Thursday, May 5, 2011

ई।ई।ई।ईश्क


भर ताटावर एकजण जेवताना दुसरा त्याच्या चेहऱयावर, ताटावर कीटकनाशकाचा फवारा मारतो.
   आपण हसतो.
नंतर तोच त्याच्या तोंडातसुद्धा फवारा मारतो.
   आपण हसतो.
  बँकेत मॅनेजर पैसे देन नाही. म्हणून त्याचा टाय कापून त्याच्या तोंडात कोंबला जातो, त्याच्या नाकाला, केसांना क्लिपा लावल्या जातात.
   आपण हसतो
 एक गाडी एक घर फोडून आरपार निघून जाते. घर कोसळतं. कमोडवर बसून पेपर वाचणारा घरमालक चकित होतो.
   आपण हसतो.
 मारामारीचे आवाज ऐकून स्वच्छतागृहातला एजण भेदरून घरंगळलेल्या पँटसह पळायला प्रयत्न करतो.
   आपण हसतो.
 टकल्या माणसाच्या टकलावर दोन कावळे लागोपाठ शिटतात.
  आपण हसतो.
  छे! छे! असल्या थिल्लर प्रसंगाना आम्ही नाही हसत. म्हणून हात झटकू नका. आपल्याला असल्या भुक्कड प्रसंगांना हसण्याची सवय नसती तर हे प्रसंग भव्य पातळीवर चित्रित करायला इंद्रकुमारला कुणी करोडो रुपये कशाला दिले असते?
 `इश्क' कसा निघाला असता?
 आपल्या हसण्याचं सोडून द्या. आपलं रडणं भावुक होणं. प्रेमव्याकुळ होणं... हे सगळंच आपण हिंदी सिनेमावाल्यांच्या दावणीला बांधलंय. आपली बुद्धी आपण त्यांच्याकडे गहाण ठेवलीये म्हणून तर इंद्रकुमारसारखा कुणीही येऊन आपल्याला `इश्क'सारखी टिकली मारून जातो.
 सिनेमामध्ये आपण कला शोधत नाही. कबूल गंभीर सिनेमे आपल्या डोक्यावरून जातात. कबूल. आशयघन सिनेमा म्हटलं की आपल्या सर्वांगावर शिरशिरी येते, कबूल. सिनेमा हा आपल्या लेखी फक्त `टाईमपास'ला तरी काही दर्जा असावा की नाही?
 `इश्क'चा विनोद, `इश्क'मधलं प्रेम, `इश्क'मधले त्याग, `इश्क'मधला संघर्ष आपण `' वेळा हिंदी पडद्यावर पाहिला आहे आणि पुन्हा तेच पाहायला रांगा लावून तिकिटं काढायची? कशासाठी?
  गरीब-श्रीमंतांमधलं प्रेम आणि त्यातून उद्भवणारा संघर्ष या रुटिन कथाबीजात `इश्क'चं वेगळेपण काय, तर एरवी एकेक नायकनायिकांच्या बाबतीत जे घडतं ते दोन नायकनायिकांच्या बाबतीत घडतं. प्रेम डबल, गाणी डबल, ग्लॅमरस चेहरे चार, चांगल्याचुंगल्या फॅशनेबल कपडय़ांचे चार सेट, एका तिकिटात दोन हीरो... दोन हिरॉईन्स. पैसा वसूल.
 श्रीमंत नायक-नायिकांनी गैरसमजामुळे एकत्र येऊन गरीब नायक-नायिकांच्या `भावा-बहिणी'च्या नात्यावर घेतलेल्या संशयाची आणखी जोड. कारण इंद्रकुमारला 9 रिळं भरायची आहेत. आता वेगळी कथा काय सांगायची श्रीमंत नायक अजय देवगण, त्याचा श्रीमंत बाप सदाशिव अमरापूरकर, अजयची गरीब प्रेयसी काजोल. इकडे गरीब नायक अमिर खान, त्याची श्रीमंत प्रेयसी जुही चावला आणि तिचा श्रीमंत बाप दलिप ताहिल. फ्लीट मारायला जॉनी लिव्हर, टाय कापून घ्यायला टिकू तलसानिया. शिवाय देवन वर्मा, दिपक शिर्के वगैरे मंडळींचा पात्रपरिचय करून दिला तरी पुष्कळ.
  आणि हो! इंद्रकुमारच्या सिनेमात नायकानं नायिकेचं भर रस्त्यात चुंबन घ्यावंच लागतं. ते इथे आहे. नायकानं नायिकेवर बलात्कार करण्याचा आव आणून तिचे कपडे फाडायचे असतात. (कधीकधी तीच ते काम करते) तेही इथे घडतं. उटीतलं एक झाड इंद्रकुमारसाठी लकी आहे. म्हणून त्याच्या प्रत्येक सिनेमात ते असतं. `इश्क'मध्ये ते आहे.
मध्यंतरापर्यंत हलकंफुलकी प्रेमप्रकरणं सुरू असतात तोवर नायक-नायिका मिळून जो धूमाकूळ घालतात तो अगदीच न बघण्यासारखा नाही. अनु मलिकनं `खेल'मधलं `ना है जमी' हे गाणं इंटरल्यूडसकट ढापून `नींद चुराई मेरी' हे गाणं बेतलंय. बाबा सहगलचं `मिस लोवा लोवा' ही जसंच्या तसं वापरलंय. ती आधीच हिट असल्यानं आताही ऐकणीय आहेत. `देखो देखो जानम' हे गाणं खरोखरीच गोड चालीचं `हमको तुमसे प्यार है' हे गाणंही हिट. त्यात सिनेमात कसलाच आगापिछा नसलेली श्वेता मेनन नाचून जाते. उन्मादक नाच होऊन जातो. व्हॉट एल्स डू यू वॉन्ट मॅन?
 आमिर खानला मध्येमध्ये नॉन्सेन्स सिनेमात काम करण्याची लहर येते. तो `इश्क'मध्ये गरजेनुरुप लाऊड काम करून जातो. जुहीला दंगा आवडतोच. अजय देवगणच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ही भूमिकाही डिसेंट वाटते, हे त्याचं कमनशीब. काजोलनं तर `हमेशा'सारख्या टुकार सिनेमातही मन लावून अभिनय केला होता. `इश्क' त्यापेक्षा बराच म्हणावा लागेल.
  कॅमेऱयासमोर काय घडावं, हे ठरवण्याचा अधिकार सिनेमॅटोग्राफर बाबा आझमीला नाही. समोर जे घडतं ते उत्तम प्रकारे चित्रित करण्याचं काम तो चोख बजावतो. इश्क है, इश्क है' या विरहगीतात प्रकाशयोजनेच्या माध्यमातून दु:खार्त मूड गडदही करून दाखवतो. त्याला स्कोप तेवढाच.
 हिंदी सिनेमा पाहण्याचं म्हणजे दगडावर डोकं आपटायचं काम आपण इतके दिवस इतक्या इमानेइतबारे, नेटानं, स्वेच्छेनं आणि आनंदानं करत आलो आहोत. इतर हिंदी सिनेमांच्या तुलनेत `इश्क' दगडापेक्षा मऊ `वीट' ठरतो, हा आपल्या दुर्भाग्याचा कळस आहे. त्याबद्दल तक्रार करणं हे टकलावर कावळा शिटल्यावर त्रागा करण्याइतकंच निरर्थक आहे.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment