Sunday, September 4, 2011

लाईफ इन ए मेट्रो, अर्थात आरशासमोर!

तो उभा आहे नुसताच तिच्याकडे बघत...

ती हलते आहे संगीताच्या तालावर... जागच्या जागी...

मग तो हातातल्या दहा रुपयांच्या जाडजूड बंडलातली एक नोट काढतो...

... ती लगेच त्याच्या जवळ येते, शिताफीनं नखाचाही स्पर्श न होऊ देता नोट हातात घेते, मग संगीताच्या ढणढणाटातही तो तिच्याशी काहीतरी बोलतो, ती मधुर हसते, १० रुपयांचा 'टॉकटाइम' संपला की पुन्हा थोडी लांब जाऊन जागच्या जागी झुलू लागते... त्याच्याकडे पाहात... तो तिच्याकडे पाहात... पुन्हा तोच खेळ चालू राहतो... त्याच्या हातातलं बंडल रात्रभर एकेका नोटेनं रिकामं होत जातं...

एका डान्स बारमध्ये पाहिलेलं हे विस्मयकारक दृश्य अनुराग बसूच्या 'लाइफ इन अ मेट्रो'नं पुन्हा एकदा आठवलं. एका तळघरात, प्रकाशाच्या, संगीताच्या कल्लोळात एकाहून एक फटाकड्या, देखण्या पोरी बेफाम नाचत होत्या. पब्लिक पागल होऊन दौलतजादा करत होतं... त्याच डान्स बारच्या एका कोपऱ्यात हा 'पेड' संवाद सुरू होता... चेहऱ्यावरून अगदी साधा वाटणारा तरूण आणि 'ही डान्स बारमध्ये काय करतेय?' असाच प्रश्ान् जिला पाहून पडावा इतक्या सोज्वळ, सात्विक चेहऱ्याची सुंदर बारगर्ल यांच्यातल्या त्या संवादात डान्स बारशी जोडली गेलेली वखवख बिलकुल नव्हती. तिच्याशी बोलताना एकदाही त्यानं लगट करण्याचा प्रयत्नही केला नव्हता. त्याला फक्त बोलायचं होतं तिच्याशी. वाटलं, त्याच्यापाशी पैसे आहेत, सुस्थापित नोकरी-व्यवसाय असावा; पण, जिच्याशी शेअर करावं अशी एक मैत्रीण नाही त्याच्याकडे... ती पैसे देऊन 'खरेदी' करावी लागतेय त्याला... अक्षरश: मिनिटामिनिटाची किंमत मोजून...
  

 ...' ये बंबई है मेरे भाय, बंबई, यहाँ कोई किसी का नहीं है. यहाँ हर चीजक की कीमत होती है...' 'श्ाी ४२०'मधल्या लंगड्या भिकाऱ्यानं भोळ्याभाबड्या राजूला कुबडीनं बाजूला सारत हे महान सत्य सांगितलं, त्यालाही आता साठएक वर्षं झाली असतील... तेव्हापासून आजपर्यंत हिंदी सिनेमातल्या कितीतरी पात्रांनी कितीतरी पद्धतीनं सांगितलं असेल, 'ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के, जरा बच के ये है बाँबे मेरी जाँ'... पण, इकडचं जिणं मुश्कील आहे, म्हणून मुंबईची लोकसंख्या घटली असं झालं नाही... आपापल्या प्रांतातल्या याहून मुश्कील जगण्याला कंटाळलेले देशभरातले लोक मुलुक सोडून इथे येत राहिले, इथल्या तकलिफी सहत आणि वाढवत राहिले, मंुबई वाढत गेली... नुसती मुंबईच नाही वाढली, मुंबईपाठोपाठ देशात अनेक नगरांची महानगरं झाली... दि मेट्रोज... 'अपवर्डली मोबाइल' मंडळींची अल्टिमेट डेस्टिनेशन्स...

 

 ' अपवर्डली मोबाइल'... सदैव उत्कर्षरत... शब्द फार वरच्या वर्गातला वाटतो... विंग्रेजी पेपरांच्या गुळगुळीत पुरवण्यांमधला... पण, नीट विचार करून बघा... रस्त्याकडेच्या, पाण्याच्या पाइपावरच्या, गटारावर फळकुटं मारून उभारलेल्या झोपड्यातला माणूसही त्याच्यात्याच्या परिघातला 'अपवर्डली मोबाइल' माणूसच असतो. म्हणून तर तो इतक्या भीषण परिस्थितीत जीवनसंघर्ष करायला आलेला असतो. कोणत्याही मेट्रो सिटीमधला कोणताही माणूस, मग तो कोणत्याही वर्गातला असो, कोणत्याही स्तरातला असो, त्याच्या 'गोतावळ्या'पेक्षा वेगळा असतो. त्याचे अनेक भाऊबंद आपापल्या प्रांतात, परिसरात ठेविले अनंते तैसेचि राहात असतात. ज्याच्या डोळ्यात काही वेगळं स्वप्न असतं, ज्याला आयुष्यात पुढे जायचं असतं, तो बोचकं घेऊन उठतो आणि बड्या शहराची वाट पकडतो...

