क्लायमॅक्सच्या दी एन्डला गुरुभाय हे सॉलिड भाषण ठोकतो... सिनेमातलं 'इन्क्वायरी कमिशन' अगदी मेलोड्रमॅटिकली भारावून जाऊन गुरुभायला मुक्त करतं आणि 'मी-माझा उत्कर्ष' याच्यापलीकडे काहीही पाहायला तयार नसलेलं, शेअर बाजाराच्या जुगारी अड्डयाचा 'आकडा' हा देशाच्या विकासाचा निर्देशांक समजणारं पब्लिक या महापुरुषाच्या थोर वचनांना टाळया-शिटया ठोकतं आणि काहीएक समज, भान शिल्लक असलेला प्रेक्षक कपाळावर हात मारून घेत म्हणतो, ''फरक एवढाच नाहीये गुरुभाय... बापू आणि तुम्ही गुजरातेत जन्मलात, इथेच साम्य संपलं. बाकी सगळा फरकच आहे. गांधींना त्यांच्या मूठभर 'शेअरहोल्डरां'च्या नव्हे, तर सबंध राष्ट्राच्या उत्थानाची काळजी होती. त्यांचा कायदेभंग देश जागवण्यासाठी होता आणि तुमचा कायदेभंग देशाच्या अर्थकारणाला कसर लावणारा, कायद्याला बटीक बनवणारा. गांधींच्या समोर या देशातला सगळयात गरीब माणूस होता. तुमच्यासमोर फक्त तुम्ही... ओन्ली गुरुभाय!''
...एवढी सगळी फिलॉसॉफी झाडण्याआधी मणिरत्नमच्या चाहत्यांना विचाराल, तर ते म्हणतील, मणिभाऊंच्या लाडक्या बदकांच्या, धबधब्यांच्या, चवळीशेंग फटाकडीच्या आयटम साँग्जच्या, बॅकलायटिंगच्या, पावसाच्या सोसापलीकडेही सांगण्यासारखं मणिभाऊंकडे काही असायचं, पाहण्यासारखं प्रेक्षकाला काही गवसायचं. इथे मात्र जत्रेत आईबापाचा हात सुटलेल्या पोरासारखे भिरभिरलेत मणिभाय.
साम-दाम-दंड-भेद वगैरे सर्व वापरून, कोणताही विधिनिषेध न बाळगता सरकारी यंत्रणाही पोखरून, वापरून, आड येणाऱ्या प्रत्येक माणसाला विकत घेऊन रिलायन्सचं साम्राज्य वाढवणाऱ्या धीरूभाई अंबानी यांच्या जीवनापासून प्रेरणा घेतलेला मणिरत्नमचा 'गुरू' हा अर्धकच्चा आणि अनपेक्षितपणे निराशा करणारा, मध्यम दर्जाचा सिनेमा आहे. ना धड प्रेमकथा, ना धड चरितकहाणी, ना धड संघर्षकथा असा काहीतरी गडबडगुंडा होऊन या सिनेमाची गोधडी होऊन बसली आहे... आता खास मणिरत्नम शैलीतली प्रसंगांची हाताळणी, काही चमकदार सीन्स, सगळयाच कलावंतांचा ए वन अभिनय, ए. आर. रहमानचं संगीत, राजीव मेननची सिनेमॅटोग्राफी, इतर तांत्रिक बाबी ही ठिगळं भरजरी आहेत खरी; पण...
...आपल्या मणिभायनी त्यांच्या परीनं पण केला आहे तो या देशातल्या समकालीन समस्यांचा, वास्तवाचा, व्यक्तींचा वेध घेण्याचा. कमर्शियल चौकटीत राहून असलं काही 'डोक्याला खुराक' छापाचं सुचणंच मुळात कौतुकास्पद. त्यात मणिभायच्या 'रोजा', 'बाँबे'ला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांची पसंती लाभली. 'दिल से' डब्यात गेला असला, तरी तो उत्तम होता, अशी उपरती नंतर पब्लिकला झाली, समीक्षकांना तो आवडला होताच. आता या सिनेमांमध्ये मणिभायनी काश्मीर प्रश्, मुंबईतल्या जातीय दंगली आणि ईशान्य भारतातला असंतोष असे समकालीन प्रश् हाताळले होते. त्याबद्दल त्यांचं तोंड फाटेस्तोवर कौतुक करताना आपण हे विसरलोच की मणिभायनी सांगितलीये ती त्यांच्या खास शैलीतली एक प्रेमकथा... समस्या आहे ती बॅकड्रॉपला... पार्श्वभूमीपुरती. मुख्य सिनेमा आहे तो उत्कट प्रेमाचा.
आता कुणी म्हणेल की असे ना का असं, आपलं काय जातंय? तर उत्तर असं आहे की आपला इंटरेस्ट जातो ना दादा. कारण असा एका सीनमध्ये घडणारा उत्कर्ष दाखवणारे डायरेक्टर इथे पैशाला पासरी पडलेत मुंबईत. त्याला मणिरत्नम कशाला पाहिजे! आणि आपल्या गुरूभायला नंतर दी एंडला भाषण ठोकायचंय ना जोरदार. ते कशाच्या आधारावर ठोकणार तो, ते दिसायला नको?
सहसा दिग्दर्शक अडकतात ते वकिलीच्या खोडयात. म्हणजे, एक कथा असते. तिच्यात एक मुख्य पात्र असतं. जोवर ते मुख्य पात्र असतं, तोवर त्याच्यात मानवी गुणदोष असतात. ते पात्र करडया छटांचं राहतं. पटकथाकार-दिग्दर्शक जेव्हा त्या पात्राच्या प्रेमात पडतो, तेव्हा तो त्याचा 'हीरो' बनवतो... आणि स्वत: बनतो हीरोचा वकील. हीरो जे काही करेल, ते कसं 'बरोबर आणि अपरिहार्य' आहे, हे पटवण्याचा त्याचा धंदा सुरू होतो. मणिभायचं गुरूभायच्या बाबतीत तेच झालंय. फक्त बिनपुराव्याची केस उभी केल्यानं दी एंडला त्याची वकिली चौपट होते.
धीरूभाई अंबानी या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वामधली 'मोठं होण्याची' आणि त्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची झिंग खरंतर मणिभायनी पूर्वार्धात व्यवस्थित पकडलीये. त्यात अभिषेकनं धीरूभाईंचं निरागस हास्य अगदी सही सही उचललंय. या माणसाला पैशाशी, त्यातून येणाऱ्या सुखांशी काही घेणंदेणं नाही; यश, अधिक यश, त्याहून अधिक यश यांचीच त्याला नशा आहे, त्यासाठीच तो हरप्रकारे मुसंडी मारतो, असं आपल्याला वाटतं. पण, लायसन्स-परमिट राजची चौकट मोडणं, उद्योगजगतातल्या प्रस्थापित मक्तेदारांना, त्यांच्या संस्थानांना शह देणं वेगळं आणि गंडवागंडवी करून एक्स्पोर्ट लायसन्स मिळवणं, नाना प्रकारच्या डयुटीज बुडवणं, क्षमतेपेक्षा जास्त उत्पादनाचे कारखाने उभारणं हे वेगळं. आधीचा भाग सिनेमॅटिक ऍंटिहीरोइझम म्हणून तरी क्षम्य आहे, दुसरा भाग हा उघडउघड देशद्रोह आहे. त्याचं उदात्तीकरण कसं योग्य ठरेल? आणि 'मी माझं एकटयाचं भलं केलं नाही, 30 लाख शेअरहोल्डर्सचंही भलं केलं', हे गुरूभायचं, एकदम अपीलिंग वाटणारं लॉजिकही पोकळ आणि भयकारी आहे. गुरूच्या कंपनीचे 30 लाख समभागधारक हा काही संपूर्ण देश नाही. त्यांचं भलं करताना त्यानं या देशातल्या किती यंत्रणांना आपण भ्रष्टाचाराची, जी हुजुरेगिरीची कसर लावली, ते समर्थनीय आहे? मग आज रिलायन्सचे अधिकारी सरकारी सुटीच्या दिवशी सरकारी ऑफिसांत बसून सरकारी कामकाज करताना दिसतात, त्याबद्दल त्यांना भारतरत्नच द्यायला हवं!
असल्या उफराटया तत्त्वज्ञानाची वकिली करताना जास्त जोर लावावा लागतो. तो न लावता मणिभाय मोंताजवर भागवून नेतात. कोणत्याही प्रोसेसच्या खोलात जात नाहीत. हा वरवरचेपणा समजून घ्यायचा तर या सिनेमातले एकंदर पत्रकारितेचे रेफरन्स पाहा. रिपोर्टरची कार्यशैली पाहा. आणि गुरूभायच्या बातम्यांचे पेपर पाहा. प्रत्येक पेपरात प्रत्येक वेळी आठ कॉलमी हेडलाइनच्या खाली नावच नाही! मणिरत्नमचा गुरूभाय उद्योगजगतातल्या किंवा राजकारणातल्या डावपेचांना जेमतेम स्पर्श करून पुन्हा आपल्या कौटुंबिक झोपाळयावर सुजाताबेन नी साथे झुलायला मोकळा होतो. तेच करत राहतो. आणि मणिकाका बदकांच्या थव्यात, पांगळया मुलीच्या लव्हस्टोरीत, महालांसारख्या सेट्सवरच्या निरर्थक नाचांमध्ये वगैरे जीव रमवत फिरायला मोकळे होतात.
एका वयानंतर हा गुरू 'गॉडफादर'च्या डॉन कॉर्लिओनीसारखा दिसायला लागतो, तसेच गाल फुगवून बोलतो. मग त्याला आठवण होते, ''माझ्या बाबांनी 'अग्निपथ' नावाचा सिनेमा केला होता.'' मग तो 'अग्नीपथ'मधल्या विजय दीनानाथ चौहानची नक्कल करत असल्यासारखा वागूबोलू लागतो. 'अग्नीपथ'साठी अमिताभला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता अभिनयाचा. इथे अभिषेकला असा पुरस्कार मिळण्याची सुपारी घेतल्यासारखी त्याची व्यक्तिरेखा बेतली गेलीये. अभिषेकचा सध्याचा खुरटी दाढीधारी पॉप्युलर, सेक्सी लुक सोडून सफाचट लुक देणं (सफाचट अभिषेकच्या चेहऱ्यावर दिसणारा अवघडलेला निरागसपणा टिपल्याबद्दल मात्र मणिरत्नमला दाद द्यायला हवी), कोणत्याही गेटअपविना वयातली वाढ दाखवणं, त्यात वृध्द अभिषेकला लकवा भरवून तसं बोलायला लावणं, असे आपल्याकडे हुकमी अवॉर्ड मिळवून देणारे फंडेही 'गुरू'मध्ये आहेत. आणि अभिषेकनं 90 टक्के काळ अतीव मेहनतीनं या रोलमध्ये रंग भरलेत. हा अभिनयाची सणसणीत भूक असलेला हावरा अभिनेता आहे खरा! ऐश्वर्या, मिथुन चक्रवर्ती, माधवन, विद्या बालन यांच्यासह सगळीच मंडळी या सिनेमात वेगळी दिसतात आणि कडक अभिनय करून जातात. 'जोड जोड जोडियाँ' या, बहुधा भांगेच्या तारेतच बनवलेल्या, महापकाव गाण्याचा अपवाद वगळता रहमानचं संगीत ए वन छे! पण, सगळी गाणी स्पीडब्रेकरसारखी उपरी होतात... साक्षात मणिरत्नमच्या सिनेमात!
...असं म्हणतात की एखाद्या फिलॉसॉफीवर आपला विश्वास नसेल, तर तिची मांडणी करताना आपण गोत्यात येतोच. 'गुरू'चं तसं झालं असेल, तर बरंच आहे. निदान मणिभाय पुढच्या सिनेमात लायनीवर येतील, अशी आशा तरी करता येईल.
No comments:
Post a Comment