Sunday, February 13, 2011

मराठी सिनेमा किती `मराठी' ?


बाबुराव पेंटर खरोखरीच द्रष्टा माणूस.
जोवर मूकपट होते तोवर त्यांनी भरपूर मराठी (!) चित्रपटनिर्मिती केली.
1930च्या सुमारास बोलपटांचा उदय होताच त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीचा गाशा गुंडाळून टाकला.
कारण एकदम साधं आणि थेट होतं... बोलपटांमुळे एवढय़ा वर्षांच्या मेहनतीने तयार झालेली दृश्यभाषा बाराच्या भावात जाईल, अशी भीती त्यांना वाटली होती.
मराठी सिनेमांच्या संदर्भात ती खरी ठरली.
बोलपट येताच (तोवर बव्हंशी भडक हातवारेपट असलेला) मराठी सिनेमा बडबडबडबडपट झाला.
काही मोजके अपवाद सोडले, तर तो आजही तसाच अखंड बडबडय़ा आहे. मराठी सिनेमात पडद्यावर जो येतो तो बोलतो. जो पडद्यावर येत नाही तो बाहुलीच्या आतून बोलतो. पडद्यावर कोणीच बोलत नसेल, तर मागून दिग्दर्शक बोलतो. पडद्यावरचा माणूस गप्प बसला तर त्याच्या मनातलंही प्रेक्षकाला ऐकू येण्याची व्यवस्था दिग्दर्शक करतो. बोलणं मस्ट! त्याशिवाय पडद्यावर काय चाललंय हे प्रेक्षकाला कळणार कसं? मराठी चित्रपट म्हणजे बोलणाऱया माणसांच्या अवतीभोवती कॅमेरे ठेवून चित्रण करून तयार केलेली कलाकृती, अशी आपली सिनेमाची व्याख्या असावी.
खरंतर मराठी सिनेमा आज कधी नव्हता एवढा `हॅपनिंग' आहे. अनेक वर्षे अनुदानाच्या सलाइनवर कसाबसा जीव तगवलेल्या रोगट, मरतुकडय़ा मराठी सिनेमाने बाळसं धरायला सुरुवात केली आहे. दहा बाय दहाच्या चाळीतल्या कोंदट खोलीत आयुष्य काढल्यानंतर आता तो एकदम चकाचक पॉश पेंटहाऊसमध्ये आलाय. जिथे सरकारचा नियमही फाटय़ावर मारून मराठी सिनेमाला ठेंगा दाखवला जायचा, त्या मल्टिप्लेक्सेसमध्ये आता हिंदी सिनेमांच्या बरोबरीने मराठी सिनेमे कमर्शियली झळकतायत आणि प्रसंगी हिंदी सिनेमांपेक्षा जास्त गर्दी खेचताहेत, गल्ला गोळा करतायत. मराठी चित्रपट थेट अमेरिकेत प्रदर्शित होतायत. आजवर फक्त हिंदी सिनेमालाच किंमत देणाऱया बडय़ा कॉर्पोरेट हाऊसेसना मराठीमध्ये केवढं टॅलण्ट आहे, याचा जणू नव्यानेच शोध लागलाय आणि त्यांनी मराठी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उडी घेतलीय. तरुण आणि वेगळं काही करू पाहणाऱया दिग्दर्शकांच्या पाठिशी ती उभी राहतायत. मराठी सिनेमाच्या क्षेत्रात इतका आनंदीआनंद सुरू असताना असा करवादा सूर कशाला लावायला हवा?
करेक्ट! प्रश्न बरोबरच आहे.
