Tuesday, February 15, 2011

फिनिक्स (संजय दत्त)

लेखाचं हे नाव वाचूनच अनेक भुवया वक्र झाल्या असतील... अनेक तोंडं वाकडी झाली असतील...
'फिनिक्स'?!...
 एक दीड दमडीचा नट, बडया बापाचा बिघडलेला बेटा, 'त्या' देशद्रोह्यांशी संधान साधलेला हाही देशद्रोहीच...
...त्याची काय औकात फिनिक्स वगैरे म्हणवून घेण्याची!... ह्या सिनेमावाल्यांनी चढवून ठेवलेत हे फडतूस नट!...
...आपल्या तथाकथित न्यायबुध्दीला कठोरात कठोर न्याय देण्यासाठी नेहमीच फक्त सिनेमावाले सापडतात... व्हेरी व्हल्नरेबल टार्गेट्स! त्यांची सगळी हीरोगिरी फक्त पडद्यापुरती असते. पडद्याबाहेर ती अतिसामान्य, असहाय माणसंच असतात... त्यांयाभोवती ना हितसंबंधियांचे गोतावळे असतात ना आंधळया अनुयायांचा फौजफाटा... कुणीही त्यांच्याबद्दल काहीही बोला...
...बोला हो, बिनधास्त बोला... पण, हेही आठवा की या माणसानं केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे, तिची सजा भोगली आहे, देशद्रोहाचा ठपका 13 वर्षं कपाळावर ठसठसत्या जखमेसारखा वागवला आहे... त्यासंबंधीच्या कायद्याखाली नाना यातना सहन केल्या आहेत. इथल्या अधिकृत न्यायव्यवस्थेनं संपूर्ण तपासाअंतीच त्याला देशद्रोहाच्या आरोपातून 'बाइज्जत बरी' केला आहे...
...पण संजय दत्तला 'बोलक्या' समाजमनाकडून असा न्याय मिळणं फार कठीण आहे... ते भाग्य त्याच्या नशिबात नाही... आता पन्नाशीच्या नजीक आला तरी त्याची पॉप्युलर इमेज व्यसनी, बाईबाज, गुंड प्रवृत्तीचा राडेबाज सांड अशीच आहे... कुणी त्याचा मन:पूर्वक तिरस्कार करतं, तर कुणाला त्याच्या या 'रांगडे'पणाचं जबर आकर्षण वाटतं... पण, त्याच्या आसपासची चारदोन गिनीचुनी टाळकी सोडली, तर त्याला सरळमार्गी, चांगला माणूस म्हणून कुणीच गणत नाही... संजूबाबा मनानं फार चांगला, उमदा वगैरे आहे, असं त्याचे मित्र, नातेवाईक, इतकंच काय, त्याच्या संपर्कात येणारे साधेसुधे लोकही सांगत असले, तरी त्याची लहानपणापासूनची चाल वाकडीच राहिली आहे, हेही खरंच... वाईटाचं त्याला बालपणापासून अतीव आकर्षण आहे की काय, देव जाणे! अतिशय सज्जन, सालस आईबापांच्या पोटी हा असला बेटा म्हणजे तुळशीत भांग, हे एकदम सोपं ऍनालिसिस आहे... अशा घरात जन्मलेला मुलगा बिघडावा आणि तो बिघडतो आहे, याची साधी शंकासुध्दा त्याच्या आईबापांना येऊ नये, हे फारच विलक्षण आहे... ड्रग ऍडिक्शन हे सहजगत्या लपून राहणारं व्यसन नसताना त्याला डि-ऍडिक्शनसाठी परदेशात नेण्याची स्थिती येईपर्यंत कसं कुणालाच काही कळलं नाही, हे गूढच आहे...
...आठवा 'रॉकी'मधला तो झोपाळू डोळयांचा झिपऱ्या, पेंगळट कोवळा पोरगा... सुनील दत्तपेक्षा नर्गिससारखा दिसणारा पण अभिनयात आईपेक्षा बापाच्या दगडीपणाशी अधिक नातं सांगणारा... संवादफेक, भावाभिव्यक्ती वगैरेचं वारंही न लागलेल्या या नटाच्या पहिल्याच सिनेमात चर्चा झाली ती टीना मुनीमबरोबरच्या त्याच्या हॉट हॉट प्रेमप्रकरणाची... नंतरही बराच काळ फक्त त्याच्या अनेकानेक अफेअर्सचीच चर्चा होत राहिली... जणू, हिंदी सिनेमातल्या आकर्षक माद्यांच्या कळपातला तो उद्दाम, उन्मादी नर होता... रती अग्निहोत्री ते रेखा अशी त्याची अफाट 'रेंज' असल्याची चर्चा होती...
...शिवाय ड्रग्जच्या विळख्यातून महत्प्रयासानं बाहेर आलेला संजय दत्त कोणत्याही ऍडिक्टप्रमाणे चेनस्मोकर झाला होता. इतर कोणत्याही व्यसनांचं त्याला वावडं नव्हतंच. त्याच्या लेखी ती व्यसनं तरी होती की नाही, कोण जाणे! त्याची ती 'लाइफस्टाइल' होती. महेश भटबरोबरच्या 'नाम', 'सडक', 'कब्जा' वगैरे थोडक्या सिनेमांचा अपवाद वगळता पडद्यावर फारसं नाव घेण्यासारखं तो काही करतच नव्हता. 'जॉनी आय लव्ह यू', 'मेरा फैसला', 'मेरा हक', 'नामोनिशान', 'मर्दोंवाली बात' असल्या त्याच्या त्या काळातल्या सिनेमांची नावं घेतली, तर या सिनेमांचं कथानक त्यालाही आठवायचं नाही कदाचित. 'त्यात कोणती नटी होती आणि...' असे काही रोमांचक तपशील आठवतील कदाचित. पडद्यावर अत्यंत सुमार कामगिरी करूनही या पोरात काहीतरी जबरदस्त 'ऍनिमल अट्रॅक्शन' होतं, नटयांबरोबरच देशापरदेशात कुठेही गेला तरी एकाहून एक फाकडू पोरींच्या उडयाच पडायच्या त्याच्यावर आणि तोही दयार्द्र दाता बनून कोणाही सुंदरीला कधी विन्मुख पाठवायचा नाही.
या काळातही त्याच्या कारकिर्दीवर फुल्ली मारली जाण्याचे असंख्य प्रसंग आले. कधी त्यानं बेंगलोरला बंदूक घेऊन केलेला राडा असो किंवा कधी रेखाच्या 'प्रकरणा'त बापाच्या तोंडाला आणलेला फेस... हा इसम कधीतरी बाराच्या भावात जाणार आहे, हे लख्खपणे दिसायचं. कारकिर्दीच्या बाबतीत बेफिकीरच असल्यानंही अनेकदा त्याच्या फ्लॉप्सची मालिकाच लागायची आणि आता हा संपला कायमचा, अशी हाकाटी व्हायची. पण, या राखेतून तो पुन्हा उभा राहायचा. एखादा 'थानेदार', एखादा 'हथियार', 'एखादा 'योध्दा' त्याला तात्पुरता हात द्यायचा. गडी पुन्हा रेकनिंगमध्ये यायचा.
सलमान-माधुरीबरोबरचा 'साजन' आला आणि एक वेगळाच संजय दत्त लोकांसमोर आला. भावखाऊ भूमिका सलमानची असली तरी सहानुभूती आणि पोरगी संजूला मिळाली... त्याहूनही मिळाली ती सुपरहिटची ऊब आणि संयत अभिनयाबद्दलची दाद. मग, 'सडक'च्या महारानीमुळे पुन्हा सुपरहिटची चव चाखता आली आणि संजय दत्त कारकिर्दीच्या दहाव्या वर्षात प्रथमच '' ग्रेडमध्ये आला. आता हा घोडा सुसाट सुटणार, अशी खात्रीच सुभाष घईच्या 'खलनायक'नं दिली होती... पण, त्या वळणावर त्याच्या कपाळावर खऱ्याखुऱ्या खलनायकत्वाचा शिक्का बसला... एका रात्रीत हा उगवता सूर्य नतद्रष्ट देशद्रोही ठरला... (नंतर काहीजणांच्या लेखी तो पुन्हा एका रात्रीत पुन्हा उगवता सूर्य बनल्याचा चमत्कारही पाहायला मिळाला.) गुंडपुंडांशी ठेवलेल्या संबंधांतून त्यानं शस्त्र बाळगण्याची घोडचूक केली होती, पण त्यातून बाँबस्फोटांसारख्या भीषण कटाशी त्याचा संबंध जोडला गेला होता... त्याच्या समर्थनार्थ थोडाफार आवाज झाला तरी निर्विवादपणे त्याच्या बाजूनं उभं राहण्याचा गाढवपणा करायला कोणीही धजत नव्हतं... महेश भटसारखे अपवाद वगळून.
...एकदा या प्रकरणात गोवला गेल्यानंतर त्यानं यातनांचा नरक भोगला... महाराष्ट्राच्या एका बडया काँग्रेसी नेत्यानं सुनील दत्तबरोबरच्या मतभेदांचं उट्टं काढण्यासाठी संजय दत्तला बख्शू नका, असा संकेत दिला आणि पोलिसांनी हात धुवून घेतले... प्रत्यक्षात त्यानं काय गुन्हा केला, हे सिध्द व्हायचं होतं... केलेल्या चुकांची कबुली तर त्यानं प्रत्यक्ष बापासमोर देऊन त्या सालस माणसालाही खचवून टाकलं होतं... पण, तरीही त्याचा भयाण वनवास संपला नव्हता... कारण, प्रसिध्द असणं, हीरो असणं, पैसेवाला असणं आणि मुस्लिमधार्जिण्या सुनील दत्तचा मुलगा असणं, हे 'गुन्हे' त्याच्यावर शाबित झाले होतेच... त्यांची 'शिक्षा' त्याला रोज मिळत होती... त्या दीड वर्षात त्याची सगळी अकड संपली, हिरोगिरी लोळागोळा झाली, डोळयांत साशंकता आणि भीती कायमची वस्तीला आली.
