Sunday, September 4, 2011

बोले तो हिट... बापू... (लगे रहो मुन्नाभाई )

आयला , हे सगळीकडे काय अजब सुरू झालंय , मामू ?

बोले तो , होल इंडियाचा भेजा सटकलाय काय ?

लीडरलोकांनी नोटेत बंदिस्त करून टाकलेला , भिंतींवर टांगून ठेवलेला , चौकाचौकांत चौथऱ्यांना जखडून ठेवलेला ' बापू ' एकदम पब्लिकमध्ये कसा आला ? सत्य , अहिंसा वगैरे बुळबुळीत **गिरीची त्याची शिकवण एकदम ' गांधीगिरी ' म्हणून ' इन थिंग ' होऊ लागलीये ?... एका गालावर कुणी हाणलं , तर त्याचा हात उखडून टाकण्याची मर्दानी शिकवण देण्याऐवजी दुसरा गाल पुढे करा , म्हणून सांगणारा मॅड म्हातारा तो... त्याला ' बंदे मे था दम ' म्हणून नावाजायला लागलेत शहाणेसुतेर् लोक!.... आणि जिकडे बघावं तिकडे ' गांधीगिरी ' चे प्रयोग करायला लागलंय आम पब्लिक!...

... ये क्या हो रहा है ?....
 

... लीकेज , जरा साइड मे खिसक ले. अपुन का भाय , मुन्नाभाय आयेला है... साथ मे ' बापू ' कोभी वापस लायेला है! ' बापू ' बोले तो... अख्खी इंडिया का बापू! समझा क्या ? विनम्र से समझा रहेला है , समझ ले.

तुमच्या आसपास , रस्त्यावर , लोकलमध्ये , बसमध्ये पब्लिक एकमेकांशी ' बोले तो ' च्या भाषेत बोलत असेल , तर आश्चर्य वाटून घेऊ नका. सीझन ' मुन्नाभाई ' चा आहे... आणि चक्क महात्मा गांधींचा आहे...

 

 ... येस्स , ज्या गांधींचा उल्लेख झाला तर टिचभर अकलेचे लोक ' ह्या देशाचं वाट्टोळं करणारा म्हातारा ' असं (यापेक्षा बऱ्याच असभ्य भाषेत) बोलतात आणि तीच पुढच्या पिढीसाठीही गांधींची सोपी ' ओळख ' होते... तेच गांधी त्यांच्या सोप्या तत्त्वज्ञानासह चक्क तरुण पिढीपर्यंत पोहोचताहेत... तेही त्यांच्या भाषेत...

... साक्षात महात्म्याला पुन्हा एकदा रेलेव्हंट करणारा महापुरुष... ' मुन्नाभाय '!

 

 ... हे तर जामच अजब आहे... मुन्नाभाई एक सडकछाप टपोरी... औपचारिक शिक्षणाचा गंधही नसलेला गुंडा... याचा धंदा बड्या लोकांचे दोन नंबरचे बडे लोच्ये निस्तरणं , म्हणजे काही लोकांची हाडं मोडणं , काहींना धमक्या देणं , कधी कुणाला ' उचलणं ', बिल्डरांसाठी घरं रिकामी करून देणं... थोडक्यात टोटल भाईगिरी... त्यातून कमावलेल्या बक्कळ पैशातून तो सर्व फिल्मी अँटिहिरोंप्रमाणे बस्तीवाल्या लोकांना सढळहस्ते मदत करत असणार... त्याला त्याच्या एरियात असलेला फुल सपोर्ट याचीच ग्वाही देणारा. (सिनेमाच्या विनोदी स्वरूपामुळे आणि भल्याबुऱ्यात नायकाच्या कायम बरोबर राहण्याच्या प्रेक्षकाच्या सवयीमुळे प्रेक्षकही सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून त्याचे ' बस्तीवाले ' होऊन जातात. त्याच्या कारवाया हास्योत्पादक ठरतात , हाणामाऱ्या कार्टून फिल्ममधल्या मारामाऱ्यांसारख्या वाटतात... खोट्याखोट्या आणि एन्जॉयेबल.) बऱ्यावाईटाचा कसलाही विधिनिषेध नसलेला हा भैताड इसम.  

असल्या माणसाच्या मुखातून गांधींचं तत्त्वज्ञान येणं म्हणजे सैतानानं बायबलवर प्रवचन देण्यासारखं... पण , ' लगे रहो मुन्नाभाई ' च्या र्कत्यांनी (दिग्दर्शक राजकुमार हिराणी , लेखक अभिजात जोशी) हा चमत्कार फार सफाईनं घडवून दाखवलाय... आधीच्या भागात राजकुमार हिराणीनं मुन्नाभाईच्या तोंडून आणि कृतीतून ' प्यार की झप्पी ' चं अनोखं , अतिशय इफेक्टिव्ह आणि सुरेख तत्त्वज्ञान प्रेक्षकांच्या गळी उतरवलंच होतं... त्यामुळे , या पुढच्या आणि स्वतंत्र भागातलं काम काहीसं सोपं झालेलं आहे.