पण, काही दशकांपूर्वी सचिन आणि महेश कोठारे यांनी मराठी सिनेमांना विनोदाची संजीवनी दिली, तेव्हाही असाच आनंदीआनंद होता. पुढे त्या संजीवनीचा एवढा ओव्हरडोस झाला की लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे चेहरे पोस्टरवर दिसले, तरी लोक फुटपाथ बदलू लागले. तशीच ठिबकसंजीवनी अनुदानाच्या रूपाने दिली गेली, तेव्हाही पानठेलेवालेसुद्धा निर्माते बनून निर्मिती करू लागले. त्यांच्या अर्धकच्च्या, तंत्रदरिद्री आणि अक्कलशून्य सिनेमांनी प्रेक्षकांना पळता भुई थोडी केली. ब्लॅक मनीवाल्यांना रिकाम्या थिएटरांवर हाऊसफुल्लचे बोर्ड चढवून पैसा पांढरा करून घेण्याची आणि अनुदान-स्पेशालिस्ट दिग्दर्शकांच्या चुली पेटत्या ठेवण्याची सोय, यापलीकडे अनुदानाने काय साधले? जी जी वाढ म्हणून गृहीत धरावी, तिने नंतर सूज सिद्ध व्हावे, असा मराठी सिनेमाचा सनातन नियम आहे. आजची स्थिती या नियमाला अपवाद आहे का, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी मांडलेल्या प्रत्येक समीकरणाला आणि गृहीतकाला मराठीत अपवाद आहेत, अगदी सणसणीत अपवाद आहेत. पण, ते अपवाद आहेत आणि आपण `नियमां'बद्दल बोलतो आहोत, हे लक्षात घेण्याचं पथ्य पाळलं पाहिजे.
तर मुद्दा असा आहे की मराठी सिनेमा म्हणून जे प्रदर्शित होतात, ते `मराठी' असतात का आणि `सिनेमा' असतात का?
पैकी पहिला मुद्दा मराठीचा.
मराठी सिनेमा खूप बोलतो, हा त्याच्या `सिनेमा' असण्याशी संबंधित भाग आहे. त्यामुळे त्याची बडबड घटकाभर खपवून घेतली, तरी ही मराठी भाषा असते का, असा एक प्रश्न उरतोच. मराठी सिनेमातली भाषा नैसर्गिक सहजशैलीत नसते. ती असते कृत्रिम शहरी (वाचा- पुस्तकी `पुणेरी') किंवा कृत्रिम ग्रामीण (वाचा- `कोल्हापुरी'- म्हणजे कोल्हापुरात बोलली जाते ती तिक्कटजाळ रांगडी बोली नव्हे, तर कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीने महाराष्ट्राच्या कोणत्याही ग्रामीण भागात बोलली जाणारी जी ग्रामीण बोली रूढ केली, ती.)
म्हणजे आचार्य अत्रे, गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, पु. . देशपांडे, दिनकर . पाटील, शंकर पाटील, अण्णासाहेब देऊळगावकर, शाहीर दादा कोंडके, . मा. मिरासदारांपासून विजय तेंडुलकरांपर्यंत अनेकांनी मराठी सिनेमासाठी लिहिलंय. त्यात सहजता नाही?
 आहे. पण, ती नाटकी- कृतक सहजता. ती आपल्या लक्षातही येत नाही. कारण, आपली सर्वच सादरीकरणाच्या कलांमधली मराठी भाषा ही बोलीभाषेपेक्षा आणि प्रमाणभाषेपेक्षा वेगळी, लाऊड आणि कृत्रिमरित्या लयबद्ध, पल्लेदार असते.
हा नाटकाचा प्रभाव.
तो मराठीच नव्हे, तर सगळय़ाच भारतीय भाषांमधल्या चित्रपटांवर पडलेला दिसतो. कारण, भारतीय सिनेमाचा पाळणा मराठी हातांनी हलवलाय.
एखादं तंत्रज्ञान आणि त्यातून निर्माण झालेलं माध्यम हे जेव्हा आपल्या मातीत रुजून उगवलेलं नसतं, आयात केलेलं असतं, तेव्हा ही गोची होत असावी बहुतेक.
