Thursday, May 5, 2011

एक जादू होनेवाला है… (छोटा चेतन)


आपल्यापासून फूटभर अंतरावर येऊन ठेपलेला पडद्यावरचा लांबलचक त्रिशूळ, मोटारीतून जाताजाता वात्रट पोरानं वॉटरबॅगची पिचकारी करून आपल्या अंगावर उडवलेलं पाणी, नाकासमोर आलेल्या कोनमधून मांडीवर ठिबकल्यासारखं भासणारं आईस्क्रीम, धनुष्यातून सुटून थेट आपल्या मस्तकाचा वेध घ्यायला निघालेले अग्नीबाण, कॅबरे नर्तिकेनं फेकलेला आणि आपल्याच मांडीवर येऊन पडल्यासारखा वाटणारा लाल रुमाल, थिएटरभर विखुरलेली स्वप्नदृश्यातली सावरीची बोंड, आपल्याला घेरून आणि भारून टाकणारा धुपाचा धूर...
 थ्री-डीची (त्रिमिती तंत्राची) जादू आजही कायम आहे. अजूनही त्या त्रिशूळाला आपण घाबरतो, पाण्याची पिचकारी पडल्यावर कपडे झटकतो, आईस्क्रीमचा कोन तोंडाला पाणी आणतो, कॅबरेवालीचा रुमाल आपल्याला ओशाळवतो, झुप्पकन् अंगावर येणारा अग्नीबाण पाह्यल्यावर ओठातून नकळत किंकाळीच फुटते आणि सावरीची `म्हातारी' पकडायला हात नकळत पुढे झेपावतात.
  बारा-पंधरा वर्षांनतर पुनरागमन केलेला `छोटा चेतन' पुन्हा पाहताना अगदी पहिल्या वेळी, लहानपणी तो पाहिला होता, तेव्हाचा थरारक अनुभव पुन्हा तस्साच भिडतो, ही गंमतच आहे. एका पिढीच्या अंतरानंतर नव्या रूपात परतलेल्या `छोटा चेतन'चे आजचे छोटे प्रेक्षक त्रिमिती तंत्राच्या मायाजालाचा अनुभव प्रथमच घेताहेत. त्यांची तर थिएटरमध्ये सॉलिड धमाल होते. पडद्यावर घडणारं सर्व काही एका अंतरावरून पाहण्याची सवय असणाऱया या बच्चेकंपनीला आपण प्रत्यक्ष घटनास्थळीच असण्याचा हा भास वेडच लावतो.
  अर्थात, त्रिमिती तंत्राचा पुरेपूर वापर करून घेणारी जादूई कथा हे `छोटा चेतन'चं बलस्थान आहे. तसं नसतं तर `थ्रीडी'ची किमया असूनही जॅकीचा `शिवा का इन्साफ' बेदम आपटला नसता. तीन शाळकरी मित्रमैत्रिणींच्या कंपूला एका पडक्या वाडय़ातलं भूत त्यांच्या वयाच्या बालमित्राच्या, छोटय़ा चेतनच्या रूपात भेटतं, फक्त त्यांनाच दिसणारा आणि इतरांसाठी अदृश्य असणारा चेतन ज्या गंमतीजंमती करतो आणि घडवून आणतो, त्यांचा धमाल अनुभव म्हणजे `छोटा चेतन'.
  `छोटा चेतन'ला पहिलेपणाचा खूप मोठा फायदा मिळाला. थ्रीडीचं तंत्रच भारतात या सिनेमानं आणल्यानं या तंत्राबद्दल उत्सुकता असणाऱया सर्व प्रेक्षकांचा प्रतिसाद त्याला लाभला. मधल्या काळात थ्रीडी सिनेमा बनविण्या-दाखविण्यासाठी करावा लागणारा तांत्रिक काथ्याकूट, चित्रपटगृहांमध्ये नवा पडदा-प्रोजेक्टर बसविणे, चष्मे वाटणे, निर्जंतुक करणे वगैरे भानगडी आणि त्या करूनही `शिवा का इन्साफ'च्या वाटय़ाला आलेलं अपयश यामुळे एकही थ्रीडी सिनेमा निघालेला नाही. त्यामुळे, पुन्हा आजच्या छोटय़ा पिढीसाठीही `छोटा चेतन' हाच त्यांनी पाहिलेला पहिला थ्रीडी सिनेमा ठरणार.
  या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठविण्यासाठी `छोटा चेतन' मध्ये ऊर्मिला मातोंडकर, शक्ती कपूर, हरीश, रवी वासवानी, सतीश कौशिक यांचं एक उपकथानक आणि अनु मलिकच्या संगीतातली नवीकोरी गाणी चपखलपणे मूळ `छोटा चेतन'ला जोडण्यात आली आहेत. `छोटा चेतन' प्रथम आला तेव्हा `बच्चे' असणाऱया आता (कदाचित) `बाप' झालेल्या प्रेक्षकांसाठी `थ्रीडीमध्ये ऊर्मिला' हे खास आकर्षण जोडलेलं असणार बहुतेक. ऊर्मिलाच थ्रीडीतलं प्रथम दर्शन आणि तिच्या सुकोमल हातांमधून प्रेक्षकात भिरकावलं जाणारं गुलाबाचं फूल बच्चेकंपनीच्या किंकाळ्याबरोबर `बाप' कंपनीमध्ये सुस्कारे निर्माण करतं.
 गाण्यांमध्ये कोलगेट कॅल्सीगार्ड, एस्सेल वर्ल्ड, कॅडबरीची केलेली बटबटीत जाहिरातबाजी वगळली, तर हा नवा जोड मूळ कथानकात परफेक्ट मिसळून गेला आहे. विशेषत: सिनेमाच्या सुरुवातीला आणि शेवटी तर मूळ प्रसंग आणि नवे प्रसंग `एकाच वेळी' घडत असतात, पण `छोटा चेतन' प्रथमच पाहणाऱया प्रेक्षकाला काय नवं आणि काय जुनं, हे समजणारही नाही.
  शिवाय, मुलांचं घराच्या भिंती चढून, छतावर उलटं नाचत म्हटलेलं गाणं, दारूच्या गुत्त्यातल्या हवेत नाचणाऱया बाटल्या, शाळेच्या वर्गात `छोटा चेतन'नं उडवलेली धमाल हे प्रसंग आजही ताजे टवटवीत वाटतात.
सुट्टीत मुलांना काय काय दाखवायचं, याची यादी करताना `छोटा चेतन' विसरून चालणार नाही.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment