Wednesday, February 23, 2011

हम (एकदाचे) दिल दे चुके सनम!


''अर्रर्रर्र चक चक! (सुस्कारा)
हाय रे दैवा! (दीर्घ सुस्कारा)
गेलं राव गिर्रेबाज पाखरू उडून! (प्रदीर्घ सुस्कारा)''
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लाँग अवेटेड साखरपुडयाची बातमी ऐकून भारतवर्षातल्या तमाम युवावर्गाची ही किंवा अशी प्रतिक्रिया झाली असेल, अशी कुणाची समजूत झाली असेल, तर ते नंदनवनात वावरत आहेत... कुणाच्या ते सांगायची गरज नाही.
मुळात 'ऍश'कडे ते अपील नाही.
अं हं हं! गैरसमज नको. हिंदी सिनेमाच्या नटीकडून ज्या प्रकारच्या आवाहक अपीलची अपेक्षा केली जाते, ते ऐश्वर्यामध्ये आहेच. (ते आपल्यात किती आहे, हे अक्षरश: दाखवण्याचा प्रयत्न तिनं नुकताच 'धूम 2'मध्ये करून दाखवलाय.)
पण, उपरोल्लेखित सुस्कारे सोडण्यासाठी, हळहळण्यासाठी जे अपील लागतं, ते ऍशमध्ये नाही.
तसं व्हायला, संबंधित पोरगी 'अ गर्ल यू कॅन टेक होम टु युवर मॉम' अशी असावी लागते... म्हणजे सोप्या मराठीत 'बायको मटिरियल'! ते आपल्या माधुरी दीक्षितमध्ये होतं. तिनं नेन्यांच्या नावाचं कुंकू भांगात भरलं, तेव्हा अखिल भारतवर्षात किती बांगडया फुटल्या असतील, त्याची गणती नाही. माधुरीत प्रेयसीची आवाहक मादकता होती आणि बायकोचं घरगुती अपील. म्हणूनच तिनं 'मला फक्त बटाटयाची भाजी येते' असं एका मुलाखतीत सांगताच तिचे चाहते तिन्हीत्रिकाळ ओन्ली पोटॅटो डाएटवर गेले आणि स्वत: बटाटयासारखे झाले. हे अपील आज विद्या बालनमध्ये आहे, पण ऍशमध्ये नाही.
ही गंमतच आहे. कारण, खरंतर ऐश्वर्या ही 'घरेलु' छापाची मुलगी. सुरुवातीच्या काही भूमिकांमध्येही तिनं हाच 'साधीसुधी सुंदरी'पणा जपला होता. नंतर 'ताल'मधला ग्लॅमरस लुक, 'आ अब लौट चले'मधली बिकिनी, 'चोखेर बाली'मधली उघडी पाठ, 'इश्क कमीना'चे लटके झटके, 'कजरारे कजरारे'मधली मादक अदा आणि आता 'धूम 2' मधला मोकळेपणा यातूनही तिचा तो घरेलुपणा काही सुटलेला नाही खरा! पण, तरीही, 'शी इज नॉट माय कप ऑफ टी' हेच फीलिंग कुठल्याही तरुणाला तिच्याकडे पाहून येतं.
एकतर तिची सुरुवातच 'मिस वर्ल्ड'सारख्या आंतरराष्ट्रीय किताबापासून झाली. आता या मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड म्हणजे आम पब्लिकसाठी मनातल्या मनातही 'फक्त पाहा' कॅटेगरी. तिच्या त्या वेळच्या सौंदर्यात एक खानदानी नजाकत होती आणि रॉयल ग्रेस. आता राजकुमारी काही गावखात्यातल्या लाकूडतोडयाच्या किंवा पाणी खात्यातल्या कारकुनाच्या हातात गावत नाहीत. त्यांची शोभा महालात, राजकुमाराच्या वामांगी.
दॅट डझन्ट मीन की राजकुमारीला कुणी फँटसाइझ करत नाही. पण, ऍशच्या रेखीव सौंदर्यात ऊबदार आवाहन नव्हतं, जाणवायचं ते मेणासारखं थंडगार बाहुलीपण... सुंदर, पण निर्जीव.