 

... पण, 'मेट्रो'मध्ये सगळे त्याच्यासारखेच... 'अपवर्डली मोबाइल'. ज्याला त्याला यशाची बडा फास्ट पकडायची आहे. समोरच्याला तुडवून घुसण्याची हिंमत असेल, तो घुसेल. इथे जो तो धावत असतो आपल्या स्वप्नांच्या मागे, जिवाच्या करारानं, सुसाट. एकीकडे पैशाची, यशाची झिंग आणि दुसरीकडे सुपरफास्ट आयुष्याचा दमवणारा वेग. इथले नीतीनियम वेगळे. यशापुढे सगळं तुच्छ. एकावर एक, एकावर एक अशा यशाच्या उतरंडी उभ्या करण्यात हयात निघून जाते. स्वप्नं कधी पूर्ण होतात कधी होतही नाहीत- पण, आयुष्याच्या जिगसॉ पझलचे तुकडे जसजसे जुळत येतात तसं एक नक्की लक्षात येतं, काहीतरी हरवलं या सगळ्या रॅट रेसमध्ये धावताना. पैशानं विकत घ्यायची सुखं लाभतात, पण, ती सुखं शेअर करायला कुणी नसतं किंवा कुणी असलं, तर सुख भोगायची फुरसत नसते...
   

... असंच काहीतरी हरवता हरवता गवसलेली, काही गवसता गवसता हरवलेली पात्रं 'अ लाइफ इन अ मेट्रो'मध्ये भेटतात. इथे दिवंगत वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यात वेगानं वर जाण्याची इच्छा असलेला राहुल (शर्मन जोशी) आहे, त्यासाठी तो आपल्या बॉसेसना त्यांच्या प्रेमपात्रांबरोबर प्रणयलीला रंगवण्यासाठी आपला फ्लॅट वापरायला देतो... तो जिच्या प्रेमात आहे त्या, त्याच्याच ऑफिसातली नेहाचं (कंगना राणावत) तिच्या विवाहित बॉसबरोबर, रणजीतबरोबर (केके मेनन) अफेअर आहे... रणजितचे त्याच्या बायकोबरोबरचे, शिखाबरोबरचे (शिल्पा शेट्टी) संबंध 'विभक्त शय्या' वर्गातले. ती आकाश (शायनी आहुजा) या होतकरू नटामध्ये गुंतत चाललेली.

 शिखाची धाकटी बहीण श्रुती (कोंकोणा सेनशर्मा) हिचं लग्नाचं वय उलटून चाललंय, ती हरतऱ्हेने बॉयफ्रेंड गटवण्याच्या प्रयत्नात आहे. एकाला गटवते, तो गे निघतो. मॅरेज ब्युरोमार्फत भेटलेला आणि तिनं रिजेक्ट केलेला रांगडा देबू (इरफान खान) योगायोगानं पुन्हा तिच्या आयुष्यात येतो, तिला मनोमन आवडूही लागतो... पण, आता त्याचं लग्न ठरलंय... आणि या सर्वांबरोबर अगदी वेगळ्या प्रतलावर चालणारी एक ओल्ड एज प्रेमकहाणी आहे, अमोल (धमेर्ंद) आणि वैजयंती (नफिसा अली) यांची...

 

'... मेट्रो'मध्ये या सगळ्या कहाण्या एकमेकांत गुंफत, गुंतत-सुटत समांतर चालतात आणि खास व्यावसायिक फिल्मी पद्धतीच्या '...आणि ते सुखाने नांदू लागले' छाप शेवटावर येतात. पण, तिथपर्यंतचा प्रवास प्रेक्षकाला गुंतवून घेणारा आहे. कधी मजेशीर, कधी कंठात हुंदका दाटवून आणणारा. 


'...मेट्रो'मध्ये महानगरांतल्या जगण्याची समग्र व्यामिश्रता नाही... दोन तासांच्या आणि हिंदी मुख्य प्रवाहात बनलेल्या सिनेमात ती अपेक्षूही नये. इथल्या पात्रांचा एक विशिष्ट जीवनस्तर आहे आणि सिनेमात केंदस्थानी आहे ती त्यांची 'प्रेम' नावाच्या भावनेसंदर्भातली उलघाल. त्यांच्या प्रेमेतर जगण्याचा संदर्भच इथे फारसा नाही. पण, हा सिनेमा, नेहमीच्या व्यावसायिक सिनेमांप्रमाणे 'जजमेंटल' होत नाही. कुणाला हीरो आणि कुणाला व्हिलन बनवत नाही. सगळेजण 'माणसां'सारखे दिसतात, वागतात, हाही केवढा मोठा रिलीफ म्हणायचा!
   

उत्तम संवाद, संवेदनशील हाताळणी आणि सगळ्या कलाकारांची उत्तम कामगिरी (इरफान, शिल्पा अप्रतिम) यांच्या बळावर '...मेट्रो' दोन तास प्रेक्षकाला एका वेगळ्याच जागी घेऊन जातो...

... आरशासमोर!


No comments:

Post a Comment