अॅक्चुअली , यात चमत्कारापेक्षा अक्कलहुशारीचा भाग मोठा आहे...

 

 गणितातलं गृहीतक कसं सिद्ध करण्याची एक पद्धत आहे... ए प्लस बी इज इक्वल टू सी , हे गृहीतक सिद्ध करायचं असेल , तर ए प्लस बी इज नॉट इक्वल टू सी अशी सुरुवात केली जाते... मग , पुढच्या आकडेमोडीत हे गृहीतक चुकीचं सिद्ध होतं आणि ज्याअथीर् ते चुकीचं आहे , त्याअथीर् ' ए प्लस बी इज इक्वल टू सी ' हेच सिद्ध होतं , अशी ही ढोबळ पद्धती... ' मुन्नाभाई ' तेच करतो. काहीजणांसाठी गांधी हा विस्मरणात गेलेला महात्मा , कोणीतरी मोठा लीडर आहे , तर काहींसाठी फाळणी घडवून पाकिस्तान नावाचा हाडवैरी भारताच्या बोडक्यावर बसवून देशाची वाट लावणारा नतदष्ट म्हातारा... 
 या माणसाची सत्य , अहिंसा वगैरे शिकवण आजच्या काळात भाकड. या स्पधेर्च्या , यशासारखं यशस्वी काहीच नसण्याच्या , पैसा हाच परमेश्वर असण्याच्या युगात गांधीवाद अगदीच इम्प्रॅक्टिकल आणि मुळमुळीत शामळू... मुन्नाभाईला तर गांधींबद्दल एकच मौलिक माहिती... या माणसाच्या हॅपी बर्थडेला ' ड्राय डे ' असतो... तो सुरुवातीलाच गांधींचा एकेरीत , बराचसा अज्ञानजन्य अवमानकारक उल्लेख करतो... इथेच त्याची नाळ आम पब्लिकशी जोडली जाते.... कारण त्या पब्लिकच्या मनातले गांधीजी असेच आहेत...

 

 ... छावीला गटवण्याच्या भानगडीत मुन्नाला गांधीवाङ्मयाचा क्रॅश कोर्सच करावा लागतो. दिवसरात्र गांधींबद्दल वाचल्यानं ' बापू ' त्याच्यासमोर आणि त्याच्यापुरतेच सगुण साकार होऊन येतात. त्याच्या भाषेत त्याच्याशी बोलतात. संकटात त्याच्या मदतीला धावतात. आयुष्यातल्या समरप्रसंगांना सामोरं जाण्याचा बापूंचा काहीएक विशिष्ट आणि प्रचलित मार्गांपेक्षा भलताच भिन्न मार्ग आहे , असं त्याच्या लक्षात येतं... हा मार्गही तो लगेच अनुसरत नाही... इतर मार्गांनी फटके बसल्यानं तो नाईलाजानं हा मार्ग वापरून पाहतो आणि तो चक्क यशस्वी होतो... 

एफएम रेडिओच्या माध्यमाची व्याप्ती आणि पटकथेची खुबीदार रचना यांतून लेखक-दिग्दर्शकांनी हा मार्ग कल्पकतेनं विश्वसनीय केला आहे. उदाहरणार्थ , ' डाव्या गालावर कुणी मारलं , तर उजवा गाल पुढे करा ', यासारखं व्यवहारात निव्वळ मूर्खपणाचं , नेभळेपणाचं वाटणारं तत्त्वज्ञान त्यांनी किती हुशारीनं प्रमोट केलंय , ते पाहण्यासारखं आहे...

 

  ... मुन्नाभाई सर्वकाळ आपल्या रस्त्यावरच्या जगण्यातून आलेल्या टपोरी तत्त्वज्ञानाच्या माध्यमातूनच गांधीवाद (त्याच्या भाषेत ' गांधीगिरी ') आत्मसात करतो , हे सर्वात महत्त्वाचं आहे... प्रेक्षक सदासर्वकाळ त्याच्या बाजूने , त्याच्याबरोबर असतो... त्याच्याबरोबरच तोही गांधींची मस्करी करतो... गांधींच्या तत्त्वज्ञानाबद्दल शंका उपस्थित करतो... गांधींचे मुन्नावरचे प्रयोग साशंक मनाने पाहतो... आणि मग लेखक-दिग्दर्शकांनी आखून दिलेल्या चौकटीतलं त्यांचं हमखास यश अनुभवतो... त्या तत्त्वज्ञानानं थरारूनही जातो... त्यानं वास्तवातल्या अॅप्लिकेबिलिटीची शक्यताही गृहीत न धरलेला , बुळा वाटणारा मार्ग इतका प्रभावी असू शकतो , ही कल्पनाच थरारक ठरते...
 