तिच्यात ऊब जाणवू लागली ती 'हम दिल दे चुके सनम'पासून. त्यात ती हंड्रेड परसेंट बायको मटिरियल दिसली होती. पण, त्याच सुमारास तिच्या आणि सलमानच्या वादळी अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. खल्लास. हे झाडही एका मर्कटानंच झपाटलं! आता ऍश आणि सलमान यांच्या स्वभावांची जरा जरी कल्पना असलेल्या कुणालाही हे प्रकरण म्हणजे अळवावरचं पाणी आहे, हे लक्षात आलंच असतं. ते तसंच निघालं. पण, त्यातून ऍशच्या नुकत्याच कुठे निर्माण झालेल्या अपीलला धक्का बसलाच. सलमानच्या त्रांगडयातून सुटण्यासाठी या बाईनं विवेक ओबेरॉयचा हात धरला, तेव्हा तर पब्लिकनं 'गॉन केस' म्हणून कपाळावर हात मारून घेतला होता. ही 'टाइमगॅप अरेंजमेंट' आहे, हे तर एक विवेक सोडल्यास अख्ख्या जगाला पहिल्या दिवसापासून कळलं होतं. मग आला अभिषेक... आणि मॅटर सेटलच झालं.
ऐश्वर्या हा ग्रह तमाम युवकांच्या कक्षेत कधी आलाच नाही; मग तिच्या जाण्याचे दु:ख कोण करी?
आता प्रश् उरतो तो तिच्या लग्नाचा तिच्या करीयरवर होणाऱ्या परिणामांचा.
अगदी अलीकडेपर्यंत, म्हणजे श्रीदेवी, माधुरीपर्यंत नटीचं लग्न झालं की ती नायिका म्हणून बाद झाली, असं सरळ समीकरण होतं. कारण, व्यावसायिक हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकाला त्यातल्या नटयांबरोबर मनोमन फँटसाइझ करायचं असतं. त्यासाठी ती 'प्राप्य' असणं गरजेचं असतं. ती लग्न करून 'अप्राप्य' झाली की तिच्याबद्दलचं आकर्षण सरलंच समजायचं.
पण, आता हे चित्र अगदी असंच उरलंय का? जुही चावलानं कितीही लपवलं, तरी तिचं जय मेहताशी लग्न झालंय, हे समस्तांसि ठाऊक झाले होतेच. प्रीटी झिंटा अजूनही अनमॅरिड असेल कदाचित, पण म्हणून तिची नेस वाडियाबरोबरची कम्पॅनियनशिप काही पब्लिकच्या नजरेतून सुटलेली नाही. बिपाशा-जॉन अब्राहम आणि करीना-शाहिद कपूर या तर या इंडस्ट्रीतल्या बिनधास्त जोडया. बिपाशा आणि जॉन एकत्रच राहतात, अशी पब्लिकची समजूत आहे आणि करीना अधूनमधून शाहिदच्या घरी जाऊन 'स्वयंपाक' करते, हेही जगजाहीर आहे. हल्लीच्या प्रेमीयुगुलांना 'वुई आर जस्ट फ्रेण्ड्स' म्हणून झाकपाक करावी लागत नाही, ते बेधडकपणे 'वुई आर सीईंग ईच अदर' असं सांगतात आणि म्हणजे काय, ते पाटर्यांमध्ये, फिल्मी समारंभांमध्ये स्वच्छपणे दिसत राहतं.
या सगळयाच नटया आम पब्लिकसाठी 'बुक्ड' आहेत, 'लायसन्स'धारक. पण, म्हणून 'बिडी जलाइले'तली बिपाशा 'भाभी' वाटत नाही किंवा 'ये मेरा दिल'मधल्या करीनाच्या झटकेबाज अदा 'फक्त शाहिदसाठी' वाटत नाहीत. आणि असलीच उदाहरणं कशाला चघळा. 'कॉर्पोरेट'मधली बिपाशा आणि 'ओमकारा'मधल्या करीनाच्या अभिनयाच्या आस्वादाआडही त्यांचं 'एंगेज्ड' असणं येत नाहीच.
जमाना बदल गया है मामू!
या नटयांचा पडद्यावरचा वावर आणि पडद्यामागचं आयुष्य यांची गल्लत पब्लिक करत नाही. 100-150 रुपये मोजून मल्टिप्लेक्सच्या खुर्चीत प्रेक्षक विसावतो, तेव्हा त्याला फक्त समोरच्या पडद्याशी मतलब असतो...
...या नटनटयांच्या त्यापलीकडच्या 'खेळां'ची जागा गॉसिप कॉलम्समध्ये आणि तेवढयापुरतीच आहे, ये पब्लिक समझ गयेली है!

(महाराष्ट्र टाइम्स, २००७)

No comments:

Post a Comment