आपल्याकडे सिनेमांचं तंत्रज्ञान थेट हातात आलं, तेव्हा दादासाहेब फाळक्यांना ते `पुराणातली उदात्त आणि प्रेरणादायी चरित्रे' सादर करण्याचं माध्यम वाटलं. त्यांच्या हाताशी आपली पौराणिक संगीत नाटकांची परंपरा होती. तिच्या पायावर पहिल्या भारतीय सिनेमाचा कळस चढला. दादासाहेबांनी जवळपास नाटकाचंच चित्रिकरण केलं. तरीही ते नाटकासारखं वाटत नाही, हा त्यांचा मोठेपणा. (आपले आजच्या काळातले अनेक `समांतर' सिनेमे नाटकाचं व्हिडिओ शूटिंग वाटत राहतात, या पार्श्वभूमीवर तर हा गुण विशेष लक्षणीय.)
परदेशी सिनेमातंत्राचा आपल्या सांस्कृतिक परंपरांशी संयोग होऊन त्यातून खास आपला असा सिनेमाचा फॉर्म तयार व्हायला हवा होता... तसा तो हिंदीत झाला. नाचगाणीयुक्त नाटय़मय सिनेमाचा. तो बहुश: पलायनवादी राहिला. समकालीन वास्तवाशी फारसे देणेघेणे नसलेला आणि त्याची अतिशयोक्त खोटी मांडणी करणारा.
मनोरंजन हे सिनेमाचं प्रमुख काम झालं.
भारतात ते `स्वस्त' असणं आवश्यक झालं. त्याशिवाय खूप लोकांनी ते पाहिलं नसतं. शिवाय, नाटक, शास्त्राe संगीत, नृत्य वगैरेंवर अभिजन छाप. त्यामुळे, गल्ल्यासाठी सामान्यजनांची गर्दी जमवणारी सिनेमा ही आधुनिक लोककलाच झाली. मल्टिप्लेक्सेसच्या आणि म्युझिक-सीडी-डीव्हीडी-ओव्हरसीज राइट्सच्या आगमनापर्यंत या गल्ला-गर्दीने सिनेमाचा गळा आवळून ठेवला होता. आता तो इतका सुटला आहे की थिएटरात काळं कुत्रंही फिरकणार नाही, अशा सिनेमांचाही सगळा खर्च या हक्कांमधूनच वसूल होतो. (त्यातून मराठीतही अनुदानाच्या रकमेच्या आत सिनेमा बसवून, त्याला एखादा पुरस्कार मिळण्याची व्यवस्था करून देणाऱया दिग्दर्शकांनी सिनेमाच्या `फॅक्टऱया' घातल्या आहेत. देव आनंदच्या अलीकडच्या सिनेमांप्रमाणेच या रतीबबहाद्दर मराठी दिग्दर्शकांचा सिनेमा पाहिलेला एक प्रेक्षक दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, असं इनाम जाहीर करता येईल.)
गर्दी आणि गल्ल्याचं गणित मांडणाऱया ठोकळेबाज हिंदी सिनेमाला `थोरला भाऊ' म्हणून स्वीकारताना त्याचा फॉर्म्युलेबाजपणाही आपण स्वीकारला. लावण्यांचा भडिमार करणारे तमाशापट, शिकलेल्या बायकोच्या नादी लागून बिघडलेला कष्टाळू आईचा मुलगा, वगैरे `सामाजिक' समस्या दाखवणारे सिनेमे, दादा कोंडकेंचा भोळाभाबडा पण इरसाल नायक, सून-सासू संबंधाच्या (नणंद-भावजय-जाऊ वगैरे अतिरिक्त पैलूंसह) सर्व छटांवर आधारलेले सिनेमे, हे सगळे फॉर्म्युलेच होते. विनोदी सिनेमांनी दिवाळी अंकांमधल्या अघळपघळ विनोदी कथांचे आणि परदेशी प्रेरणा असलेल्या फार्सांचे संस्कार घेतले.
नाटकाच्या आणि त्याच वळणाच्या साहित्याच्या भाषिक प्रभावातून मराठी सिनेमा अजूनही मुक्त झालेला नाही. `दृश्य श्रुतिकां'च्या अव्याहत पुरवठय़ाची जबाबदारी टेलिव्हिजन चॅनेल्सनी उचलल्यानंतरही सिनेमाचं `बोलपट'पण कायम आहे.
कारण, कलाकार-लेखक-दिग्दर्शक यांतील बहुतेक सगळे नाटकांमध्ये उमेदवारी करून पुढे आलेले. त्यांच्यात रंगमंचीय अभिनयशैलीचा, लेखनशैलीचा किंवा दिग्दर्शनशैलीचा प्रभाव पुसून टाकून सिनेमाची सहजशैली आत्मसात केलेली नावं हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच. थेट सिनेमाच काढणारी किंवा सिनेमातच अभिनय करायला सुरुवात करणारे जवळपास `ना के बराबर.' तशी परंपराच नाही. `स्टेजचा नट आहे, हिंदीच्या सुपरस्टारसमोरपण फेल नाय जाणार', हा आपला अभिमानबिंदू. तोही चुकीचा नाही. सिनेमातही नाटकीच अभिनय करायचा असल्याने त्यात अप्रशिक्षित सुपरस्टारसमोर आपला प्रशिक्षित मराठी साइडहिरोसुद्धा भाव मारून जातोच जातो.
सिनेमातल्या मराठीची गोची भाषिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गोची आहे. भाषिक गोची अशी की इथे एवढय़ा मोठय़ा राज्याची एक अशी मराठी भाषा नाही. सगळा बोलींचा कारभार. त्यातली पुणेरी बोली व्याकरणशुद्ध असल्याने प्रमाणभाषा झाली. तिच्यात सगळं पांढरपेशांचं साहित्य लिहिलं गेलं. त्यामुळे, मध्यमवर्गीय साहित्यिकांच्या लेखणीतून उतरलेल्या, तेच भावविश्व चितारणाऱया सिनेमांची ती भाषा झाली. हा तळ पुण्यामुंबईतला. तिकडे ग्रामीण आणि ऐतिहासिक मराठी सिनेमांचा तळ कोल्हापुरात पडलेला. त्यांनी त्यांच्या बोलीच्या जवळपासची आणि सर्व महाराष्ट्रात कळेल, अशी अवास्तव ग्रामीण बोली सिद्ध केली. इतर बोलींची बोलती बंद. मराठी सिनेमात मराठवाडी बोली यायला मकरंद अनासपुरेचा उदय व्हावा लागला. मालवणी बोलीला मच्छिंद्र कांबळींसारखा सुपरस्टार मिळाला, पण, तो स्टेजवर.
सामाजिक पातळीवर हा सिनेमा शहरांमधली गरीब ब्राह्मण आणि वरिष्ठ जातीची कुटुंबे आणि ग्रामीण भागांमधले किंग पाटील, आमदार, नामदार यांच्याभोवती फिरत राहिला. विनोदी सिनेमांमध्ये तर आडनावेच नव्हती किंवा असलीच तर ती काल्पनिक... त्या पात्राच्या सामाजिक स्थानाचा वासही लागू देणारी. जिथे कथाच लुटुपुटीची, गंमतीजंमतीची सांगायची तिथे ह्या तपशीलांची गरज भासली नाही, यात आश्चर्य नाही. महाराष्ट्रातलाच नव्हे, तर देशातला सगळा संघर्ष, सगळी घुसळण या विविधरंगी ओळखींमधून होत असताना सिनेमातल्या पात्रांनी असं निनावी होणं किती भयंकर असेल, याचा विचार करून पाहावा. एक साधे उदाहरण घ्या. मुंबईतल्या बहुमजली चाळींवर, त्यांच्यातल्या रहिवाशांवर इतकी नाटके, सिनेमे, सिरीयल्स निघाल्या असतील. याच मुंबईतल्या झोपडपट्टीवर किती मराठी सिनेमांची नजर पडली. मराठी माणसं झोपडय़ांमध्ये राहातच नाहीत? ती कोण, कोणत्या जातींची, याचा आढावा घेतला की सिनेमातली जातीय मांडणी समजू लागते. मग, सिनेमा काढण्यायोग्य साहित्यकृतींवरही नजर टाकता येईल. दलित साहित्य नावाची शाखा निर्माण करणाऱया साहित्यातील कोणतीच कृती पडद्यावर येण्याच्या पात्रतेची नव्हती?
मराठी सिनेमाने आपल्या आसपासच्या सामाजिक वास्तवाची, उसळणाऱया ऊर्म़ींची, विझवल्या जाणाऱया अंगारांची, चहूअंगांनी सतत बदलणाऱया महाराष्ट्राची कधीच कलात्मक दखल घेतली नाही. तिच्यावर भाष्य करणे दूरच. उदाहरणच घ्यायचे, तर `गिरणी कामगारांचा संप' ही महाराष्ट्राच्या कपाळावर अश्वत्थाम्यासारखी भळभळणारी जखम. तिच्यावर सिनेमा निघायला 28 वर्षं जावी लागली. तो कसा निघाला, तर गिरणी कामगारांनी विकृत चित्रण म्हणून त्याच्याविरोधात निदर्शनं केली, असा. राज्याच्या स्थापनेपासूनचा सीमाप्रश्न मराठी सिनेमात नायक-नायिका यांच्यातील दुराव्याचा `सीमाप्रश्न' असा विनोदाने उल्लेख करण्यापलीकडे कधी आला का? महाराष्ट्र म्हणजे राजकारणाचा सतत धगधगता अड्डा. राजकारण माणसांच्या नसांनसांत मुरलेलं आहे, सर्व क्षेत्रांना व्यापून उरलेलं आहे. मराठीतल्या राजकीय सिनेमाची सुरुवात आणि शेवट म्हणजे `सामना' आणि `सिंहासन'. इतर सिनेमे म्हणजे राजकारणाचं अर्कचित्र काढायला जाऊन फसलेले आणि स्वत: सिनेमाचं अर्कचित्र होऊन बसलेले प्रयोग किंवा कोणाचा ना कोणाचा झेंडा उचलून नाचणाऱयांची गर्दी.
ठिकठिकाणचा मराठी माणूस ज्या ज्या संक्रमणांमधून जातो आहे, त्यांचे पडसाद पडद्यावर उमटत नसतील, तर मग हा मराठी सिनेमा कसा? लोक नाटकी मराठी भाषा बोलतात म्हणून. महाराष्ट्राच्या समस्यांवर रूक्ष माहितीपट काढावेत, अशी अपेक्षा कोणीच करणार नाही. पण, आपल्या चित्रपटांमधील पात्रे कोणत्या काळात जगत आहेत, त्याचा स्पष्ट निर्देशही होऊ नये. सगळे मेनस्ट्रीम हिंदी सिनेमाप्रमाणे सस्पेंडेड ऍनिमेशनमध्ये जगणारे? समाज-संस्कृती-समकालीन वास्तव वगैरे तोंडी लावण्यापुरते घेणारे.
हिंदी सिनेमा ही मराठी सिनेमाची सगळय़ात मोठी डोकेदुखी. आपल्याकडे सगळय़ांचे डोळे तिकडे लागलेले असतात. प्रेक्षकांपासून कलावंत-दिग्दर्शकांपर्यंत सगळय़ांचे. हल्लीच्या काळात `सिनेमाची भाषा' बोलू पाहणारे म्हणजे बडबड कमी करून दृश्यांमधून व्यक्त होऊ पाहणारे चित्रपट उदाहरणादाखल घ्या. सगळी हिंदी चित्रपटांच्या दृश्यशैलीची उसनवार. त्यातल्या त्यात चतुर लोक (हिंदीवाले जिकडे हात मारतात त्या) दक्षिणी सिनेमांकडून उसनवार करतात आणि मग . आर. रहमानला गुरुस्थानी मानून त्याच्याकडून `प्रेरणा' घेणारे त्या चाली मराठीत पुरवतात. मराठीत डब केलेला बी ग्रेड हिंदी सिनेमाच पाहतो आहोत, असा आभास देणारे सिनेमे मराठी कसे? असला मराठी सिनेमा हा कायम हिंदी सिनेमाची `बी टीम' असल्याप्रमाणे वागतो. न्यूनगंडग्रस्त राहतो. तो तुफान चालला किंवा त्याला तुंबळ प्रतिसाद मिळाला, तर तो `मराठी' सिनेमाचा प्रतिसाद मानायचा का?
अलीकडच्या काळात थेट सिनेमात काम करू लागलेल्या लेखक-दिग्दर्शकांची एक पिढी उभी राहते आहे. ही पिढी जागतिक सिनेमा पाहते. तिच्या सिनेमांना जो प्रेक्षक कमावायचाय, तो प्रेक्षकही आता टीव्हीवर जागतिक सिनेमा पाहतो. `वर्ल्ड क्लासिक्स'च्या सीडीज त्याला गल्लोगल्ली उपलब्ध आहेत. थिएटर हे सिनेमा पाहण्याचं माध्यम बदलून हातातल्या मोबाइलमध्ये परिवर्तित होत चाललंय. मराठी समाज तर इतक्या वेगाने बदलतोय की आणखी 10-20 वर्षांत शिक्षणाचं मराठी माध्यम संपुष्टात येईल आणि मराठी मुलांचा मराठी भाषेशी येणारा संबंध एवढा कमी होईल की त्या काळातली मराठी ही आजच्या काळातल्या मराठीची एक भ्रष्ट बोली बनून राहील.
तेव्हाचा मराठी सिनेमा कसा असेल?
बाबुराव पेंटरांचं द्रष्टेपण सिद्ध करीत असेल की मराठी समाजाच्या आशा-आकांक्षांना, संस्कृती-विकृतींना, सामाजिक-राजकीय वास्तवाला अधोरेखित करणाऱया कलाकृती अस्सल मराठी भाषेत आणि चित्रभाषेत मांडत असेल?
बाबुराव पेंटर द्रष्टे होतेच...
मराठी चित्रपटरसिकांना आता प्रतीक्षा आहे ती त्यांना खोटं पाडणाऱया आधुनिक द्रष्टय़ा कलावंतांची.

(कलात्म, 2010)

1 comment:

 1. I agree with you. See the list of some cataclysmic events in Maharashtra's history which have never found a mention in Marathi cinema:

  Mumbai riots of 1992
  Naxal movement in Gadchiroli
  Gandhi assassination (Godse connection)
  Border dispute with Karnataka (mentioned by you)
  Samyukta Maharashtra movement
  Jalgaon Sex Scandal
  Cement scam
  JJ hospital deaths
  Goa Liberation
  Vidarbha Agitaion
  Vidya Prabhudesai murder (and other such cases)
  Numerous terror attacks in Mumbai and elsewhere
  Battle of Panipat
  Emergency (Aanibaani)
  etc etc
  -----
  However, Marathi cinema did take up some events of contemporary relevance, mostly when these were politically non-controversial. Some of these are
  Joshi - Abhyankar Murders (Maficha Sakshidar)
  Historical films on Shivaji (numerous)
  Manvat Killings (Sarvasakshi and Akrit)
  Films on various Godmen
  etc etc
  -------
  The situation seems to be improving now. We have seen a fairly well made film on the Mill strike (Lalbaugh Parel), a film on the Thakre feud (Zenda) and many films on the farmer suicide issue. Hopefully, the trend will continue.

  ReplyDelete