...पुन्हा एकदा राख होऊन तो तुरुंगाबाहेर आला तेव्हा त्याच्यापाशी काहीही नव्हतं, बायको गमावली होती, मुलगी परकी झाली होती, संकटकाळात प्रेमिकेनं पाठ फिरवली होती आणि सिनेमावाले त्याला घ्यायला कचरत होते... ज्या वनवासात त्यानं हे सर्व गमावलं, त्याच वनवासानं त्याला लाखमोलाची मॅच्युरिटीही दिली... ती त्याच्या अभिनयात दिसू लागली... मुळात 'अभिनय' दिसू लागला... 'दुश्मन', 'हसीना मान जाएगी', 'काँटे', 'जोडी नं. 1' अशा वेगवेगळया पिंडांच्या सिनेमांमध्ये तो वेगवेगळा दिसू लागला... 'वास्तव'मध्ये तर त्याला लाइफटाइमचा टेरिफिक रोल मिळाला. पण त्याची खरी मॅच्युरिटी दिसली ती 'मिशन कश्मीर'मध्ये. हृतिक रोशनची आई म्हणून सोनाली कुलकर्णीला पाहणं जितकं आश्चर्यकारक होतं, त्याहून मोठा धक्का बापाच्या भूमिकेतल्या संजय दत्तनं दिला... तो त्याचा 'बाप' होऊन गेला आपोआप!
एकीकडे संजय गुप्ता, महेश मांजरेकर अशा दोस्तकंपूच्या साथीनं कधी बरे, कधी वाईट सिनेमे सुरू होते. अधूनमधून एखादा चमकदार सिनेमा येत-जात होता. अशात शाहरुख खानसाठी लिहिलेला आणि त्यानं नाकारलेला मुन्नाभाई साकारण्यासाठी राजू हिराणीला चक्क संजूबाबाचं नाव सुचलं... आणि आज मुन्नाभाई म्हणून दुसऱ्या कुणाचा विचारही करणं शक्य नाही. मुन्नाभाईच्या दुसऱ्या इनिंग्जमध्ये अभिनयाचा जिम्मा सर्किट आणि बापूंवर जास्त होता... तरीही मुन्नाभाईचा रफटफ गोडवाही होता आणि तो संजय दत्तचाच होता... नव्हे अजूनही आहे...
...अख्ख्या देशाला 'गांधीगिरी'चा चस्का लावणारा एक सुपरहिट सिनेमा आणि त्याचवेळी पुन्हा राख करू शकणाऱ्या 'टाडा'च्या खटल्याची टांगती तलवार... एकाच वर्षात एकाच काळात भोगावा लागणारा हा केवढा मोठा कॉन्ट्रास्ट! पण, संजय दत्तचं अख्खं आयुष्यच अशा अतीव विरोधी रंगांच्या बेभान फटकाऱ्यांनी रेखाटलंय...
तो नायक आहे की खलनायक, ह्याची चर्चा फजूल आहे... ती कोणत्याही बाजूनं एकांगीच राहणार...

...आपण एवढं समजावं की तो आपल्यातुपल्यासारखाच आणि जरा जास्ती स्खलनशील माणूस आहे, त्याच प्रकारच्या चुका, घोडचुका करणारा.
...'पकडा गया वो चोर है' या न्यायानं गुन्हेगार ठरलेला...
...केवळ पकडले न गेल्यामुळेच साव ठरलेले अनेक गणंग आपल्या अवतीभवती, सिंहासनांवर, उच्चासनावर, हृदयसिंहासनांवर वगैरे मुक्कामी असताना उगाच ह्याला का झोडपा? त्याच्या कर्मांनी त्याला कमी झोडपलंय का?...
...लक्षात ठेवायचंच असेल, तर हे ठेवावं की जेव्हा जेव्हा, 'हा आता कम्प्लीट संपला' म्हणून नियतीसुध्दा त्याच्यावर काट मारते, तेव्हा तेव्हा तो त्या राखेतूनसुध्दा उभा राहतो आणि आधीपेक्षा पुढे झेपावतो...
...आत्ताही काही वेगळं होणार नाही...

... गॅरंटी है भाय, लगी बेट?

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment