारामाऱ्या, स्टंट्स, चपळ हालचाली वगैरेंची बातच सोडा!...
ही त्याच्या आयुष्यभराच्या स्वप्नावरची कचकचीत लाल फुली होती... एन्ड ऑफ अ ड्रीम... तो कधीही रुपेरी पडद्यावरचा 'हीरो' होऊ शकणार नव्हता... अगदी लहानपणापासून त्याला एकदा तरी सुपरमॅनसारखं उडायचं होतं... तीही इच्छा अधुरीच राहणार होती...
...पण, त्याच्या जिद्दीपुढे तो हटवादी आजारही झुकला आणि सुपरमॅनसारखं आकाशात मुक्त विहरण्याचं त्याचं स्वप्न बत्तिशीत पूर्ण झालं... आज तो भारताचा पहिला 'सुपरहीरो' बनलाय... आबालवृध्दांचा लाडला 'क्रिश'...
...त्याला लहानपणापासून ओळखणारे आप्तमित्र म्हणत असतील, 'पडद्यावर आता झाला असेल हो, आमचा हृतिक लहानपणापासून सुपरहीरोच होता...' कारण, सदोदित 'झीरो'चाच बट्टा लागावा, अशा अनेक कमतरतांवर हृतिकनं लहानपणापासून चिकाटीनं, जिद्दीनं मात केलीये.... तोही कोणताही गाजावाजा न करता.... डिंडिम न पिटता.
पिताश्री राकेश रोशन हा दुसऱ्या फळीतला दुय्यम नट. हेमामालिनीचा नायक बनूनही आणि काही सिनेमांत बरी कामं करूनही त्याच्या मागचा 'ऑल्सो रॅन'चा शिक्का काही टळला नव्हता. जीतेंद्रअंकल, ऋषी कपूरअंकल या सक्सेसफुल अंकललोकांच्या घोळक्यात आपल्या वडिलांना नॉनएन्टिटी बनून बसलेलं हृतिकनंही पाहिलं असणार बऱ्याचदा. स्वत: राकेशनं कधीतरी सांगितलंय, 'जीतू आणि ऋषीच्या सहीसाठी उत्सुक चाहत्यांचा घोळका मला पालांडून जायचा अनेकदा तेव्हा मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं.'
तोतऱ्या हृतिकला बोलक्या करीना, करिश्मा, अभिषेक, टि्वंकल, तुषार, एकता यांच्या कंपूत वेगळं काय वाटलं असेल हो? तो एका फ्लॉप बापाचा हकल्या मुलगा होता... नॉट टू बी काउंटेड अमंग्स्ट दि हॉट ऍंड हॅपनिंग!
पण, राकेश रोशन मुळात हुशार. तो व्हाया के. विश्वनाथ आधी सेन्सिबल सिनेमाकडे आणि नंतर दिग्दर्शनाकडे वळाला. दिग्दर्शक म्हणून सर्वसमावेशक, सबगोलंकारी व्यावसायिक सिनेमाची लंबीचवडी पुडी बांधण्याची त्याची सवय अगदी 'क्रिश'मध्येही सुटलेली नाही. (याला अपवाद फँटास्टिक 'खेल'चा, पण तो पडला.) व्यावसायिक यशाचा बऱ्यापैकी मंत्र गवसलेल्या डिरेक्टर राकेश रोशनची गाडी व्यवस्थित चालू लागली. या गाडीचा एक छोटासा खिळा होता हृतिक रोशन. ज्याला पडद्यावर सिनेमाच्या शेवटच्या बारीक टायपातल्या श्रेयनामावलीतही क्रेडिट मिळालं नाही, असा राकेश रोशनचा पाचवा-सहावा असिस्टंट. तसं लहानपणापासून हृतिकला सिनेमातच यायचं होतं. म्हणूनच आजोबा जे. ओमप्रकाश यांच्या सुपरहिट 'आशा'मध्ये 'जाने हम सडक के लोगों से महलोंवाले क्यों डरते हैं' या खास सडकछाप गाण्यात तो जीतेंद्रबरोबर दे धूम नाचला होता. त्या गाण्यासाठी आजोबांनी दिलेले 100 रुपये ही त्याची पहिली कमाई. 'आप के दीवाने' आणि वडिलांच्या 'भगवानदादा'मध्येही त्यानं फुटकळ भूमिका केल्या होत्या.
कधीतरी हीरो बनण्याचं स्वप्न उरात दडवून तो वडिलांकडे असिस्टंटगिरी होता. राकेश रोशन हा नियतीनंच कायम जमिनीवर ठेवलेला इसम. त्यानं तो वारसा लेकाकडे सोपवला. असिस्टंटनं असिस्टंटच्याच औकातीत राहावं हा त्याचा पृथ्वीराज कपूरी शिरस्ता. दिग्दर्शक म्हणून बऱ्यापैकी यशस्वी वडिलांचा असिस्टंट हृतिक सेकंड क्लासनं प्रवास करायचा, कॅमेरा उचलायचा, क्रेन हलवायचा, शॉट सुरू असताना जमिनीवर फतकल मारून बसायचा... (हृतिक सांगतो की, अजूनही ती सवय सुटलेली नाही... तो कधीमधी एकदम क्रेनला हात द्यायला धावतो, शॉटला वेळ असेल तर जमिनीवर बिनधास्त बसतो... मग कुणीतरी स्पॉटबॉय येतो आणि 'सर, ये आप क्या कर रहे है?' असं विचारून हृतिकला त्याच्या 'सर'कीची जाणीव करून देतो)
...तोतऱ्या, स्कॉलिऑसिसग्रस्त, मुखदुर्बळ, न्यूनगंडग्रस्त अशा या बालकात लहानपणापासून एक अजब ऊर्मी होती, अभिनयाची. जाम किडा होता ऍक्टिंगचा. एकदा राकेशनं विचारलं, 'बेटा डुग्गू, तुला पुढे जाऊन काय बनायचंय?'
डुग्गू म्हणाला, 'ऍक्टर बनायचंय.'
दुधानंच नव्हे, तर ताकानंही तोंड पोळलेल्या राकेशनं त्याला समंजस बापाप्रमाणे आणखी काही वेळ विचार करण्याचा सल्ला दिला होता. अनेक वर्षं विचार केल्यानंतरही डुग्गूची आकांक्षा बदलली नव्हती. हा पठ्ठया बापाच्या 'कोयला'च्या शूटिंगच्या काळात शाहरुखनं केलेला प्रत्येक सीन पॅकअपनंतर त्याच लोकेशनवर एनॅक्ट करायचा. त्यानं पटवून ठेवलेली कॅमेरामनची माणसं तो शूट करायची आणि फुटेज चूपचाप काढून त्याच्याकडे सोपवायची. 'कोयला'च्या एडिटिंगच्या वेळी शिफ्ट संपल्यावर ही रिळं चढवून हृतिक आपल्या स्वत:च्या ऍक्टिंगचा अंदाज घ्यायचा. त्यातच 'करण अर्जुन'च्या काळात सलमाननं त्याला सांगितलं होतं, 'बेटा ऍक्टिंग कर ले, चमकेगा.' बॉडी बनवायला आपलं प्रायव्हेट जिमसुध्दा खुलं करून दिलं होतं त्यानं.
'कहो ना प्यार है' शाहरुखला घेऊनच करायचा प्लॅन होता राकेशचा. तसं त्यानं सांगितल्यावर डुग्गू म्हणाला, 'डॅड, शाहरुखला घेऊन तुम्ही टीनएज लव्हस्टोरीचा पोर्शन कसा करणार? इट विल लुक रिडिक्युलस. हे एखाद्या न्यूकमरला घेऊन करायचं पिक्चर आहे.' काही महिन्यांनी राकेशच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यानं डुग्गूला सांगितलं, 'बेटा आय ऍम लाँचिंग यू विथ 'कहो ना प्यार है'! हृतिक म्हणाला, 'मला तयारीला वेळ हवाय.' राकेशनं चार महिने दिले. हृतिकनं किशोर नमित कपूरचा ऍक्टिंग क्लास जॉइन केला. अनुपम खेरअंकलचं ऍक्टिंग वर्कशॉप केलं, उर्दूची शिकवणी लावली आणि चार महिन्यांत राज आणि रोहित आत्मसात केले. रोहित... साधासुधा, निर्मळ, सोज्वळ, साधा, गरीब, सालस, स्वप्नाळू. आणि राज... स्टायलिश, डायनॅमिक, डॅशिंग, क्लासी, अग्रेसिव्ह. एकदम दोन ध्रुवांवरचे दोघे.