' गांधीवाद ' या संकल्पनेभोवती जमलेली (तथाकथित गांधीवाद्यांनीच जमवलेली) कळकट जळमटं झटकून तो अपडेटेड ' गांधीगिरी ' च्या रूपात सादर करणारी ही तत्त्वज्ञानाची गुटिका दजेर्दार नर्मविनोदाच्या , मानवी भावनांच्या , हलक्याफुलक्या प्रणयरम्यतेच्या शर्करावगुंठनातून प्रेक्षकाच्या गळ्यात अगदी आपसूक उतरते. त्यात लोच्या फक्त एकच आहे... लेखक-दिग्दर्शकांनी विनोदी सिनेमाच्या ' कन्ट्रोल्ड एन्व्हायरनमेंट ' मध्ये हे तत्त्वज्ञान मांडलंय. इथला व्हिलन लक्की सिंगही वास्तवातल्या खलपुरुषांच्या तुलनेत ' बापू ' वाटावा , इतका सौम्य आहे... त्याचं हृदयपरिवर्तन पटण्याला काही वाव आहे... ' मुन्नाभाई ' च्या गांधीगिरीचं लॉजिक वास्तवातल्या कितीतरी पट अधिक निबर आणि संवेदनाहीन समाजात , स्वार्थानं , ताकदीनं आंधळ्या झालेल्या पुंडांच्या संदर्भात कितपत इफेक्टिव्ह होईल , हा मोठा प्रश्ान् आहे... इथे साक्षात बापू अवतरले असते , तरी त्यांना डोकं फोडून घेण्याची वेळ आली असती...

मग , ' मुन्नाभाई ' फक्त सिनेमाच्या तीन तासांपुरताच गृहीत धरायचा का ?...
  

 ... तसं तरी का करावं ? या समाजात संवेदना जागृत असलेली अनेक माणसं सुप्तपणे आपलं काम नीट करत असतात , इतरांना आपला त्रास होऊ नये , याची काळजी घेतात , मागच्यांना पुढे येण्यासाठी हात देत असतात , व्यापक समाजहितासाठी झटत असतात... किमान तशी प्रेरणा त्यांच्यात असते.  

अशांच्यावर चहूबाजूंनी ' हाऊ टु बिकम सक्सेसफुल ' छापाचा , गळेकापू स्पधेर्च्या जाहिरातींचा मारा सुरू असतो. जगात यशस्वी व्हायचं तर कुणाला तरी पाडूनच पुढे जावं लागतं इथपासून ते ' दुनिया गेली बोंबलत , तुमचं तुम्ही पाहा तुमच्यापुरतं ' अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आजच्या युगाचं म्हणून मांडलं जातं. एकीकडे माणसाला आत्मकेंदित करत जाणारा हा मारा , दुसरीकडे समष्टीचं भानच नष्ट व्हावं इतका विखुरलेला समाज आणि तिसरीकडे या सगळ्यावर उतारा म्हणून ' ही इज द हू इन द आय ऑफ द ही ' असल्या भोंगळ बडबडीनं भरलेलं किंवा खिशावर बिल्ला लावून अणुस्फोटापासून संरक्षण देण्याच्या मूर्ख वल्गना करणारं तथाकथित आध्यात्म...  

यात रोजचं आयुष्य जगताना नेमकं काय करावं , व्यावहारिक जगात (स्वार्थांध न होता) कसं वागावं , याचा धडा काही मिळत नाही. माणसांचे माणसांशी संबंध हे या जगाच्या चलनवलनाच्या मुळाशी आहेत. त्यांचा रोज एकमेकांशी तरतऱ्हेच्या सिच्युएशन्समध्ये संपर्क येतो , तो संवादी व्हावा , संघर्ष टळावा , यासाठी काय करता येईल ? कोणती मूल्यं आपल्यात भिनवता येतील , हे सांगणारं कोणीच नाही आसपास...
  

 ...' मुन्नाभाई ' काही अंशी ही गरज भागवतो. सडकछाप असल्यामुळं तो थेट माणसांना भिडतो. कधी तो ' जादू की झप्पी ' चं सर्वत्र सहज अॅप्लिकेबल होऊ शकणारं सोपं तत्त्वज्ञान मांडतो , स्वत:च्या अनुभवांतून ते परिणामकारक बनवून दाखवतो. तर कधी बापूंनाही ' बोले तो लोच्या होगा ' या भाषेत बोलायला लावतो.
   

 म्हणून तर माथेफिरूंच्या गोळ्यांनी न संपलेले ' बापू ' आजही आपल्यासारख्यांच्या भेजात ' केमिकल लोच्या ' करू शकतात!

No comments:

Post a Comment