Sunday, September 4, 2011

बीइंग सैफ

' बापरे, मी हे असले भयंकर सिनेमे केलेयत?'...

... सैफ अली खान आपल्या सुरुवातीच्या काळातल्या काही सिनेमांची नुसती यादीच वाचून हल्ली बऱ्याचदा शहारतो म्हणे!... 'यार गद्दार', 'आओ प्यार करे', 'सुरक्षा' यांसारख्या सिनेमांची यादी वाचून तोच काय, त्याचे चाहतेही त्याच्याइतकेच शहारतात!
   

... असले सिनेमे करणाऱ्या सैफचे आपण कधीकाळी चाहते होऊ, असं, आज त्याचे कट्टर चाहते असणाऱ्यांना अगदी थोड्याच वर्षांपूवीर् वाटलं असतं का, हा प्रश्नच आहे... त्याचं उत्तर 'नाही' असंच आहे...
   

...सैफला (माथेफिरू अमृता सिंग वगळता) कोणी चाहावं, असं त्याचं ना रूप होतं, ना वर्तन ना अभिनय. बडे बाप की (आणि 'माँ' की सुद्धा) बिगडी औलाद असलेल्या सैफमध्ये तरुणपणात महान नव्वाबी किडे होतेच. तो इतका उर्मट, बेपर्वा आणि बेबंद होता की, आपल्या पहिल्याच सिनेमाच्या सेटवर लेटलतिफी करून, दारू पिऊन अस्ताव्यस्त स्थितीत पोहोचून त्यानं हकालपट्टी ओढवून घेतली होती. नाहीतर, 'बेखुदी' हाच त्याचा पहिला सिनेमा ठरला असता. 

त्याच काळात अमृता सिंगशी केलेलं अफेअर लपवण्याच्या भानगडीत त्यानं ऐका गॉसिप मॅगझिनच्या ऑफिसवर अमृताबरोबर रीतसर हल्ला चढवला होता... शमिर्लाबद्दल काहीतरी अनापशनाप लिहिणाऱ्या आणखी एका पत्रकाराला त्यानं घरात घुसून ठोकलं होतं. पडद्याबाहेर हे उपक्रम आणि पडद्यावर, जणू शमिर्ला टागोरच शर्ट-पँट घालून समोर आलीये, असा आभास निर्माण करणारं तथाकथित 'मेट्रोसेक्शुअल' (म्हणजे बायलं) रूप! 

त्याची ती आंग्ल-श्वानसदृश केशरचना, ते लिपस्टिकलाल ओठ, विचित्र घोगरा आवाज आणि इंग्रजी उच्चारणशैलीप्रदूषित हिंदी या सगळ्यातून त्याच्याविषयी फारसं बरं मत होणं शक्य नव्हतं. बरं मत होण्यासारखी एकच गोष्ट होती त्याच्याकडे... सहजता... तो कॅमेऱ्यासमोर जाम सहजतेनं वावरत होता... टिपिकल फिल्मी हीरोसारखा लाउड नाटकीपणा त्याला जमत नव्हता... बळजबरीने करावा लागला, तर ते त्याला शोभतही नव्हतं...
   

...अशी सहजता असलेल्यांचा सहसा शशी कपूर होतो... अमिताभ बच्चनच्या सिनेमांमधला... सैफचाही तो झालाच... त्याच्यासमोर अमिताभच्या जागी होता अक्षयकुमार... 'कीमत', 'मैं खिलाडी तू अनाडी', 'ये दिल्लगी' वगैरे सिनेमांमधून दुय्यम नायकाच्या भूमिका करून सैफनं चूल पेटती ठेवली... ही विभागणी छानच होती, अक्षयनं मारामाऱ्या, नाच करायचे आणि सैफनं अभिनय- हलकाफुलका, विनोदी वगैरे. सुनील शेट्टी (पहचान), सनी देओल (इम्तिहान) अशा इतर तगड्या नायकांबरोबरही त्यानं याच छापाचे सिनेमे केले. अक्षयसारखा मर्दानी हीरो आणि सैफसारखा त्याचा गुलजार जोडीदार या जोडीत सुप्त समलिंगी छटाही सापडल्या शोधक मंडळींना... मग हा शोध थेट अमिताभ-शशी कपूर जोडीपर्यंत खेचला गेला...
   

... नंतर हृतिक रोशन, माधवन, अभिषेक बच्चन वगैरे नव्या बच्च्यांच्या जमान्यात तर इंटरव्हलनंतर पडद्यावर येऊन नायिकेवर उदक सोडण्याच्या कार्याकरताच नेमणूक होऊ लागली होती त्याची... एका बऱ्या पण बेशिस्त नटाची कारकीर्द आता उतरणीला लागणार याची चिन्हं होती ही...
   

... चढेल सैफनं तशी उतरण बरीच अनुभवली होती... 'मी सी ग्रेड नायिकांबरोबर काम करत नाही', असं तो जिच्याबाबतीत गुरकावला होता, ती उमिर्ला मातोंडकर ' वन' ग्रेडला पोहोचल्याचं त्याला ('डी ग्रेड'मधूनच) 'याचि डोळा' पाहावं लागलं होतं आणि नंतर तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी यासाठी तिची जाहीर माफीही मागावी लागली होती... एके काळी मणिरत्नमसारख्या दिग्दर्शकाला तिष्ठत ठेवण्याचा उद्दामपणा करणाऱ्या सैफला पुढे कोणाही संभा नामा कोथमिरेच्या 'डायरेक्शन'मध्ये झक्कत काम करावं लागलं होतं...
   

... पण याच काळात काहीतरी हळुहळू, पण निश्चितपणे बदलत होतं... सैफच्या गुळगुळीत चेहऱ्याला आता खुरट्या दाढीनं पुरुषी शोभा आणली होती... बेढब अंगकाठी व्यायामानं प्रमाणशीर होत चालली होती... उद्दामपणाची जागा व्यवहारी नम्रतेनं घेतली होती... दोन मुलांच्या बापाला यावी तेवढी समजूत त्याच्यात आली होती... आवाजात गहिराई आली होती, अभिनयात परिपक्वता... आणि मुख्य म्हणजे त्याच्या शैलीच्या अभिनेत्याला सन्मानाची जागा देण्याइतका हिंदी सिनेमाही प्रगल्भ होत होता...

 

... या प्रगल्भतेचा साक्षात्कार घडला 'दिल चाहता है'मधून. टेलरमेड भावखाऊ रोलमधला तगडा आमिर खान आणि हळहळ्या हुळहुळ्यांना थेट डाव्या खिशात टाकणाऱ्या भूमिकेतला गुणवान अक्षय खन्ना यांच्यामध्ये दुसऱ्या एखाद्या नटाचं पार सँडविच झालं असतं... पण, सैफनं चमत्कार घडवला... 'कॉमेडियन'चा सस्ता शिक्का बसण्याजोग्या निसरड्या रोलमध्ये त्यानं अप्रतिम तोल राखला आणि उत्स्फूर्ततेच्या बळावर आमिर-अक्षयच्या बरोबरीनं आपला ठसा उमटवला... आजही या सिनेमातले त्याचे काही पंचेस (आठवा तो 'पेमाच्या बलून'चा किस्सा) हा 'अभिनय' आहे, यावर विश्वास बसणं कठीण जातं...
   

... एका नॅचरल अॅक्टरचं एका नॅचरल स्टारमध्ये रूपांतर होण्याची ती सुरुवात होती. 'कल हो ना हो'मध्ये तो शाहरुखसमोरही खणखणीत उभा राहिला. 'एक हसीना थी' आणि 'परिणीता'मध्ये त्यानं (शेवटच्या रिळातला आचरटपणा सोडल्यास) निगेटिव्ह नायक ताकदीनं उभा केला... 'हम तुम'नं त्याला सेलेबल 'सोलो हीरो'चं स्टेटस दिलं, ते 'सलाम नमस्ते'नं वाढवलं... कालपरवापर्यंत दुसऱ्या फळीतल्या मागच्या रांगेत असलेला, चाळिशीकडे झुकलेला सैफ बघता बघता ट्रेंडी कूल ड्यूड आणि यूथ आयकॉन झालाय... आणि 'बीइंग सायरस'नं तर सैफला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय... 'ऑथेल्लो'वर आधारलेला 'ओमकारा', 'एकलव्य' या हटके सिनेमांमध्ये तो काय करतोय, याची उत्सुकता निर्माण झालीये...
   

... सैफ , आमिर, शाहरुख हे भाग्यवान खरे... अमिताभला त्यासाठी म्हातारं व्हावं लागलं... ऋषी कपूरला तर त्याही वयात ते लाभलेलं नाही... व्यावसायिक हिंदी सिनेमातल्या 'मध्यवतीर् भूमिके'वर (प्रोटॅगोनिस्ट) 'नायक'पणाचा पडणारा भार हलका व्हायला सुरुवात झाली ती अगदी अलीकडे... मोठा स्टार असलेला प्रत्येक नट सिनेमात सर्वाधिक लांबीच्या, सर्वाधिक भावखाऊ भूमिकेचा तहहयात हक्कदार ठरत नाही, तसं असण्याची गरज नसते, हे आता कुठे लोकांच्या पचनी पडू लागलंय... आधी नट ठरवू, मग कथा फिरवू, हा उलट्या गंगेचा जमाना इतिहासजमा झालाय... आता दिग्दर्शक कोणती कथा कशी सांगायची ते ठरवतो, मग तिला योग्य नट निवडतो आणि ते भूमिकेच्या 'मापा'त काम करतात, कसलीही खळखळ न करता.
   

सैफ सारख्या नटासाठी सोन्याचा काळ आहे हा. तो त्याचं सोनं करीलच... हा विश्वास कुणा ऐेऱ्यागैऱ्याचा नाही... 'बीइंग सायरस'मध्ये सैफची अभिनेता म्हणून विकसित होण्याची प्रक्रिया आमोरासमोर पाहणाऱ्या नसीरुद्दीन शाहसारख्या मोठ्या नटानं दिलेली ही दाद आहे... एका मुलाखतीत तो म्हणालाय, 'मेन स्ट्रीमच्या स्टारच्या स्टारपदाची, हीरोगिरीची झूल उतरताना पाहण्यात, ते ओझं हलकं करण्याच्या शुभकार्यास हातभार लावण्यात फार मौज असते... त्यासाठीच मी आमिरबरोबर 'सरफरोश' केला होता, पण आमिरनं ओझं उतरवलंच नाही... सैफनं मात्र 'सायरस' करताना आपल्या स्टारडमचं ओझं पार लांब भिरकावून दिलंय...'
   

... त्या ओझ्याबरोबरच सैफ अली खान या दिवसेंदिवस 'मोठ्या' होत चाललेल्या अभिनेत्याची 'त्या', शहारे आणणाऱ्या भयंकर सिनेमांची यादीही त्याच्या आणि आपल्याही स्मरणातून पार दूरवर भिरकावली जात आहे...

(महाराष्ट्र टाइम्स) 

No comments:

Post a Comment