'कहो ना...' धो धो चालला यात नवल काहीच नव्हतं... सिनेमात जोश होता, स्क्रिप्ट टाइट होतं, गाणी तुफान होती आणि आजवरच्या कोणाही डेब्युटंटला मागे सारणारा सफाईदार, कडक अभिनय हृतिकनं केला होता... त्यानं पदार्पणात बेस्ट डेब्युबरोबरच बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड जिंकलं, त्याक्षणी सुपरस्टार शाहरुखलाही आपली इनसिक्युरिटी लपवता आली नव्हती.
हिंदी सिनेमाच्या हीरोला लागणारं सगळं काही एका ठिकाणी कुठे एकवटलेलं असेल, तर ते हृतिक रोशनमध्ये. निर्विवाद अभिनयकौशल्य, इंटरनॅशनल अपील असलेला देखणा चेहरा, पिळदार शरीर, अचाट नृत्यकौशल्य, हिंदी-उर्दूवर प्रभुत्व, रोमँटिक हीरोचा गोडवा आणि ऍक्शन हीरोचा जोश... सब का मालिक एक!... तरीही पुढे 'कहो ना...'च्या उंचीचं यश मिळवायला हृतिकला पुन्हा वडिलांचाच सिनेमा करावा लागला... विधु विनोद चोप्रा, सूरज बडजात्या, सुभाष घई, फरहान अख्तर अशा मातब्बरांचे सिनेमे केल्यानंतरही. 'फिजा', 'मिशन काश्मीर', 'लक्ष्य'मधल्या त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं, पण 'सोलो' व्यावसायिक यशाचा टिळा लावण्यासाठी पुन्हा वडिलांचं बोट पकडून 'कोई मिल गया'च करावा लागला आणि आता 'क्रिश'...
हृतिक साधा सरळ आहे, हा त्याचा 'दोष' ठरतोय आजच्या जमान्यात. त्याच्या सिनेमाच्या पडद्याबाहेरच्या वागण्याबोलण्यात 'मसाला' नाही. खासगी आयुष्यात 'चमचमीत' काही नाही. तो पाटर्यांमध्ये धुमाकूळ घालत नाही, कोकेन स्नॉर्टिंग करत नाही, गर्लफ्रेंडच्या घरासमोर जाऊन रात्र रात्र भुंकत नाही, लोकांना मोबाइलवरून धमकावत नाही, गाडयांखाली चिरडत नाही, हरणं मारत नाही, पोरी फिरवत नाही... फक्त पडद्यावर मेहनतीनं सिन्सीअरली कडक ऍक्टिंग करतो आणि चूपचाप घरी जातो... अच्छा बच्चा... हाऊ बोअरिंग!
...म्हणूनच नॉटी, नॅस्टी, डार्क हीरोंवर जीव ओवाळून टाकणाऱ्या तरण्या पोरीबाळींपेक्षा हृतिकचं अपील लहान मुलांमध्येच सॉलिड आहे...
...ही गोष्ट कुत्सितपणे सांगणारे एक गोष्ट विसरतात...
आज वयाच्या बत्तिशीत पाच-सात वर्षांच्या चिल्ल्यापिल्ल्यांचा तो सुपरहीरो आहे... त्यामुळेच ही मुलं बत्तिशीत पोहोचतील, तेव्हाही तो त्यांचा हीरो असू शकेल...
...तेवढी त्याची कुवतही आणि आणि सुपरजिगरही!
No comments:
Post